आत्म्याचे चिंतन करा व जीवंत राहा!
आत्म्याचे चिंतन करा व जीवंत राहा!
“आत्म्याचे चिंतन हे जीवन आहे.”—रोमकर ८:६.
१, २. “देह” व “आत्मा” यातला फरक बायबल कशाप्रकारे दाखवते?
शारीरिक वासनांना अवाजवी महत्त्व देणाऱ्या आजच्या अनैतिक जगात देवापुढे नैतिकरित्या निष्कलंक राहणे सोपे नाही. पण बायबल “देह” व “आत्मा” यातला फरक स्पष्टपणे दाखवते; तसेच, पापमय शरीराला वश झाल्यामुळे कोणते भयंकर दुष्परिणाम होतात आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या अधीन झाल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात हे देखील ते स्पष्टपणे दाखवते.
२ उदाहरणार्थ येशू ख्रिस्ताने म्हटले होते: “आत्मा हा जिवंत करणारा आहे; देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत.” (योहान ६:६३) गलती येथील ख्रिस्ती बांधवांना पौलाने लिहिले: “देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे; ही परस्परविरुद्ध आहे, ह्यासाठी की, जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये.” (गलतीकर ५:१७) पौलाने असेही म्हटले: “जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.”—गलतीकर ६:८.
३. चुकीच्या इच्छा व वासनांपासून मुक्त होण्यासाठी कशाची गरज आहे?
३ यहोवाचा पवित्र आत्मा—म्हणजेच त्याची कार्यकारी शक्ती अशुद्ध “देहवासना” आपल्या मनातून काढून टाकण्यास व पापपूर्ण देहाच्या वर्चस्वापासून आपल्याला मुक्त करण्यास समर्थ आहे. (१ पेत्र २:११) अयोग्य वासनांच्या वर्चस्वापासून मुक्त होण्याकरता देवाच्या आत्म्याची आपल्याला गरज आहे. पौलाने लिहिले: “देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.” (रोमकर ८:६) आत्म्याचे चिंतन करणे म्हणजे नेमके काय?
“आत्म्याचे चिंतन”
४. “आत्म्याचे चिंतन” म्हणजे काय?
४ “आत्म्याचे चिंतन” असे पौलाने लिहिले तेव्हा त्याने जो ग्रीक शब्द वापरला त्याचा अर्थ “विचारसरणी, दृष्टिकोन, . . . ध्येय, उत्कट इच्छा, प्रयत्न” असा होता. या शब्दाशी संबंधित असलेल्या एका क्रियापदाचा अर्थ “विचार करणे, विशिष्ट दृष्टिकोन असणे” असा होतो. त्याअर्थी, आत्म्याचे चिंतन म्हणजे यहोवाच्या कार्यकारी शक्तीच्या नियंत्रणात असणे, अधीन असणे आणि या शक्तीच्या प्रेरणेने विचार व कार्य करणे. हा शब्द असे सूचित करतो की आपण स्वखुषीने आपले विचार, इच्छा आणि आकांक्षा देवाच्या पवित्र आत्म्याच्या पूर्णपणे अधीन केल्या पाहिजेत.
५. आपण पवित्र आत्म्याच्या कितपत अधीन झाले पाहिजे?
५ आपण पवित्र आत्म्याच्या कितपत अधीन झाले पाहिजे? पौलाने म्हटले की आपण “आत्म्याच्या नाविन्याने सेवा करितो.” (रोमकर ७:६) येशूच्या खंडणी बलिदानामुळे ख्रिस्ती लोकांना पापाच्या दास्यातून मुक्तता मिळाली आहे, ते पापाला मेलेले आहेत आणि अशारितीने आता पूर्वीप्रमाणे ते पापाचे दास राहिले नाहीत. (रोमकर ६:२, ११) सांकेतिक अर्थाने मेलेले असले तरीसुद्धा ते शारीरिकरित्या अद्यापही जिवंत आहेत आणि “नीतिमत्त्वाला गुलाम” होऊन ख्रिस्ताचे अनुसरण करण्यास ते मुक्त आहेत.—रोमकर ६:१८-२०.
मोठा बदल
६. नीतिमत्त्वाचे गुलाम होणाऱ्या लोकांत कोणता बदल होतो?
