मुख्य विषय
देव खरंच आहे का? हे जाणून तुम्हाला काय फायदा होईल?
जगातल्या अनेकांचं असं म्हणणं आहे: ‘देव आहे की नाही, माहीत नाही; आणि असला तरी काय फरक पडतो?’ उदाहरणार्थ, फ्रान्समध्ये राहणारा एर्वे म्हणतो: “मी देवाला मानतोपण आणि नाहीपण. मला वाटतं, आयुष्य जगायला डोकं लागतं, देव नाही.”
असेही काही लोक आहेत ज्यांचं मत जरा वेगळं आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत राहणारा जॉन म्हणतो: “माझे आईवडील देवाला मानत नव्हते; त्यामुळं देव आहे की नाही याबद्दल माझं स्वतःचं असं मत नव्हतं. पण, कधीकधी प्रश्न पडायचा, ‘असेल का जगात देव?’”
असा प्रश्न कधी तुम्हाला पडला का? निसर्गात पाहायला मिळणाऱ्या सुरेख समतोलाचा विचार करा. शास्त्रीय माहितीनुसार, पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी हा समतोल अगदी पोषक आहे. तसंच, निर्जीव वस्तूपासून सजिवांची उत्पत्ती होणं शक्य नाही हे पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. निर्माणकर्ता असल्याशिवाय हे शक्य झालं असतं का?—“ पुराव्याचं परीक्षण करा,” ही चौकट पाहा.
देव आहे याबद्दलच्या माहितीचं आणि पुराव्याचं परीक्षण केल्यास देव खरंच आहे का, ही शंका तुमच्या मनात राहणार नाही. उलट, ते जाणून घेतल्यामुळं तुम्हाला अनेक फायदे होतील. चार फायदे विचारात घ्या.
१. अर्थपूर्ण जीवन
जीवनाला आणखीनही काही अर्थ असेल का? आणि असलाच तर त्यामुळं आपल्या जीवनात काही फरक पडेल का? हे आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण जर कोणी निर्माणकर्ता असेल आणि आपल्याला त्याची कल्पनाच नसेल, तर जगातलं सगळ्यात महत्त्वाचं सत्य आपल्याला माहीत नाही असा याचा अर्थ होईल.
बायबलनुसार, देव आपला जीवनदाता आहे. (प्रकटीकरण ४:११) या माहितीमुळं आपल्या जीवनाला अर्थ कसा लाभू शकतो? याबद्दल बायबल काय म्हणतं ते लक्षात घ्या.
मानव हा सर्व प्राणिमात्रात श्रेष्ठ आहे. बायबल असं शिकवतं, की देवानं आपल्याला त्याच्यासारखं बनवलं आहे. दुसऱ्या शब्दांत, त्यानं आपल्याला त्याच्यासारखे गुण दाखवण्याच्या क्षमतेसह बनवलं आहे. (उत्पत्ति १:२७) बायबल असंही शिकवतं, की मानव देवाशी जवळचा नातेसंबंध जोडू शकतात. (याकोब २:२३) निर्माणकर्त्यासोबत अशी जवळीक साधल्यानंच जीवनाला खरा अर्थ लाभू शकतो.
देवाशी जवळीक साधण्याचे आणखी काय फायदे आहेत? आपण त्याच्याशी मनातलं बोलू शकतो. तो आपलं ऐकेल आणि आपल्या मदतीला धावून येईल याची खातरी आपण बाळगू शकतो. (स्तोत्र ९१:१५) देवाशी जवळचा नातेसंबंध जोडल्यानं एखाद्या गोष्टीबद्दल तो कसा विचार करतो हे आपल्याला समजू शकतं; आणि त्यामुळं जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची खातरीलायक उत्तरं आपल्याला मिळू शकतात.
जर कोणी निर्माणकर्ता असेल आणि आपल्याला त्याची कल्पनाच नसेल, तर जगातलं सगळ्यात महत्त्वाचं सत्य आपल्याला माहीत नाही असा याचा अर्थ होईल
२. मनाला दिलासा
उदाहरणार्थ, जगातली दुष्टाई पाहून काहींना देवावर विश्वास ठेवणं कठीण जातं. त्यांना प्रश्न पडतो: ‘निर्माणकर्ता जर इतका शक्तिशाली आहे तर दुष्टाईबद्दल, दुःखाबद्दल तो काही करत का नाही?’
याचं दिलासादायक उत्तर बायबलमध्ये दिलं आहे. ते म्हणतं, की मानवांनी दुःख भोगावं अशी देवाची मुळीच इच्छा नव्हती. देवानं मानवाला बनवलं तेव्हा दुःख काय असतं, मरण काय असतं हे मानवाला माहीतसुद्धा नव्हतं. (उत्पत्ति २:७-९, १५-१७) यावर विश्वास ठेवणं कदाचित कठीण वाटेल किंवा ते निव्वळ स्वप्न वाटेल. पण एका प्रेमळ, शक्तिशाली निर्माणकर्त्याकडून अशाच जीवनाची आपण अपेक्षा करू शकतो, नाही का?
मग प्रश्न आहे, की मानव आज इतक्या दुःखात का? बायबल म्हणतं, की देवानं मानवाला रोबोटसारखं बनवलं नव्हतं; चांगलं काय, वाईट काय यातून निवड करण्याचं स्वातंत्र्य त्याला दिलं होतं. पण, पहिलं मानवी जोडपं आदाम आणि हव्वा यांनी देवाचं मार्गदर्शन झिडकारलं आणि स्वतःच्या इच्छेनुसार जगण्याचा स्वार्थी मार्ग निवडला. (उत्पत्ति ३:१-६, २२-२४) सबंध मानवजात त्या जोडप्यापासूनच आली आहे; त्यांनी देवाचं मार्गदर्शन नाकारलं आणि त्याचेच दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत.
