शौलाने ख्रिश्चनांचा छळ का केला?
शौलाने ख्रिश्चनांचा छळ का केला?
‘मला खरोखर वाटत असे की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्या; आणि तसे मी यरुशलेमेत केलेहि; मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात कोंडून टाकले; आणि त्यांचा घात होत असताना मी संमति दिली. प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शासन करून त्यांना दुर्भाषण करण्यास लावण्याचा प्रयत्न मी करीत असे; त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरापर्यंत देखील मी त्यांचा पाठलाग करीत असे.’—प्रेषितांची कृत्ये २६:९-११.
होते तार्सकर शौल, उर्फ प्रेषित पौल याचे शब्द. अर्थात, त्याने असे म्हटले तेव्हा तो पूर्वीसारखा राहिलेला नव्हता. आता तो ख्रिस्ती धर्माचा विरोधक नव्हे, तर त्याचा एक अत्यंत आवेशी पुरस्कर्ता बनला होता. पण मग आधी शौलाने ख्रिस्ती लोकांचा छळ का केला? अशा गोष्टी “कराव्या” असे त्याला का वाटायचे? शिवाय यातून आपण काही शिकू शकतो का?
स्तेफनाला दगडमार
शौलाचा बायबल अहवालांत पहिल्यांदा उल्लेख हा स्तेफनाची हत्या करणाऱ्यांसोबत येतो. “मग ते [स्तेफनाला] शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली.” “शौलाला तर त्याचा वध मान्य होता.” (प्रेषितांची कृत्ये ७:५८; ८:१) स्तेफनावर ही दगडमार का झाली? काही यहुद्यांनी, ज्यांत किलिकियातील यहुदी देखील होते, स्तेफनाशी वितंडवाद घातला पण त्यांच्याने त्याला तोंड देववेना. किलिकियाचाच असलेला शौल देखील यांच्यापैकी होता किंवा नाही हे सांगितलेले नाही. या लोकांनी स्तेफनावर देवाविरुद्ध दुर्भाषण करण्याचा आरोप लावण्यासाठी खोट्या साक्षीदारांना उभे केले आणि त्याला धरून न्यायसभेपुढे नेले. (प्रेषितांची कृत्ये ६:९-१४) महायाजकाच्या अध्यक्षतेखाली चालणारी ही न्यायसभा यहुदी उच्च न्यायालयाच्या भूमिकेत होती. सर्वोच्च धार्मिक अधिकार असणाऱ्या या न्यायसभेचे सदस्य आपल्या धार्मिक सिद्धान्तांत कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये म्हणून त्यांची रक्षा करीत. त्यांच्या मते स्तेफन हा मृत्यूदंडास पात्र होता. त्यांच्यावर नियमशास्त्र न पाळण्याचा आरोप लावण्याची त्याने हिंमत केली होती. (प्रेषितांची कृत्ये ७:५३) नियमशास्त्र कसे पाळायचे, आता ते त्याला शिकवणार होते!
शौलाचे स्वतःचे धार्मिक विश्वास लक्षात घेता, त्याचेही त्यांच्यासोबत सहमत असणे साहजिक होते. तो एक परूशी होता. परूशांचा प्रबळ पंथ, नियमशास्त्र आणि परंपरा यांचे काटेकोर पालन करण्याच्या मताचा समर्थक होता. आणि त्यांच्या मते, येशूच्याद्वारे तारणाचा एक नवा मार्ग शिकवणारा ख्रिस्ती धर्म त्यांच्या रूढ सिद्धान्तांच्या अगदीच विरोधात होता. पहिल्या शतकातील यहुदी लोकांचा मशीहाविषयी असा समज होता की तो एक वैभवी राजा असेल आणि त्यांना रोमी लोकांच्या सत्तेपासून मुक्त करील. त्यामुळे, ज्याला महान न्यायसभेने देवाविरुद्ध दुर्भाषण करण्याच्या आरोपात दोषी ठरवले होते आणि ज्याला एखाद्या शापित गुन्हेगारासारखे वधस्तंभावर खिळण्यात आले होते, असा माणूस मशीहा असू
शकतो ही कल्पना त्यांच्यासाठी अतिशय विचित्र, अस्वीकारणीय आणि तिरस्करणीय होती.नियमशास्त्रात असे सांगितले होते, की वधस्तंभावर टांगलेल्या मनुष्यावर “देवाचा शाप असतो.” (अनुवाद २१:२२, २३; गलतीकर ३:१३) फ्रेडरिक एफ. ब्रूस यांच्या विवेचनाप्रमाणे शौलाच्या दृष्टिकोनातून “हे शब्द येशूच्या बाबतीत अगदी खरे होते. तो देवाच्या शापाने मृत्यू पावला होता आणि त्यामुळे तो मशीहा असणे शक्यच नव्हते; कारण पारंपरिक यहुदी शिकवणीनुसार मशीहावर देवाचा सर्वाधिक आशीर्वाद असणार होता. त्यामुळे स्वतःला मशीहा म्हणवणे देवाविरुद्ध दुर्भाषण करण्यासारखे होते, आणि असा हास्यास्पद दावा करून देवाविरुद्ध दुर्भाषण करणारे शिक्षेस पात्र होते.” शौलाने स्वतः नंतर कबूल केल्याप्रमाणे, ‘वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताची कल्पनाही यहूद्यांस अडखळण अशी होती.’—१ करिंथकर १:२३.
