जेझरील येथे काय सापडले?
जेझरील येथे काय सापडले?
जेझरीलचे प्राचीन शहर कित्येक शतकांपासून ओसाड पडले आहे. एकेकाळी बायबल इतिहासात ते एक प्रमुख शहर होते. आज, स्वतःचे अस्तित्व हरवून बसलेले व जमिनीत गाडले गेलेले हे शहर फक्त मातीचा एक ढिगारा आहे. अलीकडच्या वर्षांत पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी जेझरीलच्या अवशेषांचे परीक्षण करण्यास सुरवात केली आहे. हे अवशेष बायबल अहवालांविषयी कोणती माहिती उजेडात आणतात?
बायबलमधील जेझरील
जेझरील खोऱ्याच्या पूर्वेकडे वसलेले जेझरील शहर प्राचीन इस्राएलमधील सर्वात सुपीक प्रदेशातील एक होते. खोऱ्याच्या अगदी पलिकडे उत्तरेस मोरे टेकडी आहे. इथेच, शास्ता गिदोन आणि त्याच्या सैन्यावर हल्ला करण्याच्या तयारीने मिद्यानी लोकांनी तळ ठोकला होता. पूर्वेकडे गिलबोवाच्या * पायथ्याशी हरोदची विहीर आहे. याच ठिकाणी यहोवाने हजारोंच्या संख्येने असलेले गिदोनाचे सैन्य कमी केले आणि केवळ ३०० लोकांना निवडले. आपल्या लोकांना वाचवण्याकरता कोणत्याही शक्तिशाली सैन्य बलाची गरज नाही हे प्रदर्शित करण्याकरता यहोवाने असे केले. (शास्ते ७:१-२५; जखऱ्या ४:६) जवळच्या गिलबोवा डोंगरावर, इस्राएलचा पहिला राजा शौल याचा एका नाट्यमय युद्धात पलिष्ट्यांनी पराभव केला होता. याच युद्धात योनाथान आणि त्याच्या इतर दोन भावांचाही वध करण्यात आला व खुद्द शौलाने आत्महत्या केली.—१ शमुवेल ३१:१-५.
जेझरील शहरासंबंधी बायबलच्या संदर्भांमध्ये ठळक विरोधाभास दाखवण्यात आले आहेत. इस्राएलच्या शासकांनी आपल्या सत्तेचा केलेला गैरवापर व धर्मत्याग आणि यहोवाच्या सेवकांचा विश्वासूपणा व आवेश यांचा अहवाल त्यांमध्ये दिला आहे. अधिकृत राजधानी शोमरोन असूनही राजा अहाबने जेझरीलमध्येच आपले राजमहल बांधले होते. सा.यु.पू. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात तो इस्राएलच्या उत्तरेकडील दहा-वंशांच्या राज्याचा राजा होता. (१ राजे २१:१) जेझरीलमधूनच अहाबाची विदेशी पत्नी ईजबेल यहोवाचा संदेष्टा एलिया याला जिवे मारायला धमकावत होती. कर्मेल पर्वतावर खऱ्या देवपणाची परीक्षा घेतल्यानंतर एलियाने निडरपणे बआलच्या संदेष्ट्यांची हत्या केली होती म्हणून ती त्याच्यावर चिडून होती.—१ राजे १८:३६–१९:२.
त्यानंतर जेझरील येथे एक गुन्हा घडला. जेझरीलकर नाबोथाची हत्या करण्यात आली. राजा अहाबाचा नाबोथाच्या द्राक्षमळ्यावर डोळा होता. राजाने तो मागितला परंतु एकनिष्ठ नाबोथाने त्याला उत्तर दिले: “माझ्या वाडवडिलाचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.” यावर, अहाब खूप नाराज झाला. राजाचा दुःखी चेहरा पाहून राणी ईजबेलीने ईशनिंदेचा आरोप लावून नाबोथाविरुद्ध खोटा खटला भरला. निष्पाप नाबोथाला दोषी ठरवण्यात आले आणि मरेपर्यंत त्याला दगडमार करण्यात आली व शेवटी अहाबाने त्याचा द्राक्षमळा बळकावला.—१ राजे २१:१-१६.
