सात्विकतेने कसे चालावे
सात्विकतेने कसे चालावे
आधुनिक काळाच्या शब्दकोशांमध्ये “सात्विकता” या शब्दाची व्याख्या “सदाचरण; नेकपणा,” “योग्य आचार-विचार; सत्त्वशीलपणा” अशी केली आहे. शब्दकोशकार मार्व्हिन आर. व्हिन्सेंट म्हणतात, “सात्विकता” असे भाषांतरित केलेल्या शब्दाचा मूळ साहित्यिक अर्थ “कोणत्याही प्रकारचा उत्कृष्टपणा” असा होतो. म्हणूनच तर, सुजाणता, धैर्य, आत्म-शिस्त, न्यायीपणा, दयाळुपणा, चिकाटी, प्रामाणिकपणा, नम्रता आणि एकनिष्ठपणा या गुणांना सात्विकतेची लक्षणे म्हटले गेले आहे. “योग्यतेच्या दर्जाचे पालन करणे” अशी सात्विकतेची आणखी एक व्याख्या आहे.
मग आपण सदाचरण, नेकपणा व योग्यता यांच्या बाबतीत कोणाच्या दर्जाचे पालन करावे? न्यूझवीक पत्रिकेत असे म्हटले होते, “नैतिक तत्त्वज्ञानाच्या एका प्रख्यात विचारधारेनुसार, प्रबोधनाच्या चळवळीने लोकांमध्ये संशयवादी मनोवृत्ती निर्माण झाली आणि मग प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे, भावनिक गरजेनुसार किंवा संस्कृतीनुसार योग्य-अयोग्य ठरवू लागला आहे.” परंतु, आपापल्या आवडीनिवडीनुसार योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणे उचित आहे का? नाही. आपल्याला सात्विक वर्तन ठेवायचे असेल तर चांगले आणि वाईट यांसंबंधी काही निश्चित मापदंड असण्याची गरज आहे ज्याच्या आधारे एखादी कृती, मनोवृत्ती किंवा गुण योग्य आहे की अयोग्य हे ठरवता येईल.
नैतिक दर्जांचा एकमेव स्रोत
नैतिक दर्जांच्या बाबतीत पाहिले तर मानवजातीचा निर्माणकर्ता, यहोवा देव हा एकटाच या दर्जांचा स्रोत आहे. पहिला पुरुष आदाम याला निर्माण केल्यानंतर लगेचच यहोवा देवाने त्याला ही आज्ञा दिली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१६, १७) यहोवा देवाने त्या झाडाला ते विशेष नाव देऊन हे दाखवले की, केवळ त्यालाच आपल्या प्राणीमात्रांसाठी बरे आणि वाईट ठरवण्याचा अधिकार आहे. अशाप्रकारे, एखादी कृती, विचारधारा किंवा प्रवृत्ती योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्यासाठी देवाने दिलेला बऱ्या-वाईटाचा दर्जा एक आधार बनवण्यात आला. हे दर्जे नसते तर योग्य-अयोग्य यांत आपल्याला स्पष्टपणे भेद करता आला नसता.
बऱ्या वाईटाच्या ज्ञानाच्या झाडासंबंधी दिलेल्या आज्ञेने आदाम आणि हव्वेला देवाची आज्ञा पाळायची की नाही ही निवड करण्याचा हक्क देण्यात आला होता. त्या आज्ञेचे त्यांनी पालन केले असते तर ते सात्विकतेने चालले असे म्हणता आले असते. कालांतराने, आपल्याला कोणत्या गोष्टी पसंत किंवा नापसंत आहेत याविषयी देवाने आणखी माहिती दिली. ही माहिती त्याने आपल्याकरता बायबलमध्ये नमूद करून ठेवली. त्यामुळे, सात्विकतेने चालण्यासाठी शास्त्रवचनांमध्ये दिलेल्या यहोवाच्या नीतिमान दर्जांचे पालन आपल्याला करावे लागेल.
देवाचे दर्जे पूर्णतः जाणून घ्या
यहोवा देवाने योग्य-अयोग्य यासंबंधी दर्जे ठरवले आहेत. आणि बायबलमध्ये त्यांना नमूद करून ठेवले आहे; तर मग, आपण ते जाणून घेऊ नयेत का? प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे. ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.”—२ तीमथ्य ३:१६, १७.
