व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ढोंगीपणाला कसे तोंड द्याल?

ढोंगीपणाला कसे तोंड द्याल?

ढोंगीपणाला कसे तोंड द्याल?

गेथशेमाने बागेत यहूदा इस्कर्योतने येशूजवळ जाऊन “त्याचे चुंबन घेतले.” दुसऱ्‍या व्यक्‍तीबद्दल प्रेम व्यक्‍त करण्यासाठी तिचे चुंबन घेण्याची त्याकाळी प्रथा होती. पण यहूदाचा उद्देश वेगळा होता. त्या रात्री येशूला धरायला आलेल्या लोकांना तोच येशू आहे असा संकेत देण्यासाठी यहूदाने त्याचे चुंबन घेतले होते. (मत्तय २६:४८, ४९) यहूदा ढोंगी होता. ढोंगी या शब्दाची व्याख्या, स्वतःची खोटी प्रतिमा निर्माण करणारा किंवा प्रामाणिकपणाच्या बुरख्याखाली आपले दुष्ट हेतू लपवणारा अशी करण्यात आली आहे. “ढोंगी” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ “उत्तर देणारा” असा असून हा शब्द नाटकातील पात्राला देखील सूचित करतो. कालांतराने हा शब्द, इतरांना फसवण्याकरता नाटक करणाऱ्‍या व्यक्‍तीच्या संदर्भात वापरण्यात येऊ लागला.

ढोंगीपणा पाहून तुमची काय प्रतिक्रिया असते? उदाहरणार्थ, धूम्रपान करणे किती हानीकारक आहे हे माहीत असूनही सिगारेट कंपन्या आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्याचा कसा प्रयत्न करतात हे पाहून तुम्हाला राग येतो का? किंवा ज्यांना काळजी घेण्यासाठी नेमलेले असते तेच जेव्हा क्रूरपणे दुर्व्यवहार करतात तेव्हा तुम्हाला संताप येतो का? तुम्ही ज्याला खरा मित्र समजत होता त्यानेच विश्‍वासघात केल्यामुळे कधी तुम्ही दुःखी झाला आहात का? धार्मिक वर्तुळातील ढोंगीपणा पाहून तुमच्यावर कसा परिणाम होतो?

“ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार!”

येशू या पृथ्वीवर होता तेव्हाचे धार्मिक वातावरण विचारात घ्या. शास्त्री व परुशी देवाच्या नियमशास्त्राचे विश्‍वासू शिक्षक असण्याचा आव आणत होते, पण खरे पाहता त्यांनी लोकांची मने देवापासून दूर नेणाऱ्‍या मानवी शिकवणुकींनी भरली होती. हे शास्त्री व परुशी नियमशास्त्राच्या एकूणएक अक्षराचे काटेकोर पालन करण्याचा अट्टाहास करायचे पण प्रीती व सहानुभूती यांवर आधारलेल्या मूलभूत तत्त्वांकडे मात्र दुर्लक्ष करायचे. चारचौघांसमोर ते धार्मिकपणाचे सोंग करायचे पण खासगी जीवनात मात्र ते दुष्टपणाने माखलेले होते. ते फुशारकी मारायचे पण त्यांची कृती मात्र शून्य होती. आपली सर्व कामे “लोकांनी पाहावीत” हाच त्यांचा उद्देश होता. ते ‘चुना लावलेल्या कबरांसारखे होते; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या असतात.’ येशूने त्यांचा ढोंगीपणा उघडकीस आणला आणि वारंवार त्यांना म्हटले: “अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्‍यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार!”—मत्तय २३:५, १३-३१.

तुम्ही त्या काळात हयात असता, तर इतर प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांप्रमाणेच कदाचित तुम्हालाही हा धार्मिक ढोंगीपणा घृणास्पद वाटला असता. (रोमकर २:२१-२४; २ पेत्र २:१-३) पण शास्त्री व परुशी यांच्या ढोंगीपणामुळे उद्विग्न होऊन तुम्ही सर्वच धर्मांचा अव्हेर केला असता का, अर्थात येशू ख्रिस्त व त्याचे शिष्य ज्याचा उपदेश देत होते व ज्याप्रमाणे वागत होते त्याकडेही तुम्ही पाठ फिरवली असती का? यामुळे तुमचेच नुकसान झाले नसते का?

