निद्रावस्थेत असलेल्या राक्षसाच्या पुढ्यांत
निद्रावस्थेत असलेल्या राक्षसाच्या पुढ्यांत
पूर्वीपासून लोकांना ज्वालामुखी काहीतरी गूढ आहेत असे वाटत राहिले आहे. ज्वालामुखी कित्येक शतके सुप्तावस्थेत राहू शकतात आणि अचानक त्यांचा उद्रेक होऊन ते भव्य दिसू शकतात किंवा विनाशकारी देखील ठरू शकतात. ज्वालामुखीचा उद्रेक काही मिनिटांतच शहराबाहेरचा परिसर आणि प्राणीजीवन बेचिराख करू शकतो.
ज्वालामुखी विनाशकारी असतात, हे कोणीही अमान्य करणार नाही. गेल्या अवघ्या तीन शतकात ज्वालामुखींनी लाखो लोकांचा बळी घेतला आहे. अर्थात आपल्यातील बहुतेक जण, या निद्रावस्थेत असलेल्या राक्षसांपासून दूर राहतात. तरीपण पृथ्वीवरील कोट्यवधी लोक सक्रिय ज्वालामुखींच्या पुढ्यांत राहतात. उदाहरणार्थ, एक्वादोरची राजधानी क्वीटो, शहराच्या उत्तरपश्चिम ठिकाणी असलेल्या पिचींचा या ज्वालामुखीपासून जवळच आहे. माऊंट पोपोकाटेपेट्ल, ज्याचा अर्थ अझटेक भाषेत “धूममूख पर्वत” असा होतो तो, मेक्सिको सिटीपासून सुमारे ६० किलोमीटर दूर आहे. ऑकलंड, न्यूझीलंड, नेपल्स आणि इटलीची मोठमोठी शहरे, एकतर ज्वालामुखी शंकूंच्या तोंडावर किंवा त्यांच्या पायथ्याशी वसली आहेत. एकूणच, कोट्यवधी लोक एका धोक्याच्या परिस्थितीतच राहत आहेत. पृथ्वीच्या पोटातील शक्तींचा केव्हाही भयंकर स्फोट होऊ शकतो; जणू काय, निद्रा घेत असलेला राक्षस जागा होऊ शकतो.
महाभयंकर राक्षस
नेपल्सचे रहिवासी सुमारे ३,००० वर्षांपासून माऊंट व्हेसुव्हियसच्या पुढ्यांत राहत आहेत. हा पर्वत नेपल्सपासून फक्त ११ किलोमीटर दूर आहे. हा शंकूच्या आकाराचा ज्वालामुखी प्राचीन मॉन्टे सोमाच्या कडांच्या आत आहे. व्हेसुव्हियस ज्वालामुखी पृथ्वीवरील सर्वात धोकादायक ज्वालामुखींपैकी गणला जातो. याचा तळ समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे हा पर्वत दिसतो त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे.
माऊंट व्हेसुव्हियसचा अनेकदा उद्रेक झाला आहे. त्याचा पहिला उद्रेक सा.यु. ७९ मध्ये झाला होता ज्यात पाँपई व हर्क्यूलेनियम या शहरांचा नाश झाला होता व त्यानंतर त्याचा ५० वेळा स्फोटक उद्रेक झाला आहे. १६३१ मध्ये झालेल्या विनाशकारी उद्रेकात जवळजवळ ४,००० लोक मृत्यूमूखी पडले. त्यावेळेला “लाव्हा” हा शब्द प्रचारात रूढ झाला. लॅटिन भाषेतून आलेल्या लाबी या शब्दाचा अर्थ, “घसरणे” असा होतो. या नावारुपाने हा लाव्हारस खरोखरच व्हेसुव्हियसच्या सरळ उभ्या उतारांवरून खाली घसरत जातो.
अनेक शतकांपासून व्हेसुव्हियसचा अनेकदा उद्रेक होत राहिला आहे. १९४४ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्याचा उद्रेक झाला तेव्हा मित्रसैन्याचे राखेच्या वर्षावाने स्वागत झाले. जवळची मासा आणि सॅन सबास्त्यानो या गावांवर
आणि एका इटॅलियन लोकगीतात लोकप्रिय असलेल्या “फुनीकुली, फुनीकुला” या डोंगरकडांवरून जाणाऱ्या केबल रेल्वेवर राखेचा वर्षाव झाला.आज, नेपल्सच्या रहिवाशांना, धोक्याच्या इतक्या जवळ राहण्याची कसलीही पर्वा आहे असे वाटत नाही. ऐतिहासिक स्थळे व वास्तुशिल्पे पाहून पर्यटक आश्चर्यचकीत होतात. दुकानांमध्ये व कॅफेमध्ये लोकांची वर्दळ चालू आहे. नेपल्सच्या महासागरातील अनेक जहाजांची रहदारी चालू आहे. व्हेसुव्हियस हे, निद्रावस्थेत असलेला राक्षस यापेक्षा लोकप्रिय व निरुपद्रवी ठिकाण आहे असे लोकांना वाटते.
