खरी उपासना लोकांमध्ये एकी आणते
खरी उपासना लोकांमध्ये एकी आणते
सहसा, धर्मामुळे लोकांमध्ये भेदभाव निर्माण होतात; परंतु, एकाच खऱ्या देवाच्या उपासनेत लोकांमध्ये एकता निर्माण करण्याची शक्ती आहे. इस्राएल हे देवाचे निवडलेले राष्ट्र होते तेव्हा अनेक प्रामाणिक अंतःकरणाचे विदेशी लोक खऱ्या उपासनेकडे आकर्षित झाले होते. उदाहरणार्थ, मवाब येथील आपल्या मूळ देशातील देव-देवतांना सोडून रूथ नामीला म्हणाली: “तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.” (रूथ १:१६) सा.यु. पहिल्या शतकापर्यंत, बरेच विदेशी खऱ्या देवाचे उपासक बनले होते. (प्रेषितांची कृत्ये १३:४८; १७:४) नंतर, येशूचे प्रेषित जेव्हा दूर देशांमध्ये सुवार्ता घेऊन गेले तेव्हा खऱ्या देवाची उपासना करण्यात प्रामाणिक अंतःकरणाचे इतर लोकही एकत्र आले. प्रेषित पौलाने लिहिले: ‘जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे वळाला.’ (१ थेस्सलनीकाकर १:९) आज खऱ्या देवाच्या उपासनेमध्ये लोकांना एकत्र आणण्याची शक्ती आहे का?
टीकाकारांचा असा अट्टाहास आहे की, “खरे उपासक” किंवा “खरा देव” असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांना सत्य जाणून घेण्याचा कसलाही मार्ग ठाऊक नसल्यामुळे असे वाटत असावे. पण विविध पार्श्वभूमीतील सत्याचा शोध घेणाऱ्यांना हे कळून चुकले आहे, की उपासना ही कोणत्याही व्यक्तीच्या मर्जीनुसार करता येत नाही. उपासना मिळण्यास पात्र असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे सर्व गोष्टींचा निर्माता, यहोवा देव. (प्रकटीकरण ४:११) तो खरा देव आहे आणि त्याची उपासना कशी केली जावी हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्याला आहे.
त्याच्या अपेक्षा आपल्याला समजावण्यासाठी यहोवाने त्याच्या वचनातून अर्थात बायबलमधून माहिती पुरवली आहे. आज पृथ्वीवर जवळजवळ प्रत्येकाला बायबल किंवा त्याचे काही भाग प्राप्त करणे शक्य आहे. शिवाय, देवाच्या पुत्राने म्हटले: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर . . . तुम्हाला सत्य समजेल.” (योहान ८:३१, ३२) यास्तव, सत्य समजून घेणे शक्य आहे. विविध धार्मिक पार्श्वभूमीतील प्रामाणिक अंतःकरणाचे लाखो लोक या सत्याचा धैर्याने स्वीकार करत आहेत आणि खऱ्या उपासनेत एकत्र येत आहे.—मत्तय २८:१९, २०; प्रकटीकरण ७:९, १०.
जागतिक एकता आपल्या काळात!
सफन्याच्या बायबल पुस्तकातल्या एका उल्लेखनीय भविष्यवाणीत विविध पार्श्वभूमीतील लोक एकत्र येतील असे म्हटले आहे. त्यात म्हटले आहे: “मी [यहोवा देव] राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने करितील.” (सफन्या ३:९) स्वतःमध्ये परिवर्तन करून देवाची एकतेने सेवा करणाऱ्या लोकांचे हे दृश्य किती मनोरम आहे!
हे केव्हा घडणार होते? सफन्या ३:८ म्हणते: “परमेश्वर म्हणतो, मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा कारण राष्ट्रे एकत्र जमवावी, राज्ये एकत्र मिळवावी; त्यांवर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पाडावा हा माझा निश्चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.” होय, यहोवा राष्ट्रांना एकत्र करतो परंतु त्यांच्यावर आपला संतप्त क्रोध पाडण्याआधी तो पृथ्वीच्या लीन जनांना शुद्ध वाणी देतो. तो काळ आताच आहे कारण हर्मगिद्दोन येथे सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी सर्व राष्ट्रांना गोळा करण्याचे काम केव्हाचे चालू झाले आहे.—प्रकटीकरण १६:१४, १६.
