व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाची महिमा करणारे संगीत

देवाची महिमा करणारे संगीत

देवाची महिमा करणारे संगीत

कला विश्‍वात संगीताला “निसर्गाकडून मिळालेली सर्वात जुनी व सर्वोत्तम देणगी” म्हटले जाते. मानव आणि प्राणी यांच्यातील फरक जसा भाषेतून स्पष्ट होतो तसाच तो संगीतानेही होतो. संगीत केवळ ऐकायलाच गोड वाटत नाही तर त्याने आपल्या भावनाही जागृत होतात. संगीत आपल्याला मंत्रमुग्ध करते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीत देवालाही आवडते.

बायबलमध्ये म्हटले आहे की प्राचीन काळचे इस्राएली लोक संगीतप्रिय लोक होते. संगीत जणू त्यांच्या नसा नसात भिनले होते; गायनवादन हे त्यांच्याकरता नेहमीचेच होते. पण, बहुतेकदा गाणेच ते पसंत करायचे. म्हणूनच, उंगर्स बायबल डिक्शनरी म्हणते, की संगीत कलेला “बायबलच्या काळात खूपच महत्त्वाचे स्थान होते.”

शलमोनाने यहोवाकरता भव्य मंदिर बांधण्याआधी, राजा दाविदाने निवास मंडपासमोर लेवीयांचा एक “गायकगण” नेमला होता. (१ इतिहास ६:३१, ३२) यहोवाच्या कराराचा कोश जेरुशलेमेत आणण्यात आला तेव्हा दाविदाने काही लेव्यांना यहोवाची ‘स्तुती व उपकारस्मरण’ करावयास नेमले होते. हे लेवी यहोवाच्या स्तुतीचे गीत गाताना ‘सतार, वीणा, झांज आणि कर्णे’ वाजवीत असत. ‘यहोवाची दया सनातन आहे म्हणून त्याचा धन्यवाद करावयासाठी या लोकांना नावे देऊन निवडले होते.’—१ इतिहास १६:४-६, ४१; २५:१.

बायबलमधील स्तोत्रसंहिता या पुस्तकात “परमेश्‍वराची दया सनातन आहे,” हे शब्द अनेकदा आले आहेत. हे स्तुती गीताचेच पुस्तक आहे. उदाहरणार्थ, स्तोत्रसंहितेच्या १३६ व्या अध्यायातील २६ वचनांपैकी प्रत्येक वचनात ‘त्याची दया सनातन आहे’ हे धृपद आहे. एक बायबल विद्वान लिहितात, की “इब्री भाषेतील हे धृपद इतके लहानसे आहे की जो कोणी ते ऐकेल त्याच्या ते लक्षात राहील.”

स्तोत्रसंहितेच्या काही अध्यायांच्या सुरवातीला दिलेल्या टिप्पणीवरून असे सूचित होते, की प्राचीन इस्राएलमध्ये वाद्यांचा सर्रास वापर होत असे. १५० व्या स्तोत्रात कर्णा, वीणा, डफ, पावा, झांज आणि तंतुवाद्य यांचा उल्लेख आढळतो. तरीपण, वाद्य वाजवण्यापेक्षा गीत गाण्याला जास्त महत्त्व होते. कारण स्तोत्र १५०:६ म्हणते: “प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा.”

संगीताद्वारे आपण आपल्या भावना व्यक्‍त करू शकतो. बायबल काळांत शोक प्रकट करण्याकरता विलापगीत गायिले जायचे. अशा गीतांमध्ये एकाचप्रकारचे आलाप असायचे. इन्साईट ऑन द स्क्रिप्चर्स या बायबल कोशात असे म्हटले आहे, की “अशाप्रकारचे आलाप फक्‍त विलापगीतांतच आढळतात.” * आणि हे संगीत फक्‍त इस्राएलमध्येच चालायचे.

येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री आपल्या प्रेषितांबरोबर यहोवाच्या स्तुतीगीतांमध्ये हालेल स्तोत्रे गायिले. (स्तोत्रसंहिता ११३-११८) या प्रेषितांपासून त्यांचा धनी अर्थात येशू निघून जाणार असल्यामुळे त्यांचे धैर्य खचले होते! परंतु या स्तोत्रांनी त्यांचे मनोधैर्य वाढवले असावे! एवढेच नव्हे तर, त्यांनी “त्याची दया सनातन आहे,” हे धृपद पाच वेळा गायिले तेव्हा यहोवा देवाला विश्‍वासू राहण्याचा त्यांचा निश्‍चय आणखीनच पक्का झाला असावा.—स्तोत्र ११८:१-४, २९.

