यहोवाला केलेले समर्पण आठवणीत ठेवून तुम्ही जगत आहात का?
यहोवाला केलेले समर्पण आठवणीत ठेवून तुम्ही जगत आहात का?
“जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.”—कलस्सैकर ३:२३.
१. “समर्पण” या शब्दाचा सर्वसामान्यपणे काय अर्थ होतो?
कोणताही खेळाडू उत्कृष्ट कामगिरी केव्हा बजावू शकतो? टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल, बेसबॉल, मैदानी स्पर्धा, गॉल्फ किंवा इतर कोणत्याही खेळाच्या बाबतीत विचार करा; कोणत्याही खेळात विजेतेपद मिळवण्यासाठी दृढसंकल्पाची आणि समर्पित प्रयत्नांची आवश्यकता असते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम स्थितीत ठेवण्याची आवश्यकता असते. यालाच अनुलक्षून, “समर्पित” या शब्दाची एका ठिकाणी, “एखाद्या विचाराला किंवा कार्याला पूर्णपणे वाहून घेतलेला” अशी व्याख्या देण्यात आली आहे.
२. बायबलमध्ये समर्पण हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे? उदाहरण द्या.
२ पण बायबलमध्ये “समर्पण” हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे? “समर्पित करणे” असे भाषांतरीत केलेल्या हिब्रू क्रियापदाचा अर्थ, “अलिप्त ठेवणे, अलिप्त राहणे; काढून घेणे” असा होतो. * प्राचीन इस्राएलात, महायाजक अहरोन आपल्या मंदिलावर “समर्पणाचे पवित्र चिन्ह” लावत असे; हे चिन्ह म्हणजे शुद्ध सोन्याची एक पट्टी होती ज्यावर “परमेश्वरासाठी पवित्र” या अर्थाचे हिब्रू शब्द कोरलेले होते. हे चिन्ह महायाजकाला आठवण करून देण्यासाठी होते की यहोवाचे पवित्रस्थान भ्रष्ट होईल अशाप्रकारची कोणतीही गोष्ट त्याने करू नये कारण “समर्पणाचे चिन्ह, त्याच्या देवाच्या अभिषेकाचे तेल त्याच्यावर [होते].”—निर्गम २९:६, NW; ३९:३०; लेवीय २१:१२, NW.
३. आपल्या समर्पणाचा आपल्या जीवनावर कसा परिणाम झाला पाहिजे?
३ हा संदर्भ लक्षात घेतल्यावर, समर्पण ही एक गंभीर गोष्ट आहे असे आपल्याला दिसून येते. समर्पण करणारी व्यक्ती स्वेच्छेने स्वतःला देवाचा सेवक म्हणवते. या व्यक्तीने आपले आचरण शुद्ध राखणे महत्त्वाचे आहे. पेत्राने यहोवाचे शब्द उद्धृत करून म्हटले: “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.” (१ पेत्र १:१५, १६) समर्पित ख्रिस्ती असल्यामुळे, आपले समर्पण आठवणीत ठेवूनच जीवनात प्रत्येक पाऊल उचलण्याची, म्हणजेच शेवटपर्यंत विश्वासू राहण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. पण ख्रिस्ती समर्पणात काय गोवलेले आहे?—लेवीय १९:२; मत्तय २४:१३.
४. समर्पणाचा निर्णय आपण कशाप्रकारे घेतो आणि याची तुलना कशाशी करता येईल?
४ यहोवा देवाबद्दल, त्याच्या उद्देशांबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल आणि देवाच्या उद्देशांच्या पूर्णतेत त्याच्या भूमिकेबद्दल अचूक ज्ञान मिळाल्यावर आपण यहोवा देवाची पूर्ण मनाने, बुद्धीने, जीवाने व शक्तीने सेवा करण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला. (मार्क ८:३४; १२:३०; योहान १७:३) जणू आपण प्रत्येकाने यहोवाला पूर्णपणे समर्पित राहण्याची शपथ घेतली. भावनेच्या भरात आपण हा निर्णय घेतला नाही; तर विचारपूर्वक, प्रार्थनापूर्वक आणि समजून उमजून घेतला. त्याअर्थी हा निर्णय तात्पुरत्या काळासाठी नव्हता. एखादा शेतकरी शेत नांगरायला सुरवात करतो आणि मग हे काम तर खूपच कठीण आहे किंवा कापणीला तर अजून बराच अवकाश आहे असे त्याला वाटल्यामुळे तो ते काम मध्येच टाकून देतो; अशा शेतकऱ्यासारखे आपण असता कामा नये. आता आपण अशा काही व्यक्तींच्या उदाहरणांवर विचार करू, की ज्यांनी “नांगराला हात घातल्यावर” अर्थात ईश्वरशासित जबाबदारी हाती घेतल्यावर सर्व अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन ती जबाबदारी पूर्ण केली आहे.—लूक ९:६२; रोमकर १२:१, २.
