येशूची जीवनकथा—वादाच्या भोवऱ्यात!
येशूची जीवनकथा—वादाच्या भोवऱ्यात!
बायबलमध्ये येशूच्या जन्माविषयी देण्यात आलेली माहिती खरी आहे का?
येशूच्या शिकवणी खरोखरच त्याने शिकवल्या का?
येशू मेल्यावर पुन्हा जिवंत झाला हे खरे आहे का?
“मार्ग, सत्य व जीवन मीच आहे” —योहान १४:६. असे येशूनेच म्हटले होते का?
अशा काही प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याकरता सुमारे ८० विद्वान जिजस सेमीनारला आले होते. हे चर्चासत्र १९८५ सालापासून वर्षातून दोनदा भरवले जाते. या वर्षाच्या चर्चासत्रात सहभाग घेतलेल्या विद्वानांनी वरती उल्लेख केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली पण काहीशा
वेगळ्या पद्धतीने. बायबलमधील येशूचे शब्द किती आणि कितपत खरे आहेत याविषयीचे आपले मत त्यांनी चिठ्या टाकून व्यक्त केले. लाल रंगाची म्हणजे बरोबर, काळ्या रंगाची म्हणजे चूक, गुलाबी रंगाची म्हणजे कदाचित बरोबर, करड्या रंगाची म्हणजे कदाचित चूक.या पद्धतीचा वापर करून त्यांनी वरील चारही प्रश्नांची नकारात्मक उत्तरे दिली. खरे तर, त्यांच्या मते बायबलमध्ये येशूने जे काही म्हटले होते त्यापैकी ८२ टक्के गोष्टी तो मुळात बोललाच नव्हता. शिवाय त्यांना असे वाटते, की बायबलमध्ये येशूविषयी जे सांगितले आहे त्यापैकी केवळ १६ टक्के खरे आहे.
येशूविषयी माहिती देणाऱ्या बायबलमधील पुस्तकांवर अशाप्रकारे टीका होणे काही नवीन गोष्ट नाही. सन १७७४ मध्ये भाषातज्ज्ञ हर्मान रायमारूस यांच्या प्रकाशित झालेल्या १,४०० पानी ग्रंथात त्यांनी या पुस्तकांवर कडाडून टीका केली होती. त्यांना वाटत असलेल्या पुस्तकांतील विसंगतीमुळे आणि या पुस्तकांत वापरलेल्या भाषेमुळे त्यांनी ही टीका केली होती. तेव्हापासून या पुस्तकांच्या खरेपणाबद्दल टीकाकारांनी पुष्कळदा शंका व्यक्त केली आहे. आणि यामुळे काही लोक या पुस्तकांवर इतक्या सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत.
या विद्वानांच्या विचारांमध्ये एक समान धागा दिसून येतो. त्या सर्वांनाच असे वाटते, की ही पुस्तके दुसरे-तिसरे काही नसून केवळ दंतकथा आहेत. त्यांच्या मनात पुढील प्रश्न येतात: या पुस्तकांच्या लेखकांनी घडलेल्या घटनांची अतिशयोक्ती केली आहे का? मूळ लेखकांच्या लिखाणात ख्रिश्चनांनी नंतर काही फेरबदल केले आहेत का? या पुस्तकांत किती खरे आणि किती खोटे आहे?
लोकांना बायबल एक कल्पित कहाण्यांचे पुस्तक वाटते कारण त्यांचा देवाधर्मावर विश्वासच राहिलेला नाही. दुसरे कारण म्हणजे ख्रिश्चनांनी केलेला रक्तपात, जुलूम, त्यांच्यातील गटबाजी, त्यांचा ढोंगीपणा आणि त्यांची स्वैर जीवनशैली पाहिल्यामुळे काही लोकांना बायबलवर विश्वास ठेवायला जड जाते.
पण तुम्हाला काय वाटते? या पुस्तकांवर काही विद्वान शंका घेतात म्हणून आणि ते या पुस्तकांना दंतकथा म्हणतात म्हणून तुम्ही देखील या पुस्तकांकडे शंकेने पाहणे योग्य होईल का? किंवा, स्वतःला ख्रिश्चन म्हणवणारे लोक बायबलच्या शिकवणुकींनुसार चालत नाहीत म्हणून तुम्हाला बायबल निरर्थक वाटावे का? येशूची जीवनकथा खरी आहे की खोटी हे आपण आता पाहू या.
[४ पानांवरील चित्र]
येशूची जीवनकथा खरी आहे की खोटी?
[चित्राचे श्रेय]
येशू पाण्यावर चालताना /The Doré Bible Illustrations/Dover Publications
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
पृष्ठे ३-५ आणि ८ वरील पार्श्वचित्रे: Courtesy of the Freer Gallery of Art, Smithsonian Institution, Washington, D.C.