व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पहारेकऱ्‍यासोबत सेवा करणे

पहारेकऱ्‍यासोबत सेवा करणे

पहारेकऱ्‍यासोबत सेवा करणे

“प्रभू, मी दिवसा बुरुजावर एकसारखा उभा असतो, रात्रीच्या रात्री आपल्या चौकीवर काढितो.”—यशया २१:८.

१. कोणत्या अद्‌भुत आशीर्वादांची यहोवा स्वतः हमी देतो?

यहोवा आपले सर्व उद्देश सिद्धीस नेणारा देव आहे. त्याचा विरोधी बनलेला स्वर्गदूत दियाबल सैतान त्याच्या महान उद्देशाच्या पूर्णतेत कोणताही अडथळा आणू शकत नाही; यहोवा आपल्या उद्देशानुसार आपल्या नावाचे पवित्रीकरण करेल आणि पृथ्वीचे एका सुंदर बागेत रूपांतर करून त्यावर आपल्या वैभवी राज्याची स्थापना करील. (मत्तय ६:९, १०) त्या राज्यात मानवजातीला अद्‌भुत आशीर्वाद मिळतील. यहोवा ‘मृत्यू कायमचा नाहीसा करील, प्रभू परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रू पुसेल.’ यापुढे सर्वजण मिळून आनंद, शांती आणि समृद्धी यांचा सर्वकाळ उपभोग घेतील. (यशया २५:८; ६५:१७-२५) स्वतः यहोवा या अभिवचनांच्या पूर्णतेची हमी देतो!

२. पृथ्वीवर यहोवाने कोणाचा साक्षीदार म्हणून उपयोग केला आहे?

पृथ्वीवरही महान निर्माणकर्त्या यहोवाचे साक्षीदार आहेत. ख्रिस्त येण्याआधीच्या काळात सर्वात पहिला साक्षीदार होता हाबेल. त्याच्या नंतर अनेक साक्षीदार होऊन गेले, अर्थात, आपण एका “मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो.” जीवनातल्या अतिशय कठीण अडथळ्यांनाही धीराने तोंड देऊन हे सर्व साक्षीदार जीवनाच्या शर्यतीत धावत राहिले. त्यांचा उत्कृष्ट आदर्श आजच्या काळातील निष्ठावान खिश्‍चनांना विश्‍वासू राहण्याचे प्रोत्साहन देतो. पण यहोवाचा सर्वात निर्भीड साक्षीदार कोणी असेल, तर तो होता ख्रिस्त येशू. (इब्री लोकांस ११:१–१२:२) पंतय पिलातापुढे शेवटच्या वेळी उभे करण्यात आले तेव्हा तो काय म्हणाला होता याकडे लक्ष द्या. तो म्हणाला: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) सा.यु. ३३ पासून या सा.यु. २००० सालापर्यंत आवेशी ख्रिश्‍चन येशूच्या पावलावर पाऊल ठेवून ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ निर्भयपणे साक्ष देत राहिले आहेत.—प्रेषितांची कृत्ये २:११.

बॅबिलोनमध्ये उदयास आलेला खोटा धर्म

३. यहोवाविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी दिलेली साक्ष खोटी ठरवण्याचा सैतानाने कसा प्रयत्न केला?

हजारो वर्षांपासून, यहोवाचा सर्वात मोठा शत्रू दियाबल सैतान, देवाच्या साक्षीदारांचा संदेश खोटा ठरवण्याचा दुष्ट प्रयत्न करत राहिला आहे. “लबाडीचा बाप” असलेला हा “मोठा अजगर . . . जुनाट साप,” आजवर ‘सर्व जगाला ठकवित आला आहे.’ खासकरून या शेवटल्या काळात, ‘देवाच्या आज्ञा पाळणाऱ्‍यांचा’ त्याने सतत विरोध केला आहे.—योहान ८:४४; प्रकटीकरण १२:९, १७.

४. मोठ्या बाबेलचा उदय कशाप्रकारे झाला?

