आम्ही यहोवाची प्रतीती पाहिली
जीवन कथा
आम्ही यहोवाची प्रतीती पाहिली
पॉल स्क्रिबनर यांच्याद्वारे कथित
“गुड मॉर्निंग मिसेस स्टॅकहाऊस. मी ईस्टर केकची ऑर्डर घ्यायला आलोय. तुम्हालासुद्धा केक हवा असेल.” ते १९३८ चं वर्षं होतं. वसंत ऋतू नुकताच सुरू झाला होता. मी अमेरिकेच्या न्यू जर्सीतील ॲट्को येथे जनरल बेकिंग कंपनीसाठी सेल्स करताना आमच्या एका जुन्या ग्राहकाशी बोलत होतो. पण, मिसेस स्टॅकहाऊसने मला चक्क नकार दिला; मला आश्चर्यच वाटले.
त्या म्हणाल्या, “आम्हाला केक नकोय. आम्ही ईस्टर साजरा करत नाही.”
काय? ईस्टर साजरा करत नाही? मला हे जरा विचित्रंच वाटलं. पण विक्रीतंत्राचा पहिला नियम हा आहे की, ग्राहक जे काही सांगतो ते मान्य करावे कारण ग्राहकाचे म्हणणे नेहमी बरोबर असते. मग आता काय करायचं? तरीही मी आणखी थोडा प्रयत्न करून पाहिला, “मॅडम, केक खूपच छान आहे आणि आमचा माल किती चांगला असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही ईस्टर साजरा करत नसला तरी हरकत नाही, पण मुलांना आणि साहेबांना केक नक्की आवडेल!”
त्या पुन्हा म्हणाल्या, “नाही, खरंच नको. पण मि. स्क्रिबनर बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा विचार करत होते, आणि आज मला ही चांगली संधी मिळाली आहे.” मिसेस स्टॅकहाऊस यांनी त्यादिवशी मला जे सांगितले, ते ऐकल्यावर माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली! त्या न्यू जर्सीतील यहोवाच्या साक्षीदारांच्या बर्लिन मंडळीच्या सदस्या होत्या; ईस्टरचा सण कसा सुरू झाला हे सांगून त्यांनी मला तीन पुस्तिका दिल्या. त्यांची शीर्षके होती, सेफटी, अन्कव्हर्ड आणि प्रोटेक्शन. त्या पुस्तिका घेऊन मी घरी गेलो; त्यांच्याबद्दल मला जिज्ञासा होती पण मनातल्या मनात थोडी भीतीही वाटत होती. मिसेस स्टॅकहाऊसचे बोलणे मला लहानपणी कुठेतरी ऐकल्यासारखे वाटत होते.
बायबल विद्यार्थ्यांशी अगदी पूर्वीचा संपर्क
माझा जन्म जानेवारी ३१, १९०७ रोजी झाला. १९१५ साली मी आठ वर्षांचा असताना माझे वडील कॅन्सरमुळे मरण पावले. त्यामुळे, आई आणि मी, मॅसच्युसेट्समधील मॉल्डन येथे आईच्या माहेरी, आजीआजोबांबरोबर त्यांच्या मोठ्या घरी राहायला गेलो. माझे मामा बेन्जमिन रॅन्सम हेसुद्धा आपल्या पत्नीसोबत तेथेच तिसऱ्या मजल्यावर राहायचे. २० वे शतक सुरू होण्याआधीपासूनच बेन मामांचा आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांसोबत (त्या वेळी यहोवाच्या साक्षीदारांना या नावाने ओळखले जाई) संपर्क होता. मला बेन मामा खूप आवडायचे, पण माझ्या आजोळी सगळे मेथोडिस्ट असल्यामुळे ते त्यांना वेडे समजायचे. काही वर्षांनी, मामीने त्यांना घटस्फोट देण्याआधी, त्यांच्या धार्मिक विश्वासांमुळे काही काळासाठी वेड्यांच्या दवाखान्यात दाखल केले! पण बेन मामांची मानसिक स्थिती ठीक आहे हे तेथील डॉक्टरांना कळताच त्यांनी त्यांची माफी मागून त्यांना घरी पाठवले.
