स्वीकारलेले आणि धिक्कारलेले पुस्तक बायबल
स्वीकारलेले आणि धिक्कारलेले पुस्तक बायबल
“पवित्र ग्रंथांचा सगळ्या भाषांमध्ये अनुवाद व्हावा असे मला वाटते,” असे १६ व्या शतकातील एक सन्माननीय डच विद्वान, डेसीडेरियस इरॅसमस यांनी लिहिले.
सर्वांना शास्त्रवचने वाचता यावीत आणि समजावीत अशी इरॅसमस यांची इच्छा होती. परंतु, बायबलच्या विरोधकांनी याचा कडाडून विरोध केला. खरे तर, युरोपमध्ये त्या काळात बायबलबद्दल किंचितही उत्सुकता दाखवणाऱ्यांच्या जिवाला धोका होता. इंग्लंडच्या संसदेने असा नियम जारी केला होता की, “इंग्रजी भाषेत शास्त्रवचने वाचणाऱ्याला आपली जमीन, संपत्ती, सामानसुमान आणि जीव गमवावा लागेल . . . जो हा नियम जुमानत नाही किंवा एकदा क्षमा केल्यावर पुन्हा तीच चूक करतो त्याला राजाशी फितुरी केल्याच्या आरोपावरून प्रथम फाशी देण्यात यावी आणि मग देवासमोर पाखंडी ठरल्यामुळे जाळण्यात यावे.”
युरोपमध्ये, कॅथलिक न्यायसभेने (इन्क्विझिशन) “पाखंडी” पंथांचा (जसे की, फ्रेंच वॉल्डेन्सेस) शोध सुरू केला आणि त्यांचा क्रूरपणे छळ केला. का तर, “पवित्र शास्त्राचा प्रचार करण्यास किंवा स्पष्टीकरण देण्यास सामान्य लोकांना मनाई असताना . . . [हे लोक] शुभवर्तमानाच्या पुस्तकांत, नव्या कराराचा भाग म्हणवणाऱ्या पुस्तकांत आणि इतर पवित्र लिखाणांत सांगितलेल्या गोष्टींचा” प्रचार करत होते. तेव्हा बायबलसाठी असंख्य स्त्री-पुरुषांनी असह्य छळ आणि मृत्यू सहन केला. केवळ प्रभूची प्रार्थना किंवा दहा आज्ञा पाठ करण्यासाठी किंवा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला.
यांपैकी उत्तर अमेरिकेत राहायला गेलेल्या पुष्कळजणांना देवाच्या वचनाबद्दल असेच प्रेम होते. अमेरिकेत सुरवातीला, “वाचन आणि धर्म या दोन्ही गोष्टींचा घनिष्ठ संबंध होता; त्यावरून बायबल लोकांच्या किती परिचयाचे होते याचे दर्शन घडते,” असे अ हिस्ट्री ऑफ प्रायव्हेट लाईफ—पॅशन्स ऑफ द रिनेसन्स हे पुस्तक म्हणते. बॉस्टनमध्ये तर १७६७ साली प्रकाशित झालेल्या एका प्रवचनात म्हटले होते: “नियमितपणे पवित्र शास्त्राचे वाचन करा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी बायबलमधील एक अध्याय वाचा.”
कॅलिफोर्नियाच्या वेंच्युरा येथील बार्ना संशोधन गटानुसार, ९० टक्क्यांहून अधिक अमेरिकन लोकांकडे कमीत कमी तीन बायबल तरी असतात. परंतु, अलीकडेच घेतलेल्या एका अभ्यासानुसार, तेथील लोकांना बायबलबद्दल आदर असला तरी ‘हल्ली कोणी त्याचे वाचन करत नाही, त्याचा अभ्यास करत नाही आणि त्याच्या तत्त्वांनुसार चालतही नाही.’ बहुतेकांना फक्त वरवरची माहिती आहे. एका बातमीपत्रातील स्तंभलेखकाने म्हटले: “आजच्या समस्यांसाठी [बायबल] उपयुक्त आहे असे पुष्कळांना वाटत नाही.”
लोकांची विचारधारा
आपल्याच बुद्धीने आणि मानवी सहकार्याने जीवनात यश मिळवता येते असे लोकांचे मत आहे. बायबल हे इतर पुस्तकांसारखेच केवळ धार्मिक सुविचार आणि व्यक्तिगत अनुभवांचे एक पुस्तक आहे असे त्यांचे मत आहे; हे सत्य पुस्तक असून त्यात वास्तविक घटनांचा अहवाल आहे असे त्यांना वाटत नाही.
तर मग, जीवनातल्या कठीण आणि त्रासदायक समस्यांचा लोक कसा सामना करतात? ते आध्यात्मिक पोकळीत राहतात; त्यांना नैतिक आणि धार्मिक विषयांच्या बाबतीत कोठूनही योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ते सुकाणू नसलेल्या जहाजांसारखे “माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे” असे बनले आहेत.—इफिसकर ४:१४.
पण बायबल हे इतर धार्मिक पुस्तकांसारखेच आहे का? की ते देवाचे वचन आहे आणि त्यात जीवनविषयक उपयुक्त माहिती आहे? (२ तीमथ्य ३:१६, १७) बायबलचे परीक्षण करणे आवश्यक आहे का? या प्रश्नांची उत्तरे पुढील लेखात सापडतील.
[३ पानांवरील चित्र]
डेसीडेरियस इरॅसमस
[चित्राचे श्रेय]
Deutsche Kulturgeschichte या पुस्तकातून
[४ पानांवरील चित्र]
शास्त्रवचनाचा प्रचार केल्यामुळे वॉल्डेन्सेस यांची छळणूक करण्यात आली
[चित्राचे श्रेय]
Stichting Atlas van Stolk, Rotterdam