६ पापाच्या दास्यातून मुक्त होण्यासाठी व नीतिमत्त्वाचे गुलाम होऊन देवाची सेवा करण्यासाठी ख्रिस्ती व्यक्तीत फार मोठा बदल होणे आवश्यक आहे. हा बदल अनुभवलेल्या काही बांधवांविषयी पौलाने म्हटले: ‘तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला.’—रोमकर ६:१७, १८; १ करिंथकर ६:११.
७. यहोवाचे विचार जाणून घेणे का महत्त्वाचे आहे?
७ हा आमूलाग्र बदल आपल्यात घडून येण्यासाठी प्रथम यहोवाचे विचार जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अनेक शतकांपूर्वी स्तोत्रकर्ता दावीद याने देवाला कळकळीची विनंती केली: “हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखीव . . . तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे.” (स्तोत्र २५:४, ५) यहोवाने दावीदाची प्रार्थना ऐकली आणि आज या आधुनिक काळातही तो आपल्या सेवकांची प्रार्थना ऐकेल यात शंका नाही. देवाचे मार्ग आणि त्याचे सत्य हे शुद्ध व पवित्र असल्यामुळे त्यांबद्दल आपण मनन केले पाहिजे. असे केल्यामुळे आपल्याला अशुद्ध शारीरिक वासना तृप्त करण्याचा मोह होतो तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यास निश्चितच मदत होईल.
देवाच्या वचनाची महत्त्वपूर्ण भूमिका
८. बायबलचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे का आहे?
८ देवाचे वचन बायबल हे त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेले आहे. त्यामुळे आपल्या जीवनात पवित्र आत्म्याचा प्रभाव असावा अशी इच्छा असल्यास आपण—शक्यतो दररोज—बायबलचे वाचन व त्याचा अभ्यास केला पाहिजे. (१ करिंथकर २:१०, ११; इफिसकर ५:१८) बायबलमधील सत्य व तत्त्व आत्मसात केल्यामुळे आपल्या आध्यात्मिकतेस धोक्यात आणणाऱ्या मोहांना आपल्याला तोंड देता येईल. अनैतिक इच्छा आपल्या मनात जागृत झाल्यास, देवाचा आत्मा आपल्याला बायबलमधील वचनांची व उपयोगी तत्त्वांची आठवण करून देईल; यामुळे देवाच्या इच्छेनुसार वागण्याचा निर्धार आपल्याला आणखी पक्का करता येईल. (स्तोत्र ११९:१, २, ९९; योहान १४:२६) आणि अशारितीने आपण मार्गभ्रष्ट होणार नाही.—२ करिंथकर ११:३.
९. बायबल अभ्यास केल्यामुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा निर्धार पक्का करण्यास आपल्याला कशी मदत मिळेल?
९ बायबल आधारित प्रकाशनांच्या साहाय्याने बायबलचा सखोल व मनःपूर्वक अभ्यास करत असताना आपल्या मनावर व हृदयावर देवाच्या आत्म्याचा प्रभाव पडत असतो. यामुळे यहोवाच्या आज्ञा व अपेक्षांबद्दल आपला आदर वाढत जातो. देवासोबतचा आपला नातेसंबंध हा जीवनात आपल्याकरता सर्वात महत्त्वाचा बनतो. मोह व परीक्षा येतात तेव्हा आपण त्या अयोग्य कृत्यातून मिळणाऱ्या क्षणिक सुखाचा विचार करणार नाही. उलट यहोवाला विश्वासू राहण्याचा आपण लगेच विचार करू. त्याच्यासोबतच्या आपल्या नातेसंबंधाबद्दल आपल्याला खरोखर कदर वाटत असेल तर, ज्यामुळे तो बिघडू शकतो किंवा तुटू शकतो अशा कोणत्याही अयोग्य इच्छेला आपण कधीही वश होणार नाही.
“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे”
१०. आत्म्याचे चिंतन करण्याकरता यहोवाच्या नियमांचे पालन करणे का आवश्यक आहे?