सुमारे ४,००० वर्षांपूर्वी, नोहाच्या काळातील जलप्रलयानंतर सैतानाने निम्रोद नावाच्या ‘बलवान पारध्याला’ यहोवाच्या विरोधात उभे केले. (उत्पत्ति १०:९, १०) निम्रोदाचे प्रसिद्ध बॅबिलोन (बाबेल) शहर दुरात्मिक धर्मांचे माहेरघर बनले. यहोवाने बाबेलच्या बुरुजाचे बांधकाम करणाऱ्‍यांच्या भाषेत गोंधळ केल्यावर ते लोक सबंध पृथ्वीवर पांगले आणि त्यांनी आपले खोटे धर्म देखील आपल्यासोबत नेले. अशारितीने बॅबिलोन हे सबंध जगातल्या खोट्या धर्माच्या साम्राज्याचे उगमस्थान ठरले आणि म्हणूनच या खोट्या धर्मांच्या साम्राज्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात मोठी बाबेल असे म्हणण्यात आले आहे. आणि याच पुस्तकात या प्राचीन काळात उदयास आलेल्या धार्मिक साम्राज्याचा विनाशही भाकीत केला आहे.—प्रकटीकरण १७:५; १८:२१.

साक्षीदारांचे राष्ट्र

५. यहोवाने कोणत्या राष्ट्राला आपले साक्षीदार होण्यासाठी एकत्रित केले, पण त्याने त्यास दुसऱ्‍या राष्ट्राच्या हाती का जाऊ दिले?

निम्रोदाच्या काळानंतर सुमारे ५०० वर्षांनी यहोवाने विश्‍वासू अब्राहामाच्या संततीला एकत्रित करून इस्राएल राष्ट्र निर्माण केले. हे राष्ट्र पृथ्वीवर यहोवाच्या साक्षीदाराची भूमिका पार पाडणार होते. (यशया ४३:१०, १२) या राष्ट्रातील अनेकांनी यहोवाची एकनिष्ठपणे सेवा केली. पण कालांतराने इस्राएलची उपासना आसपासच्या राष्ट्रांच्या खोट्या धार्मिक विश्‍वासांमुळे भ्रष्ट झाली. यहोवाचे करारबद्ध लोक त्याची उपासना करण्याऐवजी खोट्या दैवतांची पूजा करू लागले. त्यामुळे सा.यु.पू. ६०७ सालात नबूखदनेस्सर राजाच्या नेतृत्वाखाली आलेल्या बॅबिलोनच्या सैन्याने जेरूसलेम शहर आणि तेथील मंदिर नष्ट केले आणि बहुतेक यहुद्यांना त्यांनी बॅबिलोनला बंदी बनवून नेले.

६. यशयाच्या भविष्यवाणीतील यहोवाच्या पहारेकऱ्‍याने कोणती सुवार्ता घोषित केली आणि ही भविष्यवाणी केव्हा पूर्ण झाली?

हा खोट्या धर्मांचा मोठा विजय होता! परंतु बॅबिलोन राष्ट्राचा वरचष्मा फार काळ टिकला नाही. यहोवाने २०० वर्षांआधीच हुकूम दिला: “जा एक टेहळणारा ठेव; त्याच्या नजरेस पडेल ते त्याने कळवावे.” या पहारेकऱ्‍याने कोणती घोषणा केली? “बाबेल पडला हो पडला; त्याच्या देवांच्या सर्व मूर्ति जमिनीवर आपटून फोडिल्या.” (यशया २१:६,) आणि तसेच घडले. सा.यू.पू. ५३९ साली हे भाकीत खरे ठरले. बॅबिलोनचे शक्‍तिमान राष्ट्र पडले आणि देवाच्या करारबद्ध लोकांना लवकरच आपल्या मायदेशी परत जाता आले.