शेवटपर्यंत समर्पित राहिलेले
५. देवाची समर्पित भावनेने सेवा करण्यात यिर्मयाचे उत्तम उदाहरण आहे असे आपण का म्हणू शकतो?
५ यिर्मयाने ४० वर्षांपेक्षा अधिक काळ (सा.यु.पू. ६४७-६०७) जेरूसलेममध्ये भविष्यवाणी करण्याचे कार्य केले. हे साधेसोपे काम नव्हते. यिर्मयाला त्याच्या मर्यादांची जाणीव होती. (यिर्मया १:२-६) यहूदाच्या अडेल प्रवृत्तीच्या लोकांचा दररोज सामना करण्यासाठी यिर्मयाला धैर्याची व सहनशीलतेची आवश्यकता होती. (यिर्मया १८:१८; ३८:४-६) पण यिर्मयाने यहोवा देवावर पूर्ण भरवसा ठेवला; आणि त्यामुळे खऱ्या समर्पित भावनेने सेवा करण्यासाठी त्याला यहोवाने मदत दिली.—यिर्मया १:१८, १९.
६. प्रेषित योहानाने आपल्याकरता कोणता आदर्श मांडला?
६ विश्वासू प्रेषित योहानाविषयी काय म्हणता येईल? वृद्धावस्थेत असताना त्याला, “देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्याखातर” पात्म नावाच्या बेटावर हद्दपार करण्यात आले. तेथे अत्यंत खडतर परिस्थितीत त्याला राहावे लागले. (प्रकटीकरण १:९) पण त्याने सर्व क्लेश सहन केले आणि सुमारे ६० वर्षे तो आपल्या ख्रिस्ती समर्पणाला जागला. त्याच्या जीवनकाळात रोमी सैन्यांनी जेरूसलेमचा नाश केला. नंतर योहानाला एक शुभवर्तमान, तीन प्रेरित पत्रे आणि प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिण्याचा सन्मान मिळाला. प्रकटीकरणाच्या पुस्तकात त्याने हर्मगिदोनाच्या लढाईविषयी भाकीत केले. ही हर्मगिदोनाची लढाई आपल्या जीवनकाळात होणार नाही हे योहानाला समजले तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती? यहोवाच्या कार्यातला त्याचा उत्साह नाहीसा झाला का? नाही. ‘समय जवळ आला आहे’ हे खरे असले तरीसुद्धा आपल्याला मिळालेल्या दर्शनांची पूर्णता भविष्यात होईल हे माहीत असूनही योहान मृत्यूपर्यंत विश्वासू राहिला.—प्रकटीकरण १:३; दानीएल १२:४.
समर्पणाची आधुनिक उदाहरणे
७. ख्रिस्ती समर्पणाची आठवण ठेवून जगलेल्या एका बांधवाचे उदाहरण सांगा.