स्वतःला धार्मिक म्हणवणाऱ्‍या लोकांच्या ढोंगीपणामुळे उद्विग्न होऊन कदाचित आपण धर्माकडे पाठ फिरवू. पण असे केल्यामुळे खऱ्‍या उपासकांचा प्रामाणिकपणाही आपल्या नजरेआडच राहील. ढोंगीपणापासून संरक्षणासाठी स्वतःभोवती बांधलेल्या कुंपणामुळे, आपण खऱ्‍या मित्रांपासून वंचित राहू. तेव्हा, ढोंगीपणाबद्दल प्रतिक्रिया व्यक्‍त करताना तर्कसंगत व संतुलित मनोवृत्ती असणे महत्त्वाचे आहे.

“आपले डोळे उघडे ठेवा”

पहिली गोष्ट म्हणजे, आपण ढोंगी लोकांना ओळखायला शिकले पाहिजे. हे वाटते तितके सोपे नाही. एका कुटुंबाला याचा प्रत्यय आला, पण फार मोठी किंमत चुकवल्यानंतर. या कुटुंबातली आई कोमामध्ये गेली होती. ज्या इस्पितळातील कर्मचाऱ्‍यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडले होते त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला भरण्यासाठी या कुटुंबाने एका वकिलाची मदत घेतली. हा वकील स्थानिक चर्चचा पाळकही होता. इस्पितळाने नुकसान भरपाई म्हणून ३४ लाख डॉलर दिले. पण या कुटुंबाची समस्या मिटण्याऐवजी आणखीनच चिघळली. ती बिचारी आई अगदी कंगाल होऊन मेली, फार काय, तिच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते. का? कारण मिळालेल्या रकमेतील अधिकांश पैसा वकिलानेच पचवला. या वकिलाबद्दल एका कायदेविषयक माहितीपत्रकात असे म्हणण्यात आले की “जर आपल्या करणीप्रमाणेच हा पाळक उपदेश करत असेल तर . . . कदाचित तो ‘लोकांचे पैसे खा’ असे आपल्या चर्चला येणाऱ्‍यांना सांगत असावा.” अशाप्रकारच्या लोकांपासून आपण स्वतःला कसे वाचवू शकतो?

धार्मिक ढोंगीपणाला तोंड देणाऱ्‍या आपल्या काळातील लोकांना येशूने, “डोळे उघडे ठेवा” असा सल्ला दिला. (मत्तय १६:६, NW; लूक १२:१) होय, सावध राहण्याची गरज आहे. लोक अतिशय उदात्त हेतू बाळगण्याचे ढोंग करू शकतात; त्यांच्या वागण्याबोलण्यातून कदाचित प्रामाणिकपणा ओघळत असेल. पण आपण वाजवी प्रमाणात सावध राहिलेच पाहिजे. कोणत्याही व्यक्‍तीला नीट पारखल्याशिवाय लगेच त्याच्यावर विश्‍वास ठेवू नये. आपल्या शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट आहे हे कळल्यास आपण आपल्या नोटा काळजीपूर्वक तपासून पाहणार नाही का?

खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीतही ढोंगी लोक आढळल्याची उदाहरणे आहेत. शिष्य यहूदा याने त्यांच्याविषयी अशी ताकीद दिली: “ते तुम्हांबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनांत झाकलेले खडक असे आहेत; ते मेंढपाळ असूनहि स्वतःच चरत राहतात; ते वाऱ्‍याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूंतील फलहीन, दोनदा मेलेली, समूळ उपटलेली झाडे, असे आहेत.”—यहूदा १२.

‘डोळे उघडे ठेवण्याचा’ अर्थ, जी व्यक्‍ती प्रेमळ असण्याचा आव आणते पण मुळात स्वार्थी असून देवाच्या वचनावर आधारित नसलेल्या मतांना बढावा देते अशा व्यक्‍तीच्या फसवणुकीला बळी न पडण्याची काळजी घेणे. पाण्याच्या शांत प्रवाहाखाली झाकल्या गेलेल्या टोकदार खडकांप्रमाणे असणाऱ्‍या या व्यक्‍तीमुळे बेसावध असणाऱ्‍यांचे आध्यात्मिक जहाज बुडू शकते. (१ तीमथ्य १:१९) या ढोंगी व्यक्‍तीच्या गोष्टी कदाचित आध्यात्मिकदृष्ट्या तजेला देणाऱ्‍या आहेत असे भासत असले तरी मुळात ती एका ‘निर्जल मेघाप्रमाणे,’ पोकळ शाबीत होऊ शकते. एखाद्या फलहीन वृक्षाप्रमाणे ही फसवणूक करणारी व्यक्‍ती अस्सल ख्रिस्ती फळ उत्पन्‍न करू शकत नाही. (मत्तय ७:१५-२०; गलतीकर ५:१९-२१) निश्‍चितच, अशा फसवणूक करणाऱ्‍यांपासून आपण सांभाळून राहिले पाहिजे. पण, सर्वांच्याच नियतीबद्दल आपण शंकेखोर असावे असा याचा अर्थ होत नाही.