बेन मामा मला आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांच्या बॉस्टन येथे भरवल्या जाणाऱ्या सभांना घेऊन जात असत; विशेषतः, दुसऱ्या ठिकाणाहून कोणी वक्ते येणार असले किंवा काही खास सभा असली तर ते निश्चित मला सोबत न्यायचे. एकदा तर, चार्ल्झ टेझ रस्सल यांचे भाषण होते; त्या काळी, बंधू चार्ल्स प्रचाराच्या कार्याची देखरेख करत असत. दुसऱ्या एका खास प्रसंगी, “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” दाखवला जात होता. ही १९१५ ची घटना आहे; तरीपण त्यामधील, अब्राहाम इसहाकाला अर्पण करण्यासाठी डोंगरावर घेऊन जातानाचे ते दृश्य मला आजही स्पष्टपणे आठवते. (उत्पत्ति, अध्याय २२) यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून, अब्राहाम आणि इसहाक लाकडांची मोळी घेऊन डोंगर चढताना मला अजूनही दिसतात. मला वडील नसल्यामुळे त्या चित्राचा माझ्या मनावर खोलवर प्रभाव पडला होता.
मग, बेन मामा आणि मामी, मेन येथे राहायला गेले; आईनंसुद्धा पुन्हा लग्न केलं. त्यामुळे आमचं कुटुंब न्यू जर्सीत राहायला गेलं. त्यानंतर, खूप वर्षांपर्यंत बेन मामांशी माझी गाठ पडलीच नाही. मी किशोर वयात असताना, माझी भेट मेरियन नेफ्फ हिच्याशी झाली; तिचे कुटुंब प्रेस्बिटेरियन होतं आणि तिला सात भावंड होती. त्यांच्या घरी जायला मला खूप आवडायचं. रविवारी संध्याकाळी एकतर मी त्यांच्याकडे नाहीतर त्यांच्या चर्चच्या युथ ग्रुपमध्ये जायचो; शेवटी मी देखील प्रेस्बिटेरियन बनलो. पण, बायबल विद्यार्थ्यांच्या सभांमध्ये शिकलेल्या काही गोष्टी माझ्या मनात घर करून राहिल्या. मेरियन आणि माझा विवाह १९२८ साली झाला. आम्हाला १९३५ साली डोरिस व १९३८ साली लुईस अशा दोन मुली झाल्या. आमची एक मुलगी नुकतीच चालू लागली आणि दुसरी अद्याप तान्ही होती तेव्हा आपल्या कुटुंबाला आध्यात्मिक मार्गदर्शन मिळालं पाहिजे असं आम्हा दोघांनाही वाटू लागलं.
त्या पुस्तिकांमध्ये सत्य मिळालं
मेरियन आणि मला कोणत्या तरी चर्चचे सदस्य व्हायचे होते. त्यामुळे आम्ही दोघांनी असं ठरवलं, की आळीपाळीने एकाने एक रविवारी घरी राहून मुलींची काळजी घ्यायची आणि दुसऱ्याने चर्च शोधायचे. एकदा, मेरियनची घरी राहायची पाळी होती; पण मी घरी राहून मुलींची काळजी घ्यायला तयार झालो कारण मला मिसेस स्टॅकहाऊसने दिलेली पहिली पुस्तिका, सेफटी वाचून काढायची होती. मी ती वाचायला सुरवात केली तर मला ती खाली ठेवावीशी वाटेच ना! कोणत्याही चर्चमध्ये मला मिळणार नाही अशी माहिती मला मिळाली आहे याची मला अधिकाधिक खात्री पटू लागली. दुसऱ्या आठवडीसुद्धा असेच झाले; आणि मी दुसरी पुस्तिका, अन्कव्हर्ड ही वाचण्यासाठी घरी राहून मुलींची काळजी घ्यायला तयार होतो. त्यातली माहिती मला जरा ओळखीची वाटली. बेन मामांचा
