व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘ज्याला बुद्धी प्राप्त होते तो मनुष्य धन्य’

‘ज्याला बुद्धी प्राप्त होते तो मनुष्य धन्य’

‘ज्याला बुद्धी प्राप्त होते तो मनुष्य धन्य’

तो एक कवी, वास्तूविशारद आणि एक राजा होता. दर महा १० अब्ज रूपयांची मिळकत असलेला हा राजा पृथ्वीवरील सर्वात धनवान राजा होता. बुद्धिमत्तेसाठीही तो सुप्रसिद्ध होता. त्याला भेटायला आलेली एक राणी त्याच्या वैभवाने प्रभावित होऊन म्हणाली: “माझ्या कानी आले ते अर्धेहि नव्हते. आपले शहाणपण व समृद्धि ह्‍यांची कीर्ति झाली आहे तीहून ती अधिक आहेत.” (१ राजे १०:४-९) प्राचीन इस्राएलच्या शलमोन राजाचे हे वैभव होते.

शलमोन राजा धन आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टींसाठी प्रसिद्ध होता. आणि त्यामुळे या दोन्हींपैकी कोणती गोष्ट आवश्‍यक आहे हे ठरवण्याची विशिष्ट क्षमता त्याच्याजवळ होती. त्याने लिहिले: “ज्याला [बुद्धी] प्राप्त होते, जो [समजबुद्धी] संपादन करितो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. [बुद्धी] मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीहि इष्ट वाटणारी वस्तु [तिच्याशी] तुल्य नाही.”—नीतिसूत्रे ३:१३-१५.

परंतु, बुद्धी कशी प्राप्त करता येईल? आणि ती धनापेक्षाही मौल्यवान का आहे? तिची काही आकर्षक वैशिष्ट्ये कोणती आहेत? शलमोनाने लिहिलेल्या बायबलमधील नीतिसूत्रे पुस्तकाच्या ८ व्या अध्यायात या प्रश्‍नांची उत्तरे फार सुरेखपणे दिली आहेत. तेथे बुद्धी एक व्यक्‍ती असून तिला बोलता-चालता येते असे दाखवले आहे. आणि बुद्धी जणू स्वतःच आपली वैशिष्ट्ये आणि मूल्य सांगत असते.

‘ती मोठ्याने ओरडत राहते’

नीतिसूत्रे पुस्तकाच्या आठव्या अध्यायाच्या सुरवातीला एक प्रश्‍न विचारला आहे ज्याचे उत्तर अभिप्रेत आहे: [बुद्धी] घोषणा करीत नाही काय? [समजबुद्धी] आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय?” * होय, बुद्धी आणि समजबुद्धी आवाज देत राहतात. त्या रात्रीच्या अंधारात टपून बसलेल्या आणि कोणा एकट्या व अननुभवी तरुणाच्या कानांत कुजबूजून त्याला आपल्या मोहजालात अडकवणाऱ्‍या अनैतिक स्त्रीसारख्या नाहीत. (नीतिसूत्रे ७:१२) ‘मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरावर, चवाठ्यांवर ती उभी असते; ती वेशीनजीक, नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडते.’ (नीतिसूत्रे ८:१-३) बुद्धीचा मोठा, खणखणीत आवाज चवाठ्यावर—मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरावर, वेशीनजीक, नगराच्या तोंडी—स्पष्टपणे ऐकू येतो. तो आवाज लोकांना सहजासहजी ऐकू येऊ शकतो आणि लोक त्याला प्रतिसाद देऊ शकतात.

देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये जिच्याविषयी सांगितले आहे ती ईश्‍वरी बुद्धी पृथ्वीवरील कोणालाही हवी असल्यास त्याला ती मिळू शकत नाही असे म्हणता येईल का? द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणते, “बायबल हे इतिहासातले सर्वात जास्त वाचक वर्ग असलेले पुस्तक आहे.” त्यात पुढे असे म्हटले आहे: “इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा बायबलच्याच सर्वात जास्त प्रती वितरित करण्यात आल्या आहेत. तसेच, इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा बायबलचे सर्वात जास्त वेळा आणि सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.” संपूर्ण बायबल किंवा त्याचे काही भाग २,१०० हून अधिक भाषांमध्ये आणि पोटभाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे, ९० टक्क्यांहून अधिक लोकांकडे आपल्या स्वतःच्या भाषेत देवाच्या वचनाचा काही भाग तरी उपलब्ध आहे.

