बहुतेक तरुण विचारात घेत नाहीत असे एक पुस्तक
बहुतेक तरुण विचारात घेत नाहीत असे एक पुस्तक
“बायबल हे खरोखर देवाचं पुस्तक आहे हे मी कसं मानू? मला हे पुस्तक वाचावंसं वाटत नाही.” बीट नावाच्या एका तरुणीचे हे उद्गार आहेत.
बीट राहते त्या जर्मनीत बहुतेक तरुण असाच विचार करतात; म्हणून बायबल वाचनाला ते फार महत्त्व देत नाहीत. तेथे अलीकडे घेतलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले, की अंदाजे १ टक्के तरुण सहसा बायबल वाचतात, २ टक्के तरुण पुष्कळदा वाचतात, १९ टक्के कधीतरी वाचतात आणि जवळजवळ ८० टक्के तरुण कधीच वाचत नाहीत. इतर देशांमध्ये किंवा तुमच्या देशातही कदाचित हीच गत असेल. यावरून, स्पष्ट दिसून येते की, बहुतेक तरुणांना बायबलच्या मार्गदर्शनाची गरज वाटत नाही.
म्हणूनच, तरुण लोक बायबलविषयी अजाण आहेत. २००० सालाच्या सुरवातीला लाउझिट्स रुंटशाउ या वृत्तपत्राने, किती लोकांना दहा आज्ञा ठाऊक आहेत आणि कितीजण मार्गदर्शनार्थ त्यांचा उपयोग करतात या संदर्भात घेतलेल्या सर्वेक्षणाचे वृत्त प्रकाशित केले होते. वयाची साठी पार केलेल्या पिढीतील ६७ टक्के लोकांना या आज्ञा ठाऊक होत्या आणि ते त्यांचे पालन करत होते; परंतु, अद्याप तिशी पार न केलेल्यांमध्ये असे फक्त २८ टक्के लोक होते. होय, बहुतेक तरुण लोकांना देवाच्या वचनाबद्दल फारशी माहिती नाही.
काहींचा वेगळा दृष्टिकोन
दुसऱ्या बाजूला पाहता, जगभरात असे लाखो तरुण आहेत ज्यांना देवाचे वचन अत्यंत मौल्यवान असल्याचे समजले आहे. उदाहरणार्थ, १९ वर्षांचा ॲलेक्झांडर दररोज सकाळी कामाला जाण्याआधी बायबल वाचतो. तो म्हणतो, “दिवसाची सुरवात करण्याचा यापेक्षा दुसरा उत्तम मार्ग असेल असं मला वाटत नाही.” सँड्रा दररोज संध्याकाळी बायबलचा काही भाग न चुकता वाचायचा प्रयत्न करते. ती म्हणते, “माझ्या नित्यक्रमाचा हा भाग बनला आहे.” तसेच १३ वर्षांच्या युल्याला दररोज रात्री झोपण्याआधी बायबलचा एक अध्याय वाचण्याची सवय आहे. “मला तर ते खूप आवडतं आणि ही सवय मला कधीही तोडायची नाही.”
कोणता दृष्टिकोन तुम्हाला योग्य आणि सुज्ञपणाचा वाटतो? बायबल खरोखर वाचन करण्यालायक आहे का? तरुण पिढीसाठी ते मूल्यवान आणि महत्त्वाचे आहे का? तुम्हाला काय वाटते?