व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ऐकून विसरणारे होऊ नका

ऐकून विसरणारे होऊ नका

ऐकून विसरणारे होऊ नका

“वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता.”याकोब १:२२.

१. इस्राएल लोकांना कोणकोणती महत्कृत्ये प्रत्यक्ष पाहण्याचा बहुमान मिळाला?

 यहोवाने प्राचीन ईजिप्तमध्ये केलेली महत्कृत्ये निश्‍चितच “अविस्मरणीय” होती. दहा पीडांपैकी प्रत्येक पीडा अचंबित करणारी होती. त्या दहा विपत्तींनंतर यहोवाने तांबड्या समुद्राला दुभंगून इस्राएल राष्ट्राला सुखरूप पलीकडे नेले. (अनुवाद ३४:१०-१२) ती महत्कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली असती तर ती घडवून आणणाऱ्‍याला कदाचित तुम्ही कधीही विसरला नसता. पण स्तोत्रकर्त्याने म्हटले: “ते [इस्राएली लोक] आपल्या उद्धारक देवाला विसरले; त्याने मिसर देशात महत्कृत्ये, हामाच्या देशात अद्‌भुतकृत्ये, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती.”—स्तोत्र १०६:२१, २२.

२. देवाच्या सामर्थ्यशाली कृत्यांचे इस्राएल लोकांना लवकरच विस्मरण झाले हे कशावरून दिसून आले?

तांबडा समुद्र पार केल्यानंतर, इस्राएली लोकांनी “परमेश्‍वराचे भय धरिले आणि परमेश्‍वरावर . . . विश्‍वास ठेविला.” (निर्गम १४:३१) मोशेसोबत इस्राएल पुरुषांनी यहोवाच्या विजयाच्या स्तुतीकरता एक गीत गायले आणि मिर्याम व इतर स्त्रिया देखील डफ वाजवत नाचू लागल्या. (निर्गम १५:१, २०) होय, देवाचे हे लोक त्याची सामर्थ्यशाली कृत्ये पाहून अचंबित झाले होते. पण ही महत्कृत्ये करणाऱ्‍याबद्दल त्यांची प्रशंसा फार काळ टिकली नाही. काही काळातच त्यांच्यापैकी बरेच जण असे वागू लागले जणू त्यांना विस्मरणाचा मनोविकार झाला होता. ते यहोवाच्या विरोधात कुरकूर करू लागले. काहींनी तर मूर्तिपूजा व लैंगिक अनैतिकता आचरली.—गणना १४:२७; २५:१-९.

कशामुळे आपणही विसरू शकतो?

३. आपल्या अपरिपूर्ण स्वभावामुळे, आपण काय विसरून जाण्याची शक्यता आहे?

इस्राएल लोक यहोवाचे सर्व उपकार कसे विसरू शकले असा कदाचित आपण विचार करू. पण तीच गोष्ट आपल्याबाबतीतही घडू शकते. इस्राएल लोकांप्रमाणे आपण देवाची महत्कृत्ये प्रत्यक्ष पाहिलेली नाहीत हे खरे आहे. पण देवासोबत आपला नातेसंबंध जुळल्यानंतर निश्‍चितच अशा काही घटना घडल्या असतील ज्या अविस्मरणीय होत्या. काहींना ती वेळ आठवत असेल जेव्हा त्यांनी बायबलमधील सत्याचा स्वीकार केला होता. किंवा यहोवाला प्रार्थना करून आपले जीवन त्याला समर्पित केले अथवा खरे ख्रिस्ती म्हणून पाण्यात बाप्तिस्मा घेतला तो आनंदाचा क्षण कदाचित आपल्याला आठवत असेल. शिवाय जीवनातल्या खडतर वळणांवर यहोवाने आपला मार्ग सुरळीत केल्याच्या कित्येक घटना आपल्याला आठवत असतील. (स्तोत्र ११८:१५) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बलिदानामुळे आपल्याला तारणाची आशा मिळाली आहे. (योहान ३:१६) पण आपल्या अपरिपूर्ण स्वभावामुळे कधीकधी जेव्हा चुकीच्या इच्छा आपल्या मनात निर्माण होतात किंवा जीवनातल्या चिंतांचा दबाव वाढतो तेव्हा आपणही यहोवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी अगदी सहज विसरून जाऊ शकतो.