उदाहरणार्थ, आधीच्या लेखात उल्लेख केलेल्या कुनिहितो यांनी त्यांच्या संस्कृतीत शिकवल्यानुसार नम्रता दाखवल्याने कसा गैरसमज झाला त्याचा आपण विचार करू या. शास्त्रवचनातील दर्जांचे नीट परीक्षण केल्यावर त्यांना याबाबतीत संतुलित दृष्टिकोन राखता आला. बायबलमध्ये नम्रता दाखवण्याविषयी उत्तेजन दिले आहे यात शंका नाही. उलट, फाजील आत्मविश्वास आणि गर्व हे गुण आपल्यामध्ये नसावेत असे बायबल सांगते. (नीतिसूत्रे ११:२; मीखा ६:८) परंतु, ‘अध्यक्षाच्या कामाच्या’ पात्रतेविषयी सांगताना तो विशेषाधिकार प्राप्त करण्याची एखाद्या व्यक्तीने ‘उत्कंठा धरावी’ असे प्रेषित पौल म्हणाला. (१ तीमथ्य ३:१, पं.र.भा.) ही ‘उत्कंठा धरताना’ एखाद्याने बढाईखोर किंवा गर्विष्ठ नसावे पण त्याच वेळी स्वतःला अगदीच क्षुल्लकही समजू नये.
व्यापारी क्षेत्रात सदाचरण ठेवण्याविषयी बायबल काय म्हणते? आजच्या व्यापारी जगात, लोक सर्रास आक्षेपार्ह पद्धतींचा उपयोग करतात किंवा सरकारी नियम मोडतात आणि करसंबंधित नियम चुकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, इतरजण कसेही वागले तरी आपल्यासाठी बायबलचा दर्जा असा आहे की, आपण “सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तेच सदैव करीत राहावे.” (इब्री लोकांस १३:१८, पं.र.भा.) यास्तव, मालक, कर्मचारी, ग्राहक आणि सरकार यांच्याशी प्रामाणिक आणि योग्य व्यवहार राखून सात्विक वर्तन राखता येते. (अनुवाद २५:१३-१६; रोमकर १३:१; तीत २:९, १०) प्रामाणिकपणामुळे भरवसा आणि सद्भावनेचे वातावरण निर्माण होते. तसेच, आपापसांतले करार लिहून ठेवल्याने कधी “[अघटित] प्रसंग” घडलाच तर गैरसमज आणि समस्या टाळता येतात.—उपदेशक ९:११, पं.र.भा.; याकोब ४:१३, १४.
पेहराव आणि साज-शृंगार याबाबतीतही आपण सात्विकतेने चालावे. प्रत्येक संस्कृतीनुसार वेशभूषा वेगळी असेल आणि नवनवीन स्टाईल्सनुसार किंवा फॅशननुसार कपडे घालण्याचा आपल्यावर जास्त दबाव येत असेल. पण प्रत्येक फॅशन आपण अनुसरावी असे आहे का? बायबल म्हणते, “या युगाबरोबर समरूप होऊ नका.” (रोमकर १२:२) प्रेषित पौलाने आपल्याच मनचे नियम बनवण्याऐवजी प्रेरित होऊन असे लिहिले: “तसेच स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे, तर देवभक्ति स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभवावे.” (१ तीमथ्य २:९, १०) यातले मूळ तत्त्व स्त्रियांना आणि पुरुषांनाही लागू होते. शिवाय, आपल्या संस्कृतीनुसार किंवा आवडीनुसार साजेल अशा वेगवेगळ्या स्टाईल्स करण्याला देखील मुभा आहे.
बायबलमध्ये अनैतिक चालींविषयी देखील सांगितले आहे ज्यांविषयी देवाने उघड उघड नापसंती व्यक्त केली आहे. १ करिंथकर ६:९, १० येथे असा इशारा देण्यात आला आहे: “अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” या शास्त्रवचनाने मरियाला (आधी जिच्याविषयी सांगितले होते) हे पाहायला मदत केली की, निर्माणकर्त्याने ठरवलेल्या सदाचरणाच्या दर्जानुसार, तिचे ह्वेनशी असलेले अनैतिक संबंध चुकीचे होते आणि देवाची पसंती मिळवण्याकरता तिला त्याच्याशी संबंध तोडावे लागतील. यावरून स्पष्ट होते की, सात्विकतेने चालण्यासाठी आपल्याला यहोवाच्या दर्जांना चांगले ओळखून घ्यायची गरज आहे.