७. (अ) यहोवाने दिलेल्या शिक्षेमुळे यहुद्यांना कोणता धडा शिकायला मिळाला? (ब) बॅबिलोनच्या बंदिवासातून सुटका झाल्यानंतर यहुदी लोक कोणत्या पाशांना बळी पडले आणि याचा कोणता परिणाम झाला?

मूर्तिपूजा आणि भूतविद्येशी संबंधित असलेल्या धर्मांचे अनुकरण केल्यामुळे किती भयंकर परिणाम होतात याचा चांगला धडा बॅबिलोनहून परत आलेल्या यहूद्यांना मिळाला होता. पण कालांतराने ते वेगळ्या प्रकारच्या पाशांत अडकले. काहीजण ग्रीक तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली आले. तर इतर काहींना देवाच्या वचनापेक्षा मानवी परंपरा महत्त्वाच्या वाटू लागल्या. आणखी काहीजण राष्ट्रवादाला बळी पडले. (मार्क ७:१३; प्रेषितांची कृत्ये ५:३७) येशूच्या जन्मापर्यंत हे राष्ट्र शुद्ध उपासनेपासून पूर्णपणे दुरावले होते. यहुदी राष्ट्रापैकी काही लोकांनी येशूने घोषित केलेल्या सुवार्तेला प्रतिसाद दिला असला तरीसुद्धा राष्ट्र या नात्याने इस्राएली लोकांनी येशूला स्वीकारले नाही आणि त्यामुळे देवाने देखील त्यांना अव्हेरले. (योहान १:९-१२; प्रेषितांची कृत्ये २:३६) इस्राएल लोक आता देवाचे साक्षीदार राहिले नाहीत आणि सा.यु. ७० साली जेरूसलेम आणि येथील मंदिर पुन्हा एकदा नष्ट करण्यात आले; आणि यावेळी त्यांना नष्ट करणारे रोमी सैन्य होते. —मत्तय २१:४३.

८. कोण यहोवाचे साक्षीदार बनले आणि या साक्षीदारांना पौलाने दिलेला इशारा अतिशय समयोचित का होता?

दरम्यान, ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारले होते अशा लोकांनी मिळून बनलेले ‘देवाचे इस्राएल,’ उदयास आले होते आणि हे राष्ट्र आता इतर राष्ट्रांपुढे देवाचे साक्षीदार या नात्याने कार्य करणार होते. (गलतीकर ६:१६) लगेच सैतानाने या नव्या आध्यात्मिक राष्ट्रालाही भ्रष्ट करण्याचे धूर्त प्रयत्न सुरू केले. पहिल्या शतकाच्या समाप्तीपर्यंत मंडळ्यांमध्ये फुटीरवादाची चिन्हे दिसू लागली होती. (प्रकटीकरण २:६, १४, २०) पौलाने अगदी योग्य वेळी त्यांना ताकीद दिली: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्‍यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.”—कलस्सैकर २:८.

९. पौलाने इशारा दिल्याप्रमाणे कोणत्या कारणांमुळे ख्रिस्ती धर्मजगत अस्तित्वात आले?

काळाच्या ओघात ग्रीक तत्त्वज्ञान, बॅबिलोनी धार्मिक समजुती, आणि त्यानंतर उत्क्रांतीवाद आणि हाइयर क्रिटीसिझम यांसारख्या मानवी ‘बुद्धीवादांमुळे’ तथाकथित ख्रिस्ती धर्म दूषित झाला. पौलाने हे आधीच भाकीत केले होते: “मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हापैकीहि काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) या धर्मत्यागामुळेच ख्रिस्ती धर्मजगत अस्तित्वात आले.

१०. ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मत्यागी शिकवणुकींवर आधारित असलेल्या उपासनेला सर्वांनी शरणागती पत्करली नव्हती हे कशावरून दिसून आले?

