व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आशादायी मनोवृत्ती बाळगा!

आशादायी मनोवृत्ती बाळगा!

आशादायी मनोवृत्ती बाळगा!

“मी आपल्या तारण करणाऱ्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.”—मीखा ७:७.

१, २. (अ) अरण्यात इस्राएली लोकांच्या वाईट मनोवृत्तीमुळे काय घडले? (ब) ख्रिस्ती व्यक्‍तीची मनोवृत्ती योग्य नसल्यास काय घडू शकते?

जीवनात कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असतो. इस्राएली लोक अरण्यात भटकत असताना यहोवाने त्यांना चमत्कारिकरित्या मान्‍ना पुरवला. त्या ओसाड मरुभूमीतही यहोवाने त्यांना जिवंत राखण्याकरता मान्‍ना पुरवला याबद्दल त्यांनी खरे तर कृतज्ञ असायला हवे होते. यावरून त्यांची सकारात्मक मनोवृत्ती असल्याचे दिसून आले असते. पण उलट ते मिसर देशातील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची आठवण काढू लागले व मान्‍ना बेचव आहे अशी कुरकूर करू लागले. किती वाईट मनोवृत्ती!—गणना ११:४-६.

व्यक्‍तीची मनोवृत्ती चांगली असेल, तर तिला सर्वकाही चांगले दिसते पण मनोवृत्तीच नकारात्मक असेल तर काहीही चांगले दिसत नाही. ख्रिस्ती व्यक्‍तीची मनोवृत्ती योग्य नसल्यास हळूहळू यहोवाच्या सेवेतला तिचा आनंद कमी होऊ शकतो; आणि याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात कारण नहेम्याने म्हटल्याप्रमाणे: “परमेश्‍वराविषयीचा जो आनंद तोच [आपला] आश्रयदुर्ग” आहे. (नहेम्या ८:१०) सकारात्मक आणि आनंदी मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपण विश्‍वासात दृढ राहू शकतो आणि यामुळे आपण मंडळीत शांती आणि एकता राखण्यास हातभार लावतो.—रोमकर १५:१३; फिलिप्पैकर १:२५.

३. कठीण काळात जगत असतानाही योग्य मनोवृत्ती ठेवल्यामुळे यिर्मयाला कोणता फायदा झाला?

यिर्मयाने अत्यंत कठीण काळात जगत असतानाही आशादायी मनोवृत्ती ठेवली. सा.यु.पू. ६०७ साली जेरूसलेमचा नाश झाला; त्यावेळी झालेल्या भयंकर घटना यिर्मयाने आपल्या डोळ्यांनी पाहिल्या. पण यिर्मयाने या परिस्थितीचीही चांगली बाजू पाहिली. यिर्मयाला खात्री होती की यहोवा इस्राएल राष्ट्राला विसरणार नाही, व त्यांचा संपूर्ण नाश होणार नाही. विलापगीत या पुस्तकात यिर्मयाने असे लिहिले: “आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्‍वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे.” (विलापगीत ३:२२, २३) सबंध इतिहासात देवाच्या सेवकांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही आशादायी, आनंदी मनोवृत्ती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.—२ करिंथकर ७:४; १ थेस्सलनीकाकर १:६; याकोब १:२.

४. येशूने कशाप्रकारची मनोवृत्ती राखली आणि यामुळे त्याला कशी मदत मिळाली?

यिर्मयाच्या काळानंतर सहाशे वर्षांनी येशूला देखील सकारात्मक मनोवृत्ती ठेवण्याचा फायदा झाला. बायबल सांगते: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री लोकांस १२:२) येशूला भयंकर विरोध आणि छळ सहन करावा लागला—इतकेच काय, तर शेवटी त्याला वधस्तंभावर यातना सहन कराव्या लागल्या, पण तरीसुद्धा “जो आनंद त्याच्यापुढे होता” त्यावर त्याने सदोदीत लक्ष ठेवले. हा आनंद काय होता? यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन व त्याचे नाव पवित्र करण्याचा आणि भविष्यात आज्ञाधारक मानवजातीला अद्‌भुत आशीर्वाद मिळवून देण्याचा हा आनंद होता.

