व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘प्रभूचे वचन वाढत गेले’

‘प्रभूचे वचन वाढत गेले’

‘प्रभूचे वचन वाढत गेले’

“तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवितो; त्याचा शब्द [वचन] फार वेगाने धावतो.”—स्तोत्र १४७:१५.

१, २. येशूने आपल्या शिष्यांवर कोणते कार्य सोपवले, आणि या कार्यात कशाचा समावेश होता?

 बायबलमधील सर्वात लक्षवेधक भविष्यवाण्यांपैकी एक प्रेषितांची कृत्ये १:८ येथे आढळते. स्वर्गात जाण्याच्या काही काळाआधी येशूने आपल्या विश्‍वासू अनुयायांना उद्देशून म्हटले: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” हे किती प्रचंड कार्य असणार होते!

हे कार्य ज्या मूठभर शिष्यांवर सोपवण्यात आले होते त्यांच्याकरता सबंध पृथ्वीवर देवाच्या वचनाची घोषणा करणे हे एक आव्हानच होते. या कार्यात काय गोवले होते याचा विचार करा. लोकांना देवाच्या राज्याच्या सुवार्तेविषयी समजून घेण्यास त्यांना मदत करायची होती. (मत्तय २४:१४) येशूची साक्ष देण्याकरता त्याच्या प्रभावशाली शिकवणुकींविषयी आणि यहोवाच्या उद्देशासंबंधाने येशूची काय भूमिका आहे हे देखील लोकांना सांगण्याची जबाबदारी या शिष्यांवर होती. शिवाय, लोकांना शिष्य बनवून मग त्यांना बाप्तिस्मा देणेही त्यांच्या कार्यात समाविष्ट होते. आणि हे सारे जागतिक पातळीवर करायचे होते!—मत्तय २८:१९, २०.

३. येशूने आपल्या अनुयायांना कोणते आश्‍वासन दिले आणि त्यांना दिलेल्या कार्याविषयी त्यांची काय प्रतिक्रिया होती?

पण येशूने आपल्या शिष्यांना आश्‍वासन दिले होते की त्यांच्यावर सोपवलेले हे कार्य साध्य करण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याचे साहाय्य मिळेल. कार्य अतिशय मोठे होते; शिवाय ते निष्फळ करण्याचा विरोधकांनी सतत हिंसक मार्गांनी प्रयत्न केला. पण तरीसुद्धा येशूच्या त्या सुरवातीच्या शिष्यांनी त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे ते यशस्वीपणे पार पाडले. या गोष्टीला इतिहास साक्ष देतो आणि त्यामुळे कोणीही हे नाकबूल करू शकत नाही.

४. इतरांना प्रचार करण्याची व शिकवण्याची आज्ञा देण्यामागे देवाची प्रीती असल्याचे कशाप्रकारे दिसून येते?

हे जागतिक प्रचाराचे व शिकवण्याचे कार्य म्हणजे देवाला न ओळखणाऱ्‍या लोकांवरही त्याला असलेल्या प्रीतीचा पुरावा होता. या कार्याद्वारे या लोकांना देवाच्या निकट येण्याची व आपल्या पापांची क्षमा मिळवण्याची संधी होती. (प्रेषितांची कृत्ये २६:१८) तसेच प्रचाराची व शिकवण्याची आज्ञा, हा संदेश लोकांपर्यंत पोचवणाऱ्‍यांबद्दलही देवाला वाटणाऱ्‍या प्रीतीचा पुरावा होता; कारण या कार्यातून ते यहोवाबद्दल आपली निष्ठा आणि इतर मानवांबद्दल प्रीती व्यक्‍त करू शकत होते. (मत्तय २२:३७-३९) प्रेषित पौलाच्या नजरेत तर ही ख्रिस्ती सेवा इतकी मोलाची होती की त्याने या सेवेला “संपत्ति” म्हटले.—२ करिंथकर ४:७.

