व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्याविषयी कोणाचे वाईट मत झाले आहे का?

तुमच्याविषयी कोणाचे वाईट मत झाले आहे का?

तुमच्याविषयी कोणाचे वाईट मत झाले आहे का?

अजय अगदी गोंधळून गेला होता. कारण त्याचा दोस्त लक्ष्मण अलीकडे, काही कारण नसताना अचानकच त्याच्याशी अगदी परक्यासारखा वागू लागला होता. * कित्येकदा लक्ष्मणने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते; अमोरासमोर यावे लागले तरीही, त्यांच्या वागण्यात एकप्रकारची कृत्रिमता आली होती. अजयला भीती वाटू लागली की कदाचित त्याच्या वागण्याबोलण्यातून त्याच्या दोस्ताचा काहीतरी गैरसमज झाला असेल. पण नेमके काय झाले, कळायला मार्ग नव्हता.

गैरसमज होण्याचे प्रकार सर्दीपडशांप्रमाणे सामान्य आहेत. काही वेळा गैरसमज अगदी क्षुल्लक बाबतीत असतो आणि लगेच दूर करता येतो. पण काही गैरसमज प्रयत्न करूनही दूर होत नाहीत; आणि हे अत्यंत त्रासदायक ठरते. पण मुळात गैरसमज का होतात? यामुळे संबंधित व्यक्‍तींवर कसा परिणाम होतो? तुमच्या वागण्याबोलण्यातून कोणाला गैरसमज झाला असल्यास तुम्ही काय करू शकता? आणि इतरजण आपल्याविषयी काय समजतात याची पर्वा करण्याची काही गरज आहे का?

कटू सत्य

इतरजण आपल्या मनातले विचार आणि हेतू जाणू शकत नाहीत; त्यामुळे कधी न कधी आपल्या बोलण्याचा किंवा वागण्याचा चुकीचा अर्थ लावला जाणे अगदी साहजिक आहे. बऱ्‍याच गोष्टी गैरसमज व्हायला कारणीभूत ठरू शकतात. कधीकधी आपण स्वतःच आपले नेमके विचार पाहिजे तितक्या स्पष्टपणे मांडू शकत नाही. तर कधी आपण बोलत असताना अवतीभवती गोंधळ असतो, किंवा इतर गोष्टींमुळे ऐकणाऱ्‍याचे लक्ष विचलित होते.

काही लोकांच्या स्वभावामुळे व सवयींमुळेही त्यांच्याविषयी गैरसमज होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, लाजाळू स्वभावाच्या व्यक्‍तीला कदाचित लोक निरुत्साही, फटकून राहणारा किंवा गर्विष्ठ समजतील. कधीकधी विशिष्ट परिस्थितीत एखादी व्यक्‍ती योग्य प्रतिक्रिया दाखवण्याऐवजी, गतकाळातील अनुभवांमुळे आपल्या भावनांच्या आधारावर मत बनवते. तसेच, वेगवेगळ्या संस्कृतीचे वा भाषा बोलणारे लोकही साहजिकच एकमेकांना पूर्णपणे समजून घेऊ शकत नाहीत. शिवाय, कधीकधी तिसऱ्‍या व्यक्‍तीने एखादी गोष्ट इतरांना सांगताना नकळत किंवा मुद्दामहून थोडी बदलून सांगितल्यास गैरसमज होतात. यामुळे मुळात विशिष्ट व्यक्‍तीने ज्या हेतूने काहीतरी म्हटले किंवा केले होते ते बाजूला राहून लोक वेगळेच समजू लागतात. अर्थात, ही झाली गैरसमज होण्याची काही कारणे; पण केवळ या कारणांचा विचार केल्यामुळे ज्याच्याबद्दल गैरसमज झाला आहे त्याची समस्या काही आपोआप दूर होत नाही.

अनुजाचे उदाहरण घ्या. एकदा तिने तिच्या एका मैत्रिणीला सर्वजण किती पसंत करतात असे सहज म्हटले. तेव्हा ती मैत्रीण तिथे नव्हती. पण एका तिसऱ्‍याच व्यक्‍तीने तिच्या बोलण्याचा भलत्याच संदर्भात त्या मैत्रिणीसमोर उल्लेख केला. मग काय, त्या मैत्रिणीने सर्वांसमोर अनुजाला चांगलेच झापले. त्यांच्या ओळखीच्या एका मुलाला ती पसंत असल्यामुळे अनुजा तिच्यावर जळते असा तिने आरोप केला. बिचाऱ्‍या अनुजाला हे अगदीच अनपेक्षित होते; तिला फार वाईट वाटले. आपल्या बोलण्याचा तसा हेतू नव्हता असे त्या मैत्रिणीला पटवून देण्याचा खूप प्रयत्न करूनही काही फायदा झाला नाही. सगळ्यांच्या भावना मात्र दुखावल्या गेल्या आणि अनुजा तिच्या मैत्रिणीला झालेला गैरसमज बऱ्‍याच काळापर्यंत दूर करू शकली नाही.