७ आधुनिक काळातही अशा कित्येक विश्वासू ख्रिश्चनांची उदाहरणे आहेत ज्यांना हर्मगिदोन पाहण्याची संधी मिळाली नाही तरीसुद्धा ते शेवटपर्यंत आपल्या समर्पणाला जागले. असेच एक उदाहरण आहे इंग्लंडच्या अर्नेस्ट ई. बीवर यांचे. बीवर १९३९ साली साक्षीदार बनले. दुसरे महायुद्ध नुकतेच सुरू झाले होते आणि पूर्ण वेळचे सेवाकार्य सुरू करण्यासाठी बीवर यांनी प्रेस फोटोग्राफीचा सुस्थापित व्यवसाय सोडून दिला. ख्रिस्ती विश्वासांना अनुसरून युद्धात सहभाग न घेतल्यामुळे त्यांना दोन वर्षे तुरुंगात डांबण्यात आले. त्यांचे कुटुंब त्यांच्या पाठीशी उभे राहिले. १९५० साली त्यांची तीन मुले न्यू यॉर्क येथे वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेला उपस्थित राहिली. प्रचार कार्यात बंधू बीवर इतके आवेशी होते की त्यांच्या मित्रांनी त्यांना ‘आर्मगेडन अर्नी’ असे नाव ठेवले होते. बीवर शेवटपर्यंत म्हणजे १९८६ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत देवाची हर्मगिदोनाची लढाई किती जवळ आली आहे हे घोषित करत राहिले. त्यांनी आपल्या समर्पणाला देवासोबत केलेला तात्पुरता करार या दृष्टिकोनातून कधीही पाहिले नाही. *—१ करिंथकर १५:५८.
८, ९. (अ) फ्राँको राजवटीदरम्यान स्पेनमधील बऱ्याच तरुणांनी आपल्याकरता कशाप्रकारे उत्तम आदर्श मांडला? (ब) कोणते प्रश्न आपण विचारले पाहिजेत?
८ शेवटपर्यंत कायम राहिलेल्या आवेशाचे आणखी एक उदाहरण स्पेनच्या बांधवांचे आहे. फ्राँको राजवटीदरम्यान (१९३९-७५) शेकडो तरुण समर्पित साक्षीदारांनी ख्रिस्ती तत्त्वांच्या आधारावर युद्धात भाग घेण्यास नकार दिला. यांपैकी बऱ्याच जणांना लष्करी तुरुंगांत दहा किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्षे काढावी लागली. केसूस मार्टीन नावाच्या एका साक्षीदाराला तर वेगवेगळ्या आरोपांखाली एकूण २२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. उत्तर आफ्रिकेतील एका लष्करी कारागृहात असताना त्याला बेदम मारण्यात आले. हे सर्वकाही सहन करणे अत्यंत कठीण होते पण केसूस मार्टिन यांनी कधीही तडजोड केली नाही.
९ सहसा या तरुणांना हे देखील माहीत नसायचे की आपली सुटका केव्हा होईल, किंवा होईल की नाही. कारण त्यांना कित्येक आरोपांसाठी लागोपाठ तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण असे असूनही, तुरुंगवासाच्या काळात ते विश्वासू राहिले आणि यहोवाच्या सेवेतला त्यांचा आवेश कमी झाला नाही. शेवटी, १९७३ साली राजकीय परिस्थिती थोडी सुधारू लागली तेव्हा त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. एव्हाना, त्यांपैकी कित्येकांनी तिशी ओलांडली होती. तुरुंगातून सुटका होताच बरेचजणांनी सरळ पूर्ण वेळची सेवा सुरू केली; काही खास पायनियर तर काही प्रवासी पर्यवेक्षक बनले. तुरुंगातही त्यांनी आपल्या समर्पणाचा विसर पडू दिला नाही आणि तेथून सुटका झाल्यावरही ते आवेशाने यहोवाची सेवा करत राहिले. * आज आपल्याविषयी काय? या विश्वासू बांधवांप्रमाणे आपण देखील आपल्या समर्पणाची आठवण ठेवून जगत आहोत का?—इब्री लोकांस १०:३२-३४; १३:३.
समर्पणाविषयी योग्य दृष्टिकोन
१०. (अ) आपण आपल्या समर्पणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे? (ब) यहोवा आपल्या सेवेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?
१० देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला केलेल्या समर्पणाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? ही आपल्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का? आपली परिस्थिती कशीही असो, आपण तरुण असो वा वृद्ध, विवाहित वा अविवाहित, निरोगी अथवा आजारी, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला शक्य होईल तितक्या चांगल्याप्रकारे आपण आपल्या समर्पणाची आठवण ठेवून देवाची सेवा केली पाहिजे. एका व्यक्तीला कदाचित पायनियर, वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तरात स्वयंसेवक, मिशनरी किंवा प्रवासी पर्यवेक्षक म्हणून पूर्ण वेळची सेवा करणे शक्य असेल. दुसरीकडे पाहता, काही आईवडिलांना आपल्या कुटुंबाच्या शारीरिक व आध्यात्मिक गरजा पूर्ण कराव्या लागत असल्यामुळे हे कदाचित शक्य होणार नाही. पूर्ण वेळची सेवा करणाऱ्यांच्या तुलनेत त्यांनी सेवेत कमी तास खर्च केले असले तरीसुद्धा यहोवाच्या नजरेत ते कमी आहेत का? नाही. जे आपल्याजवळ नाही त्याची यहोवा देव कधीही आपल्याकडून अपेक्षा करत नाही. प्रेषित पौलाने हे तत्त्व सांगितले होते: “उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ असेल तसे ते मान्य होते; नसले तसे नाही.”—२ करिंथकर ८:१२.
११. आपले तारण कशावर अवलंबून आहे?
११ कितीही केले तरी, आपले तारण आपण जे करतो त्यावर नव्हे, तर आपला प्रभू ख्रिस्त येशू याच्या द्वारे यहोवाने दाखवलेल्या अपात्री कृपेवर अवलंबून आहे. पौलाने हे स्पष्टपणे सांगितले: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात.” पण आपण यहोवाचे कार्य करतो तेव्हा त्याच्या प्रतिज्ञांवर आपल्याला विश्वास असल्याचे आपण जाहीर करतो.—रोमकर ३:२३, २४; याकोब २:१७, १८, २४.
१२. आपसांत तुलना करणे का चुकीचे आहे?
१२ देवाच्या सेवेत आपण किती वेळ खर्च करतो, किती पुस्तके व मासिके लोकांना देतो किंवा किती बायबल अभ्यास चालवतो याविषयी इतरांशी तुलना करण्याची काही गरज नाही. (गलतीकर ६:३, ४) ख्रिस्ती सेवेत आपल्याला कितीही फळ मिळाले तरीसुद्धा आपल्या खऱ्या भूमिकेची आठवण करून देणारे येशूचे शब्द आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे: “तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर ‘आम्ही निरुपयोगी दास आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे,’ असे म्हणा.” (लूक १७:१०) पण खरे पाहता ‘आपल्याला सांगितलेली सर्व कामे’ आपण केली आहेत असे आपण किती वेळा म्हणू शकतो? तेव्हा हा प्रश्न येतो की, देवाची सेवा आपण किती मनोभावे करत आहोत?—२ करिंथकर १०:१७, १८.
प्रत्येक दिवसाचा सदुपयोग करा
१३. समर्पित जीवन जगत असताना आपण कशी मनोवृत्ती ठेवली पाहिजे?
१३ प्रेषित पौलाने पत्नींना, पतींना, मुलांना, आईवडिलांना आणि दासांना उपदेश दिल्यानंतर असे लिहिले: “जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभु ख्रिस्ताची चाकरी करीत जा.” (कलस्सैकर ३:२३, २४) यहोवाच्या सेवेत यश मिळवण्याद्वारे लोकांवर आपली छाप पडावी हा आपला उद्देश नाही. तर देवाची सेवा करताना आपण येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करतो. तो या पृथ्वीवर फार थोडा काळ राहिला; पण आपल्या हातात थोडाच काळ आहे याची जाणीव ठेवून त्याने जिवेभावे सेवा केली.—१ पेत्र २:२१.
१४. शेवटल्या दिवसांविषयी पेत्राने कोणती ताकीद दिली?
१४ प्रेषित पेत्राने देखील काळाचे महत्त्व ओळखून कार्य केले. त्याच्या दुसऱ्या पत्रात त्याने अशी ताकीद दिली की शेवटल्या दिवसांत, थट्टेखोर लोक येतील; हे धर्मत्यागी आणि संशयवादी लोक असतील जे स्वतःच्या इच्छेप्रमाणेच ख्रिस्ताच्या उपस्थितीविषयी निरनिराळ्या शंकाकुशंका निर्माण करतील. पण पेत्राने म्हटले: “प्रभु आपल्या वचनाविषयी [विलंब] करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल.” होय, यहोवाचा दिवस निश्चित येईल. म्हणूनच आपण दररोज यावर विचार केला पाहिजे की देवाच्या प्रतिज्ञांवर आपला विश्वास खरोखर मजबूत आहे का, त्याच्या प्रतिज्ञांविषयी आपल्याला पूर्ण खात्री आहे का?—२ पेत्र ३:३, ४, ९, १०.
