व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरा ख्रिस्ती विश्‍वास प्रबल होतो!

खरा ख्रिस्ती विश्‍वास प्रबल होतो!

खरा ख्रिस्ती विश्‍वास प्रबल होतो!

“प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.”—प्रेषितांची कृत्ये १९:२०.

१. पहिल्या शतकादरम्यान झालेल्या ख्रिस्ती विश्‍वासाच्या वाढीचे वर्णन करा.

 पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रारंभिक ख्रिश्‍चनांनी ज्वलंत आवेशाने देवाचे वचन घोषित केले. त्यांचा हा आवेश दडपून टाकणे शक्यच नव्हते. एका इतिहासकाराने लिहिले: “सबंध रोमी जगात ख्रिस्ती धर्माचा अतिशय जलद गतीने प्रसार झाला. सन १०० पर्यंत भूमध्याच्या सीमेलगतच्या जवळजवळ प्रत्येक प्रांतात एक ख्रिस्ती समुदाय होता.”

२. सुवार्तेचा विरोध करण्याचा सैतानाने कशाप्रकारे प्रयत्न केला आणि हे कशाप्रकारे भाकीत करण्यात आले होते?

त्या प्रारंभिक ख्रिश्‍चनांना सुवार्ता सांगण्यापासून परावृत्त करण्यात दियाबल सैतानाला यश आले नाही. तेव्हा, सुवार्तेच्या परिणामकारक प्रचाराला दुसऱ्‍या एका मार्गाने विरोध करण्याचा त्याने प्रयत्न केला. तो मार्ग म्हणजे धर्मत्याग. असे घडेल याविषयी येशूने गहू व निदणाचा दृष्टान्त देताना भाकीत केले होते. (मत्तय १३:२४-३०, ३६-४३) प्रेषित पेत्राने देखील असा इशारा दिला होता की मंडळीतूनच खोटे शिक्षक निघतील आणि ते मंडळीत फूट पाडतील. (२ पेत्र २:१-३) त्याचप्रकारे प्रेषित पौलाने अगदी स्पष्टपणे असा इशारा दिला होता की यहोवाचा दिवस येण्याआधी धर्मत्याग येईल.—२ थेस्सलनीकाकर २:१-३.

३. प्रेषितांच्या मृत्यूनंतर काय घडले?

प्रेषितांच्या मृत्यूनंतर, सुवार्तेवर खोट्या धार्मिक शिकवणुकींचे व तत्त्वज्ञानाचे सावट पसरले. भाकीत केल्याप्रमाणे खोट्या शिक्षकांनी सत्याच्या शुद्ध संदेशाचा विपर्यास केला आणि त्यात भेसळ केली. हळूहळू खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचा लोप होऊन बनावटी ख्रिस्ती धर्मजगताचा उदय झाला. एक वेगळा पाळकवर्ग निर्माण झाला जो सामान्य माणसाच्या हातात बायबल पडू नये म्हणून प्रयत्न करू लागला. स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍यांची संख्या जरी वाढत गेली, तरी त्यांची उपासना शुद्ध नव्हती. ख्रिस्ती धर्मजगताचा भौगोलिक विस्तार झाला आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीत त्याचा बराच पगडा बसला. पण त्याच्यावर देवाचा आशीर्वाद किंवा आत्मा नव्हता.

४. देवाचा उद्देश निष्फळ करण्याचा सैतानाचा प्रयत्न व्यर्थ का ठरला?