यहोवाचे साक्षीदार सगळीकडे जाऊन बायबलमधील संदेश सांगतात. २३५ देशांमध्ये, ते देव राज्याच्या सुवार्तेची सक्रियपणे घोषणा करत आहेत आणि देवाच्या वचनातील सत्य लोकांना शिकवत आहेत. त्यांची बायबलवर आधारित असलेली प्रकाशने अर्थात टेहळणी बुरूज (ज्याचे १४० भाषांमध्ये प्रकाशन होते) आणि सावध राहा! (जे ८३ भाषांमध्ये छापले जाते) मासिकांचे प्रत्येकी दोन कोटी प्रतींपेक्षा जास्त वितरण आहे. बुद्धी निश्‍चितच चवाठ्यावर मोठ्याने ओरडत आहे!

“मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे”

व्यक्‍तीरूपातील बुद्धी बोलू लागते; ती म्हणते: “मानवहो, मी तुम्हाला हाका मारीत आहे; मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे. अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या; मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा.”नीतिसूत्रे ८:४, ५.

बुद्धीची ही हाक विश्‍वव्यापी आहे. तिचे निमंत्रण सर्व मानवजातीकरता आहे. भोळ्यांनाही चातुर्य किंवा समंजसपणा आणि मूर्खांना सुबुद्धी प्राप्त करण्यास बोलावले जात आहे. यहोवाचे साक्षीदार असा विश्‍वास करतात की, बायबल हे सर्व लोकांकरता आहे. म्हणून सर्वांनी त्याचे परीक्षण करून त्यातील बुद्धीचे बोल जाणून घ्यावेत असे उत्तेजन ते प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करतात.

“माझे तोंड सत्य बोलते”

बुद्धी पुढे अशी विनवणी करते: “ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. माझे तोंड सत्य बोलते; माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यांत काही वाकडे व विपरीत नाही.” होय बुद्धीची शिकवण उत्तम, सरळ, सत्य आणि न्यायी आहे. त्यामध्ये वाकडे किंवा विपरीत असे काहीच नाही. “ज्याला समजूत आहे त्याला ती सर्व उघड आहेत; ती ज्ञान प्राप्त झालेल्यांस सरळ आहेत.”नीतिसूत्रे ८:६-९.

म्हणूनच बुद्धी असे आर्जवते: “रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या; उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या.” या विनंतीत तथ्य आहे “कारण मोत्यांपेक्षा [बुद्धी] उत्तम आहे; सर्व इष्ट वाटणाऱ्‍या वस्तु त्याच्याशी तुल्य नाहीत.” (नीतिसूत्रे ८:१०, ११) पण का? सर्व मौल्यवान वस्तूंपेक्षा बुद्धी सर्वात बहुमोल का आहे?

‘माझे फळ सोन्यापेक्षा उत्तम आहे’

बुद्धीकडे कान देणाऱ्‍यांना मिळणारी बक्षीसे सोने, रुपे किंवा मोत्यांपेक्षा बहुमोल आहेत. ही बक्षीसे कोणती आहेत त्याविषयी बुद्धी म्हणते: “मी [जी बुद्धी ती] माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे; आणि विद्या व [विचारशक्‍ती] ही मी प्राप्त करून घेतली आहेत. परमेश्‍वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग, व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करिते.”नीतिसूत्रे ८:१२, १३.

बुद्धी असणाऱ्‍या व्यक्‍तीला चातुर्य आणि विचारशक्‍ती प्राप्त होते. ईश्‍वरी बुद्धी असणाऱ्‍या व्यक्‍तीला देवाबद्दल श्रद्धा आणि आदरयुक्‍त भीती देखील असते कारण “परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.” (नीतिसूत्रे ९:१०) त्यामुळे ज्या गोष्टींचा परमेश्‍वराला वीट आहे त्यांचा तिलाही वीट येतो. मगरूरपणा, गर्विष्ठपणा, अनैतिक वर्तन आणि उद्धट भाषा त्या व्यक्‍तीत मुळीच दिसून येत नाही. वाईट गोष्टींचा तिला वीट असल्यामुळे शक्‍ती किंवा सत्तेचा दुरुपयोग करण्यापासून तिचे संरक्षण होते. तेव्हा, ख्रिस्ती मंडळीत जबाबदार पदावर असलेल्या बांधवांनी तसेच कुटुंब प्रमुखांनी बुद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे आहे!

बुद्धी पुढे म्हणते, “मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत; मी सुज्ञतामय आहे; मला सामर्थ्य आहे. माझ्या साहाय्याने राजे राज्य करितात. अधिपति न्याय ठरवितात. माझ्या साहाय्याने अधिपति, सरदार, व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश अधिकार चालवितात.” (नीतिसूत्रे ८:१४-१६) अंतर्ज्ञान, समजबुद्धी आणि सामर्थ्य ही देखील बुद्धीची फळे आहेत; शासक, अधिपती आणि सरदार यांच्यात हे गुण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अधिकाऱ्‍यांजवळ आणि इतरांना सल्ला देणाऱ्‍यांजवळ बुद्धी असणे फार आवश्‍यक आहे.

खरी बुद्धी सर्वांसाठी उपलब्ध आहे, पण सगळ्यांनाच ती मिळत नाही. काहींकडे ती चालून गेली तरी ते तिला झिडकारतात किंवा टाळतात. बुद्धी म्हणते, “मजवर जे प्रीति करितात त्यांजवर मी प्रीति करिते; जे मला परिश्रमाने शोधितात त्यांस मी सापडते.” (नीतिसूत्रे ८:१७) जे खरोखर बुद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच ती प्राप्त होते.

बुद्धीचे मार्ग न्यायी आणि धर्मी आहेत. तिचा शोध करणाऱ्‍यांना ती प्रतिफळ देते. बुद्धी म्हणते: “संपत्ति व मान, टिकणारे धन व न्याय, ही माझ्या हाती आहेत. माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा उत्तम आहे; माझी प्राप्ति उत्कृष्ट रुप्यापेक्षा उत्तम आहे. मी नीतिमार्गाने, न्यायाच्या वाटांनी चालते; मजवर प्रीति करणाऱ्‍यांस मी संपत्ति प्राप्त करून देते, त्यांची भांडारे भरिते.”नीतिसूत्रे ८:१८-२१.

समंजसपणा, विचारशक्‍ती, नम्रता, अंतर्ज्ञान, व्यावहारिक बुद्धी आणि समज या उत्कृष्ट गुणांसोबत संपत्ती आणि सन्मान हे देखील बुद्धीचे दान आहेत. बुद्धिमान व्यक्‍ती प्रामाणिकपणे संपत्ती मिळवू शकते आणि आध्यात्मिकरित्याही तिची वृद्धी होते. (३ योहान २) शिवाय, बुद्धीमुळे एका व्यक्‍तीला सन्मान प्राप्त होतो. तसेच, जे काही मिळते त्यात ती समाधानी असते, तिला मनःशांती प्राप्त होते आणि देवासमोर तिचा शुद्ध विवेक असतो. होय, बुद्धी प्राप्त झालेली व्यक्‍ती धन्य आहे. बुद्धीचे फळ शुद्ध केलेल्या सोन्यापेक्षा आणि उत्तम चांदीपेक्षा श्रेष्ठ आहे.

आज आपण भौतिक जगात राहत असल्यामुळे आपल्याकरता हा सल्ला किती समयोचित आहे! आज कोणत्याही मार्गाने आणि कसेही करून धन मिळवण्यावर जास्त जोर दिला जातो. बुद्धीचे मूल्य आपण कधीही विसरू नये किंवा अधर्माने धन मिळवण्याचा प्रयत्न करू नये. केवळ धन मिळवण्याच्या धुंदीत बुद्धी बहाल करणाऱ्‍या तरतुदींकडे अर्थात आपल्या ख्रिस्ती सभा, बायबलचा व्यक्‍तिगत अभ्यास आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ मिळणारी प्रकाशने यांकडे दुर्लक्ष करू नये.—मत्तय २४:४५-४७.

‘अनादिकाली माझी स्थापना झाली’

नीतिसूत्राच्या ८ व्या अध्यायात, बुद्धीला व्यक्‍तीरूप देण्यात आले आहे ते केवळ अमूर्त गुणांची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी नव्हे. ते यहोवाच्या सर्वात महत्त्वाच्या सृष्टीलाही सूचित करते. बुद्धी म्हणते: “परमेश्‍वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यांतील पहिले कृत्य, असे मला पैदा केले. अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, डोंगरांपूर्वी, मला निर्माण केले; त्या वेळापर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूलिसंचय ही निर्माण केली नव्हती.”नीतिसूत्रे ८:२२-२६.