या दुष्ट कार्यामुळे एलियाने भाकीत केले: “इज्रेलाच्या तटाजवळ ईजबेलीस कुत्री खातील.” आणि त्याने पुढे असे १ राजे २१: २३-२९) एलियानंतर संदेष्टा झालेल्या अलिशाच्या दिवसांत येहूला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्त करण्यात आले, असा अहवाल बायबलमध्ये आहे. जेझरीलला गेल्यावर येहूने, ईजबेलीस तिच्या राजमहालाच्या खिडकीतून खाली टाकावे अशी आज्ञा दिली. खाली टाकल्यावर घोड्यांनी तिला पायदळी तुडवले. नंतर असे दिसून आले, की मांसभक्षक कुत्र्यांनी फक्त तिची कवठी, पाय व हातांचे तळवे सोडून बाकी सर्व खाल्ले होते. (२ राजे ९:३०-३७) बायबलमध्ये जेझरीलशी थेट संबंधित असलेली घटना अहाबाच्या ७० पुत्रांचा वध झाल्यानंतर घडते. येहूने जेझरीलच्या वेशीपाशी त्यांच्या शिरांच्या दोन राशी केल्या व त्यानंतर अहाबाच्या धर्मत्यागी राज्यातील इतर प्रमुख पुरुषांचा व याजकांचाही त्याने वध केला.—२ राजे १०:६-११.
घोषित केले: “अहाबाचा जो कोणी नगरात मरेल त्यास कुत्री खातील . . . अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही; त्याची बायको ईजबेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकिले होते.” पण, एलियाने यहोवाच्या न्यायदंडाची घोषणा केल्यावर अहाबाने स्वतःला लीन केले. त्यामुळे ही शिक्षा अहाबाच्या हयातीत येणार नाही असे यहोवाने घोषित केले. (पुरातत्त्वशास्त्रज्ञांना काय आढळले?
एकोणीशे नव्वद साली, जेझरीलच्या उत्खननाच्या संयुक्त प्रकल्पाची सुरवात झाली. त्यात, टेल-अव्हीव विद्यापीठाच्या पुराणवस्तूशास्त्र संस्थेने (प्रतिनिधी होते डेव्हीड युशीशकीन) आणि जेरुसलेममधील ब्रिटिश पुराणवस्तूशास्त्र शाळेने (प्रतिनिधी होते जॉन वुडहेड) भाग घेतला. १९९०-९६ च्या वर्षांदरम्यान सात मौसमांत (प्रत्येक मौसम सहा आठवड्यांचा होता) ८०-१०० स्वयंसेवकांनी या ठिकाणी येऊन काम केले.
मनात कोणताही पूर्वग्रह किंवा मत न बाळगता, त्या ठिकाणाचे महत्त्व काय याचे परीक्षण करणे हा आजकाल पुरातत्त्वशास्त्राचा विचार आहे. त्यामुळे, बायबलमध्ये ज्या देशांचा उल्लेख आला आहे त्यांचा अभ्यास करणारे पुरातत्त्वशास्त्रज्ञ, अमुक देशाविषयी बायबलमध्ये असलेल्या माहितीवरच समाधान मानत नाहीत. इतर सर्व उगमांचा आणि पुराव्यांचा विचार करून काळजीपूर्वक अंदाज लावूनच हा निर्णय घेतला जातो. परंतु, जॉन वुडहेड म्हणतात की जेझरीलविषयी बायबलमधील काही अध्यायांच्या व्यतिरिक्त इतर प्राचीन लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे बायबलच्या अहवालांचे आणि कालक्रमाचे परीक्षण करावे लागेल. मग पुरातत्त्वशास्त्रज्ञांना काय आढळून आले?