पण यहोवाचा उद्देश निष्फळ करण्याचा सैतानाचा प्रयत्न अर्थातच व्यर्थ ठरला. धर्मत्यागाच्या आशाहीन काळोखातही काही लोकांमध्ये खरा ख्रिस्ती विश्‍वास जिवंत राहिला. बायबलच्या प्रती तयार करणाऱ्‍या नकलाकारांनी मोठे कष्ट घेऊन हे काम अत्यंत अचूकतेने केले. लोकांना बायबलचे शिक्षण देण्याचा अधिकार ज्यांनी स्वतःवर घेतला होता त्यांनी बायबलच्या शुद्ध संदेशाचा विपर्यास केला तरीसुद्धा, बायबलच्या संदेशात काहीही बदल झाला नाही. पुढच्या काही शतकांत जेरोम आणि टिन्डेल यांच्यासारख्या विद्वानांनी मोठ्या निर्भयपणे देवाच्या वचनाचे भाषांतर व वाटप केले. यामुळे लाखो लोकांना बायबलची आणि बनावटी का होईना, पण एक प्रकारच्या ख्रिस्ती विश्‍वासाची माहिती घेण्याची संधी मिळाली.

५. ‘खऱ्‍या ज्ञानाविषयी’ भविष्यवक्‍ता दानीएल याने काय भाकीत केले होते?

अशारितीने कालांतराने, दानीएल पुस्तकात भाकीत केल्याप्रमाणे ‘खऱ्‍या ज्ञानाची वृद्धी झाली.’ हे “अंतसमयात”—अर्थात आपण जगत असलेल्या या काळात घडले आहे. (दानीएल १२:४, NW) पवित्र आत्म्याने जगभरातील सत्याच्या चाहत्यांना देवाविषयीच्या व त्याच्या उद्देशांविषयीच्या अचूक ज्ञानापर्यंत पोचवले आहे. धर्मत्यागी शिकवणुकी इतक्या शतकांपासून अस्तित्वात असल्या तरी, देवाचे वचन त्यांहूनही प्रबल आहे! आज जगात सगळीकडे सुवार्ता घोषित केली जात आहे; लोकांना एका आनंददायक नव्या जगाची आशा दिली जात आहे. (स्तोत्र ३७:११) या आधुनिक काळात देवाच्या वचनाची कशी वाढ झाली आहे याविषयी आता आपण परीक्षण करू या.

आजच्या काळात वचनाची वाढ

६. बायबल विद्यार्थ्यांसमोर १९१४ सालापर्यंत कोणती सत्ये उलगडली?

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बायबलच्या सत्याने बायबल विद्यार्थ्यांच्या (आज, यहोवाचे साक्षीदार या नावाने अवगत असलेल्या) एका लहानाशा गटाला अत्यंत उत्साहित केले. १९१४ पर्यंत त्यांना बायबलचे बऱ्‍यापैकी ज्ञान मिळाले होते. देवाच्या उद्देशांविषयीच्या अद्‌भुत सत्यांचा अर्थ त्यांना उलगडत गेला. यहोवाने आपल्या पुत्राला या पृथ्वीवर पाठवून सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा करण्याद्वारे आपल्याबद्दल किती मोठे प्रेम व्यक्‍त केले आहे याची त्यांना जाणीव झाली. तसेच देवाचे नाव व त्याचे गुण किती अद्‌भुत आहेत याविषयी देखील त्यांना ज्ञान आणि समज मिळाली. तसेच “परराष्ट्रीयांची सद्दी” संपली आहे आणि यावरून देवाच्या राज्य सरकाराकरवी मानवजातीला आशीर्वाद मिळण्याचा समय जवळ आला असल्याचे सूचित होते हे देखील त्यांना समजले. (लूक २१:२४) ही किती अद्‌भुत सुवार्ता होती! ही शक्‍तिशाली सत्ये सर्वांना व जगातल्या सर्व भागांतील लोकांना सांगणे आवश्‍यक होते. शेवटी यावरच त्यांचे जीवन अवलंबून होते!

७. बायबलचे सत्य आधुनिक काळात कशाप्रकारे प्रबल ठरले आहे?

आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची संख्या अगदीच अल्प होती, पण यहोवाने त्यांना आशीर्वादित केले. आज खरा ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारणाऱ्‍यांची संख्या ६० लाख पेक्षा अधिक झाली आहे. देवाच्या वचनाची भौगोलिकरित्याही वाढ झाली आहे कारण आज यहोवाचे साक्षीदार २३५ देशांत आहेत. शिवाय, बायबल सत्य धार्मिक व इतर प्रकारच्या अडथळ्यांसमोर अधिक ताकदवान किंवा प्रबल ठरले आहे. या जागतिक प्रचार कार्यावरून अगदी स्पष्टपणे हे शाबीत होते की येशू राज्य सामर्थ्यासह उपस्थित आहे.—मत्तय २४:३, १४.

८. यहोवाच्या साक्षीदारांच्या वाढीबद्दल काहींनी कोणते उद्‌गार काढले?

ज्याप्रकारे पहिल्या शतकात ख्रिस्ती विश्‍वासाच्या अभूतपूर्व वाढीविषयी इतिहासकारांनी टिप्पणी केली होती त्याचप्रकारे या आधुनिक काळातही यहोवाच्या लोकांमध्ये दिसून येणाऱ्‍या वाढीविषयी बऱ्‍याच विद्वानांनी टिप्पणी केली आहे. अमेरिकेत दोन विद्वानांनी मिळून असे लिहिले: “मागील ७५ वर्षांत सातत्याने यहोवाच्या साक्षीदारांमध्ये विलक्षण वाढ दिसून येते . . . आणि हेसुद्धा जागतिक पातळीवर.” पूर्व आफ्रिकेच्या एका माहितीपत्रात साक्षीदारांविषयी असे म्हणण्यात आले की हा “जगातला सर्वात झपाट्याने वाढणारा आणि अत्यंत सन्मानित धर्म असून बायबल शिकवणुकींना पूर्णपणे जडून राहण्याची याची विश्‍वभरात ख्याती आहे.” युरोपातून प्रसिद्ध होणाऱ्‍या एका रूढिप्रिय कॅथलिक माहितीपत्रात “यहोवाच्या साक्षीदारांच्या असामान्य वाढीविषयी” उल्लेख होता. या वाढीत कोणत्या गोष्टींचे योगदान होते?

आज पवित्र आत्म्याचे कार्य

९. (अ) देवाचे वचन आज प्रबल ठरण्याचे एक मुख्य कारण कोणते आहे? (ब) यहोवा कशाप्रकारे लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो?

देवाचे वचन प्रबल ठरण्याचे एक मुख्य कारण म्हणजे पहिल्या शतकाप्रमाणेच आजही यहोवाचा सामर्थ्यशाली आत्मा कार्यशील आहे. येशूने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहान ६:४४) हे शब्द असे सूचित करतात की ज्यांची मनोवृत्ती योग्य आहे अशांच्या हृदयांना आर्जवून देव त्यांना कोमलपणे स्वतःकडे आकर्षित करतो. आपल्या साक्षीदारांच्या प्रचार कार्याच्या माध्यमाने यहोवा आपल्या सेवेकरता “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु”—अर्थात, पृथ्वीवरील मेंढरांसमान लोकांना काढून घेत आहे.—हाग्गय २:६, ७.

१०. कोणकोणत्या प्रकारच्या लोकांनी देवाच्या वचनाला प्रतिसाद दिला आहे?

१० पवित्र आत्म्याने देवाच्या लोकांना पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यात त्याचे वचन नेण्याचे सामर्थ्य तर दिलेच आहे पण त्यासोबत त्याने सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्तेला चांगला प्रतिसाद देण्यास प्रेरित केले आहे. खरोखर देवाच्या वचनाचा स्वीकार करणारे “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे” यांच्यातून आले आहेत. (प्रकटीकरण ५:९; ७:९, १०) श्रीमंत व गरीब, उच्च शिक्षण असलेले आणि निरक्षर अशा सर्व प्रकारच्या लोकांचा यांत समावेश आहे. काहींनी युद्ध सुरू असताना, क्रूरपणे छळ होत असताना देवाचे वचन स्वीकारले आहे तर काहींनी शांती व समृद्धीच्या परिस्थितीत सत्याचा स्वीकार केला आहे. सर्व प्रकारच्या सरकारांखाली राहणाऱ्‍या, सर्व संस्कृतींच्या, छळ छावण्यांपासून राजमहालांपर्यंत सर्व प्रकारच्या स्त्रीपुरुषांनी सुवार्तेला चांगला प्रतिसाद दाखवला आहे.

