व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

फिजीत देवाच्या राज्याची घोषणा करणे

फिजीत देवाच्या राज्याची घोषणा करणे

आपण विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी आहोत

फिजीत देवाच्या राज्याची घोषणा करणे

येशू ख्रिस्ताने दोन प्रकारच्या मार्गांबद्दल सांगितले. एक मार्ग रुंद आहे जो नाशाकडे जातो आणि दुसरा मार्ग अरुंद आहे जो जीवनाकडे जातो. (मत्तय ७:१३, १४) लोकांनी या दोन्ही मार्गांपैकी उचित मार्ग निवडण्याकरता यहोवा देवाने एक योजना केली. ती योजना आहे, त्याच्या येणाऱ्‍या राज्याची संपूर्ण पृथ्वीवर घोषणा करणे. (मत्तय २४:१४) आज पृथ्वीवरील सर्व लोकांना राज्याचा संदेश ऐकवला जात आहे. त्यातील काही लोक, ‘जिवाच्या तारणासाठी विश्‍वास ठेवून’ जीवनाचा मार्ग निवडत आहेत. (इब्री लोकांस १०:३९) फिजीत आणि दक्षिण पॅसिफिकच्या जवळपासच्या द्वीपांवर जीवनाच्या मार्गाची निवड करणाऱ्‍या काही लोकांचा अनुभव वाचायला आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत.

त्यांनी यहोवावर भरवसा ठेवला

मेरने पहिल्यांदा, १९६४ मध्ये राज्य संदेश ऐकला तेव्हा ती शाळेला जाणारी एक मुलगी होती. ती एका दूरवरच्या द्वीपावर राहत असल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांबरोबर पुढे तिचा जास्त संपर्क नव्हता. पण कालांतराने, तिला बायबलचे अचूक ज्ञान घेण्याची संधी मिळाली. मात्र तोपर्यंत तिचे लग्न झाले होते. तिचा पती गावाचा प्रमुख होता. बायबल तत्त्वांनुसार जगण्याचा मेरचा दृढनिश्‍चय असल्यामुळे तिच्या पतीने आणि नातेवाईकांनी तिला खूप क्रूरतेने वागवले. गावकरी देखील तिला त्रास देत असत. इतके असूनही तिने १९९१ मध्ये बाप्तिस्मा घेतला.

पण काही दिवसांनंतर तिचा पती चोसुआ याची मनोवृत्ती बदलली. तो तिच्याशी चांगला वागू लागला आणि मेर जेव्हा आपल्या मुलांबरोबर बायबलचा अभ्यास करायची तेव्हा तोही त्यांच्याबरोबर बसू लागला. चोसुआने मथोडिस्ट चर्चला जाण्याचे सोडून दिले. पण गावचा प्रमुख असल्यामुळे गावातली दर आठवडी भरणारी पंचायत तो चालवायचा. हळूहळू चोसुआबद्दलही गावातील लोकांचे मत बदलू लागले. फिजीतील लोकांच्या जीवनात चर्चला महत्त्वाचे स्थान असल्यामुळे चोसुआने चर्चला जाण्याचे सोडून दिले तेव्हा गावातील लोकांना वाटू लागले, की तो बेईमान झाला. चर्चच्या पाळकांनी त्याला पुन्हा चर्चला येण्याची खूप गळ घातली.

पण चोसुआने अगदी धैर्याने सांगितले, की त्याने आणि त्याच्या कुटुंबाने “आत्म्याने व खरेपणाने” यहोवा देवाची उपासना करण्याची निवड केली आहे आणि दृढनिश्‍चयही केला आहे. (योहान ४:२४) मग, पुढच्या पंचायतीत, गावच्या पाटलाने चोसुआ आणि त्याच्या कुटुंबाला सर्व गावाने वाळीत टाकावे आणि त्यांनी गावाबाहेर जावे असे सांगितले. त्यांना फक्‍त सात दिवसांची मुदत देण्यात आली. त्यांना ते द्वीप, व त्यांचे घर, जमीन, शेतीवाडी सर्व काही सोडून जाण्यास सांगितले.

दुसऱ्‍या बेटावरील आध्यात्मिक बांधव चोसुआच्या मदतीला धावून आले. त्यांनी त्यांना राहायला जागा दिली आणि पिके वाढवण्यासाठी शेतजमीन देखील दिली. चोसुआ आणि त्याच्या मोठ्या मुलाने आता बाप्तिस्मा घेतला आहे आणि त्याचा दुसरा मुलगा सुवार्तेचा बाप्तिस्मारहित प्रचारक आहे. मेरने अलीकडेच रेग्युलर पायनियरींग (राज्याचा पूर्ण वेळ प्रचार) सुरू केली. यहोवाची सेवा करण्याची त्यांनी निवड केल्यामुळे त्यांचे पद आणि मालमत्ता सर्व काही गेले. पण प्रेषित पौलाप्रमाणे त्यांना याचे इतके वाईट वाटत नाही, कारण गमावलेल्या सर्व गोष्टींच्या मोबदल्यात त्यांना जो जीवनाचा मार्ग मिळाला आहे तो फार मौल्यवान आहे.—फिलिप्पैकर ३:८.