५. (अ) प्रारंभिक ख्रिश्‍चनांबद्दल सर्वात विश्‍वसनीय अहवाल कोठे आढळतो आणि तेथे कोणत्या वाढीसंबंधी वर्णन केले आहे? (ब) प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आज देवाच्या सेवकांकरता इतके अर्थपूर्ण का आहे?

या सुरवातीच्या ख्रिश्‍चनांच्या प्रचार कार्याचा सर्वात विश्‍वसनीय अहवाल शिष्य लूकने लिहिलेल्या प्रेषितांची कृत्ये या बायबलमधील प्रेरित पुस्तकात आढळतो. हे पुस्तक म्हणजे प्रचार कार्यात झालेल्या आश्‍चर्यजनक व जलद वाढीचा एक अहवाल आहे. देवाच्या वचनाबद्दलच्या ज्ञानात झालेली ही वाढ स्तोत्र १४७:१५ या वचनाची आठवण करून देते: “[यहोवा, NW] आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवितो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो.” प्रारंभिक ख्रिश्‍चनांना कशाप्रकारे पवित्र आत्म्याकडून सामर्थ्य मिळाले याविषयीचा हा अहवाल अतिशय रोमांचकारीच नाही तर आपल्याकरता आज अतिशय अर्थपूर्ण आहे. कारण आज यहोवाचे साक्षीदारही प्रचाराचे आणि शिष्य बनवण्याचे तेच कार्य, अर्थात त्यांच्या तुलनेत बऱ्‍याच मोठ्या प्रमाणावर करत आहेत. शिवाय, पहिल्या शतकातील त्या ख्रिश्‍चनांना ज्याप्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले त्याच प्रकारच्या समस्या आज आपल्यापुढेही येतात. पण त्या प्रारंभिक ख्रिश्‍चनांना यहोवाने कशाप्रकारे आशीर्वादित केले आणि सामर्थ्य दिले याविषयी विचार केल्यावर आपल्याला खात्री पटते की आज यहोवा आपल्याही पाठीशी आहे.

शिष्यांच्या संख्येत वाढ

६. वाढीसंबंधी कोणता वाक्यांश प्रेषितांची कृत्ये यात तीन वेळा आढळतो आणि कशाच्या संदर्भात त्याचा उल्लेख केला आहे?

प्रेषितांची कृत्ये १:८ या वचनाची कशाप्रकारे पूर्णता झाली याचे परीक्षण करण्याचा एक मार्ग म्हणजे ‘प्रभूचे वचन वाढत गेले’ या वाक्यांशाचा विचार करणे. थोड्याफार फरकाने हा वाक्यांश बायबलमध्ये फक्‍त तीन वेळा आढळतो आणि तिन्ही वेळा प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातच आढळतो. (प्रेषितांची कृत्ये ६:७; १२:२४; १९:२०) या तीन ठिकाणी उल्लेख केलेले ‘देवाचे वचन’ किंवा ‘प्रभूचे वचन’ सुवार्तेच्या संदर्भात म्हटले आहे; हा सुवार्तेचा संदेश देवाच्या सत्याचा प्रभावशाली, जिवंत संदेश आहे. आणि जे लोक हा संदेश स्वीकारतात त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य या संदेशात आहे.—इब्री ४:१२.

७. प्रेषितांची कृत्ये ६:७ येथे उल्लेख केलेली वाढ कशासंबंधी आहे आणि सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी काय झाले?

देवाच्या वचनाच्या वाढीसंबंधी पहिला उल्लेख प्रेषितांची कृत्ये ६:७ येथे आढळतो. याठिकाणी आपण असे वाचतो: “मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्‍या विश्‍वासाला मान्यता दिली.” या ठिकाणी उल्लेख केलेली वाढ शिष्यांच्या संख्येत झालेल्या वाढीसंबंधी सांगितली आहे. या आधी, सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ रोजी एका माडीवरच्या खोलीत एकत्रित झालेल्या १२० शिष्यांवर देवाचा पवित्र आत्मा ओतण्यात आला होता. यानंतर प्रेषित पेत्राने एक प्रभावशाली भाषण दिले आणि ज्यांनी हे भाषण ऐकले त्यांच्यापैकी जवळजवळ ३,००० लोकांनी त्याच दिवशी सत्याचा स्वीकार केला. सुमारे ५० दिवसांआधी ज्या मनुष्याला गुन्हेगार ठरवून वधस्तंभावर खिळण्यात आले होते त्याच्या नावाने बाप्तिस्मा घेण्यासाठी जेरुसलेम शहरातल्या तळ्यात किंवा आसपासच्या ठिकाणी असलेल्या तळ्यांत हजारो लोक गेले असतील तेव्हा किती गोंधळ उडाला असेल याची कल्पना करा!—प्रेषितांची कृत्ये २:४१.

८. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टनंतर शिष्यांची संख्या कशाप्रकारे वाढत गेली?

अर्थात ही केवळ सुरवात होती. यहुदी धार्मिक पुढारी प्रचार कार्य थांबवण्याचा सतत प्रयत्न करत राहिले पण त्यांना यश आले नाही. ‘तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची प्रभू दररोज शिष्यांच्यात भर घालीत असल्यामुळे’ या धार्मिक पुढाऱ्‍यांचे प्रयत्न विफल झाले. (प्रेषितांची २:४७) लवकरच वचन ऐकणाऱ्‍या “पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.” यानंतर “विश्‍वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्‍यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले.” (प्रेषितांची कृत्ये ४:४; ५:१४) काही काळानंतर, आपण असे वाचतो: “अशा प्रकारे सर्व यहूदीया, गालील व शोमरोन ह्‍या प्रदेशांतील मंडळीस स्वस्थता मिळाली, आणि तिची उन्‍नति होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.” (प्रेषितांची कृत्ये ९:३१) काही वर्षांनंतर, कदाचित सा.यु. ५८ च्या सुमारास “ज्यांनी विश्‍वास ठेवला आहे असे हजारो लोक” असा उल्लेख करण्यात आला. (प्रेषितांची कृत्ये २१:२०) एव्हाना, बरेच गैरयहुदी देखील सत्य मानू लागले होते.

९. सुरवातीच्या ख्रिश्‍चनांचे तुम्ही कसे वर्णन कराल?

संख्येतील ही वाढ जास्तकरून धर्मपरिवर्तनाच्या माध्यमाने झाली. हा धर्म तसा नवीनच होता पण तो अतिशय ज्वलंत होता. याचे सदस्य केवळ चर्चमध्ये बसून उपदेश ऐकणारे मुळीच नव्हते; उलट ते यहोवाला आणि त्याच्या वचनाला पूर्णपणे समर्पित होते. त्यांपैकी काहींनी अशा लोकांकडून सत्य शिकले होते ज्यांना अतिशय क्रूरपणे छळण्यात आले होते. (प्रेषितांची कृत्ये १६:२३, २६-३३) ज्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यांनी हा निर्णय स्वतःहून, विचारपूर्वक घेतला. (रोमकर १२:१) त्यांना देवाच्या मार्गांविषयी शिकवण्यात आले; सत्य त्यांच्या मनात व हृदयात बिंबले होते. (इब्री लोकांस ८:१०, ११) आपल्या विश्‍वासांखातर ते मृत्यूलाही सामोरे जाण्यास तयार होते.—प्रेषितांची कृत्ये ७:५१-६०.

१०. प्रारंभिक ख्रिश्‍चनांनी कोणती जबाबदारी स्वीकारली, आणि आज याच्याशी समांतर परिस्थिती कोणामध्ये आढळते?

१० ज्यांनी ख्रिस्ती शिकवणुकींचा स्वीकार केला त्यांना इतरांनाही सत्य सांगण्याच्या त्यांच्या जबाबदारीची जाणीव होती. यामुळे साहजिकच संख्येत आणखी वाढ होत गेली. एका बायबल अभ्यासकाने याविषयी असे म्हटले: “आपल्या विश्‍वासाचा प्रसार करणे हे काम फक्‍त अति उत्साही सदस्यांचे किंवा विशिष्ट नेमलेल्या सदस्यांचेच आहे असे समजले जात नव्हते. तर सुवार्तेची घोषणा करणे प्रत्येक चर्च सदस्याचा विशेषाधिकार आणि कर्तव्य होते. . . . सबंध ख्रिस्ती समाजाच्या उस्फूर्त प्रयत्नांमुळे अगदी सुरवातीपासूनच ही चळवळ अतिशय प्रगतीशील ठरली.” त्यांनी पुढे लिहिले: “सुवार्तेचे घोषणाकार्य जणू प्रारंभिक ख्रिश्‍चनांची जीवनस्फूर्ती होती.” आज खऱ्‍या ख्रिस्ती लोकांनी ती परंपरा टिकवून ठेवली.

भौगोलिक वाढ

११. प्रेषितांची कृत्ये १२:२४ येथे वर्णन केलेली वाढ कशाच्या संदर्भात आहे आणि ही वाढ कशाप्रकारे घडून आली?

११ देवाच्या वचनाची वाढ होण्यासंबंधी केलेला आणखी एक उल्लेख प्रेषितांची कृत्ये १२:२४ येथे आढळतो: “देवाच्या वचनाची वृद्धि व प्रसार होत गेला.” याठिकाणी भौगोलिक वाढीसंबंधी सांगितले आहे. सरकारचा विरोध असूनही प्रचाराच्या कार्यात भरभराट होत गेली. पहिल्यांदा जेरुसलेममध्ये पवित्र आत्मा ओतण्यात आला आणि तेथून देवाच्या वचनाचा जलद गतीने प्रसार झाला. जेरुसलेममध्ये शिष्यांना छळाला तोंड द्यावे लागल्यामुळे ते यहुदिया व सामरियाच्या अनेक भागांत पांगले. याचा काय परिणाम झाला? “ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले.” (प्रेषितांची कृत्ये ८:१, ४) आत्म्याने फिलिप्पाला एका माणसाला साक्ष देण्याचे मार्गदर्शन केले; या माणसाचा बाप्तिस्मा झाला आणि त्याने देवाच्या वचनाचा संदेश इथियोपियाला नेला. (प्रेषितांची कृत्ये ८:२६-२८, ३८, ३९) लवकरच लोद, शारोन व यापो या ठिकाणी सत्य प्रस्थापित झाले. (प्रेषितांची कृत्ये ९:३५, ४२) नंतर, प्रेषित पौलाने समुद्र व जमिनीवर हजारो किलोमीटरचा प्रवास करून अनेक भूमध्य देशांत मंडळ्या स्थापन केल्या. प्रेषित पेत्र बॅबिलोनला गेला. (१ पेत्र ५:१३) पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ओतण्यात आला होता, त्यानंतर ३० वर्षांच्या आत पौलाने असे लिहिले की सुवार्तेची “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत . . . घोषणा झाली” आहे. कदाचित त्याकाळात पृथ्वीवरील प्रचलित देशांच्या संदर्भात पौलाने असे म्हटले असावे.—कलस्सैकर १:२३.

१२. ख्रिस्ती धर्माच्या विरोधकांनी देवाच्या वचनाची भौगोलिक वाढ झाल्याचे कसे कबूल केले?

१२ ख्रिस्ती धर्माच्या विरोधकांनी देखील ही गोष्ट कबूल केली की देवाचे वचन सबंध रोमी साम्राज्यात पसरले आहे. उदाहरणार्थ, प्रेषितांची कृत्ये १७:६ यात सांगितले आहे, की उत्तर ग्रीसच्या थेस्सेलनायका शहरात विरोधकांनी आरडाओरड करत म्हटले: “ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेहि आले आहेत.” पुढे दुसऱ्‍या शतकाच्या सुरवातीला, धाकट्या प्लाइनीने बिथिनियाहून रोमी सम्राट ट्राजन यास लिहिलेल्या काही पत्रांत ख्रिस्ती धर्माविषयी अशी तक्रार केली की: “केवळ शहरांतच नव्हे तर जवळपासच्या खेड्यापाड्यांतही [त्याचा] फैलाव झाला आहे.”

१३. देवाच्या वचनाची भौगोलिक वाढ झाल्यामुळे मानवजातीबद्दल देवाला असलेले प्रेम कशाप्रकारे व्यक्‍त झाले?

१३ ही भौगोलिक वाढ घडवून आणण्याद्वारे यहोवाने, मुक्‍ततेची गरज असलेल्या सबंध मानवजातीबद्दल आपले गहिरे प्रेम व्यक्‍त केले. परराष्ट्रीयांपैकी असलेल्या कर्नेल्यावर पवित्र आत्मा आला हे पेत्राने पाहिले तेव्हा त्याने म्हटले: “देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) होय, सुवार्ता सर्व लोकांकरता होती आणि आजही आहे. आणि देवाच्या वचनाची भौगोलिक वाढ झाल्यामुळे पृथ्वीवरील सर्व भागांतल्या लोकांना देवाच्या प्रेमाला प्रतिसाद देण्याची संधी प्राप्त झाली. या २१ व्या शतकात, देवाचे वचन अक्षरशः पृथ्वीवरील सर्व भागांत पसरले आहे.

प्रबलशाली वाढ

१४. प्रेषितांची कृत्ये १९:२० येथे कोणत्या प्रकारच्या वाढीसंबंधी सांगण्यात आले आहे आणि देवाचे वचन कशावर प्रबल ठरले?

१४ देवाच्या वचनाच्या वाढीसंबंधी तिसऱ्‍यांदा उल्लेख प्रेषितांची कृत्ये १९:२० येथे आढळतो: “प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.” याठिकाणी “प्रबल झाले” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ “सामर्थ्याने कार्य करणे” असा होतो. या आधीची काही वचने दाखवतात की इफिसात बरेचजण सत्य स्वीकारू लागले आणि जे जादूटोणा करत होते त्यांपैकी बऱ्‍याच जणांनी सर्वांसमोर आपली पुस्तके जाळून टाकली. अशारितीने देवाचे वचन खोट्या धार्मिक समजुतींवर प्रबल ठरले. इतर अडथळ्यांवरही, उदाहरणार्थ, छळ होत असतानाही सुवार्ता प्रबल ठरली. सुवार्तेच्या घोषणेत कोणतीही गोष्ट बाधा बनू शकली नाही. ही गोष्ट देखील आज खऱ्‍या ख्रिस्ती धर्माबद्दल खरी ठरल्याचे दिसून येते.

१५. (अ) एका बायबल इतिहासकाराने प्रारंभिक ख्रिश्‍चनांबद्दल काय लिहिले? (ब) शिष्यांनी आपल्या सफलतेचे श्रेय कोणाला दिले?

१५ प्रेषितांनी व इतर प्रारंभिक ख्रिश्‍चनांनी देवाचे वचन आवेशाने घोषित केले. त्यांच्याविषयी एका बायबल इतिहासकाराने असे म्हटले: “आपल्या प्रभूविषयी बोलण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना हे कसे करावे असा विचार करावा लागत नाही, कोणता न कोणता मार्ग ते कसाही शोधून काढतातच. या स्त्रीपुरुषांच्या कार्यपद्धतीपेक्षा हे कार्य करण्याच्या त्यांच्या प्रबल इच्छेविषयी आम्हाला कौतुक वाटते.” पण असे असूनही या प्रारंभिक ख्रिश्‍चनांनी ओळखले की त्यांच्या सेवाकार्याची सफलता केवळ त्यांच्या प्रयत्नांवर अवलंबून नव्हती. हे काम करण्याची आज्ञा त्यांना देवाने दिली होती आणि त्याअर्थी ते पूर्ण करण्यासाठीही देवच त्यांना पाठिंबा देत होता. आध्यात्मिक संदर्भातील वाढ केव्हाही देवाच्याच आशीर्वादाने होते. करिंथ मंडळीला लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने हे कबूल केले. त्याने लिहिले: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. कारण आम्ही देवाचे सहकारी आहो.”—१ करिंथकर ३:६, ९.

पवित्र आत्मा कार्यशील

१६. पवित्र आत्म्याने शिष्यांना निर्भयपणे बोलण्याचे सामर्थ्य दिले हे कशावरून दिसून येते?

१६ येशूने आपल्या शिष्यांना आश्‍वासन दिले होते की देवाच्या वचनाच्या वाढीत पवित्र आत्म्याची भूमिका असेल आणि पवित्र आत्मा त्या शिष्यांना प्रचार कार्य करण्याचे सामर्थ्य देईल. (प्रेषितांची कृत्ये १:८) हे कसे घडले? पेन्टेकॉस्टच्या दिवशी शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्यात आला त्यानंतर काही काळातच पेत्र व योहान यांना यहुदी न्यायसभेपुढे हजर राहण्याचा हुकूम देण्यात आला. ही न्यायसभा त्या देशातील सर्वोच्च न्यायालय होते. याच न्यायसभेच्या न्यायाधीशांनी येशू ख्रिस्ताला मृत्यूदंड ठोठावला होता. अशा या शक्‍तिशाली आणि प्रतिकूल सभेपुढे बोलताना प्रेषित भीतीने कापले का? मुळीच नाही! पवित्र आत्म्याने पेत्र व योहान यांना इतक्या निर्भयपणे बोलण्याचे सामर्थ्य दिले की त्यांचे विरोधक आश्‍चर्यचकित झाले आणि “हे येशूच्या सहवासात होते हेहि त्यांनी ओळखले.” (प्रेषितांची कृत्ये ४:८, १३) पवित्र आत्म्याने स्तेफनालाही न्यायसभेसमक्ष निर्भयपणे साक्ष देण्यास साहाय्य केले. (प्रेषितांची कृत्ये ६:१२; ७:५५, ५६) या आधी पवित्र आत्म्याने शिष्यांनाही निर्भयपणे प्रचार करण्यास मदत केली होती. लूक याविषयी सांगतो: “त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.”—प्रेषितांची कृत्ये ४:३१.

१७. पवित्र आत्म्याने आणखी कोणत्या मार्गांनी शिष्यांना त्यांच्या सेवाकार्यात मदत केली?

१७ आपल्या शक्‍तिशाली पवित्र आत्म्याच्या साहाय्याने यहोवाने पुनरुत्थित येशूसोबत प्रचार कार्याकरता मार्गदर्शन पुरवले. (योहान १४:२८; १५:२६) कर्नेल्य, त्याचे नातलग आणि त्याच्या इष्ट मित्रांवर पवित्र आत्मा ओतण्यात आला तेव्हा प्रेषित पेत्राने हे ओळखले की सुंता न झालेले विदेशी देखील येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेऊ शकतात. (प्रेषितांची कृत्ये १०:२४, ४४-४८) नंतर, मिशनरी कार्यासाठी बर्णबा व शौल (प्रेषित पौल) यांची नेमणूक करण्यात आणि त्यांनी कोठे जावे व कोठे जाऊ नये हे ठरवण्यातही पवित्र आत्म्याची मुख्य भूमिका होती. (प्रेषितांची कृत्ये १३:२, ४; १६:६, ७) तसेच जेरुसलेममध्ये प्रेषित व वडीलवर्ग देखील पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानेच निर्णय घेत असत. (प्रेषितांची कृत्ये १५:२३, २८, २९) ख्रिस्ती मंडळीतील पर्यवेक्षकांची नेमणूक देखील पवित्र आत्म्याच्याच मार्गदर्शनाने केली जात होती.—प्रेषितांची कृत्ये २०:२८.