१० आत्म्याचे चिंतन करण्यासाठी देवाच्या वचनाचे ज्ञान असणे पुरेसे नाही. शलमोन राजाला देवाच्या आज्ञांविषयी व तत्त्वांविषयी काही कमी ज्ञान नव्हते. पण जीवनाच्या उत्तरार्धात तो त्यांपासून दूर गेला. (१ राजे ४:२९, ३०; ११:१-६) जर आपण आध्यात्मिक प्रवृत्तीचे असू, तर आपण केवळ बायबलचे ज्ञान घेण्यातच समाधान मानणार नाही तर देवाच्या आज्ञांचे मनःपूर्वक पालन करण्याची गरजही ओळखू. याचा अर्थ आपण यहोवाच्या आज्ञांचे व अपेक्षांचे विचारपूर्वक परीक्षण करून त्यांनुसार वागण्याचा मनस्वी प्रयत्न करू. स्तोत्रकर्त्याची अशीच मनोवृत्ती होती. त्याने म्हटले: “तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.” (स्तोत्र ११९:९७) देवाच्या नियमांचे पालन करण्याची आपली खरोखर इच्छा असते तेव्हा हळूहळू आपल्या व्यक्तिमत्त्वात देवाला आवडणारे गुण येऊ लागतात. (इफिसकर ५:१, २) चुकीच्या इच्छांना नाईलाजाने वश होण्याऐवजी आपण आत्म्याची फळे प्रदर्शित करतो आणि यहोवाला संतुष्ट करण्याची इच्छा असल्यामुळे आपण ‘देहाच्या कर्मांपासून’ दूर राहतो.—गलतीकर ५:१६, १९-२३; स्तोत्र १५:१, २.
११. व्यभिचार करू नये असा जो नियम यहोवाने दिला आहे तो कशाप्रकारे आपल्याच भल्याकरता आहे हे तुम्ही समजावून सांगू शकता का?
११ आपण यहोवाच्या नियमांबद्दल मनस्वी आदर आणि प्रेम कसे विकसित करू शकतो? असे करण्याचा एक मार्ग म्हणजे यहोवाचे नियम आपल्याकरता किती मोलवान आहेत हे ओळखणे. उदाहरणार्थ, लैंगिक संबंध केवळ विवाहित स्त्रीपुरुषांतच असावेत आणि लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर स्वतःच्या सोबत्याला सोडून दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषासोबत संबंध ठेवणे चुकीचे आहे असा देवाचा नियम आहे. (इब्री लोकांस १३:४) जरा विचार करा. देवाच्या या नियमाचे पालन केल्यामुळे आपण काहीतरी चांगले गमावत असतो का? जे आपल्याकरता चांगले आहे त्यापासून आपला प्रेमळ स्वर्गीय देव खरोखरच आपल्याला वंचित ठेवेल का? निश्चितच नाही! यहोवाच्या नैतिक नियमांनुसार न वागणाऱ्यांचे जीवन कसे आहे याचा विचार करा. नको असताना गर्भधारणा झाल्यामुळे ते सहसा एकतर गर्भपात करतात किंवा लहान वयात लग्न करून मग आयुष्यभर पस्तावतात. काहींना एकट्यानेच त्या मुलाला लहानाचे मोठे करावे लागते. शिवाय, व्यभिचार करणारे शारीरिक संबंधांतून पसरणाऱ्या अनेक रोगांचा धोका पत्करतात. (१ करिंथकर ६:१८) आणि व्यभिचार करणारा जर यहोवाचा सेवक असेल तर याचे भावनात्मक परिणाम आणखीनच क्लेशमय असतात. विवेकाची सतत बोचणी झाल्यामुळे त्यांना रात्रीची झोप लागत नाही आणि ते सतत दुःखी राहतात. (स्तोत्र ३२:३, ४; ५१:३) या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर, यहोवाने व्यभिचाराविषयी दिलेला नियम आपल्या भल्याकरताच आहे हे स्पष्ट होत नाही का? होय निश्चितच. नैतिकरित्या शुद्ध राहणे हे खरोखर मोठ्या फायद्याचे आहे!
मदतीकरता यहोवाला प्रार्थना करा
१२, १३. पापमय वासना सतावतात तेव्हा प्रार्थना करणे का उचित आहे?
