व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“परमेश्‍वर व त्याचे सामर्थ्य ह्‍यांचा शोध करा”

“परमेश्‍वर व त्याचे सामर्थ्य ह्‍यांचा शोध करा”

“परमेश्‍वर व त्याचे सामर्थ्य ह्‍यांचा शोध करा”

“परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.”—२ इतिहास १६:९.

१. शक्‍ती म्हणजे काय आणि मनुष्याने आजपर्यंत तिचा कशाप्रकारे उपयोग केला आहे?

शक्‍ती किंवा सामर्थ्य या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. ताबा, अधिकार किंवा चारचौघांवर असलेला प्रभाव; कार्य करण्याची किंवा विशिष्ट परिणाम घडवून आणण्याची क्षमता; शारीरिक बळ (ताकद); मानसिक किंवा नैतिक सामर्थ्य. दुःखाची गोष्ट म्हणजे शक्‍तीचा उपयोग करण्याच्या संदर्भात सकारात्मक उदाहरणे इतिहासात अभावानेच आढळतात. इतिहासकार लॉर्ड ॲक्टन यांनी राजकीय सत्तेविषयी असे म्हटले: “सत्ता हाती आली की नीती भ्रष्ट होते, आणि संपूर्ण सत्ता हाती आल्यावर नीती संपूर्णपणे भ्रष्ट होते.” आधुनिक इतिहासात लॉर्ड ॲक्टन यांच्या शब्दांची सत्यता पटविणारी असंख्य उदाहरणे आढळतील. विसाव्या शतकात मनुष्यांनी एकमेकांवर ‘सत्ता चालवून’ कधी नव्हे इतके ‘नुकसान’ केले आहे. (उपदेशक ८:९) सत्तांध हुकुमशहांनी कोट्यवधी निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे. प्रीती, बुद्धी आणि न्याय हे गुण जोडीला नसतात तेव्हा शक्‍ती किंवा सामर्थ्य भयानक रूप धारण करू शकते.

२. यहोवा जेव्हा त्याच्या शक्‍तीचा वापर करतो, तेव्हा त्याच्या इतर गुणांचा यावर कसा प्रभाव पडतो?

पण हे झाले मनुष्याच्या बाबतीत; परमेश्‍वर मात्र नेहमी आपल्या सामर्थ्याचा चांगल्यासाठीच वापर करतो. “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.” (२ इतिहास १६:९) यहोवा आपल्या शक्‍तीचा उपयोग अनिर्बंधपणे करत नाही. सहनशील असल्यामुळे त्याने दुष्टांचा तडकाफडकी नाश केला नाही, आणि आजही तो त्यांना पश्‍चात्ताप करण्याची संधी देत आहे. मनुष्यावर प्रेम असल्यामुळे तो चांगल्या व वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लोकांवर आपला सूर्य उगवतो. पण त्याच्याठायी न्याय हा गुण देखील आहे आणि म्हणूनच तो शेवटी आपल्या असीम सामर्थ्याचा वापर करून मृत्यूस कारण असलेल्या दियाबल सैतानाला कायमचे नष्ट करील.—मत्तय ५:४४, ४५; इब्री लोकांस २:१४; २ पेत्र ३:९.

३. देव सर्वशक्‍तिमान असल्यामुळे आपण कशाचा भरवसा बाळगू शकतो?

आपल्या स्वर्गीय पित्याजवळ विलक्षण सामर्थ्य असल्यामुळे आपण त्याच्यावर पूर्ण भरवसा आणि विश्‍वास ठेवू शकतो; तो त्याची सर्व अभिवचने पूर्ण करील याविषयीच नाही, तर तो आपले संरक्षण करील याविषयी देखील आपण खातरी बाळगू शकतो. अनोळखी लोकांमध्ये असताना लहान मूल सहसा आपल्या वडिलांचा हात गच्च धरते; कारण त्यामुळे त्याला सुरक्षित वाटते, आपले वडील सोबत असताना कोणीही आपल्याला काहीही करू शकणार नाही याची त्याला खात्री असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या स्वर्गीय पित्यासोबत चालत राहिलो, तर “तारण करण्यास समर्थ” असणारा आपला देव आपल्याला कोणताही कायमचा अपाय होऊ देणार नाही. (यशया ६३:१; मीखा ६:८) तसेच एका चांगल्या पित्याप्रमाणे यहोवा नेहमी आपली सर्व अभिवचने पूर्ण करतो. त्याच्याजवळ अमर्याद सामर्थ्य असल्यामुळे आपण खातरी बाळगू शकतो की त्याचे ‘वचन, ज्या कार्याकरिता पाठविले ते केल्यावाचून विफल होऊन परत येणार नाही.’—यशया ५५:११; तीत १:२.