आशादायी मनोवृत्ती आत्मसात करा

५. आशादायी मनोवृत्ती ठेवल्याने योग्य दृष्टिकोन राखण्यास कशी मदत होऊ शकते याचे एक उदाहरण सांगा.

येशूसारखी मनोवृत्ती विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे किंवा आपल्या अपेक्षित वेळी होत नाहीत, पण योग्य मनोवृत्ती असल्यास यहोवाच्या सेवेतला आपला आनंद कमी होणार नाही. संदेष्ट्या मीखाने म्हटले: “मी तर परमेश्‍वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणाऱ्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.” (मीखा ७:७; विलापगीत ३:२१) मीखाप्रमाणेच आपणही आशादायी मनोवृत्ती ठेवू शकतो. हे कसे करता येईल? बऱ्‍याच मार्गांनी. उदाहरणार्थ, आपल्याला असे वाटत असेल की मंडळीत जबाबदारीच्या पदावर असलेल्या एखाद्या बांधवाने काहीतरी चूक केली आहे आणि त्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे. पण देवाच्या न्यायाची वाट पाहण्याची, आशादायी मनोवृत्ती असेल तर आपण अशा परिस्थितीत आधी विचार करू की ‘त्या बांधवाच्या हातून खरच चूक झाली आहे का, की माझाच काहीतरी गैरसमज झाला आहे? त्याच्याकडून चूक झालीही असेल, तर यहोवा त्याला आणखी संधी तर देत नसेल? त्या व्यक्‍तीने स्वतःत सुधारणा करावी आणि तिला फार मोठी शिक्षा देण्याची गरज पडू नये म्हणून तो मुद्दामहून तर काही घटना घडू देत नसेल?’

६. व्यक्‍तिगत समस्येला तोंड देताना सहनशील मनोवृत्ती कशी सहायक ठरू शकते?

एखाद्या व्यक्‍तिगत समस्येला तोंड देताना किंवा स्वतःच्या एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीवर मात करण्याचा प्रयत्न करताना देखील आपल्याला सहनशील मनोवृत्ती ठेवावी लागेल. यहोवाची मदत मागूनही आपली समस्या दूर झाली नाही तर? समस्या सोडवण्याचा आपल्याकडून शक्य तितका प्रयत्न केल्यानंतर आपण येशूच्या या शब्दांवर विश्‍वास ठेवला पाहिजे: “मागत राहा, म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोकत राहा म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल.” (लूक ११:९, NW) तेव्हा प्रार्थना करत राहा आणि यहोवावर विसंबून राहा. योग्य वेळी आणि यहोवाला योग्य वाटेल त्या मार्गाने तो जरूर तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देईल.—१ थेस्सलनीकाकर ५:१७.

७. बायबलमधील सत्यांची समज अधिक स्पष्ट होण्याविषयी आशादायी दृष्टीकोन ठेवल्यास आपल्याला कशाप्रकारे मदत होईल?

बायबलच्या भविष्यवाण्यांची जसजशी पूर्तता होत आहे तसतशी आपली बायबलची समज अधिकाधिक स्पष्ट होत चालली आहे. पण एखाद्या विषयाचा अजूनही खुलासा का करण्यात आला नाही, असा विचार आपल्या मनात येऊ शकतो. आपल्या अपेक्षित वेळी विशिष्ट विषयावर स्पष्टीकरण मिळाले नाही तरीसुद्धा आपण वाट पाहायला तयार आहोत का? आठवणीत असू द्या, यहोवाने ‘ख्रिस्ताविषयीचे रहस्य’ जवळजवळ ४,००० वर्षांच्या काळादरम्यान टप्प्याटप्प्याने प्रगट केले. (इफिसकर ३:३-६) मग आपण आज उतावीळ होण्याचे काही कारण आहे का? यहोवाच्या लोकांना “यथाकाळी खावयास” देण्याकरता “विश्‍वासू व बुद्धिमान दासाला” नेमण्यात आले आहे याविषयी आपल्याला काही शंका आहे का? (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २४:४५) सर्व गोष्टींचा पूर्णपणे खुलासा झालेला नाही म्हणून आपण देवाच्या सेवेतला आपला आनंद का म्हणून गमवावा? आठवणीत असू द्या, कोणतेही “रहस्य” केव्हा उलगडायचे हे स्वतः यहोवाच ठरवतो.—आमोस ३:७.