लोक सहसा स्वतःच्या दृष्टिकोनानुसार तुमच्याविषयी मत बनवत असतात. त्यामुळे, साहजिकच जेव्हा लोक तुमच्याकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतात किंवा तुम्ही वाईट हेतूने काही केल्याचा आरोप लावतात, तेव्हा वाईट वाटते. काही कारण नसताना एखाद्याने आपल्याविषयी चुकीचे मत का बनवले याचा कदाचित तुम्हाला रागही येईल. तुमच्या दृष्टीकोनातून त्यांचे मत पूर्वग्रहदूषित, टीकात्मक किंवा पूर्णपणे निराधार असेल आणि यामुळे तुमच्या भावना दुखावल्या जातील. खासकरून ज्या व्यक्‍तीच्या मतांना तुम्ही मान देता, तिने तुमच्याबद्दल वाईट मत बनवल्यास तुम्हाला अधिकच दुःख होते.

लोकांचे तुमच्याविषयीचे मत जाणून कदाचित तुम्हाला राग येईल; पण तरीसुद्धा आपण इतरांच्या मतांचा आदर केला पाहिजे. इतरांच्या मतांविषयी पर्वा न करणे हे एका ख्रिस्ती व्यक्‍तीकरता योग्य नाही. आपल्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे इतरांना कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. (मत्तय ७:१२; १ करिंथकर ८:१२) त्यामुळे एखाद्यावेळी जर कोणाला तुमच्याविषयी गैरसमज झाला असेल, तर तो दूर करण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. अर्थात, कोणाची मर्जी संपादन करण्याचा वाजवीपेक्षा जास्त प्रयत्न करून स्वतःला अगदीच कमी करण्यातही काही अर्थ नाही. कारण तुमची खरी किंमत इतरजण तुमच्याविषयी काय समजतात यावर अवलंबून नसते.

पण काहीवेळा कदाचित तुमच्याबद्दल केलेली टीका खरी असल्याचे तुम्हाला आढळेल. अर्थात, तुम्हाला वाईट वाटेल. पण जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि आनंदाने आपल्या चुका कबूल केल्या तर या अनुभवांतूनही तुम्ही काही चांगले शिकू शकता आणि स्वतःत सुधारणा करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला मिळू शकते.

दुष्परिणाम

गैरसमज झाल्यामुळे प्रत्येक वेळी काहीतरी गंभीर परिणाम होईलच असे नाही. समजा एखाद्या हॉटेलात एक माणूस मोठमोठ्याने बोलत असेल, तर कदाचित तुम्ही असा निष्कर्ष काढाल की तो जास्तच वाचाळ किंवा दिखाऊ आहे. पण तुमचा ग्रह चुकीचा असू शकतो. तो माणूस ज्याच्याशी बोलत आहे त्या व्यक्‍तीला कदाचित कमी ऐकू येत असेल. किंवा एखाद्या दुकानातील सेल्सगर्ल तुमच्याशी नीट बोलली नाही याचा कदाचित तुम्हाला राग येईल पण खरे पाहता कदाचित तिला बरे वाटत नसेल. तर अशाप्रकारचे गैरसमज कधीकधी होतात, पण त्यांमुळे काही गंभीर किंवा दीर्घकालीन नुकसान होत नाही. पण काही गैरसमज मात्र अक्षरशः जिवावर बेतू शकतात. प्राचीन इस्राएलच्या इतिहासातील दोन घटनांच्या वृत्तान्तावर विचार करा.

अम्मोनचा राजा नाहाश याचा मृत्यू झाल्यानंतर दाविदाने त्याच्या गादीवर बसलेला त्याचा पुत्र हानून याचे सांत्वन करण्याकरता काही दूतांना पाठवले. पण काहीजणांनी हानूनला असे पटवून सांगितले की हे दूत अम्मोन देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत. त्यामुळे हानूनने त्यांचा अपमान केला आणि मग इस्राएलशी युद्ध केले. यामुळे कमीतकमी ४७,००० जणांनी आपला जीव गमवला; आणि हे सर्व, चांगल्या हेतूंचा गैर अर्थ लावल्यामुळे झाले.—१ इतिहास १९:१-१९.

यापूर्वी, इस्राएलच्या इतिहासात गैरसमज झाल्याचे आणखी एक उदाहरण आहे; पण त्या वेळी ही समस्या अगदी वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात आली. रऊबेन, गाद आणि मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी यार्देन नदीजवळ एक भव्य वेदी बांधली. इस्राएलच्या बाकीच्या लोकांनी हे ऐकले तेव्हा रऊबेन, गाद व मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी यहोवाचा विश्‍वासघात केला आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. आणि म्हणून ते सर्वजण मिळून या लोकांवर चढाई करण्याची तयारी करू लागले. पण कोणतेही पाऊल उचलण्याआधी या इस्राएली लोकांनी रऊबेन, गाद व मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे काही दूत पाठवून त्यांच्या विश्‍वासघाताबद्दल आपला रोष व्यक्‍त केला. त्यांनी असे केले हे फार बरे झाले कारण वेदी बांधणाऱ्‍यांनी स्पष्ट केले की खऱ्‍या उपासनेपासून दूर जाण्याचा त्यांचा मुळीच हेतू नव्हता. उलट, ही वेदी त्यांनी यहोवाला विश्‍वासू राहण्याच्या साक्षीदाखल बांधली होती. हा गैरसमज मोठ्या रक्‍तपाताला कारणीभूत ठरू शकला असता पण सुबुद्धीने पावले उचल्यामुळे हा भयंकर परिणाम टळला.—यहोशवा २२:१०-३४.

प्रेमाने समस्या सोडवणे

वरील दोन वृत्तान्तांची तुलना केल्यामुळे आपल्याला बराच बोध मिळू शकतो. गैरसमज झाला असल्यास तो दूर करण्याचा प्रयत्न करणे निश्‍चितच योग्य आहे. वर उल्लेखलेल्या दुसऱ्‍या घटनेत दोन्ही बाजूचे लोक एकमेकांशी बोलल्यामुळे कोण जाणे किती लोकांचे जीव बचावले? अर्थात, लोकांचे जीव धोक्यात येण्याइतकी आणीबाणीची परिस्थिती सहसा उत्पन्‍न होणार नाही, पण मैत्रीचे संबंध मात्र धोक्यात येऊ शकतात. तेव्हा, तुमच्याविरुद्ध कोणी काही बोलले किंवा केले असे तुम्हाला वाटत असेल तर आधी खात्री करा की खरच त्या व्यक्‍तीचा वाईट हेतू होता का, तुमचा चुकीचा ग्रह तर झालेला नाही? त्या व्यक्‍तीचा खरा उद्देश काय होता? तिलाच विचारा. त्या व्यक्‍तीला तुमच्याविषयी गैरसमज झाला आहे असे तुम्हाला वाटते का? मग तिच्याशी याविषयी बोला. अहंकारामुळे असे करण्यास कचरू नका.

गैरसमज दूर करणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवण्यासाठी येशूने फार चांगला सल्ला दिला: “ह्‍यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.” (मत्तय ५:२३, २४) अशा वेळी इतरांना मध्ये न घेता, संबंधित व्यक्‍तीशी एकांतात बोलणे योग्य आहे. जर त्या व्यक्‍तीला तुमची तक्रार इतर कोणाकडून कळली तर समस्या सुटण्याऐवजी आणखी बिघडू शकते. (नीतिसूत्रे १७:९) समस्या प्रेमाने सोडवण्याचा तुमचा उद्देश असला पाहिजे. तेव्हा, आपली समस्या आरोपाच्या सुरात नव्हे तर स्पष्ट, साध्या शब्दांत त्या व्यक्‍तीपुढे मांडा. तुमच्या भावना कशा आणि कितपत दुखावल्या आहेत हे स्पष्ट करा. मग, फाजील भावनाप्रधान न होता त्या व्यक्‍तीचे म्हणणे देखील ऐकून घ्या. त्या व्यक्‍तीचा हेतू वाईट होता असे म्हणण्याची घाई करू नका. उलट तिचे म्हणणे खरे मानण्यास तयार असा. आठवणीत असू द्या, “[प्रीति] सर्व काही खरे मानण्यास तयार असते.”—१ करिंथकर १३:७.

अर्थात गैरसमज दूर केल्यानंतरही दुखावलेल्या भावना सहजासहजी सामान्य होत नाहीत आणि काही इतर दुष्परिणाम देखील टाळता येत नाहीत. अशावेळी काय केले पाहिजे? आवश्‍यक असल्यास, संबंधित व्यक्‍तीने मनापासून क्षमा मागणे महत्त्वाचे आहे. तसेच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी काही करता येण्यासारखे असेल तर ते देखील केले पाहिजे. या सर्व प्रकारच्या परिस्थितींत भावना दुखावलेल्या व्यक्‍तीने बायबलमधील या प्रेरित सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.”—कलस्सैकर ३:१३, १४; १ पेत्र ४:८.

