हेष्मोनी व त्यांनी बहाल केलेला वारसा
हेष्मोनी व त्यांनी बहाल केलेला वारसा
येशू या पृथ्वीवर होता तेव्हा यहुदी धर्म अनेक गटांत विभाजित झालेला होता आणि लोकांना आपल्याकडे ओढण्यासाठी या सर्व गटांमध्ये चढाओढ सुरू होती. शुभवर्तमानांच्या अहवालांतून आणि पहिल्या शतकातील यहुदी इतिहासकार जोसीफस याच्या लिखाणावरूनही त्या काळातील यहुदी धर्मजगताचे हेच चित्र उभे राहते.
परूशी व सदूकी या दोन गटांना त्या काळात बरेच वजन होते. येशू मशीहा असल्याचे अमान्य करण्यास लोकांना भाग पाडण्याइतपत त्यांचा लोकमतावर प्रभाव होता. (मत्तय १५:१, २; १६:१; योहान ११:४७, ४८; १२:४२, ४३) पण, इब्री शास्त्रवचनांत मात्र या दोन प्रभावशाली गटांचा कोठेही उल्लेख आढळत नाही.
जोसीफसने सा.यु.पू. दुसऱ्या शतकाच्या संदर्भात माहिती देताना सदूकी व परूशी लोकांचा पहिल्यांदा उल्लेख केला. या काळादरम्यान बरेच यहुदी, हेल्लेणी अर्थात ग्रीक संस्कृती व तत्त्वज्ञानाकडे आकर्षित होऊ लागले होते. हेल्लेणी व यहुदी यांच्यातील संघर्ष वाढत गेला आणि शेवटी सेल्युसिडी राजांनी जेरूसलेम येथील मंदिर भ्रष्ट करून ते झ्यूसला समर्पित केले तेव्हा हा संघर्ष कळसास पोचला. मग हेष्मोनी कुळातील ज्यूडा मॅकबी नावाच्या एका झंझावाती यहुदी नेत्याच्या नेतृत्वाखाली यहुद्यांनी बंड केले आणि ग्रीक लोकांच्या हातून जेरूसलेम येथील मंदिराचा ताबा परत मिळवला. *
मॅकबींच्या यशस्वी बंडानंतरच्या वर्षांत यहुदी समाजात प्रतिस्पर्धी तत्त्ववाद मांडण्याची वृत्ती वाढू लागली; हे सर्व प्रतिस्पर्धी गट जास्तीतजास्त यहुदी लोकांना आपल्या कह्यात घेण्याकरता चढाओढ करू लागले. पण अशी ही वृत्ती का जन्मास आली? यहुदी धर्मात इतके मतभेद का निर्माण झाले? या प्रश्नांच्या उत्तराकरता हेष्मोनी लोकांच्या इतिवृत्तावर नजर टाकू या.
वाढती स्वतंत्र वृत्ती आणि मतभेद
यहोवाच्या मंदिरातील उपासना पुन्हा सुरू करण्याचे धार्मिक ध्येय गाठल्यानंतर, ज्यूडा मॅकबी राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्याच्या मागे जाणाऱ्या बऱ्याच यहुद्यांनी त्याची साथ सोडली. पण त्याने मात्र सिल्युसिडी राजांविरुद्ध आपला संघर्ष जारी ठेवला, रोमसोबत एक करार केला आणि स्वतंत्र यहुदी राज्याची स्थापना करण्याचा प्रयत्न करू लागला. लढाईत ज्यूडाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे भाऊ जॉनथन आणि सायमन यांनी संघर्ष पुढे सुरू ठेवला. सिल्युसिडी राजांनी सुरवातीला मॅकबी लोकांशी जोरदार संघर्ष केला पण कालांतराने ते हातमिळवणी करण्यास तयार झाले आणि यामुळे हेष्मोनी भावांना काही अंशी राजकीय स्वातंत्र्य देऊ केले.