१० शुद्ध उपासनेला खऱ्‍या अर्थाने निष्ठावान असणाऱ्‍यांना ‘एकदाच पवित्रांना सोपून दिलेला विश्‍वास राखण्यास फार झटावे’ लागले. (यहुदा ३, पं.र.भा.) यामुळे शुद्ध उपासनेची आणि यहोवाविषयीची साक्ष देणारे या पृथ्वीवरून नाहीसे झाले का? नाही. तथाकथित ख्रिस्ती धर्मातील धर्मत्यागी शिकवणुकींवर आधारित असलेल्या उपासनेला सर्वांनीच शरणागती पत्करली नव्हती; आणि विद्रोही सैतान आणि त्याच्या सर्व कार्यांचा अंत जवळ आला तसतसे हे आणखीन स्पष्ट होत गेले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातल्या पिट्‌सबर्ग शहरात बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या काही प्रांजळ विद्यार्थ्यांनी स्वतःला संघटित केले आणि तोच आधुनिक काळात यहोवाच्या साक्षीदार वर्गाचा केंद्रबिंदू ठरला. या ख्रिस्ती विद्यार्थ्यांनी सध्याच्या जागतिक व्यवस्थेची समाप्ती जवळ आली असल्याचे बायबलमध्ये सापडणाऱ्‍या पुराव्याच्या आधारावर जगाला सांगितले. बायबलच्या भविष्यवाणीनुसार १९१४ साली या जगाच्या ‘समाप्तीची’ सुरवात झाली; त्या वर्षी पहिले महायुद्ध पेटले तेव्हा याला पुष्टी मिळाली. (मत्तय २४:३, ७) त्या वर्षानंतर घडलेल्या घटनांवरून हे अगदी स्पष्टपणे सिद्ध झाले की सैतानाला आणि त्याच्या सर्व दुरात्म्यांना स्वर्गातून बाहेर फेकण्यात आले होते. २० व्या शतकात एका पाठोपाठ एक आलेल्या असंख्य संकटांनी तर अगदी स्पष्टपणे हे दाखवून दिले आहे, की सैतान आता पूर्ण आवेशाने कार्य करत आहे आणि येशूच्या वैभवशाली उपस्थितीचे तसेच त्याला स्वर्गीय राज्याचा अधिकार मिळाला आहे हे दाखवणारे चिन्ह पूर्ण झाले आहे.—मत्तय, अध्याय २४ व २५; मार्क, अध्याय १३; लूक, अध्याय २१; प्रकटीकरण १२:१०, १२.

११. सैतानाने काय करण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न कशाप्रकारे फोल ठरला?

११ एकोणीसशे अठरा सालच्या जून महिन्यात सैतानाने त्या बायबल विद्यार्थ्यांचे कार्य (एव्हाना ते बऱ्‍याच देशांमध्ये प्रचार कार्य करीत होते) पूर्णपणे थांबवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यांची अधिकृत संस्था वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी देखील नामशेष करण्याचा त्याने प्रयत्न केला. संस्थेच्या जबाबदार अधिकाऱ्‍यांना अटक करण्यात आली, आणि पहिल्या शतकात येशूवर लावण्यात आला होता त्याप्रमाणे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप लावण्यात आला. (लूक २३:२) पण १९१९ साली, या अधिकाऱ्‍यांची सुटका करण्यात आली; यामुळे त्यांना आपली सेवा पुन्हा सुरू करणे शक्य झाले. नंतर त्यांच्याविरुद्ध केलेले सर्व आरोप मागे घेण्यात आले.

‘टेहळणाऱ्‍याने’ आपले काम विश्‍वासूपणे केले

१२. यहोवाच्या पहारेकरी वर्गात आज कोण सामील आहेत किंवा आधुनिक काळातील “टेहळणारा” कोण आहे आणि ते कशी मनोवृत्ती बाळगतात?