४, ५. (अ) आसा राजाने यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला तेव्हा काय परिणाम झाला? (ब) आपल्या समस्यांवर मनुष्याच्या बुद्धीने उपाय शोधण्याचा प्रयत्न केल्यास काय होऊ शकते?

आपला स्वर्गीय पिता आपले संरक्षण करण्यास समर्थ आहे हे नेहमी लक्षात ठेवणे इतके महत्त्वाचे का आहे? कारण कधीकधी कठीण परिस्थिती आल्यावर आपण इतके गोंधळून जातो की खरे संरक्षण कोठे मिळू शकते हे देखील आपण विसरून जातो. आसा नावाच्या राजाच्या उदाहरणातून हे दिसून येते; आसाला यहोवावर भरवसा नव्हता, असे नाही. त्याच्या राज्यकाळात एकदा इथियोपियाच्या दहा लाख माणसांच्या सैन्याने यहुदावर हल्ला केला होता. आपले शत्रू आपल्यापेक्षा बलवान आहेत हे जाणून आसाने प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे साहाय्य करणारा तुजवाचून अन्य कोणी नाही; हे आमच्या देवा, परमेश्‍वरा, आमचे साहाय्य कर; आमची भिस्त तुजवर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहो. हे परमेश्‍वरा, तू आमचा देव आहेस; मानवांचे तुजवर वर्चस्व होऊ देऊ नको.” (२ इतिहास १४:११) यहोवाने आसाची प्रार्थना ऐकली आणि त्याला मोठा विजय मिळाला.

पण अनेक वर्षे यहोवाला विश्‍वासू राहिल्यावर आसाचा यहोवावरचा विश्‍वास डगमगला, त्याच्या तारण करण्याच्या शक्‍तीवर आसाने शंका घेतली. इस्राएलच्या उत्तर राज्याने यहुदावर स्वारी केली तेव्हा आसाने आरामाच्या राजाकडून मदत मागितली. (२ इतिहास १६:१-३) आरामचा राजा बेन-हदाद याला लाच दिल्यानंतर यहुदावर इस्राएलकडून आलेले संकट तर टळले, पण आराम देशासोबत करार करून आसाने यहोवावर अविश्‍वास दाखवला. तेव्हा संदेष्टा हनानी याने त्याची कानउघाडणी केली: “कुशी व लुबी यांचे मोठे सैन्य नव्हते काय? त्यांच्यापाशी बहुत रथ व राऊत नव्हते काय? तरी त्या प्रसंगी तू परमेश्‍वरावर भिस्त ठेविली म्हणून त्याने त्यांस तुझ्या हाती दिले.” (२ इतिहास १६:७, ८) पण आसाने या उपदेशाकडे दुर्लक्ष केले. (२ इतिहास १६:९-१२) आपल्यापुढेही जेव्हा निरनिराळ्या समस्या येतात, तेव्हा आपण देवावरच पूर्ण विश्‍वास ठेवावा, मनुष्याच्या बुद्धीने या समस्या सोडवण्याचा कधीही प्रयत्न करू नये; कारण मनुष्याच्या शक्‍तीवर भरवसा ठेवणाऱ्‍यांच्या पदरी शेवटी निराशाच पडते.—स्तोत्र १४६:३-५.

देवाकडे शक्‍तीची याचना करा

६. आपण ‘परमेश्‍वर व त्याच्या सामर्थ्याचा शोध’ का केला पाहिजे?