१२ आत्म्याचे चिंतन करण्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रार्थनेत आपण देवाच्या आत्म्याची मदत मागितली पाहिजे. हे योग्य आहे, कारण येशूने म्हटले होते: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक ११:१३) आपल्या दुर्बलतेवर मात करण्याकरता आपण पवित्र आत्म्यावर किती अवलंबून आहोत हे आपण प्रार्थनेत यहोवा देवाजवळ व्यक्त केले पाहिजे. (रोमकर ८:२६, २७) पापी वासना किंवा मनोवृत्ती आपल्यावर प्रभाव पाडत आहे याची आपल्याला जाणीव झाल्यास, किंवा एखाद्या प्रेमळ बांधवाने हे आपल्या लक्षात आणून दिल्यास आपण प्रार्थनेत या समस्येचा अगदी स्पष्टपणे उल्लेख करून देवाला मदत मागितली पाहिजे.
१३ यहोवा आपल्याला न्याय्य, शुद्ध, सद्गुणी व प्रशंसनीय अशा गोष्टींचा नेहमी विचार करण्यास साहाय्य करेल. तसेच ‘देवाने दिलेली शांती’ आपल्या अंतःकरणांचे व विचारांचे रक्षण करो अशीही आपण यहोवाला मनःपूर्वक प्रार्थना केली पाहिजे. (फिलिप्पैकर ४:६-८) “नीतिमत्त्व, सुभक्ति, विश्वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस [लागण्याकरता]” यहोवाला प्रार्थनेद्वारे मदत मागा. (१ तीमथ्य ६:११-१४) आपल्या स्वर्गीय पित्याच्या मदतीने आपल्या चिंता आणि अयोग्य वासना कधीही आपल्या नियंत्रणाबाहेर जाणार नाहीत. उलट, देवाने दिलेली शांती आपल्याला लाभेल.
पवित्र आत्म्याला खिन्न करू नका
१४. देवाचा आत्मा शुद्ध चालचलन ठेवण्याची प्रेरणा का देतो?
१४ पौलाने म्हटले, “आत्म्याला विझवू नका.” प्रौढ ख्रिस्ती पौलाचा हा सल्ला आपल्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतात. (१ थेस्सलनीकाकर ५:१९) देवाचा आत्मा हा ‘पवित्रतेचा आत्मा’ असल्यामुळे तो शुद्ध व पवित्र आहे. (रोमकर १:४) हा आत्मा आपल्या जीवनात कार्य करतो तेव्हा तो आपल्याला शुद्ध किंवा पवित्र कार्ये करण्याची प्रेरणा देतो. नेहमी देवाच्या नियमांत राहून शुद्ध चालचलन ठेवण्यास तो आपल्याला मदत करतो. (१ पेत्र १:२) कोणत्याही प्रकारचे अशुद्ध कृत्य करणे त्या आत्म्याचा अनादर करण्यासारखे आहे. आणि असे केल्याने भयंकर दुष्परिणाम होतात. कशाप्रकारे?
१५, १६. (अ) आपण कशाप्रकारे देवाच्या आत्म्याला खिन्न करण्याची शक्यता आहे? (ब) यहोवाच्या आत्म्याला खिन्न करण्याचे आपण कसे टाळू शकतो?
१५ पौलाने लिहिले: “देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, खंडणी भरुन प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहा.” (इफिसकर ४:३०) विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चनांना यहोवा पवित्र आत्म्याने मुद्रांकित करतो किंवा त्यांना भविष्यात स्वर्गात मिळणार असलेल्या अमर जीवनाचे एक चिन्ह देतो असे बायबलमध्ये सांगितले आहे. (२ करिंथकर १:२२; १ करिंथकर १५:५०-५७; प्रकटीकरण २:१०) अभिषिक्त जन आणि पृथ्वीवर जीवनाची आशा असलेले त्यांचे सोबती विश्वासूपणे यहोवाची सेवा करत असताना पवित्र आत्मा त्यांचे मार्गदर्शन करतो आणि पापमय कृत्ये टाळण्यास त्यांना मदत करतो.