८. यहोवाच्या सहनशीलतेमुळे कित्येक लोकांना कशाप्रकारे फायदा झाला आहे?

काही बांधवांनी अनेक वर्षांपासून यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली आहे; पण “परमेश्‍वराचा महान व भयंकर दिवस” आपल्याला जिवंतपणी पाहता येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे कदाचित त्यांना निराशा वाटत असेल. (योएल २:३०, ३१) पण या बांधवांनीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास त्यांना प्रोत्साहन मिळू शकते. पेत्राने सल्ला दिला होता: “आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा.” (२ पेत्र ३:१५) यहोवाच्या सहनशीलतेमुळे आज लाखो सात्विक लोकांना सत्य शिकायला मिळाले आहे. हे पाहून तुम्हाला आनंद होत नाही का? शिवाय, यहोवा आणखी जितका काळ सहनशील राहील तितका जास्त वेळ आपल्यालाही “भीत व कापत आपले तारण साधून” घेण्याकरता मिळेल.—फिलिप्पैकर २:१२; २ पेत्र ३:११, १२.

९. आपण यहोवाच्या सेवेत जास्त सहभाग घेण्यास असमर्थ असल्यास आशादायी मनोवृत्ती आपल्याला याही परिस्थितीत धीर धरण्यास कशी मदत करेल?

राज्याची सेवा करत असताना आपल्याला विरोध, आजारपण, म्हातारपणाच्या अडचणी किंवा अशा इतर अनेक समस्या येतात. पण आशादायी मनोवृत्ती ठेवल्यास आपण निराश होणार नाही. आपण मनःपूर्वक त्याची सेवा करावी अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (रोमकर १२:१) पण देवाचा पुत्र ‘दुबळे व दरिद्री ह्‍यांच्यावर दया करतो’ असे बायबल म्हणते. तो किंवा यहोवा देव देखील आपल्याकडून कधीही अवाजवी अपेक्षा करत नाहीत. (स्तोत्र ७२:१३) म्हणूनच, आपण आपल्याकडून होईल तितकी सेवा करत राहिले पाहिजे; आणि याच व्यवस्थीकरणात किंवा येणाऱ्‍या नव्या व्यवस्थीकरणात आपल्या समस्या नाहीशा होईपर्यंत धैर्याने प्रतीक्षा करत राहिले पाहिजे. नेहमी आठवणीत असू द्या: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास [देव] अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.

१०. आशादायी मनोवृत्ती ठेवल्यामुळे देवाला न आवडणारा कोणता गुण आपण टाळू शकतो? समजावून सांगा.

१० आशादायी मनोवृत्ती ठेवणारी व्यक्‍ती सहसा आपल्या मर्यादेबाहेर जाण्याची चूक करत नाही. धर्मत्यागी झालेल्यांपैकी काहीजण प्रतीक्षा करायला तयार नव्हते. बायबलच्या एखाद्या विषयावरील स्पष्टीकरणात किंवा संघटनेतील काही बाबींत काही फेरबदल झाले पाहिजेत असे कदाचित त्यांना वाटले असावे. पण यहोवाचा आत्मा त्याच्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या माध्यमाने, आपल्याला वाटेल त्या वेळी नव्हे तर त्याच्या नियुक्‍त वेळी फेरबदल घडवून आणतो. तसेच आपल्या व्यक्‍तिगत मतांनुसार नव्हे तर यहोवा त्याच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे कोणतेही फेरबदल करतो. हे या धर्मत्यागी लोकांनी ओळखले नाही. उलट त्यांनी आपल्या मर्यादेबाहेर जाऊन चुकीची विचारसरणी अवलंबली आणि यामुळे ते विश्‍वासातून पडले. पण जर त्यांनी ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात केली असती तर ते आनंदाने यहोवाची सेवा त्याच्या लोकांसोबत करू शकले असते.—फिलिप्पैकर २:५-८.