देखील हाच विश्वास होता का? आमच्या कुटुंबाला तर वाटलं होतं की, त्यांचा धर्म विचित्र आहे. मेरियनला कळाल्यावर तिला काय वाटेल? पण मला काळजी करायचं काहीच कारण नव्हतं. कारण अन्कव्हर्ड ही पुस्तिका वाचून दोन-चार दिवसांनंतर मी कामाहून घरी परतलो तर मेरियन स्वतःच मला म्हणाली, “तुम्ही आणलेल्या त्या पुस्तिका मी वाचल्या. खूपच छान वाटल्या मला.” ते ऐकून मला आश्चर्य वाटलं आणि बरंही वाटलं!त्या पुस्तिकांच्या मागच्या बाजूला, नुकतेच प्रकाशित झालेल्या एनीमीझ या पुस्तकाची माहिती दिली होती; त्या पुस्तकात खोट्या धर्माची जोरदार शब्दांत टीका केली होती. आम्ही ते पुस्तक मागवायचं ठरवलं. पण, पत्र लिहिण्याआधीच, एका साक्षीदारानं आमचं दार ठोठावलं आणि तेच पुस्तक आम्हाला सादर केलं. त्यानंतर, आम्ही चर्चमध्ये जायचं बंद केलं आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यू जर्सीतील कॅमडेन येथील सभांना जाऊ लागलो. काही महिन्यांनंतर, रविवारी जुलै ३१, १९३८ तारखेला आम्ही जवळजवळ पन्नास-एक जण सिस्टर स्टॅकहाऊसच्या (त्याच घरात मी ईस्टर केक विकायला आलो होतो) बागेत जमून, जज रदरफोर्ड यांचे रेकॉर्ड केलेले बाप्तिस्म्याचे भाषण ऐकले. मग आम्ही त्यांच्या घरात कपडे बदलले व आम्हापैकी १९ जणांनी जवळच्या एका ओढ्यात बाप्तिस्मा घेतला.
पायनियर बनण्याचा दृढनिश्चय
माझ्या बाप्तिस्म्यानंतर लगेचच, एका बहिणीने मला पायनियरांविषयी सांगितले; ते लोक, मुख्यतः प्रचाराचेच कार्य करतात असे ती म्हणाली. माझी जिज्ञासा वाढली आणि त्यानंतर, मला एक कुटुंब भेटले ज्यांच्या घरात सगळेच पायनियर होते. बंधू कॉनिग हे वृद्ध बांधव, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी हे सगळेजण जवळच्या एका मंडळीत पायनियर होते. कॉनिग परिवाराला सेवाकार्यात किती आनंद मिळतो हे पाहून मी खूप प्रभावित झालो कारण त्या वेळी मीसुद्धा लहान मुलींचा पिता होतो. मी सहसा माझ्या बेकरीची गाडी त्यांच्या घराजवळ थांबवायचो आणि त्यांच्यासोबत घरोघरच्या सेवाकार्यात भाग घ्यायचो. मलाही यांच्यासारखं पायनियर बनावंसं वाटू लागलं. पण कसं बनणार? आमच्या दोन्ही मुली अद्याप लहानच होत्या, शिवाय, माझ्या कामाचा बोजासुद्धा वाढू लागला होता. युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि अमेरिकेतील अधिकाधिक तरुण लोक सैन्यात भरती होऊ लागले तसे आमच्यासारख्या नागरी सेवेतील लोकांवर अधिकच काम पडू लागले. मला विक्रीसाठी इतरही ठिकाणी जायला सांगण्यात येऊ लागले; त्यामुळे माझ्या अशा कामामुळे मला कधीच पायनियरींग करता येणार नाही हे मला ठाऊक होतं.
मला पायनियरींग करायची इच्छा आहे असे मी बंधू कॉनिग यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले: “यहोवाच्या सेवेत फक्त परिश्रम करत राहा आणि प्रार्थनेमध्ये तुमचं ध्येय सारखं सांगत राहा. तो नक्की तुम्हाला ते ध्येय गाठायला मदत करील.” एक वर्षभर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे करत राहिलो. मत्तय ६:८ सारख्या वचनांवर मी सतत मनन करत राहायचो. त्यामध्ये आपल्याला असे आश्वासन दिले आहे, की आपण यहोवाला काही मागण्याआधीच त्याला आपल्या गरजा ठाऊक असतात. शिवाय, मत्तय ६:३३ मधील सल्ला मी पाळायचा प्रयत्न करत राहिलो; तेथे म्हटले आहे की, प्रथम देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा. तेव्हाचे झोन सर्व्हंट (आता ज्यांना विभागीय पर्यवेक्षक म्हटले जाते) बंधू मेलव्हिन विंचेस्टर यांनीही मला खूप उत्तेजन दिले.