ऑकलंड—ज्वालामुखींचे शहर
न्यूझीलंडमधील ऑकलंड या बंदर असलेल्या शहरात अनेक ज्वालामुखी शंकू आहेत. होय, येथील १० कोटीपेक्षा अधिक जनता ४८ लहानमोठ्या ज्वालामुखींच्या आसपास राहते. प्राचीन ज्वालामुखींमुळे तयार झालेल्या दऱ्यांचे दोन बंदरे तयार झाली आहेत; ज्वालामुखींमुळे येथे द्वीप तयार झाले आहेत. यांत, रंगितोतो हा ६०० वर्षांचा उठून दिसणारा द्वीप आहे ज्याचा आकार व्हेसुव्हियससारखाच दिसतो. ज्वालामुखीमुळे हा द्वीप तयार झाला तेव्हा जवळचेच एक माओरी गाव राखेखाली पुरले गेले.
ऑकलंडच्या रहिवाशांना ज्वालामुखींची जणू काय सवयच झाली आहे. माऊंगाकेके नावाचा एक ज्वालामुखी आज एक सार्वजनिक बाग व मेंढरांचे फार्म आहे व ऑकलंडच्या अगदी
मध्यभागी आहे. काही ज्वालामुखींचे आता तलाव, बागा किंवा खेळांची मैदाने बनली आहेत. एक ज्वालामुखी कब्रस्थान बनले आहे. पुष्कळ रहिवासी ज्वालामुखी पर्वतांच्या उतारांवर राहणे पसंत करतात जेथून त्यांना नेत्रसुखद देखावे पाहायला मिळतात.पहिल्यांदा माओरी आणि १८० वर्षांपूर्वी युरोपियन लोक ऑकलंडमध्ये राहायला आल्यानंतर, कोणाच्याही मनात, हे ज्वालामुखीचे ठिकाण आहे, हा विचार देखील आला नाही. उलट, लोकांनी पाहिले, की इथे राहायला जागा आहे शिवाय ती समुद्राजवळ आहे आणि सुपीक आहे. जगाच्या इतर भागातही, जेथे जेथे ज्वालामुखी होतात तेथील जमीन मात्र खरोखरच सुपीक असते. उदाहरणार्थ, इंडोनेशियामध्ये भात-शेती करण्याकरता सर्वात उत्तम समजली जाणारी जमीन, पूर्वी सक्रिय असलेल्या ज्वालामुखींजवळची आहे. पश्चिम संयुक्त संस्थानांत सकस कृषी भागात, ज्वालामुखींनी तयार झालेली जमीन आहे. उद्रेक झाल्यानंतर, लाव्हाखालच्या जमिनीत अनुकूल परिस्थितीत वर्षभराच्या आतच वनस्पती चांगली वाढू शकते.
धोक्याच्या सूचना
पुष्कळ लोकांच्या मनात असा प्रश्न येतो, ‘पण, ज्वालामुखीच्या जवळ राहणे हे धोक्याचे नाही का?’ होय आहे. पण शास्त्रज्ञ, भूकंप आणि ज्वालामुखींच्या कार्याची जवळून पाहणी करू शकतात. जसे की, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे ही वेधशाळा, जगातील सक्रिय ज्वालामुखींचे निरीक्षण करते. यांत नेपल्स आणि ऑकलंड येथील ज्वालामुखींचा देखील समावेश होतो जेथे, ज्वालामुखीचा उद्रेक झालाच तर, तातडीच्या सेवा उपलब्ध आहेत. २४ तास चालणारे उपग्रहीय ग्लोबल पोझिशनींग सिस्टम्स आणि सिसमोमीटर नेटवर्क्सचा उपयोग करून शास्त्रज्ञ चुंबकीय व जमिनीखालच्या हालचालींचा शोध लावू शकतात.
व्हेसुव्हियसचे सतत निरीक्षण केले जात आहे. धोके टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून इटॅलियन अधिकाऱ्यांनी, १६३१ मध्ये झालेल्या उद्रेकासदृश्य स्फोट झालाच तर तातडीच्या प्रसंगी काय करायचे यांच्या योजनाही करून ठेवल्या आहेत. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे, की धोक्याच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना उद्रेक होण्यापूर्वी धोक्याची सूचना देऊन हलवता येऊ शकते.