११. प्रतीक्षा करत असताना आपण आपल्या वेळेचा सदुपयोग कसा करू शकतो, आणि यासाठी आपण कोणाच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो?

११ अर्थात, आशादायी मनोवृत्ती ठेवण्याचा किंवा प्रतीक्षा करण्याचा अर्थ आळशी किंवा अक्रियाशील होणे नव्हे. ख्रिस्ती व्यक्‍तीला कितीतरी कामे असतात. उदाहरणार्थ, आपण व्यक्‍तिगत बायबल अभ्यासाला जास्तीतजास्त वेळ दिला पाहिजे. असे केल्याने आपण दाखवतो की आपल्यालाही विश्‍वासू संदेष्ट्यांप्रमाणे व देवदूतांप्रमाणे आध्यात्मिक गोष्टींबद्दल आस्था आहे. या संदर्भात पेत्राने म्हटले होते: “ज्या संदेष्ट्यांनी तुम्हांवर होणाऱ्‍या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला; . . . त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे.” (१ पेत्र १:१०-१२) व्यक्‍तिगत बायबल अभ्यास तर आवश्‍यक आहेच पण त्यासोबत सभांना नियमित उपस्थित राहणे आणि प्रार्थना करत राहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. (याकोब ४:८) आध्यात्मिक भोजन नियमित घेण्याद्वारे व ख्रिस्ती बांधवांसोबत सहवास राखण्याद्वारे जे आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असल्याचे दाखवतात त्यांनी खऱ्‍या अर्थाने ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात केली आहे.—मत्तय ५:३.

वास्तववादी दृष्टिकोन ठेवा

१२. (अ) आदाम व हव्वा यांना कशापासून स्वातंत्र्य हवे होते? (ब) मनुष्य आदाम व हव्वा यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालल्यामुळे काय परिणाम झाला आहे?

१२ देवाने पहिल्या मानवी दांपत्याची निर्मिती केली तेव्हा योग्य व अयोग्य काय हे ठरवण्याचा अधिकार त्याने स्वतःकडेच ठेवला. (उत्पत्ति २:१६, १७) पण आदाम व हव्वा यांना देवाचे मार्गदर्शन नको होते आणि यामुळे आज जगाची ही दशा झाली आहे. प्रेषित पौलाने म्हटले: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) आदामाच्या काळापासून मानवाच्या इतिहासाच्या सहा हजार वर्षांदरम्यान यिर्मयाचे पुढील शब्द अगदी खरे ठरले आहेत: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) यिर्मयाचे हे शब्द खरे आहेत असे आपण कबूल करतो याचा अर्थ मानवांच्या सफलतेविषयी आपला निराशावादी दृष्टिकोन आहे असा नाही. उलट हा एक वास्तववादी दृष्टिकोन आहे. कित्येक शतकांपासून, देवाच्या मार्गदर्शनाशिवाय कशाप्रकारे ‘एका मनुष्याने दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान केले आहे’ हे यावरून दिसून येते.—उपदेशक ८:९.

१३. मनुष्यांच्या सामर्थ्याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचा कोणता वास्तववादी दृष्टिकोन आहे?