“न्याय करू नका”

अपरिपूर्ण मनुष्याला स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष करून इतरांकडे बोट दाखवणे फार सोपे जाते! पण या प्रवृत्तीमुळे आपण ढोंगी बनण्याचा धोका आहे. येशूने म्हटले: “अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.” येशूचा पुढील सल्ला आपण मनावर घेतला पाहिजे: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील . . . तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहातोस?”—मत्तय ७:१-५.

लोकांच्या काही कृती ढोंगीपणाच्या आहेत असे भासले तरीसुद्धा आपण लगेच त्यांच्यावर ढोंगी असा शिक्का मारू नये. उदाहरणार्थ, प्रेषित पेत्र, जेरूसलेमहून आलेल्या यहुदी पार्श्‍वभूमीच्या बांधवांची मर्जी राखण्यासाठी अंत्युखिया येथील गैरयहुदी सहविश्‍वासू बांधवांपासून “माघार घेऊन वेगळा राहू लागला.” बर्णबाही ‘पेत्र व इतरांच्या ढोंगाने ओढला गेला.’ गैरयहुदी लोकांना ख्रिस्ती मंडळीत प्रवेश करण्याचा मार्ग खुला करण्याचा सुहक्क पेत्रालाच मिळाला होता, तरीसुद्धा त्याने असे केले. (गलतीकर २:११-१४; प्रेषितांची कृत्ये १०:२४-२८, ३४, ३५) पण बर्णबा व पेत्राकडून ही चूक झाल्यामुळे ते शास्त्री व परुशी किंवा यहूदा इस्कर्योत यांच्या यादीत निश्‍चितच जमा झाले नाहीत.

“प्रीतीमध्ये ढोंग नसावे”

येशूने आपल्या शिष्यांना बजावले: “तुम्ही इतरांवर काही उपकार करता तेव्हा तुमच्यासमोर डांगोरा पिटत जाण्यासाठी एक माणूस नेऊ नका—लोकांनी आपले गुण गावेत म्हणून सभास्थांनांत व रस्त्यांवर ते नाटकी लोक असेच करतात.” (मत्तय ६:२, फिलिप्स) प्रेषित पेत्राने लिहिले: “प्रीतीमध्ये ढोंग नसावे.” (रोमकर १२:९) त्याने तीमथ्याला “शुद्ध अंतःकरणात . . . व निष्कपट [“ढोंगविरहित,” पं.र.भा.] विश्‍वासात उद्‌भवणारी प्रीति व्यक्‍त” करण्याचे उत्तेजन दिले. (१ तीमथ्य १:५) आपली प्रीती व विश्‍वास निष्कपट असल्यास, अर्थात त्यांत कोणत्याही स्वार्थाची किंवा फसवेपणाची झाक नसल्यास साहजिकच इतरजण आपल्यावर भरवसा ठेवतील. आपल्या संपर्कात येणाऱ्‍यांना आपल्या सहवासामुळे खरे मनोबल व प्रोत्साहन मिळेल. (फिलिप्पैकर २:४; १ योहान ३:१७, १८; ४:२०, २१) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवा आपल्याविषयी संतुष्ट होईल.

पण दुसरीकडे पाहता, ढोंगीपणाने वागणाऱ्‍यांकरता आज न उद्या तो घातक ठरेल. कारण शेवटी त्यांचा ढोंगीपणा उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. येशू ख्रिस्ताने म्हटले: “उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.” (मत्तय १०:२६; लूक १२:२) बुद्धिमान राजा शलमोन याने स्पष्ट केले: “सगळ्या बऱ्‍यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करिताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.”—उपदेशक १२:१४.

पण तोपर्यंत, केवळ काही लोकांच्या ढोंगीपणामुळे, खऱ्‍या मित्रांच्या निष्कपट प्रेमापासून वंचित राहण्याइतपत आपण का निराश व्हावे बरे? आपण अवास्तव शंकेखोरपणा न करताही सावध राहू शकतो. पण त्याच वेळेस, आपली स्वतःची प्रीती आणि विश्‍वास निर्दंभ आहे याचीही आपण खात्री करू या.—याकोब ३:१७; १ पेत्र १:२२.

[२२, २३ पानांवरील चित्रे]

शास्त्री व परुशी यांच्या ढोंगीपणामुळे तुम्ही येशू ख्रिस्त व त्याच्या शिष्यांकडे पाठ फिरवली असती का?