कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | तरुण
कसा कराल मोहाचा सामना?
इतकं कठीण का?
“कधीकधी मुली माझा फोन नंबर मागतात आणि एकांतात भेटून ‘थोडीशी ऐश’ करूया असं म्हणतात. मी सॉरी म्हणून तिथून निघून जातो. पण मनात कुठंतरी वाटत राहतं, ‘तिला नंबर दिला असता तर?’ काही मुली खरंच खूप खास असतात. त्यामुळं वाटतं, ‘दिला असता नंबर तर काय बिघडलं असतं?’”—१६ वर्षांचा चार्ल्स. *
चार्ल्सप्रमाणे तुम्हालाही मोहाचा सामना करणं कठीण जातं का? असल्यास, निराश होऊ नका. तुम्ही नक्कीच त्यावर मात करू शकता.
मोहाबद्दल काय माहीत असलं पाहिजे?
मोह कुणालाही होऊ शकतो—अगदी मोठ्यांनासुद्धा. कारण मोह वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. बायबलचा लेखक पौल यानं पुढील शब्द लिहिले तेव्हा तो तरुण नव्हता: “[मी] देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो; तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.” (रोमकर ७:२२, २३) चुकीची गोष्ट करण्याचा मोह होत असतानाही पौल त्यावर मात करू शकला. त्यामुळं तुम्हीसुद्धा करू शकता. तुम्हाला तुमच्या वासनांचे गुलाम होण्याची गरज नाही. (१ करिंथकर ९:२७) तरुण असतानाच मोहाचा सामना करण्यास शिकलात तर तुम्हाला कमी त्रास होईल; शिवाय प्रौढ झाल्यावर तुमच्यासमोर येणाऱ्या मोहाचा तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे सामना करू शकाल.
इंटरनेट, टीव्ही, चित्रपट यांमुळं मोहाला उत्तेजन. बायबल म्हणतं की तरुणपणाच्या वासना मुळात खूप प्रबळ असतात आणि ते खरं आहे. (२ तीमथ्य २:२२) पण, जग मात्र या वासनांना उत्तेजन देतं. तरुणांकरता असलेले चित्रपट, संगीत, टीव्ही कार्यक्रम आणि पुस्तकं यांतून हेच दाखवलं जातं की मोहाला बळी पडणं मुळीच चुकीचं नाही. उदाहरणार्थ, एखाद्या चित्रपटातील दोन व्यक्ती ‘प्रेमात पडल्या’ तर पुढं जाऊन त्या नक्कीच लैंगिक संबंध ठेवतील असं आपण म्हणू शकतो. पण, वास्तविक जीवनातले स्त्री-पुरूष “दैहिक वासनांपासून” दूर राहू शकतात असं बायबल म्हणतं. (१ पेत्र २:११) याचाच अर्थ तुम्ही मोहाचा सामना करू शकता. पण तो कसा कराल?
तुम्ही काय करू शकता?
स्वतःच्या कमतरता ओळखा. साखळीतली एक जरी कडी कमकुवत असली तर साखळी तुटू शकते; तसंच आपल्यात एक जरी कमतरता असली तर योग्य ते करण्याचा आपला निर्धार कमकुवत होऊ शकतो. तेव्हा, तुम्ही कोणत्या गोष्टींत कमजोर पडू शकाल ते ओळखा आणि त्या बाबतीत काळजी घ्या.—बायबलचं तत्त्व: याकोब १:१४.
मनाची तयारी करा. अशा प्रसंगांचा विचार करा ज्यांत तुम्हाला मोह होण्याची शक्यता आहे. एखादा मोहाचा प्रसंग समोर आलाच तर त्याचा सामना कसा कराल याची मनातल्या मनात तयारी करा.—बायबलचं तत्त्व: नीतिसूत्रे २२:३.
आपल्या मतांवर ठाम राहा. प्राचीन काळातील योसेफ नावाच्या तरुणावर लैंगिक अनैतिक कृत्य करण्याचा दबाव आला तेव्हा तो म्हणाला: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” (उत्पत्ति ३९:९) ‘मी हे कसं करू?’ असं जे योसेफानं म्हटलं त्यावरून कळतं की योग्य काय आणि अयोग्य काय याबद्दल त्याची ठाम मतं होती. तुमचीही मतं अशीच ठाम आहेत का?
चांगले मित्र निवडा. तुमच्या नैतिक मतांचा आदर करतील असे मित्र तुम्ही निवडले तर जीवनात येणारे अनेक मोह तुम्ही टाळू शकाल. बायबल म्हणतं: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील.”—नीतिसूत्रे १३:२०.
मोहाचा सामना करणं कठीण जाईल असे प्रसंग टाळा. जसं की:
-
विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत एकटं असण्याचं टाळा.
-
पोर्नोग्राफी (अश्लील साहित्य) पाहण्याचा मोह होईल अशा ठिकाणी किंवा अशा वेळी इंटरनेट वापरण्याचं टाळा.
-
जे लोक आपल्या वागण्या-बोलण्यातून हे दाखवतात की चुकीच्या गोष्टी करण्यात वेगळीच मजा आहे अशांपासून दूर राहा.
मोहाला बळी पडू नये म्हणून तुम्ही स्वतःसाठी काय ठरवू शकता?—बायबलचं तत्त्व: २ तीमथ्य २:२२.
मदतीसाठी प्रार्थना करा. येशू ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांना म्हटलं: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” (मत्तय २६:४१) खरंतर तुम्ही मोहावर मात करावी अशी यहोवा देवाची इच्छा आहे; आणि त्यासाठी तो तुम्हाला मदत करायलाही तयार आहे. बायबल म्हणतं: “तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल, यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.”—१ करिंथकर १०:१३. ▪ (g14-E 10)
^ परि. 4 नाव बदलण्यात आलं आहे.