व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव प्रार्थनांचे जरूर उत्तर देतो

देव प्रार्थनांचे जरूर उत्तर देतो

देव प्रार्थनांचे जरूर उत्तर देतो

कर्नेल्य नावाचा एक माणूस, नित्य मनःपूर्वक प्रार्थना करून देवाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. तो सेनाधिपती होता आणि आपल्या या पदवीचा तो इतरांच्या भल्याकरता उपयोग करीत असे. बायबलमध्ये सांगितले आहे की तो गरजू लोकांना “फार दानधर्म” करत असे.—प्रेषितांची कृत्ये १०:१, २.

त्याकाळी ख्रिस्ती मंडळीत येशूवर विश्‍वास ठेवणारे यहुदी, यहुदी मतानुसारी आणि शोमरोनी लोक होते. कर्नेल्य हा सुंता न झालेल्या विदेश्‍यांपैकी एक होता; अर्थातच तो ख्रिस्ती मंडळीचा सदस्य नव्हता. पण म्हणून त्याच्या प्रार्थना व्यर्थ ठरल्या का? नाही. यहोवा देवाने कर्नेल्यची आणि त्याने प्रार्थनाशील वृत्तीने केलेल्या सर्व भल्या कार्यांची योग्य दखल घेतली.—प्रेषितांची कृत्ये १०:४.

देवदूतांच्या मार्गदर्शनाने कर्नेल्य ख्रिस्ती मंडळीच्या संपर्कात आला. (प्रेषितांची कृत्ये १०:३०-३३) परिणामी, त्याला व त्याच्या घराण्याला ख्रिस्ती मंडळीत स्वीकारले जाणारे पहिले बेसुंती विदेशी होण्याचा बहुमान प्राप्त झाला. यहोवा देवाने तर कर्नेल्यचा हा अनुभव बायबलमध्ये अभिलिखित करून घेतला. अर्थातच, आपले जीवन पूर्णपणे देवाच्या नियमांच्या सामंजस्यात आणण्याकरता कर्नेल्यला अनेक बाबतीत परिवर्तन करावे लागले असेल. (यशया २:२-४; योहान १७:१६) आज देवाला संतुष्ट करू इच्छिणाऱ्‍या सर्व राष्ट्रांतील लोकांकरता कर्नेल्यचा अनुभव अतिशय उत्तेजन देणारा आहे. काही उदाहरणांचा विचार करा.

आजच्या काळातली उदाहरणे

भारतातील एक तरुण स्त्री अतिशय दुःखी होती आणि सांत्वनाच्या शोधात होती. वयाच्या २१ व्या वर्षी तिचे लग्न झाले होते आणि तिला दोन मुले होती. पण तिच्या दुसऱ्‍या मुलाचा जन्म झाल्यानंतर अवघ्या काही काळातच तिच्या पतीचा मृत्यू झाला. २४ वर्षांच्या कोवळ्या वयात ती विधवा झाली. दोन महिन्यांची तान्ही मुलगी आणि २२ महिन्यांचा मुलगा अशा दोन मुलांची जबाबदारी तिच्या खांद्यांवर आली. ती किती दुःखी असेल याची आपण कल्पना करू शकतो! पण कोण तिला मदत करेल? एकदा रात्री दुःखाने व्याकूळ होऊन तिने देवाला कळकळीची प्रार्थना केली, “स्वर्गातील पित्या, मला तुझ्या वचनातून सांत्वन दे.”

दुसऱ्‍या दिवशी सकाळी, तिच्या घरी एक गृहस्थ आला. तो यहोवाचा साक्षीदार होता. खास त्या दिवशी त्याला घरोघरच्या कार्यात फारसा चांगला अनुभव आला नव्हता; फार कमी लोक दार उघडून त्याच्याशी बोलले होते. शेवटी थकून आणि निराश होऊन, त्याने घरी परतण्याचा विचार केला. पण का कोण जाणे, त्याला फक्‍त आणखी एक घर करून मग परतावे असे वाटले. आणि नेमके तेच घर या तरुण विधवेचे होते. तिने त्याला घरात बोलावले आणि त्याच्याकडून बायबलविषयी माहिती देणारे एक पुस्तकही घेतले. ते पुस्तक वाचून, तसेच यहोवाच्या साक्षीदारांशी चर्चा करून तिला खूप खूप सांत्वन मिळाले. देवाने मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याचे आणि या पृथ्वीवर आपले राज्य आणून पृथ्वीला एका सुंदर बगीच्याचे रूप देण्याचे अभिवचन दिले आहे, हे तिला शिकायला मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला तिच्या प्रार्थनांचे उत्तर देणाऱ्‍या एका खऱ्‍या देवाची, यहोवाची ओळख झाली आणि त्याच्यावर ती मनोभावे प्रेम करू लागली.