मी मेरियनला माझ्या ध्येयांविषयी सांगितलं. आम्ही दोघं, मलाखी ३:१० या वचनाबद्दल बोललो; त्या वचनात देव असे म्हणतो की, मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्यावर वर्षितो की नाही याविषयी तुम्ही माझी प्रतीती पाहा. शेवटी, मेरियनच्या उत्तराने मला प्रोत्साहन मिळाले; ती म्हणाली: “तुम्हाला पायनियरींग करायची असेल तर माझ्यासाठी थांबून राहू नका. तुम्ही पायनियरींग करत असताना मी मुलींची काळजी घेईन. नाहीतरी, आपल्याला पैशांची जास्त काही गरज नाही.” आमच्या लग्नाला १२ वर्षं झाली असल्यामुळे मेरियन कशी काटकसरीने व जपून घर चालवते याचा मला प्रत्यय आलाच होता. गेल्या कित्येक वर्षांपासून पायनियरींगमध्ये तिने मला पूर्ण साथ दिली आहे; आमच्या जवळजवळ ६० वर्षांच्या पूर्ण-वेळेच्या सेवेत आम्ही टिकून राहिलो कारण थोडक्यात समाधानी राहून आपल्याला भरपूर मिळाले आहे असे समजून जगण्याची मेरियनची वृत्ती होती.
सन १९४१ च्या उन्हाळ्यापर्यंत, अनेक महिने प्रार्थनापूर्वक योजना करून मेरियन आणि मी काही पैसे साठवले; मग आमच्या कुटुंबाला राहण्यासाठी ५.५ मीटरचा एक ट्रेलर आम्ही घेतला. मी माझी नोकरी सोडून दिली, १९४१ साली सामान्य पायनियर बनलो आणि तेव्हापासून आतापर्यंत पूर्ण-वेळेच्या सेवेत राहिलो आहे. माझ्या पहिल्या नेमणुकीत, न्यू जर्सी व सेंट लुई, मिसुरीच्या दरम्यान असलेल्या मार्ग ५० वरील दहा स्टॉप्स मला देण्यात आले; तेथेच ऑगस्टच्या सुरवातीला आमचे अधिवेशन भरवले जाणार होते. त्या परिसरातील बांधवांची नावे व पत्ते मला देण्यात आले आणि मी त्यांना पत्राद्वारे तेथे कधी पोहंचणार ते कळवले. अधिवेशनात गेल्यावर मला पायनियर विभाग शोधून दुसरी नेमणूक घ्यायची होती.
‘मी यहोवाची प्रतीती पाहणार’
आम्ही आमच्या लहानशा ट्रेलर गाडीत साहित्य भरले आणि आमच्या बांधवांचा निरोप घ्यायला कॅमडेन येथील शेवटल्या सभेला गेलो. काही बांधवांना आमचा हा निर्णय विचित्र वाटला असावा कारण आमच्या दोन लहान मुली होत्या आणि अधिवेशनानंतर आम्ही नेमके कोठे जाणार हे देखील आम्हाला ठाऊक नव्हतं. पुष्कळजण तर आम्हाला असेही म्हणाले: “तुम्ही पुन्हा इथंच याल.” मी त्यांना म्हणालो: “मी येणार नाही असं म्हणत नाहीये. पण यहोवाने माझी काळजी घेण्याचं वचन दिलंय आणि मी त्याची प्रतीती पाहणार आहे.”
