“सार्वजनिक आरोग्याला अप्रत्यक्ष धोका”
“सार्वजनिक आरोग्याला अप्रत्यक्ष धोका”
इंटरनेटवरील अश्लील प्रकारांविषयी नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्व्हेतून असे दिसून आले की अमेरिकेतील एकूण प्रौढ इंटरनेट वापरकर्त्यांपैकी चक्क एक तृतियांश जणांनी कोणत्या न कोणत्या अश्लील वेबसाईटला भेट दिली आहे. अलीकडे बऱ्याच लोकांकरता इंटरनेट हे वासना शमवण्याचे माध्यम बनले आहे. हा सर्व्हे घेणारे मानसशास्त्रज्ञ डॉ. ॲल कूपर यांनी म्हटले की “हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक लपलेला धोका असून तो प्रमाणाबाहेर वाढत चालला आहे; याचे कारण की हा धोका ओळखणारे आणि त्याबद्दल गांभिर्याने विचार करणारे लोक फार कमी आहेत.”
सायबरसेक्स अर्थात इंटरनेटवरील अश्लील प्रकारांना कोण बळी पडण्याची जास्त शक्यता आहे? डॉ. कूपर यांच्या मते, ‘ज्यांनी जीवनात नेहमी आपल्या वासना दाबून ठेवल्या किंवा मर्यादेत ठेवल्या त्यांना अचानक, आपल्या वासना तृप्त करण्याच्या असंख्य संधी इंटरनेटच्या माध्यमाने सापडल्या आहेत.’
जे लोक वारंवार या अश्लील वेबसाईट्सला भेटी देतात त्यांपैकी अधिकांश असे समजतात की या सवयीमुळे त्यांचे काही नुकसान होणार नाही. पण हे खरे आहे का? ज्याप्रमाणे ड्रग्सच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला ते ड्रग जास्त प्रमाणात घेऊनही तृप्ती होत नाही त्याचप्रमाणे सायबरसेक्सच्या आहारी गेलेले बरेचजण आपल्या वासना तृप्त करण्याकरता इंटरनेटवरील अश्लीलतेचे “डोस” वाढवत जातात. या लोकांची नोकरी जाण्याची आणि वैवाहिक जीवनात समस्या उद्भवण्याचीही शक्यता आहे!
पण ज्यांना देवाला संतुष्ट करण्याची इच्छा आहे त्यांना इंटरनेटवरील ही अश्लीलता टाळण्याचे आणखी एक कारण आहे. देवाचे वचन असा सल्ला देते: “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा. त्यामुळे देवाचा कोप होतो.” (कलस्सैकर ३:५, ६) पण अशा अशुद्ध वासनांच्या संदर्भात आपले ‘अवयव जिवे मारण्याकरता’ एखाद्याने यहोवा देवाबद्दल मनस्वी प्रेम बाळगण्याची व ते वाढवण्याची गरज आहे. (स्तोत्र ९७:१०) जर सायबरसेक्सच्या या सार्वजनिक आरोग्य धोक्याचा मोह या व्यक्तीसमोर आल्यास, तिने देवाच्या वचनाचा, अर्थात बायबलचा अभ्यास करून यहोवाबद्दलचे प्रेम आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच स्थानिक राज्य सभागृहात यहोवाच्या साक्षीदारांच्या हितकारक सहवासामुळेही एका व्यक्तीची देवाला संतुष्ट करण्याची इच्छा बळकट होण्यास हातभार लागतो.