१३ यहोवाच्या साक्षीदारांना माहीत आहे की सध्याच्या परिस्थितीत फारसा बदल करणे मनुष्यांच्या हातात नाही. अर्थात, सकारात्मक मनोवृत्ती ठेवल्यामुळे आपण याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो पण सकारात्मक मनोवृत्ती काही सर्व समस्यांवर तोडगा नव्हे. १९५० च्या दरम्यान एका अमेरिकन पाळकाने द पावर ऑफ पॉसिटिव्ह थिंकिंग हे पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकाच्या असंख्य प्रती विकल्या गेल्या. सकारात्मक मनोवृत्तीने समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न केल्यास बऱ्‍याच समस्या सहज सोडवल्या जाऊ शकतात असे या पुस्तकात सुचवले होते. सकारात्मक विचारसरणी चांगली आहे यात वाद नाही. पण अनुभवावरून असे दिसून येते, की एका व्यक्‍तीचे ज्ञान, कौशल्य, तिची आर्थिक कुवत, आणि अशा अनेक गोष्टींमुळे, इच्छा असतानाही एक व्यक्‍ती बरेच काही करण्यास असमर्थ असते. जागतिक पातळीवर पाहता, मनुष्याच्या समस्या इतक्या वाढल्या आहेत की त्या सोडवणे मनुष्याला शक्यच नाही—मग त्याची विचारसरणी कितीही सकारात्मक असो!

१४. यहोवाच्या साक्षीदारांना निराशावादी म्हणता येईल का? समजावून सांगा.

१४ असा वास्तववादी दृष्टिकोन ठेवल्यामुळे, यहोवाचे साक्षीदार निराशावादी आहेत असा काहीजण त्यांच्यावर आरोप लावतात. पण हे खरे नाही. उलट यहोवाचे साक्षीदार सर्वांना अशा देवाविषयी सांगू इच्छितात जो मनुष्यांच्या समस्या कायमच्या सोडवेल. आणि हे देखील ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात केल्यामुळेच ते करत आहेत. (रोमकर १५:२) ते जास्तीतजास्त लोकांना देवासोबत एक चांगला नातेसंबंध कायम करण्यास मदत करत आहेत. त्यांना माहीत आहे कोणत्याही व्यक्‍तीला यापेक्षा मोठी मदत आपण करू शकत नाही.—मत्तय २८:१९, २०; १ तीमथ्य ४:१६.

१५. यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यामुळे लोकांचे जीवन कशाप्रकारे सुधारते?

१५ यहोवाचे साक्षीदार सामाजिक समस्यांकडे, खासकरून आज सर्वत्र चाललेल्या अधार्मिक कृत्यांकडे दुर्लक्ष करत नाहीत. यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक होण्याची इच्छा असणाऱ्‍यांना आपल्या जीवनात बदल करावा लागतो; देवाला न आवडणाऱ्‍या काही सवयी किंवा व्यसन असेल तर ते सोडून द्यावे लागते. (१ करिंथकर ६:९-११) आजपर्यंत यहोवाच्या साक्षीदारांनी कित्येकांना दारू, ड्रग्स, अनैतिकता, जुगार यांसारख्या वाईट गोष्टींपासून मुक्‍त होण्यास मदत केली आहे. या वाईट सवयी ज्यांनी सोडून दिल्या, ते आता प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह चालवतात व आपल्या कुटुंबाची जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडतात. (१ तीमथ्य ५:८) या व्यक्‍तींना व त्यांच्या कुटुंबांना अशाप्रकारे मदत केल्यामुळे आपोआपच समाजातल्या समस्या कमी होतात—दारू पिणाऱ्‍यांची, घरात मारहाण करणाऱ्‍यांची संख्या कमी होते. इतरांना मदत करण्याव्यतिरिक्‍त, यहोवाचे साक्षीदार स्वतः देखील नेहमी कायद्याच्या मर्यादेतच राहतात; आणि अशा रितीने ते सामाजिक समस्यांशी झुंजणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांचे काम हलके करतात.

१६. यहोवाचे साक्षीदार जगिक समाजसुधार चळवळींत का सहभागी होत नाहीत?