मॅसेच्यूसेट्सपासून मिसिसिप्पीपर्यंत २० नगरांमध्ये ६० वर्षे पायनियरींग केल्यावर आम्ही म्हणू शकतो की, यहोवाने आपले वचन निश्चितच पाळले आहे. मेरियनवर, माझ्यावर आणि आमच्या मुलींवर त्याने आशीर्वादांचा असा वर्षाव केला आहे की, १९४१ साली मी त्यांची अपेक्षाही केली नव्हती. आमच्या मुली जवळपासच्या मंडळ्यांमध्ये विश्वासू पायनियर आहेत आणि अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर आमची जवळजवळ शंभरएक (शेवटल्या वेळी मोजल्याप्रमाणे) आध्यात्मिक
मुलं-मुली आहेत. हे त्यांपैकीचे काही आशीर्वाद आहेत. मी अभ्यास घेतलेल्या ५२ लोकांनी आणि मेरियनने अभ्यास घेतलेल्या ४८ लोकांनी यहोवा देवाला आपले जीवन समर्पित केले.ऑगस्ट १९४१ साली, आम्ही सेंट लुई येथे गेलो आणि तेथे मला बेथेलचे बंधू टी. जे. सल्लीव्हन भेटले. त्यांच्याजवळ माझ्या नियुक्तीचे पत्र होते; त्याची मी वाटच पाहत होतो कारण युद्ध सुरू होण्याच्या बेतात होते आणि लोकांना सैन्यात भरती केले जात होते. मी बंधू सल्लीव्हन यांना म्हणालो, ‘माझी पत्नीसुद्धा माझ्याइतके तास भरते म्हणून तिला पण माझ्याबरोबर पायनियरींग करायला आवडेल.’ त्या अधिवेशनात पायनियर विभाग अद्याप बनलेला नव्हता तरीसुद्धा बंधू सल्लीव्हन यांनी त्याच क्षणी मेरियनला पायनियर म्हणून नियुक्त केले. मग त्यांनी आम्हाला विचारलं: “अधिवेशनानंतर तुम्ही कुठं पायनियरींग करणार?” आम्हाला तर काहीच ठाऊक नव्हतं. ते म्हणाले: “काळजी करू नका. अधिवेशनात तुम्हाला जरूर कोणी तरी भेटेल ज्यांना त्यांच्या भागात पायनियरांची गरज आहे. आणि सगळंकाही ठीक होईल. आम्हाला फक्त तुम्ही कुठं आहात ते पत्राने कळवा आणि आम्ही तुम्हाला नेमणूक देऊ.” आणि अगदी तसंच घडलं. पूर्वी झोन सर्व्हंट असलेले बंधू जॅक डवीट, यांना व्हर्जिनियातील न्यू मार्केट येथे काहीजण ठाऊक होते ज्यांच्याजवळ पायनियर गृह होते आणि त्यांना अधिक पायनियरांची आवश्यकता होती. त्यामुळे, अधिवेशन संपल्यावर आम्ही थेट न्यू मार्केटला रवाना झालो.
न्यू मार्केटला गेल्यावर आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आमच्यासोबत पायनियरींग करायला फिलडेल्फियावरून कोण आले असावेत? बेन्जमीन रॅन्सम! होय, बेन मामा. बॉस्टनमध्ये माझ्या हृदयात सत्याचे बीज त्यांनीच पेरले होते; आता २५ हून अधिक वर्षांनंतर त्यांच्यासोबत घरोघरच्या प्रचारकार्यात काम करायला मला किती आनंद झाला म्हणून सांगू! बेन मामांना कित्येक वर्षे कुटुंबाकडून उपेक्षा, उपहास आणि छळसुद्धा सहन करावा लागला; पण त्यांनी यहोवा आणि त्याच्या सेवेबद्दल आपले प्रेम मुळीच कमी होऊ दिले नाही.
न्यू मार्केट येथील पायनियर गृहात आम्ही आठ महिने राहिलो. या काळादरम्यान, साहित्याच्या मोबदल्यात कोंबड्या आणि अंडी घेणे अशा अनेक गोष्टी आम्ही शिकलो. त्यानंतर, बेन मामा, मेरियन आणि मला तसेच आमच्यासोबत इतर तीन जणांना, पेन्सिल्व्हानियातील हानोव्हर येथे खास पायनियर म्हणून नेमण्यात आले; १९४२ ते १९४५ दरम्यान पेन्सिल्व्हानियात मिळालेल्या सहा नेमणुकींपैकी ती आमची पहिली नेमणूक होती.