आपण अपरिपूर्ण असेपर्यंत गैरसमज, रुसवेफुगवे हे जीवनात असणारच. चूक कोणाकडूनही होऊ शकते. कधीकधी आपण सर्वचजण असे काहीतरी बोलून जातो ज्यामुळे इतरांच्या भावना दुखावतात. म्हणूनच बायबल म्हणते: “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरहि कह्‍यात ठेवण्यास समर्थ आहे.” (याकोब ३:२) यहोवा देवाला हे चांगले ठाऊक असल्यामुळेच त्याने आपल्याला असे मार्गदर्शन दिले आहे: “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो. बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नको, देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्याशाप देताना ऐकशील. कारण तूहि इतरांस वारंवार शिव्याशाप दिले हे तुझ्या मनास ठाऊक आहे.”—उपदेशक ७:९, २१, २२.

“अंतःकरणे तोलून पाहणारा परमेश्‍वर आहे”

पण एखाद्या व्यक्‍तीला तुमच्याविषयी झालेल्या चुकीचा ग्रह दूर करणे अशक्य आहे असे दिसल्यास काय करावे? ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका. उलट, तुमच्याने होईल तितके ख्रिस्ती गुणांचे अवलंबन करत राहा. आवश्‍यक सुधारणा करण्यासाठी मदत मिळावी म्हणून यहोवाची प्रार्थना करा. तुम्ही खरोखर चांगले आहात की वाईट हे इतर लोक ठरवू शकत नाहीत. फक्‍त यहोवा देवच ‘अंतःकरणे तोलून पाहू’ शकतो. (नीतिसूत्रे २१:२) येशूला देखील काही लोकांनी पाण्यात पाहिले, तुच्छ लेखले पण यामुळे यहोवाचा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला नाही. (यशया ५३:३) त्याचप्रमाणे कदाचित तुमच्याबद्दलही लोक चुकीचे मत बनवतील पण तुम्ही यहोवाजवळ ‘आपले मन मोकळे करू’ शकता; आणि ही खात्री बाळगू शकता, की तो तुमच्या भावना समजून घेईल, कारण “मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.” (स्तोत्र ६२:८; १ शमुवेल १६:७) तुम्ही चांगले वागत राहिला तर ज्यांचे तुमच्याबद्दल वाईट मत झाले आहे त्यांना कालांतराने जाणीव होईल व त्यांचे मत कदाचित बदलेल.—गलतीकर ६:९; २ तीमथ्य २:१५.

या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेला अजय तुम्हाला आठवतो का? त्याने बायबलच्या सल्ल्यानुसार वागण्याचे धैर्य केले आणि तो लक्ष्मणशी बोलायला गेला व त्याला कशामुळे राग आला असे विचारले. परिणाम? लक्ष्मणला विश्‍वासच बसेना. त्याने अजयला सांगितले की त्याला मुळीच राग आलेला नव्हता आणि त्याला तो अजयशी काही ठरवून वेगळे वागला नव्हता. कदाचित तो आपल्याच विचारात असल्यामुळे त्याने अजयकडे दुर्लक्ष केले असे भासले असावे. नकळत आपण आपल्या मित्राच्या भावना दुखावल्या याचे लक्ष्मणला फार वाईट वाटले, त्याने अजयची क्षमा मागितली आणि ही गोष्ट त्याच्या लक्षात आणून दिल्याबद्दल त्याचे आभारही मानले. त्याने अजयला वचन दिले की भविष्यात इतरांना त्याच्या वागण्याने असा त्रास होऊ नये याची तो जास्त काळजी घेईल. अशारितीने दोन मित्रांमधला दुरावा नाहीसा झाला आणि ते पुन्हा जिवलग मित्र बनले.

आपल्याविषयी कोणाचे वाईट मत झालेले अर्थातच कोणाला आवडत नाही. पण झालेला गैरसमज दूर करण्याचा तुम्ही आपल्या परीने प्रयत्न केला आणि प्रीति व क्षमाशीलता यांसारख्या बायबलच्या तत्त्वांनुसार वागला तर नक्कीच तुमच्याही कटू अनुभवाचा असा गोड शेवट होईल.

[तळटीप]

^ या लेखात काही नावे बदलण्यात आली आहेत.

[२३ पानांवरील चित्रे]

प्रेमाने व क्षमाशीलतेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्यास कटू अनुभवाचाही गोड शेवट होऊ शकतो