शौलाने या शिकवणीचा अतिशय दृढनिश्चयाने, होईल तितका प्रतिकार करण्याचे ठरवले. आणि या शिकवणीचे नामोनिशाण मिटवून टाकण्यासाठी तो क्रूर पद्धतींचा वापर करणार होता. हीच देवाची इच्छा आहे याची त्याला पूर्ण खातरी होती. आपल्या भावना व्यक्त करताना शौलाने म्हटले: “आस्थेविषयी म्हणाल तर [मी] मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.” “मी देवाच्या मंडळीचा पराकाष्टेचा छळ करीत असे व तिचा नाश करीत असे; आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायांविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो.”—फिलिप्पैकर ३:६; गलतीकर १:१३, १४.
छळ करण्यात अग्रेसर
स्तेफनाच्या मृत्यूनंतर, शौल केवळ छळ करणाऱ्यांना मदत करणारा नव्हे तर स्वतः छळ करण्यात अग्रेसर असल्याचे आपल्याला आढळते. आणि यासाठी तो कुप्रसिद्ध झाला असावा, कारण त्याचे धर्मपरिवर्तन झाल्यावरही जेव्हा तो शिष्यांबरोबर मिळण्यामिसळण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा “हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते.” (तिरपे वळण आमचे.) पण तो खरोखर एक ख्रिस्ती आहे हे स्पष्ट झाल्यानंतर शिष्यांना त्याच्या धर्मपरिवर्तनाबद्दल आनंद झाला आणि त्यांनी देवाची उपकारस्तुती केली कारण त्यांच्या ऐकण्यात आले की पूर्वीच्या कोणा सर्वसाधारण विरोधकाचे मन बदलले नव्हते, तर “पूर्वी आपला छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करीत असे, त्याची तो आता घोषणा करीत आहे.” (तिरपे वळण आमचे.)—प्रेषितांची कृत्ये ९:२६; गलतीकर १:२३, २४.
दिमिष्क हे जेरुसलेमपासून जवळजवळ २२० किलोमीटर अंतरावर होते, म्हणजे पायी गेल्यास सात ते आठ दिवसांचा प्रवास. तरीसुद्धा “प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयींचे फूत्कार टाकीत” शौल महायाजकाकडे गेला आणि त्याने त्याच्याकडून दिमिष्कातल्या सभास्थांनाना पत्रे मागितली. कशासाठी? तर ‘तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीहि त्याला आढळल्यास त्यांना बांधून यरुशलेमेस आणण्यासाठी.’ अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर शौल “मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाहि धरून आणून तुरुंगात टाकीत असे.” इतर काहींना तो ‘सभास्थानांत मारहाण करीत असे’ आणि त्यांचा घात होत असताना “त्यांच्याविरुद्ध [त्याने आपले] मत नोंदविले.” (शब्दशः, “मत नोंदविण्याचा खडा टाकला”).—प्रेषितांची कृत्ये ८:३; ९:१, २, १४; २२:५, १९; २६:१०, इझी टू रीड व्हर्जन, तळटीप, NW.
शौलाला गमालिएलाकडे मिळालेले शिक्षण आणि आता तो ज्याप्रकारे अधिकाराचा वापर करीत होता, हे लक्षात घेता काही विद्वानांचे असे म्हणणे आहे की शौल आता नियमशास्त्राचा निव्वळ एक विद्यार्थी राहिला नव्हता, त्याची उन्नती होऊन आता यहूद्यांच्या धार्मिक वर्तुळात त्याला एक मानाचे स्थान होते. उदाहरणार्थ, एका लेखकाने असा अनुमान लावला की कदाचित शौल एखाद्या यहुदी सभास्थानात शिक्षक असावा. पण, शौलाने ‘आपले मत नोंदविले’ हे न्यायालयाचा एक सदस्य या नात्याने की ख्रिस्ती लोकांच्या मृत्यूदंडाला नैतिक पाठिंबा देणारा या नात्याने—निश्चित सांगता येणार नाही. *
सुरवातीचे सर्व ख्रिस्ती एकतर यहुदी किंवा यहुदी मतानुसारी असल्यामुळे, ख्रिस्ती धर्म म्हणजे यहुदी धर्मातलीच एक धर्मत्यागी चळवळ आहे असा शौलाचा समज होता; आणि प्रेषितांची कृत्ये २६:११) एक मार्ग होता तुरुंगात डांबणे. दुसरा होता सभास्थानांत फटके मारणे; तीन न्यायाधीशांच्या कोणत्याही स्थानिक न्यायालयात रब्बींच्या अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा देण्याची ही एक सर्वसामान्य पद्धत होती.