यहोवा आपल्या सेवकांना शक्‍ती देतो आणि त्यांचे संरक्षणही करतो. बायबल आपल्याला प्रोत्साहन देते की “परमेश्‍वर व त्याचे सामर्थ्य ह्‍यांचा शोध करा.” (स्तोत्रसंहिता १०५:४) का? कारण आपण जेव्हा देवाच्या सामर्थ्यावर विसंबून कार्य करतो तेव्हा आपल्या कार्यामुळे इतरांचे नुकसान होण्याऐवजी त्यांचा फायदाच होतो. या संदर्भात येशू ख्रिस्ताचे सर्वोत्तम उदाहरण आपल्यापुढे आहे; ‘प्रभूच्या सामर्थ्याने’ त्याने असंख्य चमत्कार केले. (लूक ५:१७) या सामर्थ्याचा वापर करून तो धन, किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू शकला असता; तो सर्वात शक्‍तिशाली राजाही बनू शकला असता. (लूक ४:५-७) पण त्याने असे केले नाही; उलट देवाने दिलेल्या सामर्थ्याच्या साहाय्याने त्याने लोकांना शिकवले, कार्य करण्यासाठी त्यांना तयार केले, त्यांना सर्व दृष्टीने मदत केली आणि त्यांचे आजार दूर केले. (मार्क ७:३७; योहान ७:४६) हे आपल्यासाठी एक चांगले उदाहरण नाही का?

७. आपण स्वतःच्या नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर विसंबून कार्य करतो तेव्हा आपल्या स्वभावात कोणता महत्त्वाचा गुण येतो?

“देवाने दिलेल्या शक्‍तीने” आपण कार्य करतो तेव्हा आणखी एक फायदा होतो; अर्थात, नम्र मनोवृत्ती ठेवण्यास आपल्याला मदत होते. (१ पेत्र ४:११) जे सत्ता मिळवण्यासाठी आसुसलेले असतात, ते फार लवकर गर्विष्ठ होतात. याचे एक चांगले उदाहरण अस्सिरियाचा राजा एस्सार-हादोन याचे आहे; या राजाने गर्विष्ठपणे घोषित केले: “मी शक्‍तीमान आहे, मी सर्वशक्‍तीमान आहे, मी शूर आहे, मी ताकदवर आहे, मी महाबलशाली आहे.” यहोवाने मात्र, ‘बलवानास लाजवावे म्हणून जगातील जे दुर्बळ ते निवडले.’ त्यामुळे स्वतःला खरा ख्रिस्ती म्हणवणारा, स्वतःला श्रेय घेण्याऐवजी यहोवाची बढाई करतो कारण त्याला जाणीव असते की त्याने केलेले कार्य त्याच्या स्वतःच्या नव्हे तर देवाच्या शक्‍तीने साध्य झाले आहे. “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन” होण्यातच खरे गौरव आहे.—१ करिंथकर १:२६-३१; १ पेत्र ५:६.

८. यहोवाकडून सामर्थ्य मिळवण्यासाठी सर्वात आधी आपण काय केले पाहिजे?

देवाचे सामर्थ्य आपण कसे मिळवू शकतो? सर्वात आधी आपण प्रार्थनेत यहोवाला त्यासाठी विनंती केली पाहिजे. येशूने आपल्या शिष्यांना आश्‍वासन दिले की जे मागतील त्या सर्वांना त्याचा पिता पवित्र आत्मा देईल. (लूक ११:१०-१३) यामुळेच, जेव्हा धार्मिक पुढाऱ्‍यांनी ख्रिस्ताच्या शिष्यांना येशूविषयीची साक्ष देण्यास मनाई केली तेव्हा मनुष्यांपेक्षा देवाच्या आज्ञेला मान देण्याची ताकद त्यांना मिळाली. त्यांनी प्रार्थना करून यहोवाकडे मदत मागितली तेव्हा त्यांच्या प्रामाणिक प्रार्थनेचे त्यांना उत्तर मिळाले आणि पवित्र आत्म्याने त्यांना निर्भयपणे सुवार्तेचा प्रचार करत राहण्याची शक्‍ती बहाल केली.—प्रेषितांची कृत्ये ४:१९, २०, २९-३१, ३३.

९. आध्यात्मिक शक्‍ती आणखी कोणत्या माध्यमाने मिळू शकते आणि याची प्रचिती करून देणारे बायबलचे एखादे उदाहरण द्या.