१२ अशारितीने, ‘अंतसमयाची’ सुरवात झाली तेव्हा यहोवाने आपल्या उद्देशांच्या पूर्ततेशी संबंधित असलेल्या घटनांविषयी लोकांना सतर्क करण्यासाठी पुन्हा एकदा एक टेहळणी करणारा नेमला. (दानीएल १२:४; २ तीमथ्य ३:१) आणि आजपर्यंत, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या या पहारेकरी वर्गाने, अर्थात देवाच्या इस्राएलाने यशयाच्या भविष्यवाणीतल्या पहारेकऱ्‍याप्रमाणेच कार्य केले आहे: “त्याने अतिशयित उत्कंठेने कान लाविले. तो सिंहनाद करून म्हणाला, ‘प्रभू, मी दिवसा बुरुजावर एकसारखा उभा असतो, रात्रीच्या रात्री आपल्या चौकीवर काढितो.’” (यशया २१:७, ८) निश्‍चितच आधुनिक दिवसांतल्या या पहारेकऱ्‍याने आपली जबाबदारी विश्‍वासूपणे पार पाडली आहे!

१३. (अ) यहोवाच्या पहारेकऱ्‍याने कोणता संदेश घोषित केला आहे? (ब) मोठी बाबेल पडली असे का म्हणता येते?

१३ या पहारेकऱ्‍याने काय पाहिले? पुन्हा एकदा यहोवाच्या पहारेकऱ्‍याने अर्थात त्याच्या साक्षीदार वर्गाने असे घोषित केले: “बाबेल पडला हो पडला, त्याच्या देवांच्या सर्व मूर्ति [यहोवाने] जमिनीवर आपटून फोडिल्या.” (यशया २१:९) या वेळेस, पहिल्या जागतिक महायुद्धानंतर मोठी बाबेल अर्थात खोट्या धर्माचे साम्राज्य आपल्या उच्च अधिकारपदावरून खाली पडले. (यिर्मया ५०:१-३; प्रकटीकरण १४:८) आणि हे अपेक्षितच होते! कारण त्या ऐतिहासिक लढाईची सुरवात ख्रिस्ती धर्मजगतातच झाली; दोन्ही पक्षाच्या पाळकवर्गाने आपल्या तरुण पिढीला लढाईला जाण्याचे प्रोत्साहन देऊन आगीत तेल ओतण्याचे काम केले. यापेक्षा लज्जास्पद काय असू शकते! मग १९१९ साली बायबल विद्यार्थ्यांनी म्हणजेच आजच्या यहोवाच्या साक्षीदारांनी जेव्हा अक्रियाशीलतेची बंधने तोडून जागतिक साक्षकार्याची मोहीम हाती घेतली तेव्हा मोठी बाबेल त्यांना अडवू शकली नाही. आजही हे जागतिक साक्षकार्य सुरूच आहे. (मत्तय २४:१४) हे मोठ्या बाबेलच्या पतनाचे चिन्ह होते; सा.यु.पू. सहाव्या शतकात इस्राएल राष्ट्राची सुटका हा जसा प्राचीन बाबेलच्या पतनाचा इशारा होता त्याप्रमाणेच हे होते.

१४. यहोवाच्या पहारेकरी वर्गाने कोणत्या नियतकालिकाचा प्रामुख्याने उपयोग केला आहे आणि यहोवाने त्यांना कशाप्रकारे आशीर्वादित केले आहे?