आपल्या लोकांना एकत्र आणण्याकरता यहोवा त्यांना शुद्ध वाणी देतो. ही नवीन भाषा, देवाविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी बायबलमधील सत्याची योग्य समज आहे. शुद्ध वाणी बोलण्याचा अर्थ, सत्यावर विश्वास ठेवणे, त्याविषयी इतरांना शिकवणे आणि देवाच्या नियमांच्या व तत्त्वांच्या एकवाक्यतेत जगणे. तसेच भेदभाव निर्माण करणारे राजकारण झिडकारणे आणि या जगाचे गुणलक्षण असलेला जातीयवाद, फूट पाडणारा राष्ट्रीयवाद यांसारख्या स्वार्थी मनोवृत्ती मनातून काढून टाकणे. (योहान १७:१४; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) सत्याविषयी प्रेम असलेल्या सर्व प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना ही भाषा शिकता येते. आधीच्या लेखात उल्लेखिलेल्या पाच व्यक्तींचे उदाहरण पाहा. एकेकाळी त्यांच्यात धार्मिकदृष्ट्या किती दुरावा होता पण आता ते एकच खरा देव, यहोवा याची एकतेने उपासना करतात.
खऱ्या उपासनेत ते संयुक्त आहेत
आवेशी रोमन कॅथलिक असलेल्या फीदेल्याने आपल्या मुलीच्या शाळेतल्या पाठासाठी बायबल विकत आणले तेव्हा आपल्या पाच मेलेल्या बाळांचे काय झाले हे त्यातून समजवण्यासाठी तिने पाळकांना सांगितले. ती म्हणते, “पण, माझी केवढी निराशा झाली!” यहोवाच्या साक्षीदारांनी तिला भेट दिली तेव्हा तिने त्यांनाही तोच प्रश्न विचारला. मृतांची काय स्थिती आहे याविषयी आपल्याच बायबलमधून वाचल्यावर चर्चने आपल्याला कसे फसवले हे तिला दिसून आले. मृतांना काहीच कळत नाही, त्यामुळे लिंबो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ते यातना भोगत नाहीत हे तिला माहीत झाले. (स्तोत्र १४६:४; उपदेशक ९:५) फीदेल्याने आपल्या सर्व धार्मिक मूर्ती काढून टाकल्या, चर्चला जायचे सोडून दिले आणि बायबलचा अभ्यास करायला सुरवात केली. (१ योहान ५:२१) गेल्या दहा वर्षांपासून इतरांना शास्त्रवचनांतील सत्य शिकवण्याचा आनंद तिला मिळाला आहे.
मुळात काठमांडुची असणारी तारा, दुसऱ्या एका देशात राहायला गेली; तेथे फार कमी हिंदू मंदिरे होती. मग, आपल्या आध्यात्मिक गरजांचे समाधान करण्याच्या आशेने ती एका मेथोडिस्ट चर्चला जाऊ लागली. परंतु, मानवांना दुःख का सहन करावे लागते या तिच्या प्रश्नाला तेथेही उत्तर मिळाले नाही. मग यहोवाच्या साक्षीदारांनी तिला भेट दिली आणि तिच्यासोबत बायबलचा अभ्यास करायची तयारी दर्शवली. तारा म्हणते: “मला हे कळाले की, प्रीतीचा देव जगामधील सर्व दुःखाला जबाबदार असू शकत नाही . . . शांती आणि एकतेचे नवीन जग येईल या आशेविषयी जाणून मला फार आनंद झाला.” (प्रकटीकरण २१:३, ४) ताराने आपल्या सर्व हिंदू मूर्ती टाकून दिल्या, आपल्या मायदेशातील धार्मिक परंपरा सोडून दिल्या आणि यहोवाची साक्षीदार बनून इतरांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यामध्ये तिला खरा आनंद मिळाला.