इफिस आणि कलस्सै मधील आरंभीचे ख्रिश्‍चन “स्तोत्रे, गीते” (“स्तुतीगीत”) गात असत. ते ‘आध्यात्मिक गीत’ देखील गायचे; म्हणजेच ते पूर्ण अंतःकरणाने यहोवाची स्तुतीगीते गायचे. (इफिसकर ५:१९; कलस्सैकर ३:१६) यास्तव, “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार,” असे येशूने जे म्हटले ते शंभर टक्के खरे नाही का?—मत्तय १२:३४.

देवाला न आवडणारे संगीत

बायबलमध्ये अशाही संगीताविषयी सांगितले आहे जे ऐकल्यावर देवाचा क्रोध भडकला. सिनाय पर्वताजवळ झालेली घटना आठवा. मोशे नियमशास्त्र आणि दहा आज्ञा आणण्यासाठी सिनाय पर्वतावर गेला होता. पर्वतावरून खाली उतरत असताना त्याने ‘गाण्याचा आवाज’ ऐकला. पण ते गाणे ‘विजयोत्सवाचे’ अथवा ‘पराभवाचे नव्हते.’ ते मूर्तीपूजेचे गाणे होते. त्यामुळे यहोवाचा कोप भडकला आणि तेथे गायनवादन करणाऱ्‍या ३,००० लोकांचा वध करण्यास त्याने सांगितले.—निर्गम ३२:१८, २५-२८.

प्रेषित पौल म्हणतो: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) म्हणूनच, पापी मानवांनी रचलेली सर्वच गाणी यहोवाला आवडत नाहीत. कारण काही गीतांचे बोल बायबलच्या शिकवणींच्या विरुद्ध आहेत. हे बोल, कामोत्तेजक असतात, अमर आत्म्याची शिकवण देतात आणि मरीयेच्या भक्‍तीच्या संदर्भात असतात. अशा गीतांद्वारे खऱ्‍या देवाचा अपमान होतो.—अनुवाद १८:१०-१२; यहेज्केल १८:४; लूक १:३५, ३८.

संगीताची काळजी पूर्वक निवड

आजकाल इतक्या विविध प्रकारचे संगीत रचले जाते की त्याची निवड करणे कठीण होते. पुष्कळदा संगीताचे बोल ऐकण्याआधीच कॅसेट व सिडीच्या आकर्षक कव्हरमुळे लोक ते विकत घेतात. पण आपल्याला यहोवाला संतुष्ट करायचे आहे तर आपण काळजीपूर्वक संगीतांची निवड केली पाहिजे. खोट्या धर्माची शिकवण देणाऱ्‍या किंवा अश्‍लील अर्थ असणाऱ्‍या अथवा भूताखेतांचा संबंध असलेल्या संगीताची आपण निवड करणार नाही.

अल्बर्टला आफ्रिकेत मिशनरी म्हणून नियुक्‍ती मिळाली तेव्हा त्याला पियानो वाजवायला पुरेसा वेळ मिळायचा नाही. म्हणून मग, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो आपल्याकडच्या ग्रामोफोन रेकॉर्डींग ऐकायचा. आता तो आपल्या मायदेशी प्रवासी पर्यवेक्षक म्हणून काम पाहातो. कधीकधी वेळ काढून तो आपल्या आवडीची गाणी ऐकतो. बेथोवन हा त्याचा आवडता संगीतकार आहे. आणि त्याचे बरेचसे रेकॉर्डिंग त्याने गोळा केले आहेत. हे खरे आहे की सर्वांच्या आवडीनिवडी एकसारख्या नसतात. पण, संगीताची निवड करण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा मात्र आपण सर्व जण पौलाचे हे शब्द लक्षात ठेवू शकतो: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथकर १०:३१.