किल्ल्यांचे जसजसे उत्खनन होत गेले व मातीची भांडी जसजशी मिळत गेली तसतसे हे स्पष्ट होत गेले, की हे अवशेष लोहयुगातील आहेत, म्हणजे बायबलच्या काळातील जेझरीलच्याच समयावधीतील होते. परंतु जसजसे उत्खनन चालू राहिले तसतसे नवनवीन आश्चर्यकारक गोष्टी पुढे येऊ लागल्या. पहिली गोष्ट म्हणजे, त्या ठिकाणाचा आकार आणि त्याच्यावरील तो प्रचंड किल्ला. पुरातत्त्वशास्त्रज्ञ, इस्राएल राज्याची राजधानी अर्थात प्राचीन समारियासारखा किल्ला आढळण्याची अपेक्षा करीत होते. परंतु, जसजसे खोदकाम चालू राहिले तसतसे स्पष्ट होऊ
लागले की जेझरील बरेच मोठे होते. त्याच्या भिंतींची लांबी १,००० बाय ५०० फूट होती. किल्ल्याच्या आतला संपूर्ण प्रदेश, त्या काळात इस्राएलमध्ये आढळलेल्या इतर कोणत्याही जागेच्या तीनपेक्षा अधिक पटीने विस्तारलेला होता. या जागेभोवती ३५ फूट खोलीचे कोरडे खंदक होते. प्राध्यापक युशीशकीन यांच्या मते, अशाप्रकारचे खंदक बायबल काळात आढळत नव्हते. ते म्हणाले: “धर्मयुद्धे घडली त्या काळापर्यंत तरी आपल्याला इस्राएलमध्ये यासारखे काही आढळत नाही.”शहराच्या मध्यभागी कसल्याही प्रकारचे मोठे बांधकाम नव्हते ही आणखी एक अनपेक्षित गोष्ट होती. शहराच्या बांधकामाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर आणलेल्या लालसर मातीचा उपयोग एक मोठा ओटा किंवा व्यासपीठ बांधण्याकरता केला होता व त्याच्याभोवती एक कुंपण होते. टेल जेझरील येथील उत्खननांवरील सेकंड प्रिलिमनरी रिपोर्ट असे विवेचन मांडते, की या भल्या मोठ्या ओट्यावरून हेच शाबीत होते, की जेझरील हे फक्त एक राजसी वास्तव्याचेच ठिकाण नव्हते. ते पुढे म्हणते: “आम्ही ही शक्यता प्रकट करू इच्छितो, की जेझरील हे ओम्रीकर [ओम्री आणि त्याचे वंशज] राजांच्या काळातील राजाच्या इस्राएली सैन्याकरता केंद्रीय सैनिकी तळ असू शकते. . . . येथे राजाचे रथसैन्य आणि घोडदळ होते आणि तेथेच त्यांना प्रशिक्षणही दिले जात असे.” हा भला मोठा ओटा आणि त्याच्या भोवतालचे कुंपण पाहून वुडहेड असा अंदाज लावतात, की हा कदाचित एक परेड ग्राऊण्ड असावा; मध्यपूर्वेत त्या काळी असे सैन्य कोणाचेही नव्हते असे दाखवण्यासाठी कदाचित परेड केली जात असावी.
शहराच्या वेशीच्या अवशेषांचे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना जरा जास्तच कुतूहल होते. ती चार चौकींची वेशी असल्याचे आढळून येते. परंतु, इतक्या शतकांपासून तेथे पुष्कळ दगडांची रास तयार झाल्यामुळे तेथे नक्की काय होते हे सांगणे जरा कठीणच आहे. वुडहेड यांना असे वाटते, की हे अवशेष सहा चौकींच्या वेशीचे असावेत ज्या मेगिद्दो, हेझर आणि गेझर येथे सापडलेल्या चौकींच्याच आकाराच्या आहेत. *
उत्खननातून हे स्पष्ट झाले की, हे शहर फार काळ अस्तित्वात राहिले नाही. परंतु, लष्करी व भौगोलिकदृष्ट्या इतक्या मोक्याच्या ठिकाणी असूनही असे का घडले असावे याचेच पुरातत्त्वशास्त्रज्ञांना आश्चर्य वाटते. तटबंदी असलेले जेझरील शहर विशिष्ट काळापर्यंतच अर्थात, २०-३० वर्षांपर्यंतच टिकले, यावर वुडहेड जोर देतात. परंतु बायबल काळातील इस्राएलमधील इतर शहरांच्या तुलनेत हे किती विरोधाभासाचे आहे. मेगिद्दो, हेझर आणि राजधानी शहर समारिया ही तर विविध काळांत कित्येकदा पुन्हा बांधण्यात आली, विस्तारण्यात आली व वसण्यात आली. मग जेझरील हे मोक्याचे शहर इतके लवकर कसे उजाड पडले? वुडहेड यांनी असा तर्क केला की, अहाब आणि त्याच्या राजघराण्याने राष्ट्राची संपत्ती उधळून टाकल्यामुळे ते जवळजवळ कंगाल झाले होते. ही उधळपट्टी जेझरीलच्या प्रचंड आकारावरून व शक्तीवरून दिसून येते. येहूला नव्याने आपले राज्य सुरू करायचे होते, त्याला अहाबाच्या कसल्याही गोष्टीशी संबंध नको होता म्हणून कदाचित तो हे शहर सोडून गेला.