आध्यात्मिक शक्‍तीचा दुसरा उगम म्हणजे बायबल. (इब्री लोकांस ४:१२) देवाचे वचन किती शक्‍तिशाली आहे याची राजा योशियाच्या काळात प्रचिती आली. यहुदाचा राजा असणाऱ्‍या योशियाने आपल्या देशातून सर्व खोट्या दैवतांच्या मूर्ती केव्हाच काढून टाकल्या होत्या, पण जेव्हा अनपेक्षितपणे मंदिरात यहोवाच्या नियमशास्त्राची प्रत गवसली तेव्हा त्याला खोट्या उपासनेचा नाश करण्याची मोहीम आणखी उत्साहाने हाती घेण्याची प्रेरणा मिळाली. * त्याने स्वतः देवाचे नियमशास्त्र लोकांना वाचून दाखवले तेव्हा संपूर्ण राष्ट्राने यहोवाशी करार केला आणि मूर्तिपूजेच्या विरोधात दुसऱ्‍यांदा आणखी उत्साही मोहीम सुरू करण्यात आली. योशियाच्या या कार्याचा चांगला परिणाम असा झाला, की “त्याच्या सर्व कारकीर्दीत त्यांनी आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्‍वर [“यहोवा,” NW] यास अनुसरावयाचे सोडिले नाही.”—२ इतिहास ३४:३३.

१०. यहोवाकडून सामर्थ्य मिळवण्याचा तिसरा मार्ग कोणता आहे आणि हा महत्त्वाचा का आहे?

१० यहोवाकडून शक्‍ती मिळवण्याचा तिसरा मार्ग म्हणजे ख्रिस्ती बांधवांची संगती. पौलाने ख्रिस्ती बांधवांना नियमितपणे सभांना उपस्थित राहून एकमेकांना “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देण्याचे व एकमेकांना प्रोत्साहन देण्याचे आर्जवले. (इब्री लोकांस १०:२४, २५) पेत्राची चमत्कारिकरित्या बंदिशाळेतून सुटका झाली, तेव्हा तो सर्वात आधी आपल्या बांधवांची भेट घेण्यासाठी योहान मार्क याच्या आईच्या घरी गेला; येथे “बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते.” (प्रेषितांची कृत्ये १२:१२) अर्थात ते सर्व आपापल्या घरी राहूनही प्रार्थना करू शकत होते. पण, त्या कठीण समयी प्रार्थना करण्यासाठी आणि एकमेकांना धीर देण्यासाठी ते एकत्र आले. पौलाच्या लांबच्या आणि धोकेदायक प्रवासाच्या समाप्तीला पुत्युला येथे त्याला काही बांधव भेटले; पुढे आणखी काही बंधू त्याला भेटायला आले. यावर पौलाची प्रतिक्रिया काय होती? “त्यांना पाहून [भेटायला आलेल्या बांधवांना पाहून] पौलाने देवाची उपकारस्तुति करून धैर्य धरले.” (प्रेषितांची कृत्ये २८:१३-१५) आपल्या ख्रिस्ती बांधवांना पुन्हा एकदा पाहून पौलाला शक्‍ती मिळाली. ख्रिस्ती बांधवांच्या संगतीतून आपल्यालाही शक्‍ती मिळू शकते. एकमेकांशी संगती करण्याची आपल्याला मुभा आहे तोपर्यंत तरी, जीवनाकडे नेणाऱ्‍या अरुंद रस्त्यावरून आपण एकट्याने चालण्याचा प्रयत्न करू नये.—नीतिसूत्रे १८:१; मत्तय ७:१४.

११. ज्यांत ‘पराकोटीचे सामर्थ्य’ आवश्‍यक असते अशा काही परिस्थितींचा उल्लेख करा.

११ नियमित प्रार्थना, देवाच्या वचनाचा अभ्यास आणि आपल्या बंधूभगिनींसोबत संगती केल्यामुळे आपण ‘प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जातो.’ (इफिसकर ६:१०) ‘प्रभूच्या सामर्थ्याची’ ज्याला गरज नाही असा कोणीही नाही. आपल्यापैकी काहींना आजाराने जर्जर केले आहे, तर इतरांना म्हातारपणाने; काहीजण आपल्या जोडीदाराच्या मृत्यूमुळे एकाकी झाले आहेत. (स्तोत्र ४१:३) काहीजणांचे वैवाहिक जोडीदार सत्यात नसल्यामुळे त्यांना विरोध सहन करावा लागतो. आईवडिलांना, खासकरून एकट्याने कुटुंब चालवणाऱ्‍यांना पूर्णवेळेची नोकरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्‍या सांभाळताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. तरुण ख्रिश्‍चनांनाही, ड्रग्स घेण्याचा किंवा अनैतिक कृत्ये करण्याचा मित्रमैत्रिणींकडून दबाव येतो; आणि अशावेळेस खंबीर राहण्यासाठी ताकदीची नितांत गरज असते. या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी, आपण सर्वांनी मोकळेपणाने यहोवाकडे ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देण्याची विनंती केली पाहिजे.—२ करिंथकर ४:७.