१६ प्रेषित पौलाने लबाडी, चोरी, अमंगळपणा आणि अशा इतर गोष्टींविषयी ताकीद दिली होती. आपण असली कृत्ये करू लागलो तर आपण देवाच्या वचनात आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेल्या मार्गदर्शनाविरुद्ध जाऊ. (इफिसकर ४:१७-२९; ५:१-५) हे काही प्रमाणात देवाच्या आत्म्याला खिन्न करण्यासारखेच आहे; नक्कीच आपण असे करू इच्छित नाही. खरे तर, आपल्यापैकी कोणीही यहोवाच्या वचनातील मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू लागल्यास हळूहळू ही प्रवृत्ती आपल्यात बळावत जाऊन आपण जाणूनबुजून पाप करण्याची शक्यता आहे. यामुळे देवाचा आशीर्वाद आपल्यावर राहणार नाही. (इब्री लोकांस ६:४-६) कदाचित आपण सध्या पाप करत नसू, पण कदाचित आपण त्या दिशेने वाटचाल करत असू. सतत आत्म्याच्या मार्गदर्शनाविरुद्ध गेल्यामुळे आपण आत्म्याला खिन्न करतो. तसेच पवित्र आत्मा देणाऱ्या यहोवा देवाचाही विरोध करतो व त्यालाही खिन्न करतो. पण देवावर आपले प्रेम असल्यामुळे आपल्या हातून कधीही असे न घडण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. उलट, आपण आत्म्याला खिन्न करू नये आणि आत्म्याचे सदोदीत चिंतन करण्याद्वारे यहोवाच्या पवित्र नावाला गौरव आणावे म्हणून नेहमी त्याच्या मदतीकरता प्रार्थना केली पाहिजे.
सदोदीत आत्म्याचे चिंतन करत राहा
१७. आपण कोणकोणती आध्यात्मिक ध्येये डोळ्यापुढे ठेवू शकतो आणि असे करणे सूज्ञपणाचे का ठरेल?
१७ आत्म्याचे चिंतन करत राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे आध्यात्मिक ध्येये ठेवून ती मिळवण्याचा प्रयत्न करणे. सर्वांच्या आध्यात्मिक गरजा आणि परिस्थिती वेगवेगळी आहे, तेव्हा आपली ध्येये देखील वेगवेगळी असू शकतात. उदाहरणार्थ, बायबल व बायबल-आधारित प्रकाशनांचा अभ्यास अधिक नियमितपणे करणे, प्रचार कार्यात अधिक सहभाग घेणे, सेवेचा एखादा खास विशेषाधिकार मिळवण्याचा प्रयत्न करणे जसे की पूर्ण वेळची पायनियर सेवा, बेथेल सेवा किंवा मिशनरी कार्य. अशी ध्येये डोळ्यापुढे ठेवल्यामुळे आपले विचार नेहमी आध्यात्मिक गोष्टींवर केंद्रित राहतील आणि यामुळे आपल्याला देहस्वभावाच्या दुर्बलतेवर मात करण्यास मदत मिळेल. तसेच, या जगातील भौतिकवादी ध्येयांपासून आणि बायबलच्या विरोधात असलेल्या वासनांपासून दूर राहायला देखील मदत मिळेल. असे करणे निश्चितच सूज्ञपणाचे ठरेल कारण येशूने म्हटले होते: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ति साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करितात, आणि चोर घर फोडून चोरी करितात; तर स्वर्गांत आपल्यासाठी संपत्ति साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीहि करीत नाहीत; कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनहि लागेल.”—मत्तय ६:१९-२१.
१८. या शेवटल्या काळात आत्म्याचे चिंतन करणे इतके महत्त्वाचे का आहे?
१८ या ‘शेवटल्या काळात’ जगिक वासनांवर मात करून आत्म्याचे चिंतन करणेच सर्वात सूज्ञपणाचे आहे. (२ तीमथ्य ३:१-५) कारण “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१५-१७) तरुणपणीच पूर्णवेळची सेवा निवडणाऱ्याचे उदाहरण घ्या. किशोरावस्थेच्या किंवा तारुण्यावस्थेच्या आव्हानात्मक काळात या तरुण ख्रिस्ती व्यक्तीला पूर्ण वेळची सेवा एका मार्गदर्शक प्रकाशाप्रमाणे ठरेल. मोह किंवा परीक्षा येतील तेव्हा, यहोवाच्या सेवेत आपल्याला कोणती ध्येये साध्य करायची आहेत याविषयी ती स्पष्टपणे विचार करू शकेल. आध्यात्मिक प्रवृत्तीची ही व्यक्ती ओळखेल की भौतिक फायद्यासाठी किंवा पापी मार्गाने मिळवलेल्या कोणत्याही सुखासाठी आपल्या आध्यात्मिक ध्येयांचा त्याग करणे योग्य नाही, उलट असे करणे मूर्खपणाचे आहे. तुम्हाला आठवत असेल, की आध्यात्मिक गोष्टींची कदर बाळगणाऱ्या मोशेने देखील ‘पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे पसंत केले.’ (इब्री लोकांस ११:२४, २५) तरुण असो वा वयस्क, आपण सर्वांनी अशाचप्रकारे अपरिपूर्ण शरीराच्या वासनांमागे लागण्याऐवजी आत्म्याचे चिंतन केले पाहिजे आणि नेहमी आध्यात्मिक गोष्टींनाच प्राधान्य दिले पाहिजे.
