चिलीमध्ये सत्याच्या बियांचे सिंचन
राज्य घोषकांचा वृत्तान्त
चिलीमध्ये सत्याच्या बियांचे सिंचन
उत्तर चिलीच्या वाळवंटी भागात कधी कधी वर्षानुवर्षे पावसाचा थांगपत्ता नसतो. मात्र पाऊस पडला की तिथली रुक्ष, खडकाळ जमीन रंगबेरंगी फुलांनी बहरून जाते; असे वाटते, जणू फुलांचा गालिचा अंथरला आहे. हा नेत्रदीपक देखावा पाहायला दूरदूरहून पर्यटकांची गर्दी जमते.
परंतु, चिलीमध्ये आणखी एक लक्षणीय कार्य आज होत आहे. चिलीच्या कानाकोपऱ्यापर्यंत बायबलमधील सत्याचे पाणी वाहत आहे आणि प्रामाणिक अंतःकरणाचे असंख्य लोक येशू ख्रिस्ताचे शिष्य बनत आहेत. सत्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा एक मार्ग आहे टेलिफोन. टेलिफोनद्वारे साक्ष दिल्याने मिळणाऱ्या उत्तम परिणामांचा आपल्याला पुढील अनुभवांवरून प्रत्यय येईल.
• पूर्ण-वेळ सुवार्ता सांगण्याचे कार्य करणाऱ्या करिनाला एका विभागीय संमेलनात टेलिफोनद्वारे साक्ष कशी द्यायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवायला सांगण्यात आले होते. परंतु, करिनाने कधीच टेलिफोनवर कोणाला साक्ष दिली नव्हती. पण तिला संमेलनात ते प्रात्यक्षिक करता यावे म्हणून एक वडील आणि त्यांची पत्नी यांनी टेलिफोनवर साक्ष कशी देतात याविषयी करिनासोबत काही मुद्द्यांची चर्चा केली. तिने यहोवाकडे प्रार्थनेद्वारे मदत मागावी असेही ते म्हणाले. तिने तसेच केले आणि शेवटी एक फोन करायचाच असे ठरवले.
करिनाने जवळच्याच एका गावातला नंबर फिरवला. एका टेलिफोन ऑपरेटरने फोन उचलला. मग करिनाने तिला फोन करण्याचे कारण सांगितले. ऑपरेटरला ती चर्चा फार आवडली. अशातऱ्हेने तीन दिवसांनी पुन्हा फोनवर बातचीत करण्याचे ठरले. पुन्हा फोन केल्यावर त्या स्त्रीसोबत देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाचा अभ्यास सुरू झाला. त्यांचा अभ्यास फार चांगला चालला आहे आणि करिनाने त्या स्त्रीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तिला काही साहित्य देखील पाठवले आहे.
• एकदा बर्नार्डा नावाच्या एका बहिणीला एका मनुष्याने चुकून फोन केला. बर्नार्डा त्याच्यावर रागावली नाही तर तिने संधीचा फायदा घेऊन त्याला साक्ष दिली. आपण यहोवाचे साक्षीदार आहोत अशी तिने स्वतःची ओळख करून दिली आणि त्याला काही मदत हवी आहे का असे विचारले. त्यावरून त्यांच्यात चर्चा सुरू झाली. बर्नार्डाने त्या माणसाला समजावून सांगितले की देवाचे राज्य लवकरच या जगातील अन्याय काढून टाकेल. तो इसम लक्ष देऊन ऐकत होता. मग त्याने बर्नार्डाला आपला फोन नंबर दिला आणि तिने पुष्कळदा त्याच्याशी फोनवर चर्चा केली. एकदा अशीच चर्चा करत असताना तिने सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून एक उतारा वाचून दाखवला. या पुस्तकाची एक प्रत मिळेल का असे त्याने तिला विचारले. बर्नार्डाने त्याला एक पुस्तक आणि त्यासोबत एक बायबलसुद्धा पाठवले. त्यानंतर, त्याला भेट द्यायला तिथल्या एका बांधवाची व्यवस्था करण्यात आली; आणि आता ते बांधव या “रोपट्याला पाणी” घालत आहेत व त्याची चांगली वाढ होत आहे.
होय, जगाच्या या तृषितभूमीत कितीतरी बी दडलेले आहेत. जीवन देणारे सत्याचे पाणी मिळताच त्यांना अंकुर फुटू लागतो. आज हजारो तान्हेलेले लोक रोपट्यांसारखे ‘उगवत’ आणि “फुलत” आहेत; ते यहोवा देवाचे विश्वासू सेवक बनत आहेत.—यशया ४४:३, ४.