दक्षिण आफ्रिकेत, जॉर्ज शहरात राहणाऱ्‍या नॉरा नावाच्या एका बहिणीने एक महिना खास पूर्णवेळ सुवार्ता सांगण्याच्या कामाकरता देण्याचे ठरवले. पण हे कार्य सुरू करण्याआधी तिने यहोवाला मनापासून प्रार्थना केली की, बायबल अभ्यास करायला खरोखरच इच्छुक असणाऱ्‍या व्यक्‍तीशी त्याने तिची भेट होऊ द्यावी. ज्या क्षेत्रात नॉराला काम करायला सांगण्यात आले त्याच क्षेत्रात एक माणूस राहात होता, त्याने नॉरा याआधी ज्या ज्या वेळी त्याच्या घरी गेली तेव्हा तिचा अपमान केला होता. तरीही धैर्य एकवटून नॉराने त्या घराचा दरवाजा खटखटला. पण तिला आश्‍चर्य वाटले; कारण त्या घरात आता नवीन भाडेकरू आले होते. तेथे राहायला आलेल्या मुलीचे नाव नॉलीन होते. विशेष म्हणजे, नॉलीन व तिची आई बायबलमधील ज्ञान समजून घ्यायला उत्सुक होत्या आणि त्याकरता बऱ्‍याच काळापासून देवाला प्रार्थना करत होत्या. नॉरा सांगते, “मी त्यांना बायबल अभ्यास करायला आवडेल का असे विचारले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.” नॉलीन व तिच्या आईने फार लवकर प्रगती केली. कालांतराने त्या दोघी देखील नॉरासोबत लोकांच्या आध्यात्मिक व्यथा दूर करण्याच्या कार्यात सहभाग घेऊ लागल्या.

प्रार्थना किती परिणामकारक असू शकते याचे आणखी एक उदाहरण दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात राहणाऱ्‍या एका जोडप्याचे आहे. १९९६ सालची गोष्ट आहे. शनिवारची रात्र होती. डेनिस आणि कॅरोल यांच्यात कडाक्याचे भांडण झाले, अगदी घटस्फोटापर्यंतच्या गोष्टी झाल्या. शेवटचा पर्याय म्हणून त्या दोघांनी प्रार्थना करायचे ठरवले. रात्रभर ते वारंवार प्रार्थना करत राहिले. दुसऱ्‍या दिवशी सकाळी ११ वाजता, दोन यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांचे दार ठोठावले. डेनिसने दार उघडले आणि पत्नीला बोलावून आणेपर्यंत त्यांना थांबायला सांगितले. आत गेल्यावर डेनिसने कॅरोलला बजावले की साक्षीदारांना एकदा घरात घेतले की ते लवकर उठणार नाहीत. पण कॅरोलने डेनिसला आठवण करून दिली की आपण देवाला मदतीसाठी जी प्रार्थना करत होतो, त्या प्रार्थनेचेच कदाचित हे उत्तर असावे. त्यामुळे मग त्यांनी साक्षीदारांना आत बोलावले. त्यांच्यासोबत सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. जे शिकायला मिळाले त्यामुळे ते दोघे अतिशय आनंदित झाले. त्याच दिवशी दुपारी ते यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात सभेला उपस्थित राहिले. बायबलमधून मिळालेल्या ज्ञानानुसार आचरण केल्यामुळे डेनिस व कॅरोल यांना आपल्या वैवाहिक समस्या सोडवता आल्या. आज ते सुखात आहेत. बाप्तिस्मा घेऊन ते यहोवाची स्तुती करणाऱ्‍यांमध्ये सामील झाले आहेत. तसेच, ते आपल्या परिसरात राहणाऱ्‍या लोकांना नियमितपणे आपल्या बायबल आधारित विश्‍वासांविषयी सांगतात.

तुम्हाला प्रार्थना करायला लाज वाटते का?