४, ५. (अ) ऐकून विसरण्याबद्दल याकोब कशाप्रकारे ताकीद देतो? (ब) याकोबाने आरशात पाहणाऱ्‍या माणसाविषयी दिलेले उदाहरण आपण कसे लागू करू शकतो?

ख्रिस्ती बांधवांना लिहिलेल्या पत्रात येशूचा सावत्र भाऊ याकोब याने, ऐकून विसरून जाण्याच्या धोक्याविषयी ताकीद दिली. त्याने लिहिले: “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशांत आपले शारीरिक मुख पाहणाऱ्‍या माणसासारखा आहे; तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो, आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो.” (याकोब १:२२-२४) याकोब काय सांगण्याचा प्रयत्न करत होता?

आपण सकाळी उठतो तेव्हा सहसा आरशात स्वतःला पाहतो आणि अधिक चांगले दिसण्यासाठी आपल्याला काही करता येईल का याचा विचार करतो. पण नंतर आपण आपल्या कामाला लागल्यावर आणि आपले लक्ष दुसऱ्‍या गोष्टींत लागल्यावर आरशात काय पाहिले त्याविषयी आपण सहसा विचार करत नाही. आध्यात्मिक बाबतीतही असे घडू शकते. आपण देवाच्या वचनाच्या आरशात पाहतो, तेव्हा आपण कसे आहोत आणि यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो याची आपण तुलना करतो. आपल्या कमतरता आपल्यापुढे स्पष्ट होतात. या ज्ञानामुळे खरे तर आपल्याला आपले व्यक्‍तिमत्त्व अधिक चांगले व्हावे म्हणून बदल करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. पण आपण आपल्या दैनंदिन कामांत किंवा आपल्या समस्यांना तोंड देण्यात व्यग्र होतो तेव्हा आध्यात्मिक गोष्टींविषयी सहसा विचार करत नाही. (मत्तय ५:३; लूक २१:३४) जणू देवाने आपल्याकरता केलेल्या सर्व प्रेमळ कृत्यांचा आपल्याला विसर पडतो. असे घडल्यास आपण पापमय इच्छांना सहज बळी पडू शकतो.

६. बायबलमधील कोणत्या माहितीवर विचार केल्यामुळे यहोवाचे वचन न विसरण्याकरता आपल्याला मदत मिळू शकेल?

प्रेषित पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या प्रेरित पत्रात इस्राएल लोकांनी अरण्यात असताना कशाप्रकारे विसरण्याची प्रवृत्ती प्रकट केली याविषयी सांगितले. पौलाने दिलेल्या माहितीमुळे ज्याप्रकारे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना फायदा झाला त्याचप्रमाणे जर आपण त्याच्या सल्ल्यावर विचार केला तर आपल्यालाही यहोवाचे वचन ऐकून ते विसरून न जाण्याकरता मदत मिळू शकते. त्यासाठी १ करिंथकर १०:१-१२ यावर आपण विचार करू या.

जगिक वासनांचा अव्हेर करा

७. यहोवाच्या प्रेमाचा इस्राएल लोकांना कशाप्रकारे स्पष्ट पुरावा मिळाला होता?

पौलाने इस्राएल लोकांबद्दल जे सांगितले ते ख्रिश्‍चनांकरता एक इशारेवजा उदाहरण आहे. पौलाने असे लिहिले: “बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले; मेघ व समुद्र ह्‍यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला . . . ह्‍या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.” (१ करिंथकर १०:१-४) मोशेच्या काळातील इस्राएल लोकांनी कित्येक मार्गांनी देवाचे सामर्थ्य प्रकट झालेले पाहिले होते; उदाहरणार्थ, देवाचा चमत्कारिक मेघाचा स्तंभ दररोज त्यांना मार्ग दाखवत होता आणि या मेघानेच त्यांना तांबड्या समुद्रातून पलीकडे जाण्यास मदत केली. (निर्गम १३:२१; १४:२१, २२) खरोखर, इस्राएल लोकांना यहोवाच्या प्रेमाचा अगदी स्पष्ट पुरावा मिळाला होता.

८. आध्यात्मिक बाबतीत इस्राएल लोकांच्या विसरण्याच्या वृत्तीमुळे काय परिणाम झाला?