आपल्या धर्माच्या अनुयायांना ताळ्यावर आणणे ही अधिकृत यहुदी धर्माची जबाबदारी आहे, या मताचा तो होता. एरलंड जे. हल्टग्रन या विद्वानाच्या म्हणण्यानुसार, “ख्रिस्ती धर्म हा यहुदी धर्माच्या बाहेरचा एक धर्म आहे, एक प्रतिस्पर्धी धर्म आहे या दृष्टिकोनातून छळवादी पौल ख्रिस्ती धर्माचा विरोध करत नसावा. त्याच्या आणि इतरांच्या नजरेतही ख्रिस्ती धार्मिक चळवळ ही अजूनही यहुदी धर्माच्या अधिकाराखाली होती.” त्यामुळे मार्गभ्रष्ट झालेल्या या यहूद्यांना जबरदस्तीने मागे फिरायला लावून त्यांना कर्मठवादी यहुदी धर्मात परत यायला लावणे हा त्याचा हेतू होता; आणि हे तो कोणत्याही मार्गाने करायला तयार होता. (अर्थात, दिमिष्काच्या मार्गावर येशूने शौलाला दर्शन दिल्यानंतर हे सर्वकाही थांबले. ख्रिस्ती धर्माचा क्रूर वैरी असणारा शौल रातोरात त्याचा आवेशी समर्थक बनला आणि काही काळातच दिमिष्कातले यहुदी त्याचाच घात करण्याची संधी शोधू लागले. (प्रेषितांची कृत्ये ९:१-२३) काय विसंगती झाली पाहा. शौलाने छळ करणाऱ्याच्या भूमिकेतून जे अत्याचार केले होते तेच आता ख्रिस्ती बनल्यावर त्याला स्वतःला सोसावे लागणार होते. बऱ्याच वर्षांनी तो म्हणाला: “पाच वेळा मी यहूद्यांच्या हातून एकुणचाळीस फटके खाल्ले.”—२ करिंथकर ११:२४.
आवेश नेहमीच योग्य नसतो
परिवर्तन झाल्यानंतर पौल या नावाने सुप्रसिद्ध झालेल्या शौलाने असे लिहिले: “मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेविले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली.” (१ तीमथ्य १:१३) तेव्हा, एखादा आपल्या धर्माचा प्रांजळ आणि सक्रिय उपासक असला तरीसुद्धा त्याला देवाची स्वीकृती असेलच असे नाही. शौलही आवेशी होता आणि तो आपल्या विवेकाला योग्य वाटणाऱ्या मार्गाने चालत होता, पण म्हणून त्याने जे केले ते योग्य होते असे म्हणता येणार नाही. तो आपला ज्वलंत आवेश भलत्याच मार्गाने प्रकट करत होता. (पडताळा रोमकर १०:२, ३.) ही विचार करण्यासारखी बाब आहे.
आजही बऱ्याच लोकांचा असा ठाम विश्वास आहे, की देवाला त्यांच्याकडून केवळ सदाचरणाची अपेक्षा आहे. पण हे खरे आहे का? पौलाचा हा सल्ला सर्वांनी लक्ष देण्याजोगा आहे: “सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा;” (१ थेस्सलनीकाकर ५:२१) याचा अर्थ देवाच्या सत्य वचनातील अचूक ज्ञान आत्मसात करण्यासाठी वेळ काढून तंतोतंत त्या ज्ञानानुसार चालणे आवश्यक आहे. बायबलचे परीक्षण केल्यानंतर आपल्या जीवनात काही बदल करण्याची गरज आहे असे आपल्याला दिसून आल्यास आपण अवश्य हे बदल केले पाहिजेत, तेही उशीर न करता. कदाचित आपण कोणीही आधी पौलाइतके देवाची निंदा करणारे, किंवा छळ करणारे किंवा उद्दाम नसू. तरीसुद्धा, आपल्याला त्याच्यासारखा देवाचा अनुग्रह मिळवायचा असेल, तर ते केवळ एका मार्गाने आपल्याला करता येईल आणि तो म्हणजे, विश्वासाने आणि अचूक ज्ञानायोगे चालणे.—योहान १७:३, १७.
[तळटीपा]
^ एमील श्यूरर यांच्या येशू ख्रिस्ताच्या युगातील यहुद्यांचा इतिहास (सा.यु. १७५-इ.स. १३५) (इंग्रजी) या पुस्तकात सांगितल्यानुसार यहूद्यांच्या मिश्ना ग्रंथात, एकाहत्तर सदस्यांच्या न्यायसभेतील अर्थात महान्यायसभेतील न्यायपद्धतींविषयी जरी माहिती नसली तरीसुद्धा २३ सदस्यांच्या खालच्या न्यायसभेच्या न्यायपद्धतींविषयी त्यात अगदी सविस्तर माहिती आहे. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खालच्या न्यायसभेत चालणाऱ्या देहांतदंड मुकदम्यांना उपस्थित राहण्याची परवानगी होती; या मुकदम्यांत केवळ आरोपीच्या बाजूने बोलण्याची त्यांना परवानगी होती, त्याच्या विरुद्ध बोलण्याची त्यांना परवानगी नव्हती. जे देहांतदंड अपराधाचे खटले नव्हते, त्यांत त्यांना आरोपीच्या बाजूने किंवा विरुद्धही बोलण्याची मुभा असे.