१५. आपण आपल्या जीवनातील प्रत्येक दिवसाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?
१५ खऱ्या अर्थाने समर्पित जीवन जगण्यासाठी आपण प्रत्येक दिवस यहोवाची स्तुती करण्याकरता उपयोगात आणला पाहिजे. दररोज रात्री जेव्हा आपण दिवसभर काय काय केले याचा विचार करतो, तेव्हा देवाच्या नावाच्या पवित्रीकरणाला आणि त्याच्या राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराला आपण कोणत्या न कोणत्या प्रकारे आज हातभार लावला आहे असे म्हणू शकतो का? कदाचित आपल्या चांगल्या आचरणाद्वारे, प्रोत्साहनात्मक संभाषणाद्वारे किंवा आपल्या कुटुंबियांकरता व इतरांकरता काही प्रेमळ कृती करण्याद्वारे आपण यहोवाच्या नावाला स्तुती आणली असेल. आपल्या ख्रिस्ती आशेविषयी इतरांना सांगण्यासाठी, मिळालेल्या संधींचा आपण उपयोग केला का? देवाच्या प्रतिज्ञांविषयी गांभिर्याने विचार करायला आपण कोणाला मदत केली का? आतापासून आपण हा निर्धार करू या की दररोज, आपण आध्यात्मिक दृष्टीने काही न काही सकारात्मक कार्य करण्याचा प्रयत्न करू; जणू आपल्या आध्यात्मिक बँक खात्यात दररोज काही न काही भर टाकून ते दिवसेंदिवस वाढवत जाऊ.—मत्तय ६:२०; १ पेत्र २:१२; ३:१५; याकोब ३:१३.
आध्यात्मिक दृष्टी एकाग्र ठेवा
१६. समर्पणाची आठवण ठेवून जगण्याचा आपला दृढसंकल्प खचवण्यासाठी सैतान कशाप्रकारे प्रयत्न करतो?
१६ ख्रिस्ती लोकांचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. सैतान व त्याच्या मार्गावर चालणारे लोक चांगले व वाईट, निर्मळ व अश्लील, नैतिक व अनैतिक, योग्य व अयोग्य यातील फरक अस्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. (रोमकर १:२४-२८; १६:१७-१९) सैतानाने आपली मने व अंतःकरणे दूषित करण्याचा मार्ग अगदी सोपा केला आहे; फक्त टीव्हीच्या रिमोट कंट्रोलवरची किंवा कंम्प्युटरच्या की-बोर्डवरची बटने दाबण्याचा उशीर आहे. आपली आध्यात्मिक दृष्टी एकाग्र नसेल किंवा अस्पष्ट झाली असेल तर सैतानाचे डावपेच आपण ओळखू शकणार नाही. यामुळे आपल्याला आपल्या समर्पणाचा विसर पडण्याची शक्यता आहे, आणि आध्यात्मिक गोष्टींविषयी आपण तडजोड केल्यास ‘नांगरावरची’ आपली पकड ढिली होईल.—लूक ९:६२; फिलिप्पैकर ४:८.
१७. पौलाचा सल्ला आपल्याला देवासोबतचा आपला नातेसंबंध दृढ राखण्यासाठी कशी मदत करेल?
१७ थेस्सलनीका मंडळीला लिहिलेले पौलाचे शब्द अतिशय समयोचित आहेत: “देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.” (१ थेस्सलनीकाकर ४:३-५) अनैतिकतेमुळे काहींना ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले आहे; ते देवाला केलेल्या समर्पणाची आठवण ठेवून वागले नाहीत. त्यांनी देवासोबतचा आपला नातेसंबंध कमकुवत होऊ दिला आणि त्यामुळे एक अशीही वेळ आली जेव्हा यहोवाला त्यांच्या जीवनात काहीच महत्त्व राहिले नाही. पण पौलाने म्हटल्याप्रमाणे: “देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी अव्हेर करितो तो माणसाचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करितो.”—१ थेस्सलनीकाकर ४:७, ८.