पूर्ण मन लावून शिका
फक्त वाईट गोष्टींना टाळणे म्हणजे सात्विकता असे म्हणता येणार नाही. तर सात्विक वर्तनात नैतिक शक्ती सामावलेली आहे. सात्विकतेने चालणाऱ्या व्यक्तीमध्ये भलेपणा असतो. एका प्राध्यापकांचे म्हणणे आहे की, “सात्विकतेविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच ती आत्मसातही केली पाहिजे.” याचा अर्थ, सात्विक वर्तन ठेवण्यासाठी फक्त देवाच्या वचनाची माहिती असून चालत नाही. तर त्यात लिहिलेल्या गोष्टींवर मनन करण्याची गरज आहे म्हणजे यहोवासाठी आपली अंतःकरणे प्रशंसेने भरून जातील आणि आपल्या जीवनात शास्त्रवचनातील तत्त्वे लागू करायला आपल्याला प्रेरणा मिळेल.
“अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो,” असे स्तोत्रकर्ता म्हणाला. (स्तोत्र ११९:९७) तसेच राजा दावीदाने लिहिले: “मी प्राचीन काळचे दिवस मनात आणितो, तुझ्या [देवाच्या] सर्व कृत्यांचे मनन करितो; तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करितो.” (स्तोत्र १४३:५) आपणही बायबल आणि बायबल-आधारित प्रकाशनांचा अभ्यास करतेवेळी प्रार्थनापूर्वक चिंतन करायची सवय लावून घ्यावी.
सखोल अभ्यास करणे आणि सोबत चिंतनासाठीही वेळ देणे हे इतके सोपे नसेल. पण, सात्विक वर्तन ठेवण्यासाठी आपल्याला इतर कार्यांमधून वेळ काढावा लागेल. (इफिसकर ५:१५, १६) एरन हा २४ वर्षांचा तरुण अशाप्रकारे वेळ काढण्यासाठी दररोज अर्धा तास लवकर उठतो. तो म्हणतो: “आधी, मी अर्ध्या तासापर्यंत फक्त बायबल वाचायचो. पण मला चिंतनाचे महत्त्व आता समजले आहे. म्हणून आता मी त्यातला अर्धा वेळ वाचलेल्या गोष्टींवर चिंतन करण्यासाठी वापरतो. याचा मला खरोखर फायदा झाला आहे.” चिंतन इतर वेळीही करता येऊ शकते. दावीदाने एका स्तुतीगीतात यहोवाला असे म्हटले: “मी . . . प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो.” (स्तोत्र ६३:६) शिवाय बायबल सांगते: “इसहाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात” जात असे.—उत्पत्ति २४:६३.
सात्विकतेने चालण्यामध्ये चिंतन एक अनमोल साधन आहे. कारण चिंतनामुळेच यहोवाला काय वाटते ते जाणून घ्यायला आणि त्याच्या दृष्टिकोनातून पाहायला मदत मिळते. उदाहरणार्थ, मरियाला हे ठाऊक होते की जारकर्माला देवाची मनाई आहे. परंतु ‘वाईटाचा वीट मानून, बऱ्याला चिकटून राहण्यास’ तिला बायबलमधील विशिष्ट शास्त्रवचनांवर मनन करायची गरज होती. (रोमकर १२:९) कलस्सैकर ३:५ वाचल्यावर स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे हे पाहायला तिची मदत करण्यात आली. त्या वचनात, ‘आपले अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ हे जिवे मारायला’ सांगितले आहे. मरियाला स्वतःला हा प्रश्न विचारावा लागला: ‘मी कोणत्या प्रकारची कामवासना जिवे मारावी? अशुद्ध विचार मनात येऊ नयेत म्हणून मी काय टाळावे? विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत वागण्यामध्ये मला काही बदल केले पाहिजेत का?
चिंतन करण्यामध्ये एखाद्या कृतीचा काय परिणाम १ थेस्सलनीकाकर ४:३-७) पुढील प्रश्नांचा विचार करणे उचित ठरेल: ‘या कृत्यामुळे माझ्या स्वतःचे, माझ्या कुटुंबाचे किंवा इतरांचे कशाप्रकारे नुकसान होईल? आध्यात्मिकरित्या, भावनिकरित्या आणि शारीरिकरित्या माझ्यावर याचा काय परिणाम होईल? गतकाळात देवाच्या नियमाचे उल्लंघन केलेल्यांचे काय झाले आहे?’ हा सगळा विचार केल्यावर मरियाला खंबीर राहायला मदत मिळाली; आपल्यालाही अशीच मदत मिळू शकते.
