जगभरातल्या कोट्यवधी लोकांचे आवडते नवे जग भाषांतर
संपूर्ण आणि दृढनिश्चयी असे स्थिर राहा
जगभरातल्या कोट्यवधी लोकांचे आवडते नवे जग भाषांतर
बारा वर्षे, ३ महिने आणि ११ दिवसांच्या अथक श्रमाचे ते फळ होते. मार्च १३, १९६० रोजी, एका नवीन बायबल भाषांतराच्या शेवटल्या भागाचे कार्य समाप्त झाले. त्याला पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) असे नाव देण्यात आले.
एका वर्षानंतर, यहोवाच्या साक्षीदारांनी एकाच खंडात हा अनुवाद प्रकाशित केला. १९६१ साली त्या आवृत्तीच्या दहा लाख प्रती छापण्यात आल्या. आज, नवे जग भाषांतराच्या छापील प्रतींनी दहा कोटींचा क्रमांक पार केला आहे आणि ते जगातले सर्वात जास्त प्रमाणात वितरित केलेले बायबल ठरले आहे. पण साक्षीदारांना हा अनुवाद करायची प्रेरणा कशामुळे मिळाली?
नवीन बायबल भाषांतर का?
पवित्र शास्त्रवचनांमधील संदेश समजून घेता यावा आणि घोषित करता यावा म्हणून यहोवाच्या साक्षीदारांनी गेल्या कित्येक वर्षांपासून विविध इंग्रजी बायबल भाषांतरे वापरली आहेत. या आवृत्तींचे काही फायदेकारक गुण निश्चितच आहेत. परंतु, सहसा त्यावर धार्मिक रितीरिवाजांचा आणि ख्रिस्ती धर्मजगतातील वेगवेगळ्या गटांचा प्रभाव असल्याचे आढळते. (मत्तय १५:६) म्हणूनच, मूळ ईश्वरप्रेरित लिखाणांमधील मजकूर अचूकपणे सादर करणाऱ्या बायबल अनुवादाची गरज आहे हे यहोवाच्या साक्षीदारांनी ताडले.
ऑक्टोबर १९४६ मध्ये, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य नेथन एच. नॉर यांनी एक नवीन बायबल अनुवाद तयार करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा ही गरज भागवण्यामधील पहिले पाऊल उचलण्यात आले. डिसेंबर २, १९४७ रोजी, नवे जग बायबल भाषांतर समितीने मूळ मजकुराशी तंतोतंत जुळणारा, अलीकडेच हाती लागलेल्या बायबलच्या हस्तलिखितांमधून गोळा केलेल्या विद्वानांची नवनवीन संशोधने असलेला आणि आजच्या वाचकांना कळणारी सोपी-सुलभ भाषाशैली असलेला अनुवाद तयार करायला आरंभ केला.
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर हा पहिला खंड १९५० साली प्रकाशित करण्यात आल्यावर अनुवादकांनी आपले उद्दिष्ट साध्य केल्याचे सिद्ध झाले. सुरवातीला, अस्पष्ट असलेली बायबलमधील वचने एकदम स्पष्टरित्या समजू लागली. मत्तय ५:३ येथील गोंधळवणाऱ्या वचनाचेच उदाहरण घ्या. तेथे म्हटले आहे: “जे आत्म्याचे दीन ते धन्य.” पण त्याचे भाषांतर असे करण्यात आले: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य.” मत्तय २४:३ येथे “येण्याचे” याऐवजी “उपस्थितीचे” असे भाषांतर करण्यात आले. तसेच, “सुभक्तीचे रहस्य” याचे भाषांतर “ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज” (१ तीमथ्य ३:१६) असे करण्यात आले आहे. नवे जग भाषांतराने खरोखरच नवी समज प्राप्त करून दिली.
अनेक विद्वान या भाषांतरामुळे प्रभावित झाले. उदाहरणार्थ, ब्रिटिश बायबल विद्वान अलेक्झांडर टॉमसन म्हणाले की, ग्रीक भाषेतील वर्तमान काळाचा अनुवाद इफिसकर ५:२५ येथे “पतींनो, . . . आपआपल्या पत्नीवर प्रीति करा” असे फक्त म्हणण्याऐवजी असा अनुवाद केला आहे की, “पतींनो, . . . आपापल्या पत्नीवर प्रीती करत राहा.” “इतर कोणत्याही आवृत्तीत हे उल्लेखनीय वैशिष्ट्य इतक्या व्यापकतेने आणि वारंवार वापरण्यात आलेले नाही,” असे टॉमसन यांनी नवे जग भाषांतराविषयी म्हटले.
नवे जग भाषांतराने अगदी अचूकतेने केला आहे. उदाहरणार्थ:आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे, नवे जग भाषांतरातील यहोवा या देवाच्या वैयक्तिक नावाचा वापर. ते नाव इब्री व ग्रीक या दोन्ही शास्त्रवचनांमध्ये वापरण्यात आले आहे. जुना करार म्हटलेल्या भागातच देवाचे इब्री नाव सुमारे ७,००० वेळा आढळते त्यामुळे आपल्या उपासकांनी आपले नाव वापरावे आणि व्यक्ती या नात्याने त्याच्याशी परिचय करून घ्यावा हे स्पष्ट आहे. (निर्गम ३४:६, ७) असे करण्यात नवे जग भाषांतराने कोट्यवधी लोकांना मदत केली आहे.