१९. आत्म्याचे चिंतन करत राहिल्यास आपल्याला कोणते लाभ होतील?
१९ “देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे,” पण “आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.” (रोमकर ८:६, ७) आपण आत्म्याचे चिंतन करत राहिलो तर आपल्याला शांती लाभेल. आपल्या पापी प्रवृत्तीचे आपल्या अंतःकरणांवर व विचारांवर पूर्वीप्रमाणे नियंत्रण राहणार नाही. वाईट कृत्ये करण्याच्या मोहाला आपण अधिक चांगल्याप्रकारे तोंड देऊ शकू. आणि देह व आत्मा यांच्यात होणाऱ्या संघर्षाला तोंड देण्यासाठी स्वतः यहोवा देव आपली मदत करेल.
२०. देह व आत्म्याच्या संघर्षात विजयी होणे शक्य आहे असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?
२० आत्म्याचे चिंतन करत राहिल्याने आपण जीवन व पवित्र आत्मा देणाऱ्या यहोवा देवासोबतचे आपले नाते कायम ठेवू शकतो. (स्तोत्र ३६:९; ५१:११) हे नाते तोडून टाकण्यासाठी दियाबल सैतान आणि त्याचे हस्तक आज मिळेल त्या मार्गाचा अवलंब करत आहेत. ते आपल्या विचारांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात. कारण आपण त्यांच्या दबावाला बळी पडलो तर आपोआपच देवापासून दूर जाऊ आणि शेवटी आपला नाश होईल हे त्यांना माहीत आहे. पण देह आणि आत्मा यांच्यातील संघर्षात आपण विजयी होऊ शकतो. पौलाला हा अनुभव आला कारण त्याच्या स्वतःच्या संघर्षाविषयी सांगताना तो आधी असे विचारतो: “मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?” मग तो स्वतःच या प्रश्नाचे उत्तर देतो: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.” (रोमकर ७:२१-२५) देहस्वभावाच्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी तरतूद केल्याबद्दल ख्रिस्ताद्वारे आपणही देवाचे आभार मानले पाहिजे आणि सार्वकालिक जीवनाची अद्भुत आशा डोळ्यापुढे ठेवून सदैव आत्म्याचे चिंतन केले पाहिजे.—रोमकर ६:२३.
तुम्हाला आठवते का?
• आत्म्याचे चिंतन म्हणजे काय?
• यहोवाच्या आत्म्याचा आपल्या जीवनात प्रभाव असावा म्हणून आपण काय करू शकतो?
• पापी वासनांना तोंड देण्याकरता बायबलचा अभ्यास करणे, यहोवाच्या नियमांचे पालन करणे आणि त्याला प्रार्थना करणे का महत्त्वाचे आहे हे समजावून सांगा.
• आध्यात्मिक ध्येये ठेवल्यामुळे आपल्याला जीवनाच्या मार्गावर टिकून राहण्यास कशाप्रकारे मदत मिळते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६ पानांवरील चित्र]
बायबलचा अभ्यास केल्यामुळे आपल्या आध्यात्मिकतेस धोक्यात आणणाऱ्या मोहांना आपल्याला तोंड देता येईल
[१७ पानांवरील चित्र]
पापमय वासनांवर मात करण्यासाठी प्रार्थनेत यहोवाची मदत मागणे अगदी उचित आहे
[१८ पानांवरील चित्रे]
आध्यात्मिक ध्येये ठेवल्यामुळे आत्म्याचे चिंतन करण्यास आपल्याला मदत मिळेल