पृथ्वी केवळ एक परीक्षा स्थळ?
पृथ्वी केवळ एक परीक्षा स्थळ?
एका विद्यार्थीनीने दिवस-रात्र एक करून सलग दोन आठवडे परीक्षेसाठी अभ्यास केला होता! आणि आज रिझल्ट हाती पडल्यावर आपण पास झालो आहोत हे पाहून तिला फार आनंद झाला आहे! कारण आता तिला आपल्या मनाजोगी नोकरी मिळवता येईल!
बहुतेक लोक आपल्या पृथ्वीवरील जीवनाकडे याच दृष्टिकोनातून पाहतात. त्यांचे असे मत आहे, की या जगातले जीवन म्हणजे एक परीक्षा आहे. या परीक्षेतून सर्वांना जावेच लागते. आणि जो कोणी या परीक्षेत “पास” होतो त्याला मत्यूनंतरच्या जीवनात आणखीन उत्तम जीवन मिळते. जर सध्याचेच जीवन सर्वकाही असेल, तर ही निश्चितच दुःखाची गोष्ट ठरेल. कारण बहुतेक लोकांचे सध्याचे जीवन म्हणजे निव्वळ अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड आहे. बायबलमध्ये ईयोब नावाच्या एका मनुष्याविषयी सांगितले आहे, जो जवळजवळ सबंध आयुष्य निरोगी व आनंदी असूनही असे म्हणाला: “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.”—ईयोब १४:१.
बऱ्याच लोकांच्या मताप्रमाणेच न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिया यातही असे म्हटले आहे: “मनुष्य स्वर्गात जाणार असे मानवाबद्दलचे भविष्य देवाने आधीच वर्तवले आहे. . . . आणि मनुष्याला खरे सुख-समाधान स्वर्गात गेल्यावरच मिळेल.” अलीकडेच, अमेरिकेच्या चर्च ऑफ क्राईस्टने एक सर्वेक्षण घेतले. त्या सर्वेक्षणानुसार ८७ टक्के लोकांना असे वाटते की मेल्यानंतर ते स्वर्गात जातील.
या व्यतिरिक्त बरेच गैर-ख्रिस्ती लोकही, मेल्यानंतर कोणत्यातरी सुखलोकात जाण्याची आशा बाळगतात. उदाहरणार्थ, मुस्लिम धर्माचे लोक जन्नतमधील (स्वर्गातील नंदनवन) जीवनाची आशा बाळगतात. तर चीन आणि जपानमध्ये बौद्ध धर्माच्या ‘पवित्र देश’ पंथांचे अनुयायी असे मानतात, की आपण न थांबता, अखंडपणे “ऑमीडा” (असीमित प्रकाशाच्या बुद्धाचे नाम) जपत राहिलो तर आपला पुनर्जन्म पवित्र देशात अथवा पश्चिमी नंदनवनात होईल. आणि तिथेच आपल्याला परम सुखाचा अनुभव घेता येईल.
पण, मनोरंजक गोष्ट अशी, की जगभरात सुप्रसिद्ध असलेल्या आणि सर्वाधिक भाषांत अनुवादित केलेल्या बायबलमध्ये कोठेच असे म्हटलेले नाही, की पृथ्वी ही मनुष्याचे एक तात्पुरते निवास्थान आहे. उलट बायबल म्हणते: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) तसेच बायबलमध्ये येशूचे एक विख्यात वाक्य देखील आपण वाचतो: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.”—मत्तय ५:५.
सर्वसामान्य लोकांचे असे मत आहे, की आपण केवळ काही दिवसांसाठी या पृथ्वीवर राहायला आलो आहोत. याचा अर्थ, मृत्यू हाच एक मार्ग आहे ज्यातून मनुष्यासाठी एका नव्या नयनरम्य जगाचे द्वार उघडले जाते. असे असेल, तर मग मृत्यू हा तर एक आशीर्वाद म्हणावा लागेल. पण, सर्वसामान्यपणे असे मानले जाते का? लोक मृत्यूला आशीर्वाद समजतात का, की ते सतत मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न करतात? सहसा असे दिसून येते, की लोक जेव्हा निरोगी आणि सुरक्षित जीवनाचा अनुभव घेत असतात तेव्हा त्यांना मरण्याची मुळीच इच्छा नसते.
पण पृथ्वीवरील अमाप दुष्टाई आणि दुःखांमुळे, बऱ्याचशा लोकांना असे वाटते की खरी सुख-शांती मिळवण्याचे एकमात्र ठिकाण म्हणजे स्वर्ग. पण, प्रश्न आहे की स्वर्ग हे परम सुख-शांतीचे स्थळ आहे का? तेथे दुष्टाई आणि दुःखाची कधी सावलीही पडली नसेल का? मृत्यूनंतर केवळ स्वर्गातच सुखसंपन्न जीवन मिळू शकेल का? या प्रश्नांची बायबलमध्ये दिलेली उत्तरे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. का? कृपया पुढचा लेख वाचा.