आपण वाईट गोष्टी करत आहोत याची जाण असणाऱ्‍या काही प्रामाणिक मनाच्या लोकांना आपण देवाला प्रार्थना करण्यास योग्य नाही असे वाटते. येशू ख्रिस्ताने एकदा अशाच एका माणसाची गोष्ट सांगितली. हा माणूस कर वसूल करणारा होता आणि त्यामुळे सर्व लोक त्याची निंदा करायचे. एकदा तो मंदिराच्या अंगणात आला, पण सर्वजण जेथे प्रार्थना करत होते तेथे जाण्याचे त्याला धैर्य झाले नाही. “दूर उभा राहून [तो] . . . आपला ऊर बडवीत म्हणाला, ‘हे देवा, मज पाप्यावर दया कर.’” (लूक १८:१३) पण, येशूने सांगितले की या माणसाची प्रार्थना देवाने ऐकली. यावरून हेच दिसून येते की जे लोक आपल्या पापांबद्दल प्रामाणिकपणे पश्‍चात्ताप करतात, अशांवर देव अवश्‍य दया करतो आणि त्यांना मदतही करू इच्छितो.

दक्षिण आफ्रिकेतील पॉल नावाच्या एका तरुणाचे उदाहरण लक्षात घ्या. लहानपणी पॉल आपल्या आईसोबत यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना जायचा. पण, हायस्कूलमध्ये असताना तो देवाच्या मार्गानुसार न चालणाऱ्‍या तरुणांसोबत संगत राखू लागला. शाळा सोडल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेच्या भूतपूर्व वर्णभेदी सरकारच्या सैन्यात भरती झाला. यादरम्यान त्याच्या प्रेयसीने अचानक त्याच्यासोबतचे संबंध तोडून टाकले. पॉल जीवनात अगदी निराश झाला, त्याचे कशातच मन लागेना. तो सांगतो, “एकदा संध्याकाळी मी यहोवाला प्रार्थना केली आणि मदतीकरता विनवणी केली; कितीतरी वर्षांपासून मी मनापासून यहोवाला प्रार्थना केलेली नव्हती, पण त्या संध्याकाळी मात्र केली.”

पॉलने प्रार्थना केल्यानंतर काही दिवसांनीच, पॉलच्या आईने त्याला ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीकरता येण्याचे आमंत्रण दिले. (लूक २२:१९) पॉलला आश्‍चर्य वाटले कारण इतक्या वर्षांपासून तो स्वैर जीवन जगत होता शिवाय बायबलविषयीही त्याने कधीच आस्था दाखवली नव्हती. “यहोवाने माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहे, आता मला माझे कर्तव्य केले पाहिजे, असा मी मनात विचार केला.” त्या दिवसापासून पॉल सर्व ख्रिस्ती सभांना जाऊ लागला. चार महिने बायबलचा अभ्यास केल्यावर बाप्तिस्मा घेण्याइतकी त्याची तयारी झाली. शिवाय, त्याने आपला इंजिनियरिंगचा अभ्यास बंद केला व तो पूर्णवेळचा सुवार्तिक बनला. आज पॉल आनंदी आहे. तो आपल्या मागच्या आयुष्याचा विचार करून निराश होत नाही. गेल्या ११ वर्षांपासून तो दक्षिण आफ्रिकेतील वॉचटावर संस्थेच्या शाखा दफ्तरात सेवा करत आहे.

खरोखर यहोवा देव मोठ्या दयेने आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो आणि ‘त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना प्रतिफळ देतो.’ (इब्री लोकांस ११:६) लवकरच यहोवाचा महान दिवस येईल आणि सर्व दुष्टाईचा अंत होईल. तोपर्यंत साक्ष देण्याच्या अतिमहत्त्वपूर्ण कार्यात त्याच्या लोकांना आवेशाने भाग घ्यायचा आहे; हे कार्य करायला शक्‍ती आणि मार्गदर्शन देण्यासाठी ते यहोवाला प्रार्थना करतात आणि यहोवा त्यांच्या प्रार्थनांचे त्यांना उत्तर देतो. म्हणूनच, सर्व राष्ट्रांतून लाखो लोकांना ख्रिस्ती मंडळीच्या संपर्कात आणून त्यांना बायबलचे ज्ञान, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान दिले जात आहे.—योहान १७:३.

[५ पानांवरील चित्र]

कर्नेल्यने मनापासून प्रार्थना केली तेव्हा प्रेषित पेत्र त्याची भेट घ्यायला आला

[६ पानांवरील चित्रे]

प्रार्थनेमुळे अनेकांना दुःखात सांत्वन मिळाले आहे

[७ पानांवरील चित्रे]

बायबलमधील सत्य समजून घ्यायला मदत मिळावी म्हणून प्रार्थना करा

पती व पत्नी आपल्या वैवाहिक जीवनातला आनंद टिकून ठेवण्याकरता प्रार्थना करू शकतात