“तरी,” पौल पुढे म्हणतो, “त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता; ह्‍यामुळे त्यांचा रानात नाश झाला.” (१ करिंथकर १०:५) किती दुःखाची गोष्ट! ईजिप्तमधून बाहेर पडलेल्या इस्राएल लोकांपैकी बहुतेकांनी प्रतिज्ञात देशात जाण्यास आपण लायक नसल्याचे दाखवले. त्यांच्या अविश्‍वासामुळे देवाने त्यांचा अव्हेर केला आणि ते अरण्यातच मरण पावले. (इब्री लोकांस ३:१६-१९) यावरून आपण काय शिकू शकतो? पौल म्हणतो: “ह्‍या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या, अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये.”—१ करिंथकर १०:६.

९. यहोवाने आपल्या लोकांकरता कोणत्या तरतुदी केल्या होत्या, पण त्यांनी काय केले?

अरण्यात असताना आध्यात्मिकरित्या जागरूक राहणे इस्राएल लोकांसाठी काही अशक्य नव्हते. यहोवाने त्यांच्यासोबत करार केला होता आणि त्यांचे राष्ट्र यहोवाला समर्पित होते. शिवाय, त्यांच्याकरता याजकगणाची, उपासनेचे केंद्र म्हणून एका दर्शनमंडपाची आणि यहोवाला बलिदाने देण्याची तरतूद करण्यात आली होती. पण या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांविषयी आनंद मानण्याऐवजी देवाच्या भौतिक तरतुदींबद्दल ते असमाधान व्यक्‍त करू लागले.—गणना ११:४-६.

१०. आपण कधीही देवाचा विसर का पडू देऊ नये?

१० अरण्यातील इस्राएल लोकांचा यहोवाने अव्हेर केला पण आज मात्र तो आपल्या लोकांविषयी संतुष्ट आहे. तरीसुद्धा, देवाचा विसर न पडू देण्याची आपण प्रत्येकाने वैयक्‍तिकरित्या काळजी घेणे महत्त्वाचे आहे. असे केल्यामुळे आपली आध्यात्मिक दृष्टी अस्पष्ट करणाऱ्‍या स्वार्थी इच्छांचा अव्हेर करण्यास आपल्याला मदत मिळेल. आपण ‘अभक्‍तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्‍तीने वागण्याचा’ निर्धार केला पाहिजे. (तीत २:१२) आपल्यापैकी जे लोक लहानपणापासून ख्रिस्ती मंडळीत आहेत त्यांनी कधीही असा विचार करू नये, की आपल्याला तर जगातल्या गोष्टींचा आनंद घ्यायला मिळालाच नाही. असे विचार कधी आपल्या मनात आले तर आपण यहोवाची व त्याने आपल्याकरता राखून ठेवलेल्या अद्‌भुत आशीर्वादांची आठवण केली पाहिजे.—इब्री लोकांस १२:२, ३.

यहोवाला पूर्णपणे आज्ञांकित असणे

११, १२. एक व्यक्‍ती मूर्तिपुढे नमन न करताही मूर्तिपूजक कशी ठरू शकते?

११ पौल आपल्याला आणखी एका गोष्टीविषयी सावध करतो: “त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका; लोक खावयाला प्यावयाला बसले, नंतर नाच-तमाशा करावयास उठले असे शास्त्रात लिहिलेले आहे.” (१ करिंथकर १०:७) या ठिकाणी पौल त्या प्रसंगाविषयी बोलत होता, जेव्हा इस्राएल लोकांनी अहरोनला सोन्याचे वासरू बनवायला भाग पाडले. (निर्गम ३२:१-४) अर्थात आपण त्यांच्याप्रमाणे खरोखर मूर्तिपूजा कदाचित करणार नाही पण जर आपण आपल्या स्वार्थी इच्छा-आकांक्षांना, पूर्ण मनाने व जिवाने यहोवाची उपासना करण्यात बाधा बनू दिले तर ही मूर्तिपूजाच ठरेल.—कलस्सैकर ३:५.

१२ दुसऱ्‍या एका ठिकाणी पौलाने काही अशा लोकांविषयी लिहिले ज्यांना आध्यात्मिक गोष्टींऐवजी केवळ भौतिक गोष्टींविषयी काळजी होती. अशा लोकांना त्याने “ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी” म्हटले आणि त्यांच्याविषयी असे लिहिले की “नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत . . . आहे.” (फिलिप्पैकर ३:१८, १९) हे लोक काही कोरीव मूर्तीची पूजा करत नव्हते. पण ते स्वतःच्या शारीरिक स्वार्थांचे भक्‍त होते. अर्थात सगळ्याच इच्छा चुकीच्या नसतात. यहोवाने आपल्याला काही उपजत गरजा दिल्या आहेत आणि वेगवेगळ्या मार्गांनी आनंद उपभोगण्याची क्षमता देखील दिली आहे. पण जे लोक देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधांपेक्षा सुखोपभोगाला जास्त महत्त्व देतात ते निश्‍चितच मूर्तिपूजक ठरतात.—२ तीमथ्य ३:१-५.