११. पवित्र आत्मा कशाप्रकारे देवाच्या लोकांच्या जीवनात कार्यशील आहे आणि आज कोणता भेद स्पष्टपणे दिसून येतो?

११ देवाचे लोक इतक्या वेगवेगळ्या पार्श्‍वभूमींचे आहेत की लोकांना आश्‍चर्य वाटेल, पण ते सर्व एकोप्याने राहतात. (स्तोत्र १३३:१-३) देवाची सेवा करणाऱ्‍यांच्या जीवनात पवित्र आत्मा कार्यशील आहे याचा हा आणखी एक पुरावा आहे. त्याचा आत्मा हा एक सामर्थ्यशाली प्रभाव असून तो चांगले करण्याची प्रेरणा देतो. तो यहोवाच्या सेवकांना प्रीति, आनंद, शांती, ममता आणि यांसारखे इतर चांगले गुण विकसित करण्यास मदत करतो. (गलतीकर ५:२२, २३) आज आपल्याला भविष्यवक्‍ता मलाखीने फार पूर्वी केलेले एक भाकीत पूर्ण होताना स्पष्टपणे दिसत आहे. “धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.”—मलाखी ३:१८.

देवाचे वचन आवेशी सेवकांत प्रबल आहे

१२. सुवार्ता प्रचाराच्या कार्याविषयी यहोवाच्या साक्षीदारांची कशी मनोवृत्ती आहे, आणि त्यांच्या प्रचार कार्याला कशाप्रकारची प्रतिक्रिया मिळण्याची ते अपेक्षा करतात?

१२ यहोवाचे साक्षीदार चर्चमध्ये बसून केवळ उपदेश ऐकणाऱ्‍यांप्रमाणे नाहीत. ते सुवार्ता प्रचाराच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतात. आरंभीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणे ते देवाची इच्छा करण्यासाठी स्वेच्छेने स्वतःला सादर करतात. ते देवाचे सहकर्मी आहेत आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून इतरांनाही यहोवाची सेवा करण्याकरता एकत्रित करत आहेत. असे करण्याद्वारे ते विश्‍वास न ठेवणाऱ्‍या मानवांप्रती यहोवाची दया व प्रीती व्यक्‍त करतात. त्यांच्या कार्याला थंड प्रतिसाद मिळतो, त्यांची थट्टा केली जाते आणि त्यांना छळले जाते तरीसुद्धा ते असे करत राहतात. सुवार्तेबद्दल लोकांची प्रतिक्रिया वेगवेगळ्या प्रकारची असेल याविषयी येशूने आधीच आपल्या अनुयायांची मानसिक तयारी केली होती. त्याने म्हटले: “कोणताही गुलाम आपल्या धन्यापेक्षा श्रेष्ठ नसतो! त्यांनी माझा छळ केला आहे; ते तुमचाही छळ करतील! त्यांनी माझा शब्द राखला तर ते तुमचाही राखतील!”—योहान १५:२०, मराठी कॉमन लँग्वेज.

१३. ख्रिस्ती धर्मजगतात नसलेल्या कोणत्या गोष्टी यहोवाच्या साक्षीदारांत विपुलतेने आढळतात?