“तो निर्बलास विपुल बल देतो”

१२. ख्रिस्ती सेवा करताना यहोवा आपल्याला कशाप्रकारे मदत करतो?

१२ याशिवाय, प्रचार कार्याकरता देखील यहोवा आपल्या सेवकांना शक्‍ती देतो. यशयाच्या भविष्यवाणीत असे म्हटले आहे: “तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. . . . तरी परमेश्‍वराची आशा धरून राहणारे नवीन शक्‍ति संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.” (यशया ४०:२९-३१) प्रेषित पौलाला हाच अनुभव आला, त्याची सेवा पूर्ण करण्याकरता त्याला देवाकडून सामर्थ्य मिळाले. यामुळेच त्याची सेवा परिणामकारक ठरली. थेस्सलनीका येथील ख्रिस्ती बांधवांना त्याने असे लिहिले: “आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली.” (१ थेस्सलनीकाकर १:५) त्याच्या प्रचारात व शिक्षणात इतकी ताकद होती की ऐकणाऱ्‍यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आले.

१३. तीव्र विरोधाला तोंड देताना आपले कार्य करत राहण्यासाठी यिर्मयाला सामर्थ्य कोठून मिळाले?

१३ आपल्या प्रचाराच्या क्षेत्रात जेव्हा लोक थंड प्रतिसाद देतात, जेव्हा अनेक वर्षे पुन्हापुन्हा त्याच क्षेत्रात काम करूनही चांगले परिणाम दिसून येत नाहीत तेव्हा निराशा वाटणे साहजिक आहे. यिर्मया संदेष्ट्याला देखील विरोध सहन करावा लागला, लोकांनी त्याची थट्टा केली आणि तो सांगत असलेल्या संदेशाकडे जराही लक्ष दिले नाही; तेव्हा तो देखील निरुत्साहित झाला. त्याने मनातल्या मनात ठरवले: “मी [देवाचे] नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही.” पण तो फार वेळ शांत राहू शकला नाही. त्याचा संदेश जणू “त्याच्या हाडात कोंडलेला अग्नि जळत आहे” असा त्याला अस्वस्थ करू लागला. (यिर्मया २०:९) मग विरोधाला न जुमानता, नव्या जोमाने कार्य करण्याचे सामर्थ्य त्याला कोठून मिळाले? “परमेश्‍वर पराक्रमी [शक्‍तिशाली] वीराप्रमाणे मजबरोबर आहे,” असे तो म्हणाला. (यिर्मया २०:११) आपला संदेश आणि देवाने आपल्याला नेमलेले कार्य किती महत्त्वाचे आहे हे यिर्मयाने ओळखले होते आणि म्हणून यहोवाने जेव्हा त्याला उत्तेजन दिले तेव्हा तो पुन्हा एकदा कामाला लागला.

दुखवण्याची शक्‍ती आणि दुःख हलके करण्याची शक्‍ती

१४. (अ) जीभ हा अंग किती शक्‍तिशाली आहे? (ब) जिव्हेमुळे कशाप्रकारे अनर्थ होऊ शकतो याची उदाहरणे द्या.

१४ सर्वच प्रकारच्या शक्‍ती देव देत नाही. मनुष्याची जीभ हा शरीरातला एक लहानसा अंग आहे, पण या जिभेत इतरांना दुखवण्याचीही शक्‍ती आहे आणि इतरांचे दुःख हलके करण्याचीही शक्‍ती आहे. शलमोनाने ताकीद दिली, “जिव्हेच्या हाती मृत्यु व जीवन ही आहेत.” (नीतिसूत्रे १८:२१) सैतानाने हव्वेसोबत अगदी थोडावेळ संभाषण केले होते, पण त्याचे परिणाम भयंकर झाले; आपल्या तोंडातून निघणारे शब्द किती अनर्थ करू शकतात हेच यावरून दिसून येते. (उत्पत्ति ३:१-५; याकोब ३:५) कधीकधी आपण बोललेल्या एखाद्या गोष्टीमुळे बरेच नुकसान होऊ शकते. एखाद्या तरुण मुलीला तिच्या वजनाबद्दल हिणवल्यामुळे कदाचित ती हळूहळू काही खायचेच सोडून देईल. एखाद्याबद्दल विचार न करता वारंवार खोटी माहिती सांगितल्यामुळे चांगल्यात चांगली मैत्री देखील तुटू शकते. त्यामुळे, जिभेवर नियंत्रण ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.

