अविनाशी वाटणारे पाणअस्वल
अविनाशी वाटणारे पाणअस्वल
जपानमधील सावध राहा! लेखकाकडून
◼ जगातील कोणत्याही पाणथळीत—शेवाळ, बर्फ, ओहोळे, गरम पाण्याचे झरे, तलाव, महासागर आणि कदाचित तुमच्या घराच्या मागच्या दलदलीत—तुम्हाला सर्व सृष्टीतील सर्वात चिवट लहानसा प्राणी, ज्याला पाणअस्वल म्हणतात, तो दिसेल. पाणअस्वल इतका लहान असतो की तो पटकन् दिसतसुद्धा नाही. याच्या शरीराचे चार भाग करता येतात. ते बुटके असते आणि त्याच्यावर संरक्षक त्वचा असते. त्याला आठ पाद असतात आणि प्रत्येक पादाच्या शेवटी नख्या असतात. हा प्राणी दिसायला आणि त्याच्या चालण्याची पद्धत रेटत चाललेल्या अस्वलासारखी असल्यामुळे त्याला पाणअस्वल हे नाव पडले आहे.
पाणअस्वले टार्डीग्रेड्स आहेत अर्थात “मंदगतीने चालणारे” प्राणी आहेत. याच्या शेकडो जाती ज्ञात आहेत. मादी एका वेळेला १ ते ३० अंडी घालते. मूठभर ओल्या वाळूत किंवा मातीत हे लहान प्राणी हजारोंच्या संख्येने आढळतील. हे प्राणी सापडण्याचे सर्वात उत्तम ठिकाण म्हणजे, छपरांवर वाढणारे शेवाळ.
पाणअस्वले सर्वात प्रतिकूल हवामानातही जिवंत राहू शकतात. एन्सायक्लोपिडिआ ब्रिटॅनिका मध्ये त्यांच्याविषयी असे म्हटले आहे: “काही पाणअस्वलांना आठ दिवस एका पोकळीत ठेवण्यात आले त्यानंतर तीन दिवस हेलियम वायुत साधारण तापमानात आणि नंतर अनेक तासांसाठी -२७२°से. (-४५८°से.) तापमानात ठेवण्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा साधारण तापमान असलेल्या खोलीत आणल्यानंतर ते जणू काय पुन्हा जिवंत झाले.” जितकी क्ष-किरणे मनुष्याकरता प्राणघातक ठरतील त्यापेक्षा शंभरपट पाणअस्वले सहन करू शकतात. आणि त्यांना अवकाशात पाठवल्यास तेथील पोकळीतही कदाचित ते काही काळापर्यंत जिवंत राहू शकतील!
ते निष्क्रिय अवस्थेत जात असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही ते जिवंत राहू शकतात, हे त्यांचे रहस्य आहे. त्यांची चयापचय क्रिया ०.०१ टक्क्यांहून कमी म्हणजे ज्याचा तपास लावणे सुद्धा मुश्किल जाते इतकी कमी होते. या अवस्थेत जाताना ते आपले पाय आपल्या शरीरात ओढून घेतात, शरीरातून जितके पाणी गेले आहे त्याच्या जागी एका विशिष्ट प्रकारची साखर उत्पन्न करतात आणि टन नावाच्या एका चिमुकल्या, मेणाचे आवरण असलेल्या गोळ्यात अंगाची मुटकळ करतात. जेव्हा, सामान्य तापमान होते तेव्हा ते काही मिनिटे किंवा काही तासांच्या आत पुन्हा सक्रिय होतात. एकदा तर, १०० वर्षांपासून अचेतनावस्थेत असलेल्या काही पाणअस्वलांना यशस्वीरीत्या पुन्हा जिवंत करण्यात आले!
होय, हे चिमुकले “सरपटणारे प्राणी” स्वतःच्या शांत परंतु अद्भुत पद्धतीने यहोवाची स्तुती करतात.—स्तोत्र १४८:१०, १३. (g ३/०७)
[३० पानांवरील चित्राचे श्रेय]
© Diane Nelson/Visuals Unlimited