१६ यहोवाच्या साक्षीदारांनी या जगाची नैतिक स्थिती बदलली असे म्हणता येईल का? मागच्या दहा वर्षांत सक्रिय यहोवाच्या साक्षीदारांची संख्या ३८,००,००० पासून वाढून ६०,००,००० इतकी झाली आहे. त्याअर्थी २२,००,००० लोकांनी कित्येक वाईट गोष्टींपासून मुक्‍त होऊन ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारला. इतक्या लोकांचे जीवन सुधारले! पण त्याच दहा वर्षांत जगाच्या लोकसंख्येत ८७,५०,००,००० जणांची भर पडली! यहोवाच्या साक्षीदारांत सामील झालेल्यांची संख्या या संख्येच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. यहोवाच्या साक्षीदारांना याची जाणीव आहे की फार कमी लोक जीवनाच्या रस्त्यावर येतील; तरीसुद्धा जे कोणी सत्याच्या ज्ञानाला प्रतिसाद देतात त्यांना मदत करण्यास त्यांना आनंद वाटतो. (मत्तय ७:१३, १४) त्यांना माहीत आहे की सबंध जगाची परिस्थिती केवळ देवच बदलू शकतो; म्हणूनच देवाच्या नियुक्‍त वेळेची वाट पाहात असताना ते कोणत्याही समाजसुधार चळवळींत सहभाग घेत नाहीत. या चळवळी नेक इराद्याने सुरू तर केल्या जातात पण सहसा त्यांची उद्दिष्टे पूर्ण होत नाहीत आणि कधीकधी तर त्यांचा हिंसेत शेवट होतो.—२ पेत्र ३:१३.

१७. येशूने त्याच्या काळातील लोकांना कशाप्रकारे मदत केली पण त्याने काय केले नाही?

१७ यासंदर्भात यहोवाचे साक्षीदार येशूचे अनुकरण करतात; येशू ख्रिस्तानेही पृथ्वीवर असताना यहोवावर असाच विश्‍वास प्रदर्शित केला होता. पहिल्या शतकात, येशूने चमत्कारिकरित्या कित्येकांचे रोग बरे केले. (लूक ६:१७-१९) त्याने मृतांनाही जिवंत केले. (लूक ७:११-१५; ८:४९-५६) पण आजारपणाची समस्या किंवा मनुष्यजातीचा सर्वात मोठा शत्रू मृत्यू त्याने पूर्णपणे नाहीसा केला नाही. त्याला माहीत होते, की यासाठी देवाची नियुक्‍त वेळ अजून आलेली नव्हती. परिपूर्ण असल्यामुळे निश्‍चितच तो त्याच्या काळातील राजकीय व सामाजिक समस्या सोडवू शकला असता. किंबहुना त्याने असे करावे अशी त्याच्या काळातील लोकांना इच्छा देखील होती. पण येशूने त्यांची ही इच्छा पूर्ण केली नाही. बायबल सांगते: “त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.”—योहान ६:१४, १५.

१८. (अ) येशूने नेहमीच कशाप्रकारे धीर धरण्याची मनोवृत्ती दाखवली? (ब) एकोणीसशे चौदा पासून येशू काय करत आहे?

१८ येशूने राजकीय घडामोडींत किंवा सामाजिक कार्यात सहभाग घेतला नाही. कारण त्याला माहीत होते की त्याला राज्याधिकार दिली जाण्याची व सबंध जगातील सर्व लोकांचे रोग दूर करण्याची वेळ अजून आलेली नव्हती. स्वर्गात अमर आत्मिक जीवन मिळाल्यानंतरही तो यहोवाच्या नियुक्‍त वेळेकरता थांबून राहण्यास तयार होता. (स्तोत्र ११०:१; प्रेषितांची कृत्ये २:३४, ३५) पण १९१४ साली त्याला देवाच्या राज्याचा राजा नेमण्यात आले; तेव्हापासून तो ‘विजयावर विजय मिळवत’ आहे. (प्रकटीकरण ६:२; १२:१०) स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या कित्येकांना अजूनही देवाच्या राज्याबद्दल बायबल काय शिकवते हे नीट माहीत नाही, पण आपण मात्र अत्यंत आनंदाने त्याच्या राज्याला अधीन झालो आहोत!

प्रतीक्षेचा परिणाम निराशा की आनंद?

१९. प्रतीक्षेमुळे “अंतःकरण कष्टी” केव्हा होते, आणि आनंदी केव्हा होते?