१५. इतरांची उन्‍नती करण्यासाठी आणि त्यांचे दुःख हलके करण्यासाठी आपण आपल्या जिव्हेचा उपयोग कसा करू शकतो?

१५ पण दुसरीकडे पाहता, जिभेचा उपयोग इतरांना उत्तेजन देण्याकरता देखील करता येतो. प्राचीन काळात लिहिलेल्या नीतिसूत्रांत असे म्हटले आहे: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” (नीतिसूत्रे १२:१८) दुःखी किंवा शोकित जणांना सांत्वन देण्याकरता समजूतदार ख्रिस्ती आपल्या जिव्हेच्या शक्‍तीचा उपयोग करतात. तसेच, तरुणांशी सहानुभूतीने बोलल्यास त्यांना आपल्या सोबत्यांच्या दबावाला तोंड देण्याचे उत्तेजन मिळू शकते. विचारशीलपणे बोलल्यामुळे आपण वयोवृद्ध बंधूभगिनींनाही खूप दिलासा देऊ शकतो; तुमच्यावर आमचे प्रेम आहे आणि आम्हाला तुमची अजूनही गरज आहे अशी हमी त्यांना देऊ शकतो. आजाऱ्‍यांशी प्रेमाने बोलल्याने त्यांना उत्साह मिळतो. पण जिभेचा सर्वात चांगला उपयोग आपण देवाच्या राज्याचा संदेश सर्वांना सांगण्यासाठी करू शकतो. देवाचे वचन आपल्या मनात रुजले असेल तर आपोआपच आपल्याला त्याची घोषणा करण्याचे सामर्थ्य मिळेल. बायबल म्हणते: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको.”—नीतिसूत्रे ३:२७.

शक्‍तीचा योग्य उपयोग

१६, १७. देवाने दिलेल्या अधिकाराचा वापर करताना वडील, पालक, पती आणि पत्नी कशाप्रकारे यहोवाचे अनुकरण करू शकतात?

१६ यहोवा सर्वशक्‍तीमान आहे. पण तरीसुद्धा ख्रिस्ती मंडळीवर तो अतिशय प्रेमाने राज्य करतो. (१ योहान ४:८) ख्रिस्ती मंडळीत देखरेख करणारे बंधू याबाबतीत यहोवाचे अनुकरण करतात; ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करत नाहीत, तर प्रेमाने देवाच्या कळपाची काळजी वाहतात. हे खरे आहे, की कधीकधी या बांधवांना ‘दोष दाखवावा लागतो, निषेध व बोध करावा लागतो,’ पण हे देखील ते ‘सहनशील वृत्तीने आणि शिक्षण’ कौशल्याने करतात. (२ तीमथ्य ४:२) आणि म्हणूनच प्रेषित पेत्राने मंडळीत अधिकाराच्या पदावर असणाऱ्‍यांसाठी दिलेल्या सल्ल्यावर वडील नेहमी मनन करतात: “देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा; तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा.”—१ पेत्र ५:२, ३; १ थेस्सलनीकाकर २:७, ८.

१७ कुटुंबात आईवडिलांना आणि पतींना यहोवाने अधिकार देऊ केला आहे. त्यांनी या अधिकाराचा वापर आपल्या कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी आणि त्यांची काळजी वाहण्यासाठी केला पाहिजे. (इफिसकर ५:२२, २८-३०; ६:४) अधिकाराचा प्रेमळपणे वापर करूनही चांगले परिणाम मिळवता येतात हे येशूच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला मिळते. मुलांना शिक्षा देताना कधीही अतिरेक करता कामा नये, तसेच आईवडिलांचे नियम व अपेक्षा नेहमी सुसंगत असाव्यात; यामुळे मुले खचून जाणार नाहीत. (कलस्सैकर ३:२१) त्याचप्रकारे ख्रिस्ती पती देवाने दिलेली मस्तकपदाची भूमिका प्रेमाने पार पाडतात. आणि पत्नी देखील आपल्या पतींचा मनस्वी आदर करतात. त्या आपल्या पतींवर वर्चस्व करण्यासाठी किंवा नेहमी आपल्याच इच्छेप्रमाणे सर्व घडवून आणण्यासाठी देवाने दिलेल्या अधिकाराच्या मर्यादांचे उल्लंघन करत नाहीत. यामुळे आपोआपच वैवाहिक बंधन अधिक मजबूत होते.—इफिसकर ५:२८, ३३; १ पेत्र ३:७.