पान्या या बौद्ध व्यक्तीला यहोवाच्या साक्षीदारांनी प्रथम बँकॉक येथे भेट दिली तेव्हा तो ज्योतिषी होता. त्यामुळे, बायबलमधील भविष्यवाण्यांकडे तो आकर्षित झाला. पान्या म्हणतो: “निर्माणकर्त्याच्या मूळ उद्देशापेक्षा सध्याची परिस्थिती वेगळी का आहे आणि त्याला व त्याचा सर्वाधिकार नाकारणाऱ्यांनी केलेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याने कशी व्यवस्था केली आहे हे कळाल्यावर मला असे वाटले, जणू माझ्या डोळ्यांवरचा पडदा काढून टाकण्यात आला आहे. बायबलच्या संदेशामध्ये किती सामंजस्य होते. एक खरी व्यक्ती म्हणून यहोवावर माझे प्रेम वाढू लागले; यामुळे मला जे योग्य वाटत होते ते आचरण्यास मला प्रेरणा मिळाली. इतरांनाही मानवी बुद्धी आणि दैवी बुद्धी यांच्यातील फरक दाखवायला मी उत्सुक होतो. खऱ्या बुद्धीने माझे जीवन खरोखर बदलून टाकले आहे.”
कालांतराने, व्हर्जलला त्याच्या धार्मिक विश्वासांविषयी शंका वाटू लागली. त्यामुळे, देवाने काळ्या लोकांना आणि त्यांच्या संघटनेला (जी व्हर्जलच्या मते जातीय भेदभाव मानणारी संघटना असून गोऱ्या लोकांबद्दल द्वेष निर्माण करत होती) मदत करावी अशी प्रार्थना करण्याऐवजी त्याने जे काही सत्य असेल व ते जेथे कोठे असेल त्यासाठी प्रार्थना केली. व्हर्जल म्हणतो, “देवाला अशी कळकळीने प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी उठलो तेव्हा मला घरात एक टेहळणी बुरूज मासिक दिसले . . . कुणीतरी ते दाराच्या खालून आत सरकवले असावे.” लवकरच, यहोवाच्या साक्षीदारांसोबत तो बायबलचा गहन अभ्यास करू लागला. तो पुढे म्हणतो: “माझ्या जीवनात पहिल्यांदा मला समाधान मिळालं. . . . मला आशेचा किरण दिसू लागला.” व्हर्जल लवकरच त्या लोकांमध्ये सामील झाला जे देवाचे वचन अर्थात बायबलमधील
एकमेव खरी आशा इतरांना देतात.लॅटिन अमेरिकेच्या चारोला आपल्या लहान मुलांना सांभाळायला फार कठीण जात असल्याचे पाहून ग्लॅडिस नावाची एक साक्षीदार बहीण तिला बाजारहाटासाठी मदत करू लागली तेव्हा चारो फार प्रभावित झाली. ग्लॅडिसने, चारोला सादर केलेला मोफत गृह बायबल अभ्यास तिने कालांतराने स्वीकारला. सर्व चांगले लोक स्वर्गात जात नाहीत परंतु यहोवा पृथ्वीवरही लोकांना सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद देईल हे स्वतःच्याच बायबलमधून पाहिल्यावर चारोला आश्चर्य वाटले. (स्तोत्र ३७:११, २९) गेल्या १५ वर्षांपासून चारो इतरांना ही आशा सांगत आहे.
कल्पना करा, एकच खऱ्या देवाची अर्थात यहोवाची एकजुटीने उपासना करणाऱ्या प्रामाणिक लोकांनी सबंध पृथ्वी व्यापली आहे! हे केवळ स्वप्न नाही. हे वचन यहोवाने दिले आहे. सफन्या संदेष्ट्याद्वारे देवाने म्हटले: “मी तुजमध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवितील. . . . [ते] काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखांत कपटी जिव्हा आढळावयाची नाही; . . . कोणी त्यांस भेवडावणार नाही.” (सफन्या ३:१२, १३) या अभिवचनाबद्दल तुम्हालाही कुतूहल वाटत असल्यास, बायबलमधील या प्रोत्साहनाकडे लक्ष द्या: “देशांतील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो, त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”—सफन्या २:३.