तुमचा काय निर्धार आहे?
१८. आपण कोणता निर्धार केला पाहिजे?
१८ यहोवा देवाला आपण केलेल्या समर्पणाचे गांभीर्य आपण ओळखत असू, तर आपण कोणता निर्धार केला पाहिजे? आपले आचरण आणि आपले सेवाकार्य यांबाबतीत यहोवापुढे आपला विवेक सदैव निष्कलंक राहावा असा दृढसंकल्प आपण केला पाहिजे. पेत्राने बांधवांना आर्जवून म्हटले: “शुद्ध विवेक राखा. ह्यासाठी की, तुमच्याविरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे.” (१ पेत्र ३:१६, NW) आपल्या ख्रिस्ती आचरणामुळे कदाचित आपल्याला छळ सहन करावा लागेल, पण देवाला विश्वासू राहिल्यामुळे ख्रिस्ताला देखील छळण्यात आले होते. “म्हणून,” पेत्र म्हणतो “ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हीहि तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे.”—१ पेत्र ४:१.
१९. आपल्याविषयी काय म्हटले जावे असा आपण प्रयत्न करावा?
१९ आपल्या समर्पणाची सतत आठवण ठेवून जगण्याचा दृढसंकल्प केल्यामुळे, आध्यात्मिक, नैतिक आणि शारीरिकरित्या रोगिष्ट झालेल्या सैतानाच्या या जगात आपल्याला फसवू पाहणाऱ्या सर्व पाशांपासून आपले रक्षण होईल. एवढेच नाही तर देव आपल्याबाबतीत संतुष्ट आहे याची आपण खात्री बाळगू शकू आणि अशी खात्री असणेच सर्वात महत्त्वाचे आहे; सैतान व त्याचे अनुयायी आपल्याला जे काही देऊ इच्छितात त्यातील कशाशीच याची तुलना करता येत नाही. आपण सत्यात आलो तेव्हा जे प्रेम आपल्याला होते ते आता थंडावले आहे असे आपल्याबाबतीत म्हटले जाण्याची आपण कधीही संधी देऊ नये. उलट पहिल्या शतकातील थुवतीरा मंडळीबद्दल जे म्हणण्यात आले ते आपल्या बाबतीतही म्हटले जावे: “तुझी कृत्ये आणि तुझी प्रीति, विश्वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत; आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत.” (प्रकटीकरण २:४, १८, १९) आपल्या समर्पणाची भावना कधीही कोमट होऊ नये. उलट, अंत येईपर्यंत आपण “आत्म्यात उत्सुक [ज्वलंत]” राहू या कारण अंत जवळ आला आहे.—रोमकर १२:११; प्रकटीकरण ३:१५ १६.
[तळटीपा]
^ टेहळणी बुरूज, एप्रिल १५, १९८७, (इंग्रजी) पृष्ठ ३१.
^ अर्नेस्ट बीवर यांच्या जीवनाच्या सविस्तर अहवालासाठी टेहळणी बुरूज (इंग्रजी) मार्च १५, १९८०, पृष्ठे ८-११ पाहा.
^ वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित १९७८ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक यात पृष्ठे १५६-८, २०१-१८ पाहा.
तुम्हाला आठवते का?
• समर्पण म्हणजे काय?
• देवाच्या समर्पित सेवकांची प्राचीन व आधुनिक काळातील कोणती उदाहरणे अनुकरणीय आहेत?
• देवाच्या सेवेविषयी आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
• देवाला केलेल्या समर्पणाच्या संबंधाने आपण कोणता निर्धार केला पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्र]
दुष्ट लोकांचा विरोध सहन करावा लागला तरीही यिर्मया विश्वासू राहिला
[१६ पानांवरील चित्र]
अर्नेस्ट बीवर यांनी ख्रिस्ती आवेशाचा उत्तम आदर्श आपल्या मुलांपुढे ठेवला
[१७ पानांवरील चित्र]
स्पॅनिश तुरुंगांत शेकडो तरुण साक्षीदार यहोवाला विश्वासू राहिले
[१८ पानांवरील चित्रे]
दररोज आध्यात्मिक दृष्टीने सकारात्मक असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा