व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज्ञाधारकपणा महत्त्वाचे बाळकडू?

आज्ञाधारकपणा महत्त्वाचे बाळकडू?

आज्ञाधारकपणा महत्त्वाचे बाळकडू?

“पालकांना निव्वळ आपल्या आज्ञेत राहणारी लहान मुले नकोत, तर आपल्या मुलांना स्वतंत्र व्यक्‍तिमत्त्व असावे असे त्यांना वाटते.” एका बातमीपत्रामध्ये हा मथळा छापून आला होता. न्यूझीलंड येथे घेतलेल्या सर्वेक्षणाच्या परिणामांवर हे वृत्त देण्यात आले होते; त्या सर्वेक्षणात असे निष्पन्‍न झाले की, “मुलांना घरी आज्ञाधारकपणाचे बाळकडू दिले पाहिजे असे [केवळ] २२ टक्के लोकांना वाटत होते.” त्या सर्वेक्षणातून असेही दिसून आले की, शिष्टाचार, स्वावलंबीपणा आणि जबाबदारपणा हे शिकवणे जास्त महत्त्वाचे आहे असे आजकालच्या पालकांचे मत आहे.

आजच्या या युगात जेथे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यावर आणि आत्म-केंद्रीत असण्यावर जास्त जोर दिला जातो तेथे बहुतेक लोक आज्ञाधारकपणाला महत्त्व देत नाहीत आणि मुलांना तो शिकवला पाहिजे असा विचार करत नाहीत हे इतके आश्‍चर्याचे नाही. पूर्वीच्या काळात मुलांना आज्ञाधारकपणा शिकवण्याची गरज होती, पण आता त्याची काही गरज नाही असे समजणे योग्य आहे का? की, मुलांसाठी तो महत्त्वाचा धडा आहे, आणि त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो? परंतु, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुटुंब व्यवस्थेचा संस्थापक यहोवा देव याला मुलांनी पालकांच्या आज्ञेत राहण्याविषयी काय वाटते आणि अशा आज्ञाधारकपणाचे काय फायदे आहेत?—प्रेषितांची कृत्ये १७:२८; इफिसकर ३:१४, १५.

“हे योग्य आहे”

पहिल्या शतकातील इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला प्रेषित पौलाने लिहिले: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.” (इफिसकर ६:१) यावरून दिसून येते की, मुलांनी पालकांना आज्ञाधारक राहण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे ते यहोवाच्या आदर्शांप्रमाणे आहे. पौलाने म्हटल्याप्रमाणे “ते योग्य आहे.”

याच्या एकवाक्यतेत, पालकांनी प्रेमाने दिलेली शिस्त दागिन्यासारखी आहे अर्थात ‘शिराला भूषण, व गळ्याला हार अशी आहेत’ व “प्रभूला संतोषकारक आहे” असे देवाचे वचन म्हणते. (नीतिसूत्रे १:८, ९; कलस्सैकर ३:२०) याच्या अगदी उलट, पालकांची अवज्ञा करणाऱ्‍यांना देव नापसंत करतो.—रोमकर १:३०, ३२.

“तुझे कल्याण व्हावे”

पौलाने आज्ञाधारकतेचा आणखी एक फायदा दाखवून दिला; त्याने लिहिले: “‘आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख, ह्‍यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.’ अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.” (इफिसकर ६:२, ३; निर्गम २०:१२) पालकांची आज्ञा मानल्याने आपले कल्याण कसे होऊ शकेल?

पालकांचे वय, त्यांचा अनुभव यामुळे त्यांना जास्त माहिती आहे हे खरे नाही का? कदाचित त्यांना कम्प्युटर किंवा शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या इतर विषयांबद्दल फारशी माहिती नसेल पण जीवनाविषयी आणि जीवनातल्या समस्यांचा सामना करण्याविषयी त्यांना बरीच माहिती आहे. परंतु, प्रौढ झाल्यावर संतुलित विचार करण्याची जी क्षमता प्राप्त होते ती तरुण लोकांमध्ये नसते. त्यामुळे, ते सहसा अविचारीपणाने निर्णय घेतात, वाईट गोष्टी करण्यासाठी सोबत्यांच्या दबावाला बळी पडतात आणि कधीकधी स्वतःच्याच पायावर कुऱ्‍हाड मारून घेतात. म्हणूनच बायबल म्हणते: “बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते.”—नीतिसूत्रे २२:१५.