याजकांचे घराणे असूनही हेष्मोन्यांच्या कुळातील कोणीही अद्याप महायाजकपदी सेवा केलेली नव्हती. बऱ्याच यहुद्यांच्या मते हे पद केवळ, शलमोनाने महायाजकपदी नेमलेल्या सादोकच्या कुळातील याजकांनाच दिले जाणे १ राजे २:३५; यहेज्केल ४३:१९) जॉनथनने संघर्ष व राजकारणाचा उपयोग करून स्वतःस महायाजक नेमण्याकरता सिल्युसिड राजांना भाग पाडले. पण जॉनथनच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ सायमन याने तर त्याहीपेक्षा अधिक यश मिळवले. सा.यु.पू. १४० च्या सप्टेंबर महिन्यात जेरूसलेममध्ये एक महत्त्वाचा जाहीरनामा काढण्यात आला. ब्रॉन्झच्या पाट्यांवर ग्रीक शैलीत लिहिलेल्या या जाहीरनाम्याचा मजकूर असा होता: “राजा डिमिट्रिअस [ग्रीक सिल्युसिड राजा] याने त्याला [सायमनला] महायाजकपदी नेमले आहे, त्याला आपली मैत्री बहाल केली आहे आणि त्याला बहुमानित केले आहे. . . . यहुद्यांनी व त्यांच्या याजकांनी असा निश्चय केला आहे की विश्वसनीय संदेष्टा येईपर्यंत सायमनच आता त्यांचा कायमचा नेता व महायाजक राहील.”—१ मक्काबी १४:३८-४१ (अपॉक्रिफा यात समावेश असलेले एक ऐतिहासिक पुस्तक).
योग्य होते. (अशारितीने सायमनला व त्याच्या वंशजांनाही विदेशी सिल्युसिड सत्ताधिकाऱ्यांनीच नव्हे तर त्याच्या स्वतःच्या लोकांतील “मोठ्या मंडळीने” देखील शासक व महायाजक म्हणून स्वीकारले. हे एक लक्षणीय पाऊल होते. इतिहासकार एमिल शूरर यांनी म्हटल्याप्रमाणे, हेष्मोन्यांचे राजकीय घराणे सुस्थापित होताच “त्यांचे मुख्य ध्येय पूर्वीप्रमाणे, तोरहचे [यहुदी नियमशास्त्र] पालन करणे नव्हे तर स्वतःच्या राजकीय सत्तेची रक्षा आणि वाढ करणे हे बनले.” पण यहुदी लोकांच्या भावना दुखवण्याच्या भीतीने सायमन स्वतःला “राजा” म्हणवण्याऐवजी “एथनार्क” किंवा “लोकनेता” म्हणवत असे.
हेष्मोन्यांची धार्मिक व राजकीय मक्तेदारी सर्वांना भावली नाही. बऱ्याच विद्वानांच्या मते, याच काळादरम्यान कुम्रान समाजाचा उदय झाला. कुम्रान लिखाणांत “धार्मिकतेचा शिक्षक” असे ज्याच्याविषयी म्हटले होते तो सादोकच्या कुळातील कोणी एक याजक होता असे लोक मानायचे. या याजकाने जेरूसलेम सोडले व त्याने एका विद्रोही गटाला मृत समुद्रावाटे यहुदी वाळवंटात नेले. मृत समुद्रात सापडलेल्या गुंडाळ्यांपैकी एक हबक्कूकच्या पुस्तकावर केलेले भाष्य आहे. यात एका ‘दुष्ट याजकाची’ निंदा करण्यात आली आहे ‘ज्याला सुरवातीला सत्याचे नाव देण्यात आले होते; पण नंतर इस्राएलवर राज्य करू लागल्यावर तो गर्विष्ठ झाला.’ बऱ्याच विद्वानांच्या मते कुम्रान लिखाणात उल्लेख केलेल्या या ‘दुष्ट याजकाचे’ वर्णन जॉनथन किंवा सायमन यांच्याशी जुळते.
आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी सायमनने संघर्ष सुरूच ठेवला. पण त्याचे राज्य अचानक संपुष्टात आले. आपल्या दोन मुलांसोबत जेरिकोजवळ एका ठिकाणी मेजवानीचा आनंद लुटत असताना टॉलमी या त्याच्या जावयाकडून त्याचा व त्याच्या दोन मुलांचा देखील वध करण्यात आला. पण सत्ता हाती घेण्याचा टॉलमीचा हा डाव फसला. सायमनचा तिसरा मुलगा जॉन हरकॅनस याला आपलाही वध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना मिळाली. त्याने कपटाने आपला वध करू पाहणाऱ्यांना ताब्यात घेतले आणि आपल्या वडिलांची सत्ता व महायाजकपद हाती घेतले.