१३ आज यहोवाच्या साक्षीदारांत आणि पहिल्या शतकातील खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचा स्वीकार करणाऱ्‍यांत किती साम्य आहे हे पाहून आपण थक्क झाल्याशिवाय राहात नाही. आणि तितकाच फरक यहोवाच्या साक्षीदारांत आणि ख्रिस्ती धर्मजगतात दिसून येतो. सुवार्ता प्रसाराच्या संदर्भात प्रारंभिक ख्रिश्‍चनांच्या आवेशाविषयी लिहिल्यानंतर एका विद्वानाने खेदाने असे म्हटले: “चर्च सदस्यांच्या सध्याच्या जीवनशैलीत जोपर्यंत बदल घडून येत नाही, सुवार्ताप्रसाराची जबाबदारी प्रत्येक बाप्तिस्मा झालेल्या ख्रिश्‍चनावर आहे अशी जोपर्यंत जाणीव होत नाही आणि विश्‍वासी लोकांचे जीवन अविश्‍वासी लोकांपेक्षा चांगले आहे हे जोपर्यंत दिसून येत नाही तोपर्यंत फारशी प्रगती होणे शक्य नाही.” ख्रिस्ती धर्मजगतात ज्या गोष्टी नाहीत त्याच नेमक्या यहोवाच्या साक्षीदारांत विपुलतेने आढळतात! त्यांचा विश्‍वास जिवंत, खरा आणि बायबलच्या सत्यावर आधारित आहे आणि जे कोणी ऐकू इच्छितात त्यांस आपल्या विश्‍वासाविषयी सांगितल्याशिवाय त्यांना राहवत नाही.—१ तीमथ्य २:३, ४.

१४. येशूने आपल्या सेवाकार्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले आणि त्याचे शिष्य आज कशी मनोवृत्ती दाखवतात?

१४ येशूने आपल्या सेवाकार्याकडे गांभिर्याने पाहिले, त्याला जीवनात प्राधान्य दिले. त्याने पिलाताला म्हटले: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) देवाच्या लोकांच्या भावना येशूसारख्याच आहेत. बायबलचे सत्य त्यांच्या अंतःकरणात रुजले आहे आणि जितक्यांना शक्य होईल तितक्यांना याविषयी सांगण्याचे मार्ग शोधून काढण्याचा ते सतत प्रयत्न करतात. कधी कधी अतिशय कल्पकतेने हे मार्ग ते शोधून काढतात.

१५. काहींनी कशाप्रकारे कल्पक युक्‍त्‌या काढून सुवार्तेची घोषणा केली आहे?

१५ दक्षिण आफ्रिकेतील एका देशात साक्षीदार ॲमेझॉन नदीला मिळणाऱ्‍या एक लहान नदीतून प्रवास करून किनाऱ्‍यांवर राहणाऱ्‍या लोकांना सत्याचा संदेश सांगायला जायचे. पण १९९५ साली अंतर्गत युद्धामुळे नदीतून सामान्य लोकांना जाण्यायेण्यास बंदी घालण्यात आली. पण सत्य जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्‍यांपर्यंत बायबलची प्रकाशने कशीही करून पोचवायची असे साक्षीदारांनी ठरवले होते. त्यांनी बायबलचा संदेश नदीतून तरंगत पाठवण्याची युक्‍ती काढली. त्यांनी पत्रे लिहून टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांसोबत ही पत्रे प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये घातली. मग त्यांनी या बाटल्या नदीत फेकून दिल्या. साडेचार वर्षांपर्यंत ते असे करत राहिले; यानंतर नदीतून येण्याजाण्याचा मार्ग पुन्हा सर्व लोकांसाठी खुला करण्यात आला. नदीच्या किनाऱ्‍यांजवळ राहणाऱ्‍या कित्येक लोकांनी प्रकाशने पाठवण्याबद्दल साक्षीदारांचे आभार मानले. बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या एका स्त्रीने बांधवांना अक्षरशः बिलगून म्हटले: “मला वाटत होते की मला पुन्हा कधीही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण बाटल्यांमधून नियतकालिके येऊ लागली तेव्हा मला कळले की तुम्ही मला विसरलेला नाहीत!” नदीच्या किनाऱ्‍यांवर राहणाऱ्‍या इतरांनीही सांगितले की त्यांनी वारंवार ही नियतकालिके घेऊन वाचली. काही वसाहतींत तर चक्क “पोस्ट ऑफिस” होते. या ठिकाणी सगळ्या बाटल्या येऊन जमा व्हायच्या. आस्थेवाईक लोक सहसा इथेच वेळोवेळी येऊन नदीतून काही “टपाल” आले का हे पाहून जायचे.