देवानं मुळात मानवांना दुःख भोगण्यासाठी बनवलं नव्हतं हे जाणून मनाला किती दिलासा मिळतो! पण, आपल्याला या दुःखातून सुटका आणि भविष्यासाठी एक सुंदर आशा हवी आहे.
३. भविष्यासाठी आशा
पहिल्या मानवी जोडप्यानं देवाचं मार्गदर्शन नाकारण्याद्वारे त्याच्याविरुद्ध बंड केलं. त्यानंतर देवानं लगेच वचन दिलं, की मानवांबद्दल असलेला त्याचा मूळ उद्देश तो भविष्यात नक्कीच पूर्ण करेल. देव शक्तिशाली असल्यामुळं कोणतीही गोष्ट त्याच्या उद्देशाच्या आड येऊ शकत नाही. (यशया ५५:११) मानवानं केलेल्या बंडामुळं जे नुकसान झालं ते देव लवकरच भरून काढेल व पृथ्वी आणि मानव यांच्याबद्दल असलेला त्याचा मूळ उद्देश पूर्ण करेल.
यामुळं तुम्हाला काय मिळेल? भविष्यात देवाकडून अनेक आशीर्वाद! त्यांपैकी दोन आशीर्वादांचा आपण विचार करूया. बायबल म्हणतं:
-
दुष्टाई नाहीशी होईल आणि सबंध पृथ्वीवर शांती असेल. “थोडक्याच अवधीत दुष्ट लोक नाहीसे होतील; ते शोधूनही सापडणार नाहीत. परंतु जे देवासमोर स्वतःला नम्र करतात, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल आणि ते विपुल शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:१०, ११, सुबोधभाषांतर.
-
आजारपण आणि मृत्यू नाहीसा होईल. “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) “तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो, प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो.”—यशया २५:८.
देवानं दिलेली ही वचनं नक्की पूर्ण होतील असा भरवसा आपण का बाळगू शकतो? कारण बायबलमध्ये दिलेल्या अनेक भविष्यवाण्या तंतोतंत पूर्ण झाल्या आहेत. अर्थात, ही वचनं भविष्यात पूर्ण होणार आहेत; पण आत्ताचं काय? दुःखाचा सामना करण्यासाठी देव आज आपल्याला कशी मदत करतो?
४. निर्णय घेण्यास मार्गदर्शन व समस्यांचा सामना करण्यास मदत
जीवनात आपण अनेक निर्णय घेत असतो; काही लहान, तर काही मोठे. चांगले निर्णय घेण्यासाठी आणि समस्यांचा सामना करण्यासाठी देव आपल्याला मार्गदर्शन पुरवतो. हे सगळ्यात उत्तम मार्गदर्शन आहे! कारण, मागं काय घडलं आणि पुढं काय घडेल हे फक्त आपला निर्माणकर्ताच सांगू शकतो; शिवाय, तोच आपला जीवनदाता आहे. त्यामुळं आपल्यासाठी सगळ्यात चांगलं काय हे त्यालाच माहीत आहे.
बायबल हे माणसांनी लिहिलं असलं तरी त्यात यहोवा देवाचेच विचार आहेत, कारण देवानंच त्यांना ते लिहिण्याची प्रेरणा दिली होती. बायबलमध्ये आपण असं वाचतो: “जो तुला तुझे हित साधायला शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यातच जो तुला चालवतो तो मीच यहोवा तुझा देव आहे.”—यशया ४८:१७, १८, पं.र.भा.
देवाजवळ अमर्याद शक्ती आहे आणि तो मानवांच्या हितासाठी तिचा उपयोग करू इच्छितो. बायबलमध्ये म्हटलं आहे, की देव हा मदतीसाठी धावून येणाऱ्या प्रेमळ पित्यासारखा आहे. ते म्हणतं: “स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक ११:१३) देवाकडून मिळणाऱ्या या शक्तीमुळं आपल्याला मार्गदर्शन आणि मदत मिळू शकते.
तुम्हाला ती कशी मिळवता येईल? याचं उत्तर बायबल देतं: “देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) देव आहे याची खातरी पटण्यासाठी स्वतः पुराव्यांचं परीक्षण करणं गरजेचं आहे.
तुम्ही परीक्षण कराल का?
देव आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी वेळ दिला, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अमेरिकेत स्थायिक झालेल्या स्यूजिन सीऑ या चीनी व्यक्तीचा अनुभव विचारात घ्या. तो म्हणतो: “मी खरंतर उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवायचो; पण, बायबलबद्दल मला कुतूहल होतं. त्यामुळं मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास सुरू केला. त्या वेळी मी खूप आनंदी असायचो. पुढं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मी इतका व्यस्त झालो की फक्त नावापुरता बायबलचा अभ्यास करायचो. पण, मी पहिल्यासारखा आनंदी नव्हतो. म्हणून मी पुन्हा गांभीर्यानं बायबल अभ्यास करू लागलो; तेव्हा कुठं माझा हरवलेला आनंद मला परत मिळाला.”
आपला निर्माणकर्ता, यहोवा देव याच्याबद्दल तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचंय का? मग त्यासाठी आवर्जून वेळ काढा. ▪ (g15-E 03)