वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
यहोवाने अब्राहामाशी ऊर येथे करार केला की हारान येथे?
यहोवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचा सर्वात पहिला वृत्तान्त उत्पत्ति १२:१-३ येथे वाचायला मिळतो; तेथे म्हटले आहे: “परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा; मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; . . . तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.” * अब्राहाम ऊर येथे असताना यहोवाने त्याच्याशी हा करार केला आणि हारानमध्ये यहोवाने त्याची पुन्हा खात्री करून दिली असावी.
अब्राहामाने कनानला जावे या यहोवाच्या आज्ञेचा स्तेफनाने पहिल्या शतकात उल्लेख केला. सभास्थानाला उद्देशून तो म्हणाला: “आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, ‘तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल.” (तिरपे वळण आमचे.) (प्रेषितांची कृत्ये ७:२, ३) अब्राहाम मूळचा ऊर येथील होता आणि स्तेफनाने दाखवल्याप्रमाणे, कनान देशात जाण्याची आज्ञा त्याला प्रथम ऊरमध्ये असतानाच दिली होती. (उत्पत्ति १५:७; नहेम्या ९:७) देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचा स्तेफनाने उल्लेख केला नाही पण उत्पत्ति १२:१-३ या वचनात कनानला जाण्याच्या आज्ञेसोबत त्या कराराचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणून यहोवाने अब्राहामाशी हा करार ऊरमध्येच केला असावा असा विचार करणे उचित आहे.
परंतु, उत्पत्तीचा अहवाल लक्ष देऊन वाचल्यास, यहोवाने ज्याप्रमाणे नंतर त्या कराराचा अनेकदा उल्लेख केला आणि त्याच्या काही पैलूंबद्दल सविस्तर सांगितले त्याचप्रमाणे अब्राहाम हारानमध्ये असताना त्याने त्याची पुनरुक्ती केल्याचे दिसून येते. (उत्पत्ति १५:५; १७:१-५; १८:१८; २२:१६-१८) उत्पत्ति ११:३१, ३२ मध्ये सांगितल्याप्रमाणे अब्राहामाचा पिता तेरह, अब्राहाम, साराय आणि लोट यांच्यासोबत ऊर सोडून कनान देशात गेला. ते सगळे तेरहचा मृत्यू होईपर्यंत हारान येथे राहिले. ज्याअर्थी अब्राहामाने पुष्कळ मालमत्ता मिळवली त्याअर्थी तो हारान येथे बराच काळ राहिला होता. (उत्पत्ति १२:५) काही काळानंतर, अब्राहामाचा भाऊ नाहोर हा देखील तेथे राहायला आला.
तेरहच्या मृत्यूविषयी सांगून झाल्यावर, यहोवाने अब्राहामाला काय म्हटले ते सांगितले आहे आणि मग पुढे त्या वचनात असेही म्हटले आहे: “परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला.” (उत्पत्ति १२:४) यास्तव, उत्पत्ति ११:३१-१२:४ या शास्त्रवचनांमधून अशीच समज मिळते की, यहोवाने तेरहच्या मृत्यूनंतर उत्पत्ति १२:१-३ येथील शब्द उद्गारले. असे असले तर, अब्राहामने ऊर सोडले व नुकत्याच ऐकलेल्या व तत्पूर्वी ऊरमध्ये असताना यहोवाने आज्ञापिलेल्या देशात तो राहायला गेला.
उत्पत्ति १२:१ च्या वचनानुसार, यहोवाने अब्राहामाला अशी आज्ञा दिली: “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा.” एकेकाळी अब्राहामाचा “देश” ऊर होता आणि त्याच्या पित्याचे “घर” तेथेच होते. परंतु, अब्राहामाच्या पित्याने आपले घराणे हारान येथे हलवले आणि मग तो अब्राहामाचा देश बनला. कनानमध्ये अनेक वर्षे राहिल्यावर, इसहाकाला पत्नी शोधण्यासाठी अब्राहामने आपल्या सेवकाला ‘त्याच्या देशाला व त्याच्या आप्तांकडे’ पाठवले तेव्हा तो सेवक “नाहोरच्या नगरात” (एकतर हारान किंवा जवळपासचे एखादे ठिकाण असावे) गेला. (उत्पत्ति २४:४, १०) तेथे, त्याच्या सेवकाला नाहोरच्या मोठ्या कुटुंबात अब्राहामाच्या नातेवाईकांमध्ये रिबका भेटली.—उत्पत्ति २२:२०-२४; २४:१५, २४, २९; २७:४२, ४३.
सन्हेद्रिनला उद्देशून दिलेल्या भाषणात स्तेफन अब्राहामविषयी म्हणाला: “त्याचा बाप मेल्यावर देवाने [अब्राहामाला] तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.” (प्रेषितांची कृत्ये ७:४) यावरून दिसून येते की, यहोवा हारानमध्ये अब्राहामाशी बोलला. उत्पत्ति १२:१-३ येथे सांगितल्यानुसार, त्या प्रसंगी यहोवाने आपल्या कराराचा पुन्हा उल्लेख केला कारण अब्राहाम कनान देशात गेल्यावर तो करार अंमलात आला. या सर्व वस्तूस्थितींचे परीक्षण केल्यावर आपण या निष्कर्षावर पोहंचतो, की यहोवाने मुळात ऊर येथे अब्राहामाशी करार केला आणि नंतर हारानमध्ये पुन्हा त्याची आठवण करून दिली.
[तळटीप]
^ यहोवाने अब्रामाचे नाव बदलून ते अब्राहाम केले; त्या वेळी तो ९९ वर्षांचा होता आणि कनान देशात राहात होता.—उत्पत्ति १७:१, ५.