१६. आपण आपला वेळ आणि शक्‍ती खर्च करण्यास तयार असतो तेव्हा शिष्य बनवण्याच्या संधी कशाप्रकारे चालून येतात?

१६ सुवार्तेचे प्रचार कार्य यहोवा देवाच्या आणि त्याच्या शक्‍तिशाली देवदूतांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठिंब्याने होत आहे. (प्रकटीकरण १४:६) हे कार्य करण्यासाठी आपण आपला वेळ आणि शक्‍ती खर्च करण्यास तयार असतो तेव्हा शिष्य बनवण्याच्या अनपेक्षित संधी कधीकधी चालून येतात. केनिया येथील नायरोबी शहरात दोन ख्रिस्ती स्त्रियांनी क्षेत्र सेवेत त्यांना नेमून दिलेली घरे नुकतीच संपवली होती. तेवढ्यात एक तरुणी त्यांच्याजवळ आली आणि अतिशय उत्सुकतेने त्यांना म्हणाली: “मी तुमच्यासारख्या लोकांची भेट व्हावी अशी केव्हापासून प्रार्थना करत होते.” तिने साक्षीदारांना चर्चा करण्यासाठी आपल्या घरी येण्याची कळकळीने विनंती केली; त्याच दिवशी तिच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. ती स्त्री इतक्या उत्सुकतेने त्या दोन ख्रिस्ती बहिणींकडे येऊन असे का म्हणाली? कारण दोनच आठवड्यांआधी तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाला होता. आणि एका लहान मुलाच्या हातात तिला “मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?” ही पत्रिका दिसली. ती पत्रिका वाचण्याची तिला खूपच इच्छा होती. पण तिने त्या मुलाला ती मागितली तेव्हा त्याने तिला ती दिली नाही. पण त्याला ज्यांनी ती पत्रिका दिली होती त्या साक्षीदारांकडे त्याने बोट दाखवले. या स्त्रीने भराभर आध्यात्मिक प्रगती केली. आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन करण्यास तिला यामुळे खूप मदत मिळाली.

देवाची प्रीती निश्‍चितच प्रबल ठरेल

१७-१९. खंडणीची तरतूद करण्याद्वारे यहोवाने मानवजातीवर कशाप्रकारे प्रेम दाखवले?

१७ सर्व जगात होत असलेल्या देवाच्या वचनाच्या वाढीचा ख्रिस्त येशूच्या खंडणी बलिदानाशी जवळून संबंध आहे. खंडणीप्रमाणेच प्रचार कार्य देखील सबंध पृथ्वीवरील लोकांबद्दल यहोवाला असलेल्या प्रीतीचा पुरावा आहे. प्रेषित योहानाने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.

१८ यहोवाने खंडणीची तरतूद करण्याद्वारे किती अद्‌भुतरितीने मानवांकरता आपली प्रीती व्यक्‍त केली याचा विचार करा. अगणित काळापासून देव व त्याच्या “सृष्टीचे आदिकरण” असलेला त्याचा परमप्रिय एकुलता एक पुत्र यांच्यात अतिशय घनिष्ट नातेसंबंध होता. (प्रकटीकरण ३:१४) येशूचे त्याच्या पित्यावर अतोनात प्रेम आहे आणि यहोवाने येशूवर ‘जगाच्या स्थापनेपूर्वी प्रीति केली.’ (योहान १४:३१; १७:२४) मानवांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला मृत्यूच्या स्वाधीन होऊ दिले. मानवजातीकरता देवाने दाखवलेल्या प्रेमाबद्दल विचार केल्यास आपण हतबद्ध होतो!