ऑकलंड, शास्त्रज्ञ ज्याला एकजननिक ज्वालामुखी क्षेत्र म्हणतात त्या क्षेत्रात आहे. या क्षेत्रात, सुप्तावस्थेत असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक होत नाही तर एका नवीन ज्वालामुखीचा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी उद्रेक होऊ शकतो. पुष्कळ दिवस ते पुष्कळ आठवड्यांदरम्यान अनेक भूकंप होऊन गेल्यानंतरच्या कालावधीत नवीन ज्वालामुखीचा उद्रेक होऊ
शकतो. या आगाऊ सूचनेमुळे लोकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्यास वेळ मिळेल.धोक्यांवर लक्ष ठेवणे
ज्वालामुखींचे निरीक्षण करणे हे जबाबदारीचे काम असले तरी, धोक्याच्या सूचनांकडे जर लक्ष देण्यात आले नाही तर या निरीक्षणांचा काहीही उपयोग होणार नाही. १९८५ साली, कोलंबियातील आरमेरो येथील अधिकाऱ्यांना, नेवाडो डेल रुईझ या ज्वालामुखीच्या स्फोटक उद्रेकाची पूर्वसूचना देण्यात आली होती. पण गावापासून सुमारे ५० किलोमीटर दूर असलेला हा डोंगर जेव्हा कांपत होता तेव्हा गावातील लोकांना, शांत राहण्यास सांगण्यात आले. संपूर्ण शहरावर उडालेल्या मातीच्या फवाऱ्यात २१,००० पेक्षा अधिक लोक मृत्यूमूखी पडले.
अशाप्रकारच्या दुर्घटना क्वचितच घडत असल्या तरी, उद्रेकांचा मधला काळ, आणखी संशोधन व तयारी करण्यासाठी वापरण्यात आला आहे. यामुळे, सतत निरीक्षण, पुरेशी तयारी आणि जनजागृती यांमुळे, निद्रावस्थेत असलेल्या राक्षसाच्या पुढ्यांत राहणाऱ्यांचे धोके कमी करता येतात. (g २/०७)
[२४ पानांवरील चौकट/चित्र]
तयार राहा!
एखाद्या नैसर्गिक विपत्तीसाठी तुम्ही तयार आहात का? तुमच्या क्षेत्रातील धोक्यांच्या परिस्थितीबाबत सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांची ताटातूट झालीच तर तुम्ही सर्व कोणत्या ठिकाणी पुन्हा एकत्र भेटणार आणि तुम्ही नेमके कोठे आहात हे कोणाला कळवणार याची आधीच तयारी करा. तातडीच्या प्रसंगी लागणाऱ्या वस्तू जसे की, अन्न व पाणी, प्राथमिक उपचार, कपडे, रेडिओ, वॉटरफ्रूप फ्लॅशलाईट आणि ज्यादा बॅटरींचा समावेश असू शकतो. पुरेशा प्रमाणात या वस्तू बाळगा जेणेकरून अनेक दिवसांपर्यंत तुम्हाला त्या पुरतील.
[२३ पानांवरील चित्र]
व्हेसुव्हियसच्या मुख्य कुंडाशेजारून जाणारे पर्यटक
[चित्राचे श्रेय]
©Danilo Donadoni/Marka/age fotostock
[२३ पानांवरील चित्र]
नेपल्स, इटलीतील माऊंट व्हेसुव्हियसच्या समोर
[चित्राचे श्रेय]
© Tom Pfeiffer
[२३ पानांवरील चित्र]
सा.यु. ७९ मध्ये झालेल्या स्फोटक उद्रेकाचे एका कलाकाराचे कल्पनाचित्र; या उद्रेकात पाँपई व हर्क्यूलेनियम शहरे बेचिराख झाली
[चित्राचे श्रेय]
© North Wind Picture Archives
[२४ पानांवरील चित्र]
रंगितोतो, ऑकलंडच्या अनेक ज्वालामुखी द्वीपांपैकी एक
[२४, २५ पानांवरील चित्रे]
वर आणि उजवीकडे खाली: माऊंट पोपोकाटेपेट्ल, मेक्सिको
[चित्राचे श्रेय]
AFP/Getty Images
Jorge Silva/AFP/Getty Images
[२२ पानांवरील चित्राचे श्रेय]
USGS, Cascades Volcano Observatory