दुसऱ्या महायुद्धादरम्यानचे खास पायनियर
दुसऱ्या महायुद्धादरम्यान अनेकदा आम्हाला आमच्या तटस्थतेमुळे विरोधाचा सामना करावा लागला पण यहोवाने आम्हाला कधीच सोडले नाही. एकदा मॅसेच्यूसेट्समधील प्रोव्हिन्सटाऊन येथे आमची जुनी ब्यूईक गाडी बंद पडली. मला एका पुनर्भेटीला जायचे होते; तेव्हा मला कॅथलिकांच्या एका परिसरातून पुष्कळ किलोमीटर चालत जावे लागले; येथील कॅथलिक खूप विरोध करायचे. वाटेत काही टवाळखोर तरुण उभे होते; त्यांना पार करून मी पुढे गेलो पण त्यांनी मला ओळखले आणि ते ओरडू लागले. त्यांनी माझ्यावर दगडं फेकायला सुरवात केली; पण मी भरभर पावले टाकत पुढे चालत राहिलो. या तरुणांनी माझा पाठलाग करू नये एवढीच मी प्रार्थना करत होतो. कसाबसा मी त्या आस्थेवाईक गृहस्थाच्या घरापर्यंत सुखरूप पोहंचलो. तो गृहस्थ अमेरिकन लिजनचा माननीय सदस्य होता. पण मला पाहिल्यावर त्याने खंत व्यक्त करत म्हटले: “आज आम्ही पिक्चर पाहायला चाललो म्हणून मी तुमच्यासोबत बसू शकणार नाही. आणि तुम्हाला मी हे सांगायलाच विसरून गेलो.” हे ऐकून मी एकदम निराश झालो कारण माझ्यावर दगडं फेकणाऱ्या व माझी वाट पाहत थांबलेल्या त्या टपोऱ्या मुलांची मला आठवण झाली; ते माझ्या परतण्याची वाट पाहात थांबले होते. पण त्या गृहस्थाने म्हटले: “वाटल्यास, तुम्ही आमच्यासोबत चालत येऊ शकता. आपण वाटेतच चर्चा करू या.” हे ऐकून मला खूप हायसे वाटले. अशाप्रकारे, मी त्या गृहस्थाला साक्ष देऊ शकलो आणि त्या परिसरातून सहीसलामत बाहेर पडलो.
कुटुंबाची जबाबदारी आणि सेवाकार्य
युद्धानंतर, व्हर्जिनियात आम्हाला पुष्कळ नेमणुका मिळाल्या; यात, शॉर्लेट्सविले येथे आठ वर्षे राहून खास आणि सामान्य पायनियर कार्य केल्याचाही समावेश आहे. १९५६ पर्यंत आमच्या मुली मोठ्या झाल्या होत्या आणि त्यांची लग्नंसुद्धा झाली होती. मेरियन आणि मी पुन्हा एकदा प्रवास करू लागलो. आम्ही व्हर्जिनियातील हॅरिसनबर्ग येथे पायनियरींग केली आणि उत्तर कॅरोलायनातील लिंकलटन येथे खास पायनियरींग केली.
सन १९६६ मध्ये, मला विभागीय कार्यात नेमण्यात आले आणि मग मी एका मंडळीहून दुसऱ्या मंडळीत प्रवास करून बंधू विंचेस्टरने १९३० च्या दशकात न्यू जर्सीत मला जसे उत्तेजन दिले होते तसेच बांधवांना उत्तेजन देऊ लागलो. दोन वर्षे मी टेनेस्सी येथील मंडळ्यांच्या एका विभागात सेवा केली. त्यानंतर, मेरियन आणि मला पुन्हा खास पायनियरींग करायला
सांगण्यात आले; आम्हा दोघांना तर खास पायनियरींग आधीपासूनच खूप आवडत होते. १९६८ पासून १९७७ पर्यंत आम्ही दक्षिण अमेरिकेतील जॉर्जिया व मिसिसिप्पी येथील अनेक ठिकाणी खास पायनियरींग केले.जॉर्जियातील ईस्टमन येथे, मला, पॉवेल कर्कलंड यांच्या जागी मंडळीचा पर्यवेक्षक (सध्याचे अध्यक्षीय पर्यवेक्षक) नेमण्यात आले कारण अनेक वर्षे विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा केलेल्या या प्रिय बांधवाची प्रकृती ढासळत चालली होती. आम्ही त्यांचा भार हलका केल्याबद्दल त्यांनी आमचे खूप आभार मानले आणि आम्हाला सहकार्यही दिले. त्यांच्या सहकार्याची आम्हाला विशेष गरज होती कारण मंडळीत काही कलह निर्माण झाले होते आणि त्यात मंडळीतले काही प्रमुख जण गोवलेले होते. हा खूप मोठा वादविषय झाला आणि याविषयी मी यहोवाला पुष्कळदा प्रार्थना केली. नीतिसूत्रे ३:५, ६ सारख्या शास्त्रवचनांची मला आठवण झाली: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” परंतु मनमोकळेपणाने चर्चा करण्याचा प्रयत्न करून शेवटी मंडळीत आम्ही ऐक्य आणू शकलो आणि याचा सर्वांसाठी चांगला परिणाम झाला.