१४ पहारेकरी वर्गाने सुरवातीपासून आतापर्यंत आपले काम मोठ्या उत्साहाने आणि योग्य तेच करण्याच्या उत्कंठेने पूर्ण केले आहे. १८७९ च्या जुलै महिन्यात बायबल विद्यार्थ्यांनी या नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले; तेव्हा याचे नाव झायन्स वॉचटावर ॲन्ड हेरल्ड ऑफ ख्राइस्ट्‌स प्रेसेन्स होते. १८७९ पासून डिसेंबर १५, १९३८ पर्यंत प्रत्येक अंकाच्या मुखपृष्ठावर हे शब्द होते: “‘जागल्या, रात्र किती राहिली?’—यशया २१:११.” * १२० वर्षांपासून या टेहळणी बुरूजावरून सतत जागतिक घटनांचा वेध घेऊन त्यांच्या भविष्यसूचक अर्थाचा खुलासा करण्यात आला आहे. (२ तीमथ्य ३:१-५, १३) देवाच्या पहारेकरी वर्गाने ‘इतर मेढरांपैकी’ असलेल्या आपल्या सोबत्यांबरोबर या नियतकालिकाच्या माध्यमाने सबंध मानवजातीपुढे हे पूर्ण आवेशाने घोषित केले आहे की ख्रिस्ताच्या राज्याकरवी यहोवाच्या सार्वभौमत्वाचे दोषनिवारण होण्याचा समय जवळ आला आहे. (योहान १०:१६) या साक्षकार्यावर यहोवाने आशीर्वाद दिला आहे का? टेहळणी बुरूजच्या पहिल्या अंकाच्या ६,००० प्रती १८७९ साली प्रकाशित झाल्या होत्या; आज या नियतकालिकाच्या प्रत्येक अंकाच्या २,२०,००,००० हून अधिक प्रती सबंध जगात १३२ भाषांतून वितरित केल्या जातात आणि यांपैकी १२१ भाषांतील अंक एकाच वेळी निघतात. जगातले सर्वाधिक वितरण असलेले धार्मिक नियतकालिक खरा देव यहोवा याच्या नावाचे गौरव करते हे योग्यच नाही का?

उत्तरोत्तर शुद्ध केले जाणे

१५. कोणत्या प्रकारे १९१४ च्याही आधी यहोवाच्या उपासकांना उत्तरोत्तर शुद्ध करण्यात आले?

१५ ख्रिस्ताचे स्वर्गीय राज्य १९१४ साली सुरू होण्याआधी जवळजवळ ४० वर्षांच्या काळात बायबल विद्यार्थ्यांनी ख्रिस्ती धर्मजगताच्या, (तान्ह्या बालकांचा बाप्तिस्मा, आत्म्याचे अमरत्त्व, परगेटरी, नरक यातना आणि त्रैक्य, यांसारख्या) बऱ्‍याच गैरशास्त्रीय धर्मसिद्धान्तांच्या विळख्यातून स्वतःला सोडवून घेतले होते. पण अद्यापही सर्व असत्य कल्पनांपासून ते मुक्‍त झाले नव्हते. उदाहरणार्थ, १९२० च्या दशकात बरेच बायबल विद्यार्थी ख्रिस्ताचा क्रूस आणि मुकुट याचे प्रतीक असणारी एक शोभेची पिन लावायचे, तसेच नाताळ आणि इतर धर्मांतील सण देखील ते पाळायचे. पण मूर्तिपूजेपासून पूर्णतः मुक्‍त झाल्याशिवाय उपासना शुद्ध होऊ शकत नाही. ख्रिस्ती व्यक्‍तीच्या विश्‍वासाचा आणि आचरणाचा एकमेव आधार देवाचे वचन अर्थात पवित्र बायबल असले पाहिजे. (यशया ८:१९, २०; रोमकर १५:४) देवाच्या वचनात काही जोडणे किंवा त्यातून काही काढून टाकणे अयोग्य आहे.—अनुवाद ४:२; प्रकटीकरण २२:१८, १९.

१६, १७. (अ) पहारेकरी वर्गाची काही दशकांपर्यंत कोणती खोटी समजूत होती? (ब) ‘मिसर देशातील वेदी आणि स्तंभ’ याचा खरा अर्थ काय आहे?