राज्याचा विस्तार आणि जुलूम
सुरवातीला जॉन हरकॅनस याला सिरियन सैन्याकडून आक्रमण होण्याची भीती होती, पण मग सा.यु.पू. १२९ साली सिल्युसिड राजांचे घराणे पार्थियन सैन्याविरुद्ध झालेल्या झुंजार युद्धात पराभूत झाले. या युद्धामुळे सिल्युसिड राजांवर काय परिणाम झाला याविषयी यहुदी विद्वान मेनहेम स्टर्न यांनी असे लिहिले: “त्यांच्या राज्याची सबंध संरचनाच खिळखिळी झाली.” अशारितीने, हरकॅनसने “यहुदाला पूर्णार्थाने राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिले आणि तो आपले राज्यक्षेत्र वेगवेगळ्या दिशांनी वाढवण्याचा प्रयत्न करू लागला.” असे करण्यात त्याला यशही आले.
सिरियाकडून आता कोणताही धोका नसल्यामुळे हरकॅनसने यहुदाच्या बाहेरील क्षेत्रांवर आक्रमण करून ते आपल्या ताब्यात घेण्यास सुरवात केली. या क्षेत्रांतील रहिवाशांना यहुदी धर्म पत्करण्यास भाग पाडले जायचे, अन्यथा त्यांच्या संपूर्ण शहराचा सर्वनाश केला जायचा. एकदा इडुमियन्स (एडोमाइट्स) लोकांविरुद्ध हरकॅनसने अशीच एक मोहीम हाती घेतली. याविषयी स्टर्न यांनी सांगितले: “इडुमियन्सचे धर्मांतर म्हणजे पूर्वी कधी न घडलेला प्रकार होता कारण त्यांच्या जातीच्या दोनचार लोकांचे नव्हे तर त्यांच्या संपूर्ण जातीचेच धर्मांतर झाले.” हरकॅनसने हस्तगत केलेल्या इतर प्रदेशांपैकी एक होता समेरिया; येथे हरकॅनसने गेरझिम पर्वतावरील समॅरिटन लोकांचे मंदिर जमीनदोस्त केले. हेष्मोनी घराण्याने चालवलेल्या या जबरदस्तीच्या धर्मांतरातील विसंगतीविषयी इतिहासकार सॉलमन ग्रेझल यांनी असे लिहिले: “मथ्थायसचाच [ज्यूडा मॅकबीचे वडील] एक नातू, त्याच्याच घराण्याच्या पूर्वीच्या पिढीने प्राणपणाने रक्षण केलेल्या तत्त्वाचे—धार्मिक स्वातंत्र्याचे धडधडीत उल्लंघन करत होता.”
परुशी व सदूकी यांचा उदय
हरकॅनसच्या राज्याविषयी लिहितानाच जोसीफस पहिल्यांदा परूशी व सदूकींच्या वाढत्या प्रभावाचा उल्लेख करतो. (अर्थात जॉनथनच्या राज्यादरम्यान हयात असलेल्या परूश्यांचा जोसीफसने याआधी उल्लेख केला होता.) पण त्यांच्या मुळारंभाविषयीचे त्याने वर्णन केले नाही. काही विद्वानांच्या मते ते हसिदिम पंथातून उदयास आले असतील. हसिदिम या श्रद्धाळू पंथाच्या लोकांनी ज्यूडा मॅकबीच्या धार्मिक ध्येयपूर्तीकरता त्याला पाठिंबा दिला पण जेव्हा राजकीय महत्त्वाकांक्षेने त्याला झपाटले तेव्हा मात्र त्यांनी त्याला सोडून दिले.
परूशी हे नाव “अलिप्त राहणारे” या अर्थाच्या मूळ इब्री शब्दापासून आले आहे असे सामान्यतः मानले जाते. अर्थात काहींच्या मते या शब्दाचा संबंध “भाषांतरकार” या शब्दाशी आहे. परूशी हे कोणत्या विशेष कुळातले नव्हे तर सामान्य लोकांपैकीच असलेले विद्वान होते. खास पवित्रतेच्या तत्त्वज्ञानाने त्यांनी स्वतःला धर्मपालनातील अशुद्धतेपासून अलिप्त केले. मंदिरात याजकांना पाळाव्या लागणाऱ्या पवित्रतेच्या नियमांचे त्यांनी दैनंदिन जीवनात पालन करण्यास सुरवात केली. परूशांनी शास्त्रवचनांचे विश्लेषण करण्याची एक नवी पद्धत निर्माण केली; याच संकल्पनेला नंतर मौखिक नियम म्हणण्यात आले. सायमनच्या राज्यात त्यांना गेरूसिया (वडील पुरुषांचे मंडळ) यावर नेमण्यात आले तेव्हा त्यांचा प्रभाव अधिकच वाढला; गेरूसियालाच नंतर सन्हेद्रिन म्हणण्यात आले.