व्यक्‍तीरूपातील बुद्धीचे वरील वर्णन शास्त्रवचनांमध्ये ‘शब्दाविषयी’ सांगितलेल्या वर्णनाशी किती चांगल्याप्रकारे जुळते! प्रेषित योहानाने लिहिले, “प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता आणि शब्द एक देव होता.” (योहान १:१, NW) व्यक्‍तीरूपातील बुद्धी मानवपूर्व अस्तित्वातील देवाच्या पुत्राला अर्थात येशू ख्रिस्ताला लाक्षणिकरित्या सूचित करते. *

येशू ख्रिस्त, “सर्व उत्पतीत ज्येष्ठ आहे; कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्‍य व अदृश्‍य असलेले . . . जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले.” (कलस्सैकर १:१५, १६) व्यक्‍तीरूपातील बुद्धी पुढे म्हणते: “त्याने [यहोवाने] आकाश स्थापिले तेव्हा मी होते; जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरविली; जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले; जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली; जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखिले; तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते; मी त्याला नित्य आनंददायी होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे; त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी; मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे.” (नीतिसूत्रे ८:२७-३१) यहोवाचा ज्येष्ठ पुत्र आपल्या पित्यासोबत होता; तो आकाश आणि पृथ्वीच्या अनुपम निर्माणकर्त्यासोबत कार्य करण्यात तरबेज होता. यहोवा देवाने पहिल्या मानवाला निर्माण केले तेव्हा त्याचा पुत्र देखील कुशल कारागीर या नात्याने त्याच्यासोबत होता. (उत्पत्ति १:२६) म्हणूनच, देवाच्या पुत्राला मानवजातीबद्दल काळजी आहे; इतकेच नव्हे तर त्याला मानवजात प्रिय देखील आहे.

‘जो माझे ऐकतो तो धन्य’

व्यक्‍तीरूपातील बुद्धी या नात्याने देवाचा पुत्र म्हणतो: “आता माझ्या मुलांनो, माझे ऐका; जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत; बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका. जो माझ्या दारांशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते, आणि त्याला परमेश्‍वराची दया प्राप्त होते; परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जिवाची हानि करून घेतो; जे माझा द्वेष करितात त्या सर्वांना मरण प्रिय आहे.”नीतिसूत्रे ८:३२-३६.

येशू ख्रिस्त देवाच्या बुद्धीचे मूर्त स्वरूप आहे. “त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधि गुप्त आहेत.” (कलस्सैकर २:३) तर मग, आपण त्याचे लक्ष देऊन ऐकू या आणि त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालू या. (१ पेत्र २:२१) त्याला अव्हेरून आपण आपल्याच पायावर कुऱ्‍हाड मारून घेऊ आणि स्वतःवर मरण ओढवून घेऊ कारण “तारण दुसऱ्‍या कोणाकडून नाही.” (प्रेषितांची कृत्ये ४:१२) आपल्या तारणासाठी पाठवलेला म्हणून आपण येशूला स्वीकारू या. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) मग, ‘जीवन प्राप्त झाल्याचा आणि यहोवाची दया प्राप्त झाल्याचा’ आनंद आपल्याला मिळेल.

[तळटीपा]

^ “बुद्धी” यासाठी असलेला इब्री शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे काही भाषांतरांमध्ये बुद्धीसाठी वापरलेले सर्वनाम स्त्रीलिंगी आहेत.

^ “बुद्धी” यासाठी असलेला इब्री शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे देवाच्या पुत्राला सूचित करण्यासाठी तिचा वापर करणे चुकीचे ठरत नाही. “देव प्रीति आहे” या वाक्यांशातील “प्रीति” यासाठी असलेला ग्रीक शब्दसुद्धा स्त्रीलिंगीच आहे. (१ योहान ४:८) तरीही, देवाला सूचित करण्यासाठी तो वापरला जातो.

[२६ पानांवरील चित्रे]

जबाबदार पदांवर असलेल्या लोकांसाठी बुद्धी फार आवश्‍यक आहे

[२७ पानांवरील चित्रे]

बुद्धी बहाल करणाऱ्‍या तरतुदींकडे दुर्लक्ष करू नका