विवेकानुसार निवड करणे

बायबल प्रशिक्षित विवेकानुसार चालण्याकरता विश्‍वास आणि धैर्याची आवश्‍यकता आहे. किरिबातीच्या द्वीपांवरील एका द्वीपावर अर्थात तारावा येथे राहणाऱ्‍या सुरांग नावाच्या एका स्त्रीचे उदाहरण घ्या. तिचा नवीनच बाप्तिस्मा झाला होता. ती हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. एकदा तिने एक विशिष्ट प्रकारचे काम आपल्याला देण्यात येऊ नये अशी विनंती केली. तिची विनंती मान्य करण्यात आली नाही. उलट तिला एका दूरवरच्या द्वीपावरील लहानशा वैद्यकीय केंद्रात काम करायला पाठवण्यात आले. यामुळे सुरांगचा इतर यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क तुटला.

या द्वीपावर राहायला येणाऱ्‍या नवीन लोकांनी तेथील स्थानीय ‘आत्म्याला’ बली द्यायचा रिवाज आहे. जे लोक असे करणार नाहीत त्यांचा मृत्यू होतो असा त्या लोकांचा समज आहे. ही एक प्रकारची मूर्तीपूजा असल्यामुळे सुरांगने याला नकार दिला. गावातील सर्व लोकांना वाटले, की आता सुरांगला तो आत्मा ठार मारील. पण जेव्हा सुरांग आणि तिच्याबरोबर आलेल्या लोकांना काहीच झाले नाही तेव्हा लोकांना आश्‍चर्य वाटले आणि यामुळे सुरांगला साक्ष द्यायला अनेक संधी मिळाल्या.

पण सुरांगच्या परीक्षा एवढ्यावरच थांबल्या नाहीत. द्वीपावरील तरुण पुरुष, नवीन आलेल्या तरुण स्त्रियांना भुलवण्यासाठी पैज लावतात. पण सुरांगने त्यांना मुळीच प्रतिसाद दिला नाही, ती देवाला एकनिष्ठ राहिली. नर्स असल्यामुळे तिला केव्हाही बोलावले जायचे, तिच्या कामाची ठराविक वेळ नव्हती तरीसुद्धा ती नियमित पायनियर म्हणून सेवा करू शकली.

सुरांग जेव्हा द्वीप सोडून चालली होती तेव्हा गावातील लोकांनी एका खास पार्टीची योजना केली. त्यावेळी, गावातील वडील लोक म्हणाले, की सुरांग ही त्यांच्या द्वीपावर आलेली पहिली खरीखुरी मिशनरी होती. बायबल तत्त्वांबद्दल तिने घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे द्वीपावरील इतर लोक राज्य संदेश चांगल्याप्रकारे ऐकू लागले आहेत.

इतर आव्हाने

काही गावे एकमेकांपासून दूर असल्यामुळे तेथील यहोवाच्या साक्षीदारांना क्षेत्र सेवेसाठी दूरदूर जावे लागते आणि ख्रिस्ती सभांसाठीही लांब प्रवास करून जावे लागते. एक बंधू आणि तीन भगिनींचा हा अनुभव ऐका. सभांना जायला-यायला त्यांना पुष्कळ तास प्रवास करावा लागतो. त्यांना प्रत्येक वेळा तीन नद्या पार कराव्या लागतात. नदीचे पाणी चढलेले असते तेव्हा, त्यांच्यातील बंधू एका मोठ्या मडक्यात त्या सर्वांच्या बॅग्स, पुस्तके आणि सभांचे कपडे घालतो आणि ते मडके घेऊन नदीच्या दुसऱ्‍या बाजूला पोहून जातो. मग पुन्हा पोहून येऊन बाकीच्या तिघा बहिणींना मदत करतो.

किरीबातीमध्ये नोनोनुती नावाचे आणखी एक दूरवर वसलेले द्वीप आहे. या द्वीपावरील साक्षीदारांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ते ज्या घरात सभा घेतात त्या घरात फक्‍त सात ते आठ लोकांना बसण्यापुरती जागा आहे. जास्त लोक येतात तेव्हा त्यांना घराच्या बाहेर बसावे लागते. या घराची एक भिंत जाळीची भिंत असल्यामुळे हे बांधव त्या जाळीतून आत डोकावून कार्यक्रम ऐकतात. हे घर रस्त्यावरच असल्यामुळे, रस्त्यावरील सर्व लोक त्यांना पाहू शकतात. ते लोक मात्र मोठमोठ्या चर्चेसमध्ये जातात. तरीही आपल्या बांधवांना, इतक्या लहानशा जागेत सभा भरवायला लाज वाटत नाही. कारण, त्यांना माहीत आहे, की यहोवाला इमारतींचे नव्हे तर त्याची उपासना करणाऱ्‍या लोकांचे महत्त्व वाटते. (हाग्गय २:७) या द्वीपावरील बाप्तिस्मा घेतलेली फक्‍त एकच भगिनी आहे आणि तीही वृद्ध आहे. तिला दूरपर्यंत चालता येत नाही. पण एक बाप्तिस्मारहित प्रचारक भगिनी तिला क्षेत्रसेवेत एका हातगाडीवर घेऊन जाते. सत्याबद्दल त्यांना किती गुणग्राहकता आहे!

फिजीच्या द्वीपांवर २,१०० पेक्षा अधिक प्रचारक सेवा करत आहेत. देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचा त्या सर्वांचा दृढनिश्‍चय आहे. त्यांचा पक्का विश्‍वास आहे, की आणखी पुष्कळ लोक “जिवाच्या तारणासाठी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी” होतील.

[८ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

ऑस्ट्रेलिया

फिजी