१८. (अ) रागावर नियंत्रण करण्यासाठी आपण यहोवाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करावे? (ब) अधिकार पदांवर असणाऱ्‍यांनी त्याच्या हाताखाली असणाऱ्‍यांच्या मनात काय उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

१८ कुटुंबात आणि मंडळीत अधिकार चालवणाऱ्‍यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची खास काळजी घेतली पाहिजे; कारण रागामुळे प्रीती नव्हे, तर भीती उत्पन्‍न होते. संदेष्टा नहूम याने म्हटले: “परमेश्‍वर मंदक्रोध व महापराक्रमी (शक्‍तिशाली) आहे.” (नहूम १:३; कलस्सैकर ३:१९) रागावर नियंत्रण करणे यातच खरी ताकद आहे, रागावरचे नियंत्रण गमावणे हे दुबळेपणाचे चिन्ह आहे. (नीतिसूत्रे १६:३२) कुटुंबात आणि मंडळीतही, आपला मुख्य उद्देश सर्वांच्या मनात प्रेम निर्माण करणे हा आहे—यहोवाबद्दलचे प्रेम, एकमेकांबद्दलचे प्रेम आणि योग्य तत्त्वांबद्दलचे प्रेम. प्रेम हे एकतेचे सर्वात मजबूत बंधन आहे आणि सुधारणा करण्याची प्रेरणा देणारा सर्वात परिणामकारक मार्ग आहे.—१ करिंथकर १३:८, १३; कलस्सैकर ३:१४.

१९. यहोवा आपल्याला कोणता दिलासा देतो आणि आपण त्याला कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा?

१९ यहोवाला जाणून घेणे म्हणजे त्याच्या सामर्थ्यास ओळखणे. यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने म्हटले: “तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्‍वर हा सनातन देव, परमेश्‍वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्‍नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धि अगम्य आहे.” (यशया ४०:२८) यहोवाची शक्‍ती कधीही न संपणारी आहे. स्वतःच्या शक्‍तीपेक्षा आपण नेहमी त्याच्याच शक्‍तीवर विसंबून राहिल्यास तो आपल्याला कधीही सोडणार नाही. तो स्वतः याचे आश्‍वासन देतो: “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्‍ति देतो; मी तुझे साहाय्यहि करितो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो.” (यशया ४१:१०) यहोवाच्या या प्रेमाला आपण कशाप्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे? येशूचे अनुकरण करून, यहोवाने जी काही शक्‍ती आपल्या हातात दिली आहे तिचा नेहमी इतरांच्या मदतीसाठी त्यांच्या उन्‍नतीसाठी उपयोग करू या. आपल्या जिभेचाही आपण अशाप्रकारे वापर करावा की त्यामुळे इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, तर त्यांचे दुःख हलके होईल. तसेच आध्यात्मिकरित्या सदोदीत जागृत राहून, विश्‍वासात खंबीर राहून आपला महान निर्माणकर्ता यहोवा याच्या शक्‍तीने सदैव बलवान होत राहू.—१ करिंथकर १६:१३.

[तळटीपा]

^ परि. 9 यहुद्यांना मिळालेली नियमशास्त्राची प्रत ही मोशेच्या नियमशास्त्राची मूळ प्रत होती; कितीतरी शतकांआधी ही मंदिरात ठेवण्यात आली होती.

तुम्ही याचे स्पष्टीकरण कसे द्याल?

• यहोवा आपल्या शक्‍तीचा उपयोग कशाप्रकारे करतो?

• आपण कोणकोणत्या मार्गांनी यहोवाकडून सामर्थ्य मिळवू शकतो?

• जिभेचा आपण कशाप्रकारे उपयोग केला पाहिजे?

• देवाने दिलेला अधिकार एक आशीर्वाद केव्हा ठरेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

यहोवाने दिलेल्या शक्‍तीचा येशूने इतरांना मदत करण्यासाठी उपयोग केला

[१७ पानांवरील चित्रे]

देवाचे वचन आपल्या मनात रुजले असेल तर आपोआपच आपल्याला त्याची घोषणा करण्याचे सामर्थ्य मिळेल