१३. सोन्याच्या वासराच्या अहवालावरून आपण काय शिकू शकतो?

१३ ईजिप्त सोडल्यानंतर इस्राएल लोकांनी उपासना करण्याकरता एक सोन्याचे वासरू बनवले. हा अहवाल आपल्याला केवळ मूर्तिपूजेविषयीच सावध करत नाही, तर यात आपल्याकरता आणखी एक महत्त्वाचा धडा आहे. इस्राएल लोकांनी यहोवाच्या सुस्पष्ट मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केले. (निर्गम २०:४-६) पण यहोवा आपला देव असल्याचे त्यांनी नाकारले नव्हते; असे करण्याचा त्यांचा इरादाही नव्हता. उलट त्यांनी त्या ओतीव वासरापुढे बलिदाने दिली आणि तो प्रसंग “परमेश्‍वराप्रीत्यर्थ उत्सव” होता असे म्हटले. देव त्यांच्या आज्ञाभंगाकडे दुर्लक्ष करेल असा विचार करून ते आपलीच फसवणूक करत होते. त्यांनी यहोवाचा अपमान केला आणि यामुळे यहोवा अत्यंत क्रोधित झाला.—निर्गम ३२:५, ७-१०; स्तोत्र १०६:१९, २०.

१४, १५. (अ) ऐकून विसरण्याच्या प्रवृत्तीबद्दल इस्राएल लोकांकडे कोणतीही सबब का नव्हती? (ब) आपण ऐकून विसरणारे न होण्याचा संकल्प केला असल्यास यहोवाच्या आज्ञांच्या संदर्भात आपण काय करू?

१४ यहोवाच्या साक्षीदारांपैकी कोणी क्वचितच खोट्या धर्मात सामील होईल. पण काहीजण मंडळीत राहूनच इतर मार्गांनी यहोवाच्या मार्गदर्शनाचा अव्हेर करण्याची शक्यता आहे. इस्राएल लोकांजवळ त्यांच्या विसराळू प्रवृत्तीकरता कोणतीच सबब नव्हती. त्यांनी दहा आज्ञा ऐकल्या होत्या आणि “तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका; आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका” ही देवाची आज्ञा मोशेने सांगितली होती तेव्हा ते उपस्थित होते. (निर्गम २०:१८, १९, २२, २३) पण तरीही इस्राएल लोकांनी सोन्याच्या वासराची पूजा केली.

१५ आपण जर देवाचे वचन ऐकून ते विसरलो तर आपल्यालाही कोणतीच सबब देता येणार नाही. शास्त्रवचनांत देवाने आपल्याला जीवनातल्या बऱ्‍याच गोष्टींविषयी मार्गदर्शन दिले आहे. उदाहरणार्थ, कोणाकडून पैसे उधार घेऊन ते परत न करणे किती चुकीचे आहे हे यहोवाच्या वचनात स्पष्टपणे सांगितले आहे. (स्तोत्र ३७:२१) मुलांना आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळण्यास सांगण्यात आले आहे आणि पित्यांना आपल्या मुलांना ‘प्रभूच्या शिक्षणात’ वाढवण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (इफिसकर ६:१-४) अविवाहित ख्रिश्‍चनांना “केवळ प्रभूमध्ये” विवाह करण्यास सांगण्यात आले आहे, तर देवाच्या विवाहित सेवकांना असे सांगण्यात आले आहे की “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्‍यांचा न्याय देव करील.” (१ करिंथकर ७:३९; इब्री लोकांस १३:४) जर आपण ऐकून विसरणारे न होण्याचा संकल्प केला असेल, तर देवाच्या या मार्गदर्शक सूचनांकडे आपण गांभिर्याने लक्ष देऊन त्यांचे पालन करू.

१६. सोन्याच्या वासराची उपासना केल्यामुळे काय परिणाम झाले?

