व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

एदेन बागेत सर्पाने हव्वेला बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाविषयी असलेल्या देवाच्या नियमाचे उल्लंघन करण्यास कसे सांगितले?

उत्पत्ति ३:१ म्हणते: “परमेश्‍वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” सर्पाने हव्वेशी कशाप्रकारे संवाद केला असेल याबद्दल वेगवेगळी मते आहेत. एका मतानुसार त्याने हालचालीद्वारे किंवा हावभावांद्वारे संवाद केला असेल. उदाहरणार्थ, जोसफ बेनसन नावाच्या एका पाळकाने म्हटले: “कदाचित हे काही प्रकारचे संकेत असतील अशी जास्त शक्यता दिसते. काहींचे असे प्रतिपादन आहे, की तेव्हा सर्पाठायी विचार करण्याची व बोलण्याची क्षमता होती. . . . पण यासाठी कसलाही पुरावा नाही.”

परंतु, मना केलेले फळ तिने खाल्ले तर ती देवासारखी होऊ शकेल, बरे काय आणि वाईट काय ठरवू शकेल हे सर्प तिला केवळ हावभावांद्वारे कसे सुचवू शकला? शिवाय, सर्पाने तिला विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देऊन हव्वेने या संवादात भाग घेतला होता. (उत्पत्ति ३:२-५) सर्पाने हव्वेशी खाणाखुणा किंवा हावभाव यांद्वारे संवाद केला असे जर म्हटले तर हव्वेनेही हावभावांद्वारेच त्याला उत्तर दिले असेल; परंतु बायबल तर म्हणते की हव्वा बोलली.

या घटनेचा उल्लेख करून प्रेषित पौलाने सहख्रिश्‍चनांना असा इशारा दिला की: ‘जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडू नयेत . . . असे मला भय आहे.’ “खोटे प्रेषित, कपटी कामदार,” यांच्यापासून येणाऱ्‍या धोक्याविषयी पौल बोलत होता. हे ‘अतिश्रेष्ठ प्रेषित’ केवळ हावभाव किंवा खाणाखुणा यांच्याद्वारेच लोकांना फसवत नव्हते. तर, इतरांची दिशाभूल करण्यासाठी आपल्या धूर्त बोलण्याद्वारे ते लोकांना फसवत होते.—२ करिंथकर ११:३-५, १३.

एदेन बागेत हव्वेला फसवण्याकरता बोलीचा उपयोग करण्यात आला होता तरीसुद्धा यावरून असे सूचित होत नाही की सर्पाला स्वरयंत्र होते. त्याला त्याची गरज नव्हती. देवाचा दूत एका गाढवीद्वारे बलामाशी बोलला तेव्हा त्या गाढवीला मनुष्याला असतात त्यासारख्या जटील स्वरयंत्राची आवश्‍यकता नव्हती. (गणना २२:२६-३१) हे ‘मुके गाढव मनुष्यवाणीने बोलू’ लागले तेव्हा आत्मिक स्रोताच्या शक्‍तीनेच हे घडू शकले.—२ पेत्र २:१६.

हव्वेशी सर्पाद्वारे बोलणाऱ्‍या आत्मिक व्यक्‍तीची ओळख बायबलमध्ये ‘दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप’ अशी करण्यात आली आहे. (प्रकटीकरण १२:९) हव्वेच्या कानी पडलेले आणि तिने ज्यांना प्रतिसाद दिला ते शब्द प्रवृत्त करणारा सैतान होता जो “स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.”—२ करिंथकर ११:१४.

[२७ पानांवरील चित्र]

“तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल”