आमच्या विश्वासाची परीक्षा झाली पण आम्ही एकटे नव्हतो
आमच्या विश्वासाची परीक्षा झाली पण आम्ही एकटे नव्हतो
विकी, आमची लाडकी लेक १९९३ साली जन्मली तेव्हा अतिशय गोड, गुबगुबीत होती. तिचा जन्म झाला तेव्हा आमच्या आनंदाला पारावार नव्हता. स्वीडनच्या एका छोट्याशा गावात आम्ही अगदी सुखात राहात होतो.
पण विकी दीड वर्षाची असताना आमच्यावर जणू आभाळ कोसळले. विकीला काही दिवसांपासून बरे नसल्यामुळे आम्ही तिला दवाखान्यात नेले होते. डॉक्टरांनी विकीच्या आजाराचे निदान दिले तो क्षण आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांनी आम्हाला सांगितले की आमच्या लाडक्या विकीला अक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (लहान मुलांना होणारा रक्तातील पांढऱ्या पेशींचा कर्करोग) झाला होता.
आमच्या चिमुकल्या बाळाला इतका भयंकर रोग झाला आहे यावर आमचा विश्वासच बसेना. आता कोठे तिला तिच्या भोवतालच्या जगातल्या एकेका वस्तूची ओळख होऊ लागली होती; आणि आता तिच्यावर हे मृत्यूचे भयंकर सावट आले होते. डॉक्टर आमचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी आम्हाला सांगितले की या रोगावर एक उपचार आहे आणि तो बहुतेक केसेसमध्ये गुणकारी ठरतो. पण त्यासाठी केमोथेरपी आणि त्यासोबत बऱ्याचदा रक्त संक्रमण करावे लागेल. आम्हाला पुन्हा धक्का बसला.
आमच्या विश्वासाची परीक्षा
आमच्या मुलीवर आमचे अतोनात प्रेम आहे आणि सर्वात चांगला उपचार तिला मिळावा अशीच आमची इच्छा होती हे काही वेगळे सांगायला नको. पण तरीसुद्धा रक्त संक्रमणाचा पर्याय आम्ही स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. आमचा देवाच्या वचनावर अर्थात बायबलवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की ख्रिश्चनांनी ‘रक्त वर्ज्य करावे.’ (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) शिवाय, रक्त संक्रमणे किती धोकेदायक असतात याचीही आम्हाला कल्पना होती. हजारो लोकांना यामुळे वेगवेगळे आजार जडले आहेत आणि काही तर संक्रमण दिल्यानंतर दगावले देखील. तेव्हा आमच्यासमोर एकच पर्याय उरला होता. रक्त न देता सर्वात उत्तम प्रतीचा इलाज करणे. अशारितीने आमच्या विश्वासाच्या परीक्षेची सुरवात झाली.
सर्वात आधी, मदतीसाठी आम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या स्वीडनच्या शाखा दफ्तरातील इस्पितळ माहिती सेवा विभागाशी संपर्क साधला. * रक्त न देता केमोथेरपी करायला तयार असणारे इस्पितळ आणि डॉक्टर शोधण्यासाठी लगेच, सबंध युरोपातील वेगवेगळ्या इस्पितळांना फॅक्स संदेश पाठवण्यात आले. आम्हाला मदत करण्यासाठी आमच्या ख्रिस्ती बांधवांनी जो उत्साह आणि प्रेम दाखवले ते पाहून खरोखर आम्हाला खूप बळ मिळाले. आमच्या विश्वासासाठी लढा देताना आम्ही एकटे नव्हतो याची जाणीव आम्हाला झाली.
काही तासांतच, आम्हाला मदत करण्यास तयार असलेल्या इस्पितळाशी आणि डॉक्टरांशी आम्ही संपर्क साधू शकलो. हे इस्पितळ जर्मनीतल्या सार नदीवरील हॉम्बर्ग शहरात होते; त्यामुळे दुसऱ्या दिवशी विकीची तपासणी करण्यासाठी तिथे विमानाने जाण्याची आमच्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आम्ही हॉम्बर्गला पोचलो तेव्हा तेथील स्थानिक मंडळीतील यहोवाचे साक्षीदार, तसेच आमचे काही नातेवाईक आम्हाला घ्यायला आले होते. इस्पितळ सहकार्य समितीच्या एका प्रतिनिधीने आमचे स्वागत केले. ते आमच्यासोबत इस्पितळात आले आणि आम्हाला फार मोठा आधार दिला. या परक्या देशातही आमचे आध्यात्मिक भाऊ आमच्या पाठीशी आहेत हे पाहून फार सांत्वन मिळाले.
इस्पितळात आम्ही डॉ. ग्राफ यांना भेटलो तेव्हा पुन्हा एकदा आम्हाला सांत्वन मिळाले. ते फारच समजूतदार होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की विकीचा रक्त न देता इलाज करण्याचा ते आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतील. तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण ५ पर्यंत घसरले तरीही ते रक्त न देता उपचार सुरू ठेवायला तयार होते. ते म्हणाले की आजाराचे लवकर निदान झाले आणि आम्ही लवकरात लवकर हालचाल केल्यामुळे विकीचा उपचार बहुदा यशस्वीच ठरेल. अर्थात, त्यांनी मान्य केले की विकीसारख्या केसमध्ये रक्त न देता केमोथेरपी करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. पण डॉ. ग्राफ यांचे धैर्य आणि दृढ संकल्प पाहून आमचे मन कौतुकाने व कृतज्ञतेने भरले.
आर्थिक अडचणी
आता प्रश्न होता, की विकीच्या उपचारांचा खर्च कसा भागवायचा? तिच्या दोन वर्षांच्या उपचारांकरता साधारण १,५०,००० डॉइश मार्क (३० लाख रुपये) खर्च येईल असे आम्हाला सांगण्यात आले तेव्हा आम्ही चाटच पडलो. आमच्याजवळ असलेले पैसे या रकमेच्या मानाने काहीच नव्हते. पण विकीचा उपचार लगेच सुरू करण्याची गरज होती. शिवाय, आम्ही स्वीडनऐवजी इथे जर्मनीला उपचाराकरता आल्यामुळे सरकारी आरोग्य विमा मिळण्याचीही शक्यता नव्हती. आम्ही कोंडीत सापडलो होतो. आमची चिमुकली विकी एका भयंकर रोगाशी झुंजत होती आणि इतके कार्यक्षम डॉक्टर तिच्यावर उपचार करायला तयार असूनही आमच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते.
इस्पितळातील व्यवस्थापनाने आम्हाला यातून एक मार्ग सुचवला. त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही २०,००० मार्क्स (४ लाख रुपये) लगेच दिले आणि बाकीच्या रकमेकरता गॅरेंटी पत्रावर सही केली तर ते उपचार सुरू करायला तयार होते. आमच्याजवळ असलेले पैसे आणि काही जवळच्या लोकांची मदत घेऊन आम्ही २०,००० मार्क्स एकदाचे दिले. पण आता बाकीची रक्कम कोठून आणायची?
पुन्हा एकदा आम्हाला जाणीव झाली की विश्वासाच्या लढाईत आम्ही एकटे नव्हतो. एका आध्यात्मिक बांधवाने, तेव्हा आमच्याबरोबर ओळखही नसताना बाकीची रक्कम देण्याची तयारी दाखवली. अर्थात आम्हाला त्यांच्या उदार देणगीचा उपयोग करावा लागला नाही कारण आम्ही इतर मार्गांनी पैशांची व्यवस्था केली.
सक्षम वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रयत्न
केमोथेरपीला सुरवात झाली. दिवस आणि आठवडे उलटत होते. कधीकधी विकीला आणि आम्हालाही या उपचाराचा त्रास आणि तणाव सहन करणे फार कठीण जायचे. पण तिच्या प्रकृतीत किंचितही सुधारणा दिसली की आम्हाला फार आनंद व्हायचा. केमोथेरपी आठ महिने चालली. एकदा विकीचे हिमोग्लोबिन ६ पर्यंत घसरले पण डॉ. ग्राफ यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला.
आता सहा वर्षे झाली आहेत. विकीची शेवटची तपासणी झाली तेव्हा तिच्या मणक्यातील द्रवात ल्युकेमियाचा कोणताच मागमूस सापडला नाही. आज ती अगदी ठणठणीत आहे आणि चारचौघींसारखी हसूखेळू शकते. विकी अगदी
पूर्णपणे बरी झाली हा चमत्कारच म्हणावा लागेल. विकीसारखाच आजार झालेल्या कित्येक लहान मुलांना तर केमोथेरपी आणि रक्त संक्रमणे देऊनही वाचवता येत नाही.आम्ही विश्वासाकरता दिलेल्या लढ्यात विजयी झालो. पण आमच्या नातेवाईकांच्या, ख्रिस्ती बंधूभगिनींच्या आणि कार्यक्षम वैद्यकीय कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. इस्पितळ माहिती सेवा विभागाने आम्हाला २४ तास पूर्ण आधार दिला. डॉ. ग्राफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकीचा उपचार करण्यासाठी आपली बुद्धी व कौशल्ये पणास लावली. त्यांच्या सगळ्या मदतीसाठी कसे आभार मानावेत आम्हाला कळत नाही.
आमचा विश्वास आणखी दृढ झाला आहे
पण या सर्वांपेक्षा आम्ही आमच्या यहोवा देवाचे आभार मानतो की त्याने आमची प्रेमळपणे काळजी वाहिली आणि त्याच्या वचनाच्या, अर्थात बायबलच्या माध्यमाने आम्हाला शक्ती दिली. मागे वळून पाहताना आम्हाला जाणीव होते, की जीवनातल्या या अत्यंत कठीण अनुभवातून आम्हाला किती काही शिकायला मिळाले आहे आणि आमचा विश्वास किती मजबूत झाला आहे.
आता आमची मनापासून हीच इच्छा आहे की आम्ही यहोवा देवासोबत सदैव घनिष्ट नातेसंबंध ठेवावा आणि त्याच्या अपेक्षांनुसारच जीवनात प्रत्येक निर्णय घेणे किती चांगले असते हे आपल्या मुलीलाही शिकवावे. हो, या पृथ्वीवरील नव्या जगात सार्वकालिक जीवन विकीला मिळावे म्हणून आम्ही तिच्यावर उत्तम आध्यात्मिक संस्कार करू इच्छितो.—सौजन्याने.
[तळटीप]
^ इस्पितळ माहिती सेवा हा जगभरातील इस्पितळ सहकार्य समित्यांवर देखरेख करणारा विभाग आहे. या विभागात डॉक्टर व साक्षीदार रुग्णांत सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रशिक्षण मिळालेले ख्रिस्ती स्वयंसेवक कार्य करतात. २०० पेक्षा जास्त देशांमध्ये १,४०० पेक्षा अधिक इस्पितळ सहकार्य समित्या कार्यरत आहेत.