आज्ञाधारक राहण्याचे फायदे केवळ पालक आणि मुलांमधील संबंधांपुरतेच सीमित नाहीत. मानवी समाज सुरळीत चालण्यासाठी आणि फलदायी असण्यासाठी सहकार्याची गरज असते आणि त्यासाठी काही प्रमाणात आज्ञाधारकतेची आवश्‍यकता आहे. उदाहरणार्थ, वैवाहिक जीवनात नेहमी स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आणि इतरांचे हक्क किंवा त्यांच्या भावनांबद्दल कदर न दाखवण्याऐवजी नमते घेण्याची तयारी असली तरच शांती, सुसंगतता आणि आनंद असू शकतो. कोणताही व्यापार किंवा धंदा यशस्वी होण्यासाठी कामगारांनी अधीनता दाखवण्याची गरज आहे. सरकारी कायदे-कानून पाळल्याने फक्‍त शिक्षा टळत नाही तर काही प्रमाणात संरक्षण आणि बचावही मिळतो.—रोमकर १३:१-७; इफिसकर ५:२१-२५; ६:५-८.

अधिकाराला न जुमानणारे तरुण लोक सहसा समाजकंटक बनतात. त्या उलट, बालपणापासून मिळालेले आज्ञाधारकपणाचे बाळकडू संपूर्ण जीवनभर फायदेकारक ठरू शकते. त्यामुळे हे बालपणीच शिकणे किती फायदेकारक आहे!

आज्ञाधारकपणाचे मोठे प्रतिफळ

आज्ञाधारकपणामुळे कुटुंबात आनंदी वातावरण राहते आणि इतर दीर्घकालीन फायदेही होतात. पण त्याच आज्ञाधारकपणावर सर्वात महत्त्वपूर्ण नातेसंबंधाचा अर्थात निर्माणकर्ता आणि एका व्यक्‍तीमधील नातेसंबंधाचा पाया उभारला जाऊ शकतो. “जीवनाचा झरा” ज्याच्याजवळ आहे तो ‘[महान] निर्माणकर्ता’ अर्थात यहोवा देव आपली पूर्ण अधीनता मिळवण्यास पात्र आहे.—उपदेशक १२:१; स्तोत्र ३६:९.

“आज्ञा पाळणे” हा शब्द वेगवेगळ्या रूपांत बायबलमध्ये पुष्कळदा वापरण्यात आला आहे. शिवाय, देवाचे नियमशास्त्र, विधी, आज्ञा, निर्णय आणि नियम यांचे शेकडो उल्लेख आलेले आहेत आणि त्या सर्वांप्रती अधीनता दाखवण्याची गरज आहे. देवाची संमती मिळवण्याकरता त्याला आज्ञाधारकपणा दाखवणे अपेक्षित आहे हे आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवून देण्यात आले आहे. होय, यहोवासोबत नातेसंबंध जोडण्यासाठी आज्ञाधारकपणा हा एक अत्यावश्‍यक गुण आहे. (१ शमुवेल १५:२२) परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे, मानवांची स्वाभाविक प्रवृत्ती आज्ञाधारक असण्याची नाही तर अवज्ञाकारी असण्याची आहे. बायबल म्हणते, “मानवाच्या मनांतल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.” (उत्पत्ति ८:२१) त्यासाठी, आज्ञाधारकतेचा धडा केवळ बाळपणीच नव्हे तर आयुष्यभर शिकण्याची गरज आहे. असे केल्याने मोठे प्रतिफळ लाभेल.

प्रेषित पौलाने काय म्हटले ते आपण आठवू या; तो म्हणाला होता की, पालकांच्या आज्ञेत राहण्याचे दोन फायदे आहेत अर्थात “तुझे कल्याण व्हावे तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.” नीतिसूत्रे ३:१, २ येथे या अभिवचनाला पुष्टी दिली आहे: “माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण ही तुला प्राप्त होतील.” आज्ञाधारक राहणाऱ्‍यांना सध्या तर यहोवासोबत एक व्यक्‍तिगत नातेसंबंध लाभतोच पण शांतीमय नवीन जगात त्यांना सार्वकालिक जीवनाचे भव्य प्रतिफळही मिळेल.—प्रकटीकरण २१:३, ४.

[३०, ३१ पानांवरील चित्रे]

आज्ञाधारकपणामुळे कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि यहोवासोबत चांगले नातेसंबंध राहतात