१६ हे तत्त्व किती महत्त्वाचे आहे हे एका उदाहरणावरून लक्षात येईल. १८८६ साली सी. टी. रस्सेल यांनी एक पुस्तक प्रकाशित केले ज्याचे नाव होते द डिव्हाइन प्लॅन ऑफ दी एजेस. या ग्रंथात एक तक्‍ता होता ज्यात मानवजातीच्या इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांचा इजिप्तच्या ग्रेट पिरॅमिडशी संबंध जोडण्यात आला होता. त्यावेळी असा समज होता की खुफू नावाच्या फारोचे स्मारक असणारे हे पिरॅमिड म्हणजेच यशया १९:१९, २० यात उल्लेख असणारा स्तंभ आहे: “त्या काळी मिसर देशाच्या मध्ये परमेश्‍वरासाठी वेदी होईल, व त्याच्या सीमेवर परमेश्‍वरासाठी स्तंभ होईल. ही मिसर देशात सेनाधीश परमेश्‍वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील.” पण पिरॅमिडचा बायबलशी काय संबंध असू शकतो? या ग्रेट पिरॅमीडमध्ये असणाऱ्‍या काही मार्गांच्या लांबीवरून, मत्तय २४:२१ या वचनातील “मोठे संकट” सुरू होण्याचा काळ सूचित होतो असे त्यावेळी समजले जात होते. काही बायबल विद्यार्थी आपण कोणत्या तारखेला स्वर्गात जाऊ आणि अशाच इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी या पिरॅमिडच्या वेगवेगळ्या भागांचे मोजमाप करण्यात गढून गेले होते!

१७ या पिरॅमिडला काही दशकांपर्यंत शिलारूपात असलेले बायबल म्हणून बरेच महत्त्व दिले गेले; पण मग १९२८ साली टेहळणी बुरूजच्या नोव्हेंबर १५, आणि डिसेंबर १ अंकात स्पष्ट करण्यात आले की मूर्तिपूजक फारो राजांनी बांधलेल्या आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित असणारी दुरात्मिक प्रतिके असलेल्या दगडी इमारतीच्या साहाय्याने बायबलमध्ये दिलेल्या साक्षीला दुजोरा देण्याची यहोवाला गरज नाही. तर, यशयाच्या भविष्यवाणीचा आत्मिक गोष्टींशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. प्रकटीकरण ११:८ येथे “मिसर” हे सैतानाच्या अधिपत्याखाली असलेल्या जगास सूचित करते. “परमेश्‍वरासाठी वेदी” ही आपल्याला अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी या जगात तात्पुरते रहिवासी म्हणून राहताना वाहिलेल्या ग्रहणीय बलिदानांची आठवण करून देते. (रोमकर १२:१; इब्री लोकांस १३:१५, १६) “[मिसर देशाच्या] सीमेवर” असलेला स्तंभ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीला सूचित करतो जी “सत्याचा स्तंभ व पाया” आहे; “मिसर” म्हणजे हे जग ज्याला हे अभिषिक्‍त ख्रिस्ती लवकरच सोडून जाणार आहेत व ज्यात आज ते यहोवाला साक्ष देत आहेत.—१ तीमथ्य ३:१५.

१८. (अ) प्रांजळ बायबल विद्यार्थ्यांना समजण्यासाठी यहोवाने कशाप्रकारे बायबलची सत्ये अधिकाधिक स्पष्ट केली आहेत? (ब) एखाद्या बांधवाला बायबलमधल्या एखाद्या विषयावरील स्पष्टीकरण समजायला कठीण वाटत असेल तर त्याने कशी मनोवृत्ती बाळगणे चांगले ठरेल?

१८ जसजशी वर्षे जात आहेत तसतसे यहोवा सत्याचे उत्तरोत्तर स्पष्टीकरण करत आहे; खासकरून त्याच्या भविष्यसूचक वचनाची अधिक सुस्पष्ट समज आपल्याला देण्यात आली आहे. (नीतिसूत्रे ४:१८) अलीकडच्या वर्षांत अनेक विषयांच्या गहन अर्थाकडे बारकाईने लक्ष देण्याचे उत्तेजन आपल्याला मिळाले; उदाहरणार्थ, अंत येण्यापूर्वी नाहीशी होणार नाही ती पीढी, शेरडे व मेंढरे यांचा दृष्टान्त, अमंगळ पदार्थ आणि तो पवित्रस्थानात केव्हा उभा राहील, नवा करार, रूपांतराचा दृष्टान्त, आणि यहेज्केल पुस्तकातील मंदिराचा दृष्टान्त. ही नवी स्पष्टीकरणे कदाचित समजायला कठीण वाटत असतील, पण त्यामागची कारणे कालांतराने स्पष्ट होतील. जर एखाद्या बांधवाला एखाद्या वचनाचे नवीन स्पष्टीकरण पूर्णपणे समजत नसेल तर त्याने संदेष्ट्या मीखाची मनोवृत्ती बाळगावी, जो म्हणतो: “मी आपल्या तारण करणाऱ्‍या देवाची वाट पाहत राहीन.”—मीखा ७:७.