अशाप्रकारे आतापर्यंत उत्खननात सापडलेल्या सर्व पुराव्यांवरून याची पुष्टी मिळते, की जेझरील शहर लोहयुगात प्रमुख इस्राएली केंद्र होते. अहाब आणि ईजबेलीच्या प्रमुख राजमहालाविषयी बायबलमध्ये केलेल्या वर्णनाशी त्या शहराचा आकार आणि तटबंदी अगदी मिळतीजुळती आहे. या कालावधीतील मर्यादित लोकवस्तीची चिन्हे, त्या शहराविषयी बायबलमधील या अहवालांशी जुळतात: अहाबाच्या कारकीर्दीत त्या शहराची वेगाने भरभराट झाली पण, यहोवाने आज्ञा केल्या केल्या ते धुळीस मिळाले. येहूने “अहाबाच्या घराण्यातील जे लोक उरले होते ते सर्व, त्याचे सर्व थोर पुरूष, जिवलग मित्र व याजक हे . . . वधिले, २ राजे १०:११.
त्यातला एकहि शेष राहू दिला नाही.”—जेझरीलचा कालक्रम
“पुरातत्त्वशास्त्रात तारीख ठरवायला अचूक आधार मिळवणे अतिशय कठीण आहे,” असे जॉन वुडहेड कबूल करतात. यास्तव, सात वर्षांच्या उत्खननांमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना जे काही हाती लागले त्याची तुलना ते इतर पुरातत्त्वीय ठिकाणांमध्ये मिळालेल्या गोष्टींशी करतात. यामुळे अनेकदा पुन्हा परीक्षण करावे लागले व अनेकदा वादविवादही झाले. का? कारण १९६० व १९७० च्या दशकांच्या सुरवातीच्या काळात इस्राएली पुरातत्त्वशास्त्रज्ञ यिगल यादीन यांनी केलेल्या उत्खननांनंतर पुरातत्त्वीय क्षेत्रातील अनेकांनी असे खात्रीपूर्वक मानले, की यिगल यांना राजा शलमोनाच्या काळातील तटबंदींचा आणि वेशींचा शोध लागला होता. परंतु आता, जेझरील येथे सापडलेली तटबंदी, मातीची भांडी आणि वेशी यांमुळे यिगल यांच्या उत्खननाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
उदाहरणार्थ, जेझरील येथे सापडलेली मातीची भांडी, मेगिद्दो येथील भूस्तराशी जुळतात; मेगिद्दो येथील भूस्तर शलमोनाच्या राजवटीच्या काळातला असल्याचा यादीन यांनी तर्क केला होता. दोन्ही ठिकाणांच्या वेशींची रचना आणि आकार तंतोतंत मिळतेजुळते नसले तरी सारखेच आहेत. वुडहेड म्हणतात: “सर्व पुराव्यांवरून असे वाटते, की जेझरील एकतर शलमोनाच्या काळातील असेल, नाहीतर मग इतर ठिकाणे [मेगिद्दो आणि हेझर] अहाबाच्या काळातील असतील.” परंतु, बायबलनुसार पाहायला गेल्यास हे जेझरील अहाबाच्या काळातील होते त्यामुळे मग सापडलेले भूस्तर अहाबाच्या कारकीर्दीच्या काळातील आहे असे मानणे जॉन वुडहेड यांना जास्त योग्य वाटते. डेव्हीड उशीशकीन आपली सहमती अशाप्रकारे दर्शवतात: “बायबल म्हणते की शलमोनाने मेगिद्दो बांधले—त्याने त्याच वेशी बांधल्या असे ते म्हणत नाही.”