जोसीफस सांगतो की हरकॅनस सुरवातीला केवळ परूशांचा एक विद्यार्थी व समर्थक होता. पण आपल्या महायाजकपदाचा त्याग न करण्याबद्दल एकदा परूशांनी त्याची टीका केली. यानंतर त्याच्या भूमिकेत लक्षणीय बदल झाला. हरकॅनसने परूशांच्या धार्मिक विधींना नियमबाह्य ठरवले. त्यांची शिक्षा अधिकच तीव्र करण्यासाठी त्याने परूशांच्या धार्मिक विरोधकांशी अर्थात सदूक्यांशी संगनमत केले.
सदूकी हे नाव कदाचित महायाजक सादोक याच्याशी संबंधित असावे; त्याचे वंशज शलमोनाच्या काळापासून याजकपदी होते. पण सर्व सदूकी या कुळाचे नव्हते. जोसीफसच्या मते, सदूकी हे यहुदातील उमराव व धनिक होते व त्यांना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा नव्हता. प्राध्यापक शिफमन असे म्हणतात: “यांपैकी बहुतेकांनी . . . याजक किंवा महायाजकांच्या घराण्यांतील सोयरीक केलेली होती.” अशारितीने सत्ताधीशांसोबत त्यांची पूर्वीपासूनच जवळीक होती. त्यामुळे, परूशांचे समाजातले वाढते वर्चस्व व दैनंदिन जीवनात याजकांप्रमाणे पावित्र्य राखण्याची त्यांची संकल्पना यांमुळे सदूक्यांचे प्रतिपादित वर्चस्व नाहीसे होईल असे मानले जाऊ लागले होते. पण आता हरकॅनसच्या शेवटल्या काही वर्षांत सदूक्यांनी पुन्हा वर्चस्व मिळवले.
वाढते राजकारण आणि कमी होत चाललेली धर्मनिष्ठा
हरकॅनसचा सर्वात थोरला मुलगा ॲरिस्टोब्युलस हा केवळ एक वर्ष राज्य करून मरण पावला. त्याने देखील इटुरियन लोकांच्या बाबतीत जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे धोरण पत्करले आणि गालीलचे वरील क्षेत्र हेष्मोन्यांच्या ताब्यात आणले. पण सा.यु.पू. १०३ ते सा.यु.पू. ७६ पर्यंत राज्य करणारा त्याचा भाऊ ॲलेक्झँडर जनेअस याच्या राज्याचा काळ हेष्मोनी घराण्याच्या सत्तेचा सुवर्णकाळ ठरला.
ॲलेक्झँडर जनेअस याने पूर्वीचे धोरण रद्द करून स्वतःला याजक व राजा *
घोषित केले. हेष्मोनी व परूशी यांच्यातील संघर्ष वाढत गेला आणि शेवटी मुलकी युद्ध होऊन त्यात ५०,००० यहूदी मृत्यूमुखी पडले. बंडखोरांचे प्रयत्न निष्फळ केल्यानंतर, इतिहासात मूर्तिपूजक राजांनी केल्याप्रमाणे, जनेअस याने त्या बंडखोरांपैकी ८०० जणांना वधस्तंभावर खिळले. ते शेवटला श्वास घेत असतानाच त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या बायकामुलांची निर्घृण कत्तल करण्यात आली. दरम्यान जनेअस मात्र आपल्या दास्यांसोबत मेजवानीचा आनंद लुटत होता.जनेअस याचे परूशांशी वैमनस्य असले तरीसुद्धा तो अतिशय संधीसाधू राजकारणपटू होता. त्याने पाहिले की परूशांना लोकांचे वाढते समर्थन मिळू लागले होते. मृत्यूशय्येवर असताना जनेअसने आपली पत्नी सलोमी ॲलेक्झांड्रा हिला परूशांसोबत मिळून राज्य करण्याची आज्ञा दिली. आपल्या मुलांऐवजी त्याने आपल्या पत्नीला आपल्या राज्याची वारसदार म्हणून निवडले होते. तिने स्वतःला एक अतिशय कार्यक्षम शासक असल्याचे शाबित केले. हेष्मोन्यांच्या सबंध राज्यकाळात तिची कारकीर्द (सा.यु.पू. ७६-६७) राष्ट्राकरिता शांतीमय काळांपैकी एक ठरली. परूशांना आपले हरवलेले वर्चस्व पुन्हा बहाल करण्यात आले आणि त्यांच्या धार्मिक विधींवर प्रतिबंध लावणारे कायदे रद्द करण्यात आले.