१९७७ सालापर्यंत, आम्हाला म्हातारपण जाणवू लागलं आणि आम्हाला पुन्हा शॉर्लेट्सविले भागात नेमण्यात आलं; तिथंच आमच्या दोन्ही मुली आपापल्या कुटुंबांसमवेत राहत होत्या. गेली २३ वर्षं आम्ही या भागात कार्य केले, तेथे रकर्सविले, व्हर्जिनिया मंडळी सुरू करायला मदत केली आणि
आमच्या आधीच्या बायबल विद्यार्थ्यांची मुले व नातवंडे मोठी होऊन मंडळीत वडील, पायनियर व बेथेल सदस्य बनलेले पाहिले. मेरियन आणि माझा क्षेत्र सेवेचा नित्यक्रम अद्यापही चांगला राहिला आहे; तसेच मला शॉर्लेट्सविलेच्या ईस्ट मंडळीत वडील म्हणून सेवा करण्याचा, पुस्तक अभ्यास चालवण्याचा आणि जाहीर भाषणे देण्याचा बहुमान मिळाला आहे.गेल्या वर्षांदरम्यान इतरांप्रमाणे आम्हालाही समस्या आल्या आहेत. उदाहरणार्थ, आम्ही प्रयत्न करूनही डॉरिस काही काळासाठी तिच्या किशोरवयात आध्यात्मिकरित्या कमजोर झाली आणि तिने साक्षीदार नसलेल्या एका माणसाशी विवाह केला. पण तरी, यहोवाबद्दल तिचे प्रेम ती पूर्णपणे कधीच विसरली नाही; तिचा मुलगा बिल गेल्या १५ वर्षांपासून न्यूयॉर्क येथील वॉल्किल बेथेलमध्ये सेवा करत आहे. डॉरिस आणि लुईस या दोघीही आता विधवा आहेत; तरीही जवळपासच त्या दोघीही सामान्य पायनियरींग करत आहेत.
या सर्व वर्षांदरम्यान मिळालेले धडे
यहोवाची सेवा करण्यात यशस्वी व्हायचे असल्यास काही साधे नियम पाळायला मी शिकलो आहे; जसे की, आपले जीवन साधेसुधे ठेवा. आपल्या वागण्यात आणि खाजगी जीवनातही एक आदर्श व्हा. सर्व बाबतीत, ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ दिलेल्या सूचना पाळा.—मत्तय २४:४५.
मेरियनने मुलांचे संगोपन करून यशस्वीरित्या पायनियरींग करण्यासाठी एक लहानच परंतु प्रभावशाली सूचना यादी तयार केली आहे: आपल्याला जमण्यासारखा आराखडा बनवा आणि तो पाळा. आपले पायनियर सेवाकार्यच आपले करियर आहे असे माना. स्वास्थ्यपूर्ण आहार घ्या. चांगला आराम घ्या. मनोरंजनाच्या बाबतीत अती करू नका. सत्य आणि सेवाकार्यातील सर्व पैलू आपल्या मुलांसाठी आनंददायक बनवा. आपल्या मुलांना क्षेत्र सेवा आवडेल असे करा.
आता आम्ही वयाची नव्वद वर्षं पार केली आहेत. स्टॅकहाऊस यांच्या बगीच्यात बाप्तिस्म्याचे भाषण ऐकून बासष्ट वर्षं उलटली आहेत आणि आम्ही पूर्ण-वेळेच्या सेवेत ६० वर्षं पूर्ण केली आहेत. मेरियन आणि मी मनापासून असं म्हणू शकतो की, आमच्या जीवनातून आम्हाला पूर्ण समाधान मिळालं. आध्यात्मिक ध्येयांना प्रथम स्थान देऊन ती ध्येये प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मला तरुण पिता असताना देण्यात आलेल्या सल्ल्याची मी खरोखर कदर बाळगतो; तसंच माझी प्रिय पत्नी, मेरियन आणि माझ्या मुलींनी मला साथ दिल्याबद्दलही मी त्यांचा आभारी आहे. आम्ही फार श्रीमंत नाही; तरीपण उपदेशक २:२५ (पं.र.भा) येथील शब्द मी नेहमी स्वतःला लागू करतो: “माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील, अथवा कोण अधिक सुखाचा उपभोग घेईल?”