१९ योहान ३:१७ म्हणते: “देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले.” यहोवाने आपल्या पुत्राला मानवजातीचा न्यायनिवाडा करण्यासाठी किंवा त्यांना दोषी ठरवण्यासाठी नाही तर मुक्‍तता देण्याची प्रेमळ कामगिरी बजावण्यासाठी पाठवले. हे पेत्राच्या शब्दांच्या अनुरूप आहे: “कोणाचा नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.”—२ पेत्र ३:९.

२०. तारणाचा सुवार्तेच्या घोषणेशी कशाप्रकारे संबंध आहे?

२० स्वतः फार मोठी किंमत मोजून यहोवा देवाने तारणाकरता कायदेशीर आधार पुरवला आहे; पण या तरतुदीचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यांवाचून ते कसे ऐकतील?”—रोमकर १०:१३, १४.

२१. प्रचार कार्यात सहभागी होण्याच्या संधीविषयी आपला कसा दृष्टिकोन असावा?

२१ जागतिक प्रचाराच्या व शिक्षणाच्या कार्यात सहभागी होणे हा आपल्याकरता किती मोठा सन्मान आहे! हे काम अर्थातच सोपे नाही, पण यहोवा जेव्हा आपल्या लोकांना विश्‍वासूपणे सत्याच्या मार्गावर चालताना आणि इतरांना सुवार्ता सांगताना पाहत असेल तेव्हा त्याला किती आनंद होत असेल! म्हणूनच, तुमची परिस्थिती कशीही असो, देवाच्या आत्म्याच्या आणि तुमच्या हृदयातील प्रीतीच्या प्रेरणेने या कार्यात सहभागी होण्याचे कधीही सोडू नका. आणि आठवणीत असू द्या की आज जगभरात जे काही कार्य साध्य केले जात आहे ते याच गोष्टीचा खात्रीलायक पुरावा आहे की यहोवा देव लवकरच “नवे आकाश व नवी पृथ्वी” निर्माण करण्याचे त्याचे अभिवचन पूर्ण करेल.—२ पेत्र ३:१३.

तुम्हाला आठवते का?

• धर्मत्यागामुळे सुवार्तेची घोषणा करणाऱ्‍यांचे कार्य का बंद करता आले नाही?

• देवाचे वचन आपल्या या काळात कशाप्रकारे प्रबल ठरले आहे?

• आज देवाचा आत्मा कशाप्रकारे कार्यशील आहे?

• खंडणीचा सुवार्तेच्या घोषणेशी कशाप्रकारे संबंध आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील आलेख/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

विसाव्या शतकात राज्य प्रचारकांच्या संख्येत झालेली वाढ

प्रचारकांची सरासरी संख्या (लाखात)

६०

५५

५०

४५

४०

३५

३०

२५

२०

१५

१०

१९०० १९१० १९२० १९३० १९४० १९५० १९६० १९७० १९८० १९९० २०००

[१५ पानांवरील चित्रे]

जेरोम

टिन्डेल

गुटनबर्ग

हूस

[चित्राचे श्रेय]

गुटनबर्ग आणि हूस: द स्टोरी ऑफ लिबर्टी, १८७८ या पुस्तकातून

[१५ पानांवरील चित्र]

बायबल विद्यार्थी १९२० च्या दशकात सुवार्तेची घोषणा करताना

[१६, १७ पानांवरील चित्रे]

सबंध जगात लोक सुवार्तेला प्रतिसाद देत आहेत

[१८ पानांवरील चित्र]

येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाप्रमाणेच प्रचार कार्याद्वारे देवाने दाखवलेल्या प्रीतीचा गौरव केला जातो