जेझरीलचा इतिहास ज्ञात होईल का?
हे पुरातत्त्वीय शोध आणि चाललेला वादविवाद यांमुळे जेझरील किंवा शलमोन यांच्याविषयी बायबलमधील अहवाल शंकास्पद वाटतात का? खरे तर, पुरातत्त्वीय वादविवादाचा बायबल अहवालांशी इतका संबंध येत नाही. पुरातत्त्वशास्त्र एका वेगळ्या आधारावर इतिहासाचे परीक्षण करते. ते नेहमीच बायबलच्या अहवालांचा आधार घेत नाहीत. त्यांचे प्रश्न वेगळे असतात; त्यांचे ध्येय वेगळे असते. हे समजायला आपण एक उदाहरण घेऊ या; आपण एक बायबल विद्यार्थी आणि एक पुरातत्त्वशास्त्रज्ञ यांची तुलना दोन प्रवाशांशी करू या, जे जवळजवळ दोन समांतर रस्त्यांवरून प्रवास करीत आहेत. एक प्रवासी रस्त्यावरून गाडी चालवतो आणि दुसरा रस्त्याच्या कडेने पायी चाललाय. दोघांचीही ध्येये आणि हेतू वेगवेगळे आहेत. तरीपण, त्यांचे दृष्टिकोन विसंगत नव्हे तर एकमेकांना पूरक आहेत. दोन्ही प्रवाशांच्या मतांची तुलना केल्यावर आपल्याला आश्चर्यकारक माहिती मिळू शकते.
बायबलमध्ये प्राचीन घटना आणि लोकांचा लिखित अहवाल आहे; पुरातत्त्वशास्त्र, या प्राचीन घटना व लोकांचे राहिलेल्या अवशेषांचे परीक्षण करून त्यांच्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते. परंतु, हे अवशेष बहुतेकदा अपूर्ण असतात आणि कोणीही त्यांचा कसाही अर्थ लावू शकतो. याबाबतीत, बायबल काळातील देशाचे पुरातत्त्वशास्त्र—१०,०००-सा.यु.पू. ५८६, नामक आपल्या पुस्तकात आमिही माझर असे म्हणतात: “पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी . . . केवळ प्रशिक्षित असणे व त्यांच्याजवळ कौशल्य व साधनसामग्री असणे पुरेसे नाही. त्यांनी सृजनशील, प्रामाणिक असावयास हवे आणि यशस्वी होण्याकरता त्यांच्याजवळ व्यवहारज्ञानही असले पाहिजे.”
पुरातत्त्वशास्त्राने जेझरील येथील एका प्रमुख राजसी व सैनिकी केंद्राच्या अस्तित्वाची पुष्टी दिली आहे; एक असे केंद्र जे, अहाबाच्या कारकीर्दीशी मेळ खाणाऱ्या एका ऐतिहासिक कालावधीदरम्यान अतिशय अल्पकाळासाठी अस्तित्वात होते—बायबल सांगते तसेच! याविषयी अनेक वेधक प्रश्न उभे राहिलेत ज्यांचा अभ्यास येणाऱ्या वर्षांत पुरातत्त्वशास्त्रज्ञ कदाचित करतील. परंतु, देवाचे वचन बायबल अगदी स्पष्टपणे माहिती देते; आपल्यासमोर अशाप्रकारे संपूर्ण चित्र उभे करते जे कोणा पुरातत्त्वशास्त्रज्ञाला जमणार नाही.
[तळटीपा]
^ परि. 4 मराठी बायबलमध्ये शास्ते ७:३ येथे गिलाद डोंगर म्हटले आहे परंतु काही हस्तलिखितांमध्ये गिलबोवा डोंगर म्हटले आहे.
^ परि. 13 ऑगस्ट १५, १९८८ टेहळणी बुरूज (इंग्रजी), मधील “वेशींचे रहस्य” हा लेख पाहा.
[२६ पानांवरील चित्रे]
जेझरीलमधील पुरातत्त्वीय उत्खनन
[२८ पानांवरील चित्र]
जेझरील येथे सापडलेली एक कनानी मूर्ती