होईल याचा विचार करणे हेसुद्धा सामील होते. ख्रिश्चनांनी जारकर्मापासून दूर राहून स्वतःवर संयम ठेवावा असे पौलाने त्यांना सांगितले होते म्हणजे ‘कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेणार नाही.’ (उदाहरणांवरून शिकणे
सात्विकता एखाद्या वर्गामध्ये शिकवता येऊ शकते का? कित्येक शतकांपासून विचारवंतांना हा प्रश्न पडला आहे. हे शक्य आहे असे ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोला वाटत होते. परंतु, अरिस्टोटल याचे म्हणणे होते की, सात्विकता व्यवहारात आणून संपादन केली जाते. एका पत्रकाराने या वादविषयावर शेवटी असे मत मांडले: “थोडक्यात सांगायचे म्हणजे, सात्विकता फक्त शिकून आत्मसात करता येत नाही. किंवा पाठ्यपुस्तकांमधूनही ती शिकवली जाऊ शकत नाही. सदाचरण, समाजात राहून शिकले जाते . . . अशा समाजांत जेथे सात्विक वर्तनाला उत्तेजन दिले जाते आणि त्याचा फायदाही होतो.” पण आपल्याला खऱ्या सात्विक व्यक्ती कोठे सापडतील? काही संस्कृतींतल्या वीरपुरुषांच्या पौराणिक कथांमध्ये सात्विक व्यक्तींची उदाहरणे असली तरीही बायबलमध्ये सात्विक व्यक्तींची अनेक उदाहरणे आहेत.
यहोवा, सात्विकतेचे सर्वात उल्लेखनीय उदाहरण आहे. तो नेहमी सात्विक मार्गाने वागतो आणि जे काही यथान्याय व उत्तम आहे तेच करतो. ‘देवाचे अनुकरण करून’ आपणही सात्विकतेने चालू शकतो. (इफिसकर ५:१) देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याने देखील ‘त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून आपल्याकरिता कित्ता घालून दिला आहे.’ (१ पेत्र २:२१) त्याशिवाय, बायबलमध्ये अब्राहाम, सारा, योसेफ, रूथ, ईयोब, दानीएल आणि त्याचे तीन इब्री साथीदार अशा अनेक विश्वासू व्यक्तींचे अहवाल दिले आहेत. यहोवाच्या आधुनिक काळातील सेवकांमध्येही सात्विक व्यक्तींची उदाहरणे आहेत त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये.
आपल्याला शक्य आहे
देवाच्या नजरेत सात्विक असलेले वर्तन आपण खरोखर ठेवू शकतो का? अपरिपूर्णतेचा वारसा मिळाल्याने काही वेळा असे होते की, एकीकडे, सात्विकतेने चालण्यासाठी आपली इच्छा असते तर दुसरीकडे, आपल्या पापमय प्रवृत्तींनुसार आपण वागत असतो. अशाप्रकारे, आपले मन आणि शरीर यांच्यात कडा संघर्ष चालू असतो. (रोमकर ५:१२; ७:१३-२३) परंतु, देवाच्या मदतीने हा संघर्ष जिंकता येतो. (रोमकर ७:२४, २५) यहोवाने त्याचे वचन आणि बायबल-आधारित प्रकाशनांची व्यवस्था केली आहे. शास्त्रवचनांचा कसून अभ्यास आणि त्याचसोबत प्रार्थनापूर्वक चिंतन केल्याने आपण आपले अंतःकरण शुद्ध ठेवू शकतो. अशाच शुद्ध अंतःकरणातून सात्विक विचार, शब्द आणि कार्य येऊ शकतात. (लूक ६:४५) यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांची उदाहरणे पुढे ठेवून आपण ईश्वरी व्यक्तिमत्त्व विकसित करू शकतो. आणि देवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्या व्यक्तींपासूनही आपण पुष्कळ काही शिकू शकतो.
प्रेषित पौलाने त्याच्या वाचकांना “जो काही सद्गुण (सात्विक वर्तन)” आहे त्याचे आणि इतर प्रशंसनीय गोष्टींचे मनन करत राहण्याचे उत्तेजन दिले. असे केल्याने देवाचा आशीर्वाद तुम्हावर जरूर येईल. (फिलिप्पैकर ४:८, ९) यहोवाच्या मदतीने आपण सात्विकतेने चालू शकू.
[६ पानांवरील चित्र]
बायबलचा अभ्यास करताना चिंतनही करा
[७ पानांवरील चित्र]
ख्रिस्त येशूचे अनुकरण करून ईश्वरी व्यक्तिमत्त्व विकसित करा