आमच्या बाबतीत, यहोवाने मलाखी ३:१० प्रमाणे आपले वचन खरोखर पूर्ण केले आहे. त्याने आम्हावर अगदी ‘जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद वर्षवला’ आहे!
[२९ पानांवरील चौकट/चित्र]
युद्धकाळातील आठवणी
युद्धाला सुमारे ६० वर्षं होऊन गेली आहेत, तरी कुटुंबातल्या सर्वांनाच त्याच्या आठवणी आहेत.
डॉरिस म्हणते, “पेन्सिल्व्हानियात कधीकधी खूप थंडी पडायची. एकदा रात्री -३५ डिग्री सेल्सियस तापमान होतं.” लुईस म्हणते, “डॉरिस आणि मी, आमचे पाय गार पडू नयेत म्हणून आमच्या ब्युईक गाडीच्या मागच्या सीटवर एकमेकींच्या पायांवर आळीपाळीने बसायचो.”
डॉरिस म्हणते, “आम्ही गरीब आहोत, आम्हाला काही मिळत नाही असं आम्हाला कधीच वाटलं नाही. आम्ही इतरांपेक्षा जास्त प्रवास करतो हे आम्हाला ठाऊक होतं तरीपण खाण्याच्या आणि कपड्यांच्या बाबतीत आम्हाला कधीच काही कमी पडलं नाही; आमचे कपडे आम्हाला ओहायोतील आमच्या ओळखीच्या लोकांकडून (ज्यांच्या मुली आमच्यापेक्षा जरा मोठ्या होत्या) पाठवले जायचे तरीसुद्धा ते नवीनच असायचे.”
लुईस सांगते, “आईवडिलांचं प्रेम आणि प्रशंसा आम्हाला कधीच उणी पडली नाही. त्यांच्याबरोबर आम्ही सेवाकार्यातही खूप वेळ खर्च करू शकलो. त्यामुळे आम्ही कोणीतरी खास आहोत आणि त्यांचे लाडके आहोत असं आम्हाला वाटायचं.”
पॉल म्हणतात, “माझी गाडी १९३६ सालची ब्युईक स्पेशल मॉडेल होती आणि त्या गाड्यांचे ॲक्सेल नेहमी तुटायचे. मला वाटतं त्या गाडीचं इंजिन जरा जास्त शक्तिशाली होतं. आणि हे ॲक्सल ज्या दिवशी सर्वात जास्त थंडी असेल हमखास त्याच दिवशी रात्रीच्या वेळी तुटायचं, आणि मग मला जंकयार्डमधून (जेथे सगळ्या बिघडलेल्या गाड्या ठेवल्या जातात) दुसरं ॲक्सल आणायला जावं लागायचं. ॲक्सल बदलण्यात तर मी एकदम पटाईत झालो.”
मेरियन म्हणतात, “रेशन कार्डाची गंमत तर आम्हाला कधीच विसरता येणार नाही. पूर्वी सगळंकाही रेशनवर मिळायचं—मटण, पेट्रोल, गाडीचे टायर वगैरे. नवीन नेमणूक मिळाली की आम्ही अधिकाऱ्यांकडे जायचो आणि नवीन रेशन कार्डासाठी अर्ज भरायचो. पण रेशन कार्ड मिळायला कधी कधी महिने लागायचे. आणि प्रत्येक वेळी असंच व्हायचं, की रेशन कार्ड मिळाल्यावर आमची नेमणूक बदलायची. मग पुन्हा अर्जापासून सुरवात. पण यहोवानं नेहमी आमची काळजी घेतली.”
[चित्र]
मेरियन, मी, डॉरिस (डावीकडे) आणि लुईस, २००० साली
[२५ पानांवरील चित्र]
मी ११ वर्षांचा असताना, १९१८ मध्ये आईसोबत
[२६ पानांवरील चित्र]
लुईस, मेरियन आणि डॉरिससोबत १९४८ साली; त्या वेळी मुलींचा बाप्तिस्मा झाला
[२६ पानांवरील चित्र]
आमच्या लग्नाचा फोटो, ऑक्टोबर १९२८
[२६ पानांवरील चित्र]
माझ्या मुली (एकदम डावीकडे आणि एकदम उजवीकडे) आणि मी, यँकी स्टेडियम येथे १९५५ साली