१६ इस्राएल लोकांनी आपल्या मनाप्रमाणे यहोवाची उपासना करण्याचा प्रयत्न केला, पण यहोवाने त्यांच्या अशा उपासनेचा स्वीकार केला नाही. उलट ३,००० लोकांचा नाश झाला; कदाचित सोन्याच्या वासराची पुजा करण्याच्या विद्रोही कृत्यात या लोकांची महत्त्वाची भूमिका असेल. या गैरप्रकारात सामील झालेल्या इतरांनाही यहोवाने ताडण केले. (निर्गम ३२:२८, ३५) जे देवाचे वचन वाचतात पण त्यातल्या कोणत्या आज्ञा पाळायच्या हे आपल्या मनाप्रमाणे ठरवू इच्छितात त्यांच्याकरता हा किती अचूक धडा आहे!

“जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा”

१७. पहिले करिंथकर १०:८ यात कोणत्या घटनेचा संदर्भ आहे?

१७ पौलाने जीवनाच्या आणखी एका पैलूचा उल्लेख केला ज्यात शारीरिक इच्छा आध्यात्मिक गोष्टी विसरण्याचे कारण बनू शकतात. “त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये.” (१ करिंथकर १०:८) इस्राएल लोकांचा ४० वर्षांचा अरण्यवास संपण्याच्या बेतात असताना मवाबाच्या मैदानांत घडलेल्या एका घटनेचा पौल या ठिकाणी उल्लेख करतो. इस्राएल लोकांना नुकतेच यहोवाने यार्देनच्या पूर्वेकडील प्रदेशांवर विजय मिळवण्यासाठी साहाय्य केले होते पण तरीसुद्धा त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांना याचे विस्मरण झाले व त्यांनी कृतघ्न मनोवृत्ती दाखवली. प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर असताना ते लैंगिक अनैतिकतेला आणि बआल पौराच्या अशुद्ध उपासनेला बळी पडले. जवळजवळ २४,००० लोकांचा नाश करण्यात आला; यांपैकी १,००० जण, लोकांना वाईट कृत्ये करण्यास प्रवृत्त करणारे होते.—गणना २५:९.

१८. कशाप्रकारच्या आचरणामुळे एखादी व्यक्‍ती लैंगिक अनैतिकतेत फसू शकते?

१८ आज यहोवाचे साक्षीदार उच्च नैतिक आदर्शांचे पालन करणारे म्हणून सुप्रसिद्ध आहेत. पण लैंगिक अनैतिकतेचा मोह येतो तेव्हा काही ख्रिस्ती देवाकडे आणि त्याच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करतात. ते ऐकून विसरणारे झाले आहेत. सुरवातीला कदाचित प्रत्यक्ष जारकर्म करण्याचा मोह एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला होणार नाही. कदाचित हा मोह उत्सुकतेपोटी अश्‍लील चित्रे पाहण्याचा, असभ्य विनोद करण्याचा किंवा विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत केवळ मौजेखातर प्रणयचेष्टा करण्याचा किंवा नैतिकरित्या डळमळीत प्रवृत्तीच्या व्यक्‍तीशी मैत्री वाढवण्याचा असू शकतो. या सर्व गोष्टींनीच काही ख्रिश्‍चनांना पाप करण्यास प्रवृत्त केले आहे.—१ करिंथकर १५:३३; याकोब ४:४.

१९. बायबलमधील कोणता सल्ला आपल्याला ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ’ काढण्यास मदत करतो?

१९ अनैतिक वर्तनात सामील होण्याचा मोह होतो तेव्हा आपण कधीही यहोवाकडे दुर्लक्ष करू नये. उलट आपण त्याच्या वचनात आठवण करून दिलेल्या गोष्टींचे पालन केले पाहिजे. (स्तोत्र ११९:१, २) ख्रिस्ती या नात्याने आपल्यापैकी बहुतेक जण नैतिकरित्या शुद्ध राहण्याचा शक्य तितका प्रयत्न करतात; पण देवाच्या नजरेत योग्य ते करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहण्याची गरज आहे. (१ करिंथकर ९:२७) रोममधील ख्रिस्ती लोकांना पौलाने असे लिहिले: “तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुम्हाविषयी मी आनंद मानतो; तरी जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटाविषयी साधेभोळे असावे, अशी माझी इच्छा आहे.” (रोमकर १६:१९) ज्याप्रकारे २४,००० इस्राएल लोकांना त्यांच्या पापांमुळे नाश करण्यात आले त्याचप्रकारे जारकर्म व इतर दुष्कर्म करणाऱ्‍यांना यहोवाचा न्यायदंड भोगावा लागेल. (इफिसकर ५:३-६) म्हणूनच, ऐकून विसरणारे होण्याऐवजी आपण नेहमी ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ’ काढला पाहिजे.—१ करिंथकर ६:१८.