नवे जग भाषांतर अनेक भाषांमध्ये उपलब्ध
इंग्रजीतील अनुवादानंतर, जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांना नवे जग भाषांतर आपल्याही मातृभाषेत असावे अशी इच्छा होती—आणि याला उचित कारण होते. काही देशांमध्ये, स्थानीय भाषांमधील भाषांतरे मिळणे कठीण होती कारण बायबल संस्थांच्या प्रतिनिधींना ती भाषांतरे यहोवाच्या साक्षीदारांच्या हाती लागलेली आवडत नव्हती. शिवाय, अशा स्थानीय भाषांतील बायबलमध्ये सहसा महत्त्वाच्या शिकवणी लपवल्या जात. याचे एक उत्तम उदाहरण आहे दक्षिण युरोपियन भाषेची एक आवृत्ती; त्यामध्ये, “तुझे नाव पवित्र मानिले जावो” हे येशूचे शब्द “लोक तुझे गौरव करोत” अशाप्रकारे भाषांतरित करून देवाच्या नावाचा महत्त्वाचा संदर्भ पूर्णतः लपवून टाकला आहे.—मत्तय ६:९.
सन १९६१ पासूनच, नवे जग भाषांतर यातील इंग्रजी मजकूर इतर भाषांमध्ये अनुवादित केला जाऊ लागला. केवळ दोन वर्षांनंतर, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर हे सहा अतिरिक्त भाषांमध्ये पूर्ण करण्यात आले. तोपर्यंत, जगभरातील ४ साक्षीदारांपैकी ३ जणांना हे बायबल स्वतःच्या भाषेत उपलब्ध झाले. परंतु, इतर कोट्यवधी लोकांपर्यंत या बायबलची प्रत पोहंचवण्याकरता यहोवाच्या साक्षीदारांना पुष्कळ काम करावे लागणार होते.
यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात १९८९ साली भाषांतर सेवा विभाग स्थापित झाल्यापासून ते ध्येय सुसाध्य वाटू लागले. त्या विभागाने भाषांतराची एक अशी पद्धत निर्माण केली ज्यात बायबलमधील शब्दांचा अभ्यास आणि कम्प्युटर तंत्रज्ञान यांचा संयोग घडवून आणला गेला. या पद्धतीचा वापर करून ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे काही इतर भाषांमध्ये एका वर्षात तर इब्री शास्त्रवचनांचे दोन वर्षांत भाषांतर करणे शक्य झाले आहे—सहसा बायबल भाषांतराच्या कामाला लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत हा फारच कमी वेळ होता. ही पद्धत निर्माण करण्यात आल्यापासून नवे जग भाषांतराच्या इंग्रजीमधून २९ आवृत्त्या भाषांतरित करण्यात आल्या आहेत आणि सुमारे दोन अब्ज लोकांच्या भाषांमध्ये हा अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे. आणखी १२ भाषांमध्ये याचे भाषांतर करण्याचे काम सुरू आहे. आजतागायत, संपूर्ण नवे जग भाषांतर किंवा त्याचे काही भाग ४१ भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत.
ऑगस्ट ३, १९५० साली, न्यूयॉर्क सिटीतील यहोवाच्या साक्षीदारांचे ईश्वरशासनाची वृद्धी संमेलन येथे नवे जग भाषांतराच्या पहिल्या भागाचे अनावरण करण्यात आले तेव्हापासून ५० वर्षे उलटली आहेत. त्या प्रसंगी, नेथन एच. नॉर यांनी अधिवेशनाला उपस्थित असलेल्यांना असे आर्जवले: “हा अनुवाद घ्या. तो वाचून काढा; तुम्हाला तो निश्चितच पसंत पडेल. त्याचा कलस्सैकर ४:१२.
अभ्यास करा कारण त्याने देवाच्या वचनाबद्दलची तुमची समज वाढेल. आणि इतरांपर्यंत तो पोचवा.” आम्हीसुद्धा तुम्हाला बायबलचे दररोज वाचन करण्याचे उत्तेजन देतो कारण त्याचा संदेश तुम्हाला “देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार . . . परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर” राहण्यास मदत करील.—[८, ९ पानांवरील आलेख/चित्रे]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
“नवे जग भाषांतराची अनावरणे”
प्रथम इंग्रजीत प्रकाशित केलेले नवे जग भाषांतर सध्या संपूर्ण किंवा काही भागांमध्ये ४१ अतिरिक्त भाषांत उपलब्ध आहे.
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने संपूर्ण बायबल
१९५० १
१९६०-६९ ६ ५
१९७०-७९ ४ २
१९८०-८९ २ २
१९९०-आतापर्यंत २९ १९