१९ प्रतीक्षा करणे किती निराशादायक असते हे शलमोनाला माहीत होते. म्हणूनच त्याने लिहिले: “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते.” (नीतिसूत्रे १३:१२) साहजिक एखादी व्यक्‍ती काहीही आधार नसताना एखाद्या गोष्टीची आशा करत असेल तर शेवटी निराशाच तिच्या पदरी पडेल. पण जेव्हा आपण एखाद्या आनंदाच्या घटनेची वाट पाहात असतो, उदाहरणार्थ लग्नाची, बाळाच्या जन्माची, किंवा प्रिय जनांशी पुन्हा भेट होण्याची, तेव्हा कित्येक दिवसांआधीपासूनच आपण आनंदी असतो. आणि मधला काळ जर आपण या घटनेची तयारी करण्याकरता उपयोगात आणला तर आपला आनंद द्विगुणित होतो.

२०. (अ) कोणत्या अद्‌भुत घटना घडतील याची आपल्याला खात्री आहे? (ब) यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेची वाट पाहताना आपण कशाप्रकारे आनंदी राहू शकतो?

२० आपली आशा केव्हा पूर्ण होईल हे माहीत नसले तरीसुद्धा, ती निश्‍चित पूर्ण होईल अशी आपल्याला पूर्ण खात्री असल्यास प्रतीक्षेच्या काळात आपले “अंतःकरण कष्टी” होणार नाही. देवाच्या विश्‍वासू उपासकांना हे पक्के ठाऊक आहे की ख्रिस्ताचे हजार वर्षांचे राज्य लवकरच सुरू होईल. त्यांना पूर्ण खातरी आहे की मृत्यू व आजार कायमचे काढून टाकले जातील तो दिवस ते आपल्या डोळ्यांनी पाहतील. आणि ते मोठ्या आनंदाने त्या दिवसाची वाट पाहात आहेत जेव्हा त्यांचे मृत प्रिय जन व इतर लाखो मृतजन पुन्हा जिवंत होतील. (प्रकटीकरण २०:१-३, ६; २१:३, ४) आज पृथ्वीची नैसर्गिक संपत्ती नष्ट होत चालली आहे, पण लवकरच ही पृथ्वी पुन्हा एकदा एका निसर्गरम्य बागेसारखी होईल याची त्यांना खातरी आहे. (यशया ३५:१, २,) मग या अद्‌भुत काळाची प्रतीक्षा करत असताना आपल्या वेळेचा सदुपयोग करणे आणि “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” असणेच शहाणपणाचे नाही का? (१ करिंथकर १५:५८) आध्यात्मिक ज्ञान सतत आत्मसात करत राहा. यहोवासोबतचा आपला नातेसंबंध दिवसेंदिवस आणखी मजबूत करा. यहोवाची सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे अशा लोकांना शोधून काढा. आपल्या बांधवांना प्रोत्साहन द्या. जोपर्यंत यहोवा सहनशीलता दाखवेल तोपर्यंत संधीचा फायदा करून घ्या. हे सर्व तुम्ही केल्यास यहोवाच्या राज्याची प्रतीक्षा करत असताना तुमचे “अंतकरण” कधीही “कष्टी” होणार नाही. उलट, तुम्ही सदैव आशेत आनंदी राहाल!

तुम्ही समजावून सांगू शकाल का?

• येशूने कशाप्रकारे आशादायी मनोवृत्ती दाखवली?

• कोणकोणत्या प्रसंगी ख्रिस्ती लोकांनी आशादायी मनोवृत्ती दाखवली पाहिजे?

• यहोवाचे साक्षीदार यहोवाची आनंदाने आशा का धरतात?

• आपली आशा पूर्ण होईपर्यंत आनंदी राहण्याकरता आपण काय केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्रे]

येशूने त्याच्यापुढे असलेल्या आनंदामुळे सर्व परीक्षांना तोंड दिले

[१३ पानांवरील चित्र]

अनेक वर्षे यहोवाची सेवा केल्यानंतरही आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो

[१५ पानांवरील चित्रे]

यहोवाचे साक्षीदार बनल्यानंतर अनेकांनी आपल्या पूर्वीच्या वाईट सवयी सोडून दिल्या आहेत