यहोवाच्या तरतुदींची नेहमी कदर बाळगा

२०. इस्राएल लोकांनी कशाप्रकारे यहोवाची परीक्षा पाहिली आणि याचा काय परिणाम झाला?

२० खऱ्‍या ख्रिश्‍चनांपैकी अधिकांश जण लैंगिक अनैतिकतेच्या मोहाचा यशस्वीपणे प्रतिकार करत आहेत. पण आपण कधीही अशाप्रकारे वागू नये, जेणेकरून आपल्याला कुरकूर करण्याची सवय लागेल आणि त्यामुळे यहोवा आपल्यावर अप्रसन्‍न होईल. पौल आपल्याला सल्ला देतो: “त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका.” (१ करिंथकर १०:९, १०) इस्राएल लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध, एवढेच काय तर देवाविरुद्धही कुरकुर केली; यहोवाने चमत्कारिकरित्या पुरवलेल्या मान्‍नाला त्यांनी तुच्छ लेखले. (गणना १६:४१; २१:५) त्यांच्या जारकर्मामुळे यहोवा त्यांच्यावर जितका क्रोधित झाला होता त्यापेक्षा तो त्यांच्या कुरकुर करण्यामुळे काही कमी क्रोधित झाला का? बायबल सांगते, की कुरकुर करणारे बरेचजण सर्पदंशाने मारले गेले. (गणना २१:६) या आधी एका प्रसंगी कुरकुर करणाऱ्‍या १४,७०० बंडखोरांचा नाश करण्यात आला होता. (गणना १६:४९) तेव्हा, आपण कधीही यहोवाच्या तरतुदींचा अनादर करून त्याच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नये.

२१. (अ) पौलाला कोणता आग्रहाचा उपदेश लिहिण्यास प्रेरित करण्यात आले? (ब) याकोब १:२५ अनुसार आपण खरा आनंद कसा मिळवू शकतो?

२१ सह विश्‍वासू बांधवांना लिहिताना पौलाने वरील सर्व इशारेवजा सूचना लिहिल्यानंतर शेवटी असे लिहिले: “ह्‍या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रत येऊन पोहंचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” (१ करिंथकर १०:११, १२) इस्राएल लोकांप्रमाणे आपल्यालाही यहोवाकडून असंख्य आशीर्वाद मिळाले आहेत. पण त्यांच्याप्रमाणे आपण कधीही देवाने आपल्याकरता केलेल्या चांगल्या गोष्टी विसरून, कृतघ्न मनोवृत्ती दाखवू नये. जीवनात दबाव येतात तेव्हा आपण त्याच्या वचनात सापडणाऱ्‍या अद्‌भुत प्रतिज्ञांवर मनन करावे. आणि यहोवासोबत असलेल्या आपल्या मोलवान नातेसंबंधाची नेहमी आठवण ठेवून त्याने आपल्याला सोपवलेले राज्य प्रचाराचे कार्य करत राहावे. (मत्तय २४:१४; २९:१९, २०) असे केल्यामुळे निश्‍चितच आपल्याला जीवनात खरा आनंद मिळेल कारण शास्त्रवचनांत असे अभिवचन देण्यात आले आहे, की “जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यांत धन्यता [“आनंद,” NW] मिळेल.”—याकोब १:२५.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपण कशामुळे ऐकून विसरणारे होण्याची शक्यता आहे?

• देवाला पूर्णपणे आज्ञांकित राहणे का महत्त्वाचे आहे?

• आपण कशाप्रकारे ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढू’ शकतो?

• यहोवाच्या तरतुदींच्या संदर्भात आपली कशी मनोवृत्ती असावी?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

यहोवाने इस्राएल लोकांकरता केलेल्या महत्कृत्यांचा त्यांना विसर पडला

[१६ पानांवरील चित्र]

उच्च नैतिक आदर्शांनुसार आचरण करण्याचा यहोवाच्या लोकांचा निर्धार आहे