सलोमीचा मृत्यू झाल्यानंतर तिचे दोन पुत्र, म्हणजे, महायाजकपदी सेवा केलेला हरकॅनस दुसरा व ॲरिस्टोब्युलस दुसरा एकमेकांसोबत सत्तेसाठी संघर्ष करू लागले. पण दोघांजवळही त्यांच्या पूर्वजांसारखी राजकीय व लष्करी सूक्ष्मदृष्टी नव्हती आणि सिल्युसिड राज्याचे संपूर्ण पतन झाल्यानंतर त्या प्रदेशातील वाढत्या रोमी प्रभावाचे काय परिणाम होऊ शकतील हे त्या दोघांनाही कळले नाही असे दिसते. सा.यु.पू. ६३ साली दोघा भावांनी रोमन शासक पॉम्पे, डमॅस्कस येथे आला असताना त्याची भेट घेऊन त्यांच्यात मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्याच वर्षी पॉम्पे व त्याच्या सैन्याने जेरूसलेमवर आक्रमण करून त्यावर कब्जा केला. हेष्मोनी राज्याच्या समाप्तीची ही सुरवात होती. सा.यु.पू. ३७ साली जेरूसलेमवर इडुमियन राजा हेरोद द ग्रेट याने विजय मिळवला; त्याला रोमन सिनेटने “यहुदाचा राजा” आणि “रोमी लोकांचा मित्र” म्हणून स्वीकारले होते. अशारितीने हेष्मोनी राज्याचा अंत झाला.
हेष्मोन्यांनी बहाल केलेला वारसा
ज्यूडा मॅकबी पासून ॲरिस्टोब्युलस दुसरा याच्या राज्यापर्यंत हेष्मोन्यांच्या सबंध राज्यकाळात, येशू पृथ्वीवर असताना यहुदी समाजातील जी विभाजित धार्मिक स्थिती होती तिचा जणू पाया घालण्यात आला. हेष्मोन्यांना सुरवातीला देवाच्या उपासनेबद्दल खूप आवेश होता पण नंतर ते आपलाच स्वार्थ साधण्यामागे लागून भ्रष्ट झाले. त्यांचे याजक खरे तर लोकांमध्ये ऐक्य निर्माण करून त्यांना देवाचे नियमशास्त्र पाळण्यास प्रेरित करू शकत होते. पण त्याउलट त्यांनी लोकांना राजकीय संघर्षाच्या खाईत लोटले. या वातावरणात धार्मिक मतभेद फोफावले. एव्हाना, हेष्मोनी इतिहासजमा झाले होते पण आता हेरोदच्या आणि रोमच्या नियंत्रणाखाली आलेल्या यहुदी राष्ट्रात सदूकी, परूशी व इतर गटांत धार्मिक मक्तेदारीसाठी संघर्ष सुरूच राहणार होता.
[तळटीपा]
^ टेहळणी बुरूजच्या नोव्हेंबर १५, १९९८ अंकातील “मक्काबी कोण होते?” हा लेख पाहा.
^ मृत समुद्रातील गुंडाळ्यांपैकी “नहूमवरील भाष्य” नावाच्या एका गुंडाळीत “माणसांना फाशीवर जिवंत लटकवणाऱ्या क्रोधिष्ट सिंहाचा उल्लेख आहे;” कदाचित हा उल्लेख वरील घटनेच्या संदर्भात असावा.
[३० पानांवरील तक्ता]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
हेष्मोनी राजघराणे
ज्यूडा मॅकबी जॉनथन मॅकबी सायमन मॅकबी
↓
जॉन हरकॅनस
↓ ↓
सलोमी ॲलेक्झँड्रा—विवाहित—ॲलेक्झँडर जनेअस ॲरिस्टोब्युलस
↓ ↓
हरकॅनस दुसरा ॲरिस्टोब्युलस दुसरा
[२७ पानांवरील चित्र]
ज्युडा मॅकबी याला स्वतंत्र यहुदी राज्य स्थापन करायचे होते
[चित्राचे श्रेय]
The Doré Bible Illustrations/Dover Publications, Inc.
[२९ पानांवरील चित्र]
आपले राज्य वाढवून गैर यहुदी शहरांवर ताबा मिळवण्यासाठी हेष्मोन्यांचा संघर्ष
[चित्राचे श्रेय]
The Doré Bible Illustrations/Dover Publications, Inc.