संगीत आणि समर्पण

सूझीकरता संगीत म्हणजे जीव की प्राण. ती म्हणते: “मी ६ वर्षांची असताना पियानो वाजवायला शिकले; १० वर्षांची होते तेव्हा व्हायलीन शिकले आणि १२ वर्षांची असताना हार्प शिकले.” नंतर तिने रॉयल कॉलेज ऑफ म्युझिक येथे एका प्रख्यात हार्प वादकाकडून हार्प वाजवण्याचे ट्रेनिंग घेतले. त्यानंतर पॅरिसच्या संगीत कलामंदिरातून एक वर्षाचे खास ट्रेनिंग घेतले. संगीत क्षेत्रात तिला पुष्कळ पदव्या मिळाल्या. वीणा वाजवण्याचा व पियानो शिकवण्याचा तिने डिप्लोमा मिळवला.

सूझी लंडनमध्ये असताना तिचा यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क आला. साक्षीदारांमधलं खरं प्रेम पाहून ती खूप प्रभावीत झाली. हळू हळू यहोवाबद्दलचं तिचं प्रेम दृढ झालं. ती पूर्ण मनाने यहोवाची सेवा करू इच्छित होती. त्यामुळे तिने यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला. समर्पणाविषयी सूझी म्हणते: “संगीताला आपल्या जीवनाचे करिअर बनवणारी व्यक्‍ती जसा तन्मयतेने रियाज करते त्याचप्रमाणे सत्याच्या मार्गाने चालण्याच्या ध्येयाकरता एखाद्या व्यक्‍तीला तन्मयतेने यहोवाची सेवा करावी लागते.” सूझी प्रचारात जास्त वेळ घालवू लागल्यापासून संगीत कार्यक्रमांसाठी ती पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नाही.—मत्तय २४:१४; मार्क १३:१०.

मग आता तिला कसे वाटते? ती म्हणते: “मला पूर्वी इतका रियाज करायला वेळ मिळत नाही तरीदेखील वेळ मिळेल तेव्हा मी संगीताचा आनंद लुटते. कारण संगीत ही यहोवाकडील देणगी आहे. आणि जेव्हापासून मी यहोवाच्या सेवेला जीवनात प्रथम स्थान देऊ लागले तेव्हापासून तर संगीतातील आनंद अधिकच वाढला आहे.”—मत्तय ६:३३.

देवाची स्तुती करणारे संगीत

अल्बर्ट आणि सूझी संपूर्ण जगभरातील ६० लाख पेक्षा अधिक यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणेच नियमितरीत्या यहोवा देवाची संगीताद्वारे स्तुती करतात. यहोवाच्या साक्षीदारांच्या २३४ देशांतील राज्य सभागृहांमध्ये होणाऱ्‍या ख्रिस्ती सभांची सुरवात आणि समारोप यहोवाच्या स्तुतीगीतांनीच होते.

ही गीते बायबलच्या विषयांवर आधारित असतात. जसे की, यहोवा काळजी वाहणारा देव आहे (गीत ४४), यहोवाची स्तुती करा (गीत १९०), ख्रिस्ती बंधूभगिनी, ख्रिस्ती जीवन व जबाबदाऱ्‍या, उत्तम गुण वगैरे वगैरे. आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि उत्तर व दक्षिण अमेरिका अशा निरनिराळ्या ठिकाणच्या बांधवांनी ही गाणी रचली आहेत. त्यामुळे या गाण्यांच्या चालीत सुरेख विविधता आढळते. *

एका स्तोत्रकर्त्याने असे लिहिले: “परमेश्‍वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी, परमेश्‍वराचे गुणगान कर. परमेश्‍वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा, राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्‌भुतकृत्ये जाहीर करा.” (स्तोत्र ९६:१-३) हे यहोवासाठी गायलेल्या स्तुतीगीताचे सुरवातीचे बोल आहेत. जे इस्राएली लोक गायचे. आज यहोवाचे साक्षीदारही राज्य सभागृहांत यहोवाला स्तुतीगीत गातात. यहोवाला आवडणाऱ्‍या गीतांच्या गायनात सूरात सूर मिसळण्याचे तुम्हालाही आमंत्रण आहे.

[तळटीपा]

^ परि. 7 वॉच टावर संस्थेद्वारे प्रकाशित.

^ परि. 22 ही गीते, सिंग प्रेझेझ टू जेहोवा या गीत-पुस्तकातील आहेत. हे पुस्तक वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केले आहे.

[२८ पानांवरील चित्र]

यहोवाचे गुणगान करताना