१८. प्रारंभिक ख्रिश्‍चनांनी आपले प्रेम कशाप्रकारे व्यक्‍त केले?

१८ याशिवाय, ख्रिस्ती व्यक्‍तींच्या व्यक्‍तिमत्त्वात प्रीतीसारखे देवाचे गुण विकसित करण्याद्वारेही पवित्र आत्मा प्रगट झाला. (गलतीकर ५:२२, २३) याच प्रीतीमुळे शिष्य एकमेकांना मदत करायला तयार होते. उदाहरणार्थ, सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टनंतर जेरुसलेममधील शिष्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याकरता एक सार्वजनिक निधी गोळा करण्यात आला. बायबलमधील अहवाल याविषयी असे सांगतो: “त्यांच्यातील कोणालाहि उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवीत; मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.” (प्रेषितांची कृत्ये ४:३४, ३५) शिष्यांनी हे प्रेम केवळ आपल्या सहविश्‍वासू बांधवांपुरते मर्यादित न ठेवता इतरांनाही दाखवले; एकतर सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे आणि इतर दयेची कृत्ये करण्याद्वारे देखील. (प्रेषितांची कृत्ये २८:८, ९) येशूने म्हटले की त्याचे अनुयायी त्यांच्यातील स्वार्थत्यागी प्रेमामुळे ओळखले जातील. (योहान १३:३४, ३५) प्रेमाच्या याच महत्त्वाच्या गुणामुळे बरेच लोक देवाकडे आकर्षित झाले आणि पहिल्या शतकातील वाढीला या गोष्टीचाही हातभार लागला यात वाद नाही. आजही हेच घडत आहे.—मत्तय ५:१४, १६.

१९. (अ) पहिल्या शतकात यहोवाच्या वचनाची कोणत्या तीन प्रकारे वाढ झाली? (ब) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१९ मूळ भाषेत, प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात “पवित्र आत्मा” या अर्थाची ग्रीक संज्ञा एकूण ४१ वेळा आढळते. यावरून पहिल्या शतकातील खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या वाढीचा पवित्र आत्म्याच्या शक्‍तीशी व मार्गदर्शनाशी जवळून संबंध होता हे अगदी स्पष्ट दिसून येते. शिष्यांच्या संख्येत वाढ झाली, देवाचे वचन विस्तारित क्षेत्रात पसरवण्यात आले आणि त्याकाळातील धर्मांवर व तत्त्वज्ञानांवर ते प्रबल ठरले. पहिल्या शतकात झालेल्या या वाढीची आज यहोवाच्या साक्षीदारांच्या कामात समांतरता दिसून येते. पुढच्या लेखात आपण या आधुनिक काळात देवाच्या वचनाच्या तितक्याच आश्‍चर्यकारक वाढीचे परीक्षण करणार आहोत.

तुम्हाला आठवते का?

• प्रारंभिक शिष्यांच्या संख्येत कशाप्रकारे वाढ झाली?

• देवाच्या वचनाचा भौगोलिकरित्या कसा प्रसार झाला?

• पहिल्या शतकात देवाचे वचन कशाप्रकारे प्रबल ठरले?

• देवाच्या वचनाच्या वाढीत पवित्र आत्म्याची काय भूमिका होती?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्र]

फिलिप्पाने इथियोपियन माणसाला प्रचार केल्यावर सुवार्तेचा भौगोलिकरित्या प्रसार झाला

[१३ पानांवरील चित्र]

जेरुसलेम येथे असलेल्या प्रेषितांना व वडीलवर्गाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन होते

[१० पानांवरील चित्राचे श्रेय]

वरती उजवीकडच्या कोपऱ्‍यांत: दुसऱ्‍या मंदिराच्या काळातील जेरुसलेम शहराची प्रतिकृती - जेरूसलेममधील होलीलँड हॉटेलच्या प्रांगणात