१९. अभिषिक्‍त शेष जनांनी आणि इतर मेंढरांपैकी असलेल्या त्यांच्या सहकाऱ्‍यांनी या शेवटल्या दिवसांत कशाप्रकारे सिंहासारखे धैर्य दाखवले आहे?

१९ पहारेकऱ्‍याबद्दल काय म्हटले होते ते लक्षात घ्या: “तो सिंहनाद करून म्हणाला, प्रभू, मी दिवसा बुरुजावर एकसारखा उभा असतो, रात्रीच्या रात्री आपल्या चौकीवर काढितो.” (यशया २१:८) खोट्या धर्माची भ्रष्टता उजेडात आणण्यात आणि लोकांना स्वातंत्र्याचा मार्ग दाखवण्यात अभिषिक्‍त शेषांनी सिंहासारखे धैर्य दाखवले आहे. (प्रकटीकरण १८:२-५) अनेक भाषांतून बायबल, नियतकालिके आणि इतर प्रकाशनांच्या रूपात आध्यात्मिक अन्‍न ‘यथाकाळी खावयास देऊन’ त्यांनी ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाची’ आपली भूमिका पार पाडली आहे. (मत्तय २४:४५) तसेच त्यांनी ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या एका मोठ्या लोकसमुदायाला’ एकत्रित करण्यात पुढाकार घेतला आहे. या मोठ्या लोकसमुदायातील सदस्यांनी देखील येशूने खंडणीकरता वाहिलेल्या रक्‍ताने स्वतःला शुद्ध केले आहे आणि सिंहासारखे धैर्य दाखवून ते देखील ‘अहोरात्र देवाची सेवा करीत आहेत.’ (प्रकटीकरण ७:९, १४, १५) यहोवाच्या अभिषिक्‍त साक्षीदारांच्या अद्यापही जिवंत असलेल्या छोट्याशा गटाने व त्यांच्या मोठ्या लोकसमुदायातील सहकाऱ्‍यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना कोणती फलप्राप्ती झाली आहे? आमचा पुढचा लेख यावर प्रकाश टाकेल.

[तळटीपा]

^ परि. 14 जानेवारी १, १९३९ पासून याऐवजी “तेव्हा त्यांस समजेल की, मी परमेश्‍वर [“यहोवा,” NW] आहे.—यहेज्केल ३५:१५” हे वचन मुखपृष्ठावर घालण्यात आले.

तुम्हाला आठवते का?

• यहोवाने साक्ष देण्यासाठी कोणाकोणाचा उपयोग केला आहे?

• मोठी बाबेल कशाप्रकारे उदयास आली?

• यहोवाने आपल्या साक्षीदारांच्या राष्ट्राच्या राजधानी शहराचा, अर्थात जेरुसलेमचा सा.यु.पू. ६०७ आणि सा.यु. ७० मध्ये नाश का होऊ दिला?

• यहोवाच्या पहारेकरी वर्गाने आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांनी कशी मनोवृत्ती दाखवली आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[७ पानांवरील चित्र]

“प्रभू, मी बुरुजावर एकसारखा उभा असतो”

[१० पानांवरील चित्रे]

यहोवाचा पहारेकरी वर्ग आपली जबाबदारी विश्‍वासूपणे पार पाडतो