वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
एखाद्या ख्रिश्चन स्त्रीचा सत्यात नसलेला पती धार्मिक सुट्यांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेत असल्यास, ती देवाला एकनिष्ठ राहण्यात आणि पतीला अधीनता दाखवण्यात संतुलन कसे राखू शकते?
असे संतुलन राखण्यासाठी तिला बुद्धीची आणि व्यवहारचातुर्याची आवश्यकता आहे. तिच्या दोन कर्तव्यांमध्ये संतुलन राखण्यासाठी ती करत असलेला प्रयत्न उचित आहे. अशाच एका संदर्भात येशूने हा सल्ला दिला: “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” (मत्तय २२:२१) येथे येशू सरकाराच्या संदर्भात असलेल्या कर्तव्यांविषयी बोलत होता; तेव्हा, ख्रिश्चनांनी यांच्या अधीन राहिले पाहिजे असे त्यांना सांगण्यात आले. (रोमकर १३:१) तरीपण, त्याचा हा सल्ला, देवाप्रती असलेली कर्तव्ये आणि शास्त्रवचनानुसार पत्नीला तिच्या पतीला, मग तो सत्यात नसला तरी, दाखवावी लागणारी अधीनता यांमध्ये संतुलन राखण्याला लागू होतो.
बायबलचे ज्ञान असलेली व्यक्ती हे निश्चितच कबूल करेल, की बायबलमध्ये ख्रिश्चन व्यक्तीचे सर्वात पहिले कर्तव्य म्हणजे सर्वशक्तिमान देवाला सर्वप्रसंगी एकनिष्ठ राहणे, यावर जोर देण्यात आला आहे. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) तरीपण, अनेक प्रसंगी एक खरा उपासक, अधिकार पदी असलेल्या पण सत्यात नसलेल्या व्यक्तीच्या विनंत्या किंवा मागण्या देवाच्या सर्वोच्च नियमांचे उल्लंघन न करता स्वीकारू शकतो.
याबाबतीत, दानीएलाच्या ३ ऱ्या अध्यायातील तीन हिब्रू तरुणांचा आदर्श आपल्यासमोर आहे. या तिघांना आणि इतरांना, दूरा नामक मैदानात हजर राहण्याची राजाज्ञा त्यांचा राजा नबुखद्नेस्सर याने दिली. खोट्या उपासनेची योजना केली जात आहे, हे या तिघांना समजल्यावर त्यांनी तेथे हजर न राहणे बहुधा पसंत केले असावे. दानीएलला कदाचित तिथे न जाण्यासाठी एखादे कारण मिळाले असावे, परंतु या तिघांना तसे करता आले नसावे. * त्यामुळे त्यांनी तेथे हजर राहण्याची आज्ञा पाळली —परंतु ते तेथे कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कार्यात भाग घेणार नव्हते, नव्हे त्यांनी भाग घेतलाही नाही.—दानीएल ३:१-१८.
तसेच, धार्मिक सुट्यांमध्ये, सत्यात नसलेला पती आपल्या ख्रिस्ती पत्नीला, असे काहीतरी करायची विनंती अथवा मागणी करेल जी टाळावी असे तिला वाटेल. काही उदाहरणांचा विचार करा: पती तिला त्या दिवशी विशिष्ट स्वयंपाक करायला सांगेल जेणेकरून तो आणि इतरजण सण साजरा करू शकतील. किंवा, कदाचित तो, संपूर्ण कुटुंब मिळून (पत्नीसुद्धा) त्या दिवशी त्याच्या नातेवाईकांकडे भोजनासाठी किंवा फक्त भेट द्यायला म्हणून जाऊ या, अशी मागणी करेल. किंवा, सणाच्या आदल्या दिवशी पत्नी बाजाराला जाईल तेव्हा येताना—सणासाठी लागणारे खाद्यपदार्थ, भेट म्हणून देण्याकरता काही वस्तू किंवा भेटवस्तू गुंडाळण्यासाठी लागणारा कागद व शुभेच्छा कार्ड आणण्यास तिला सांगेल.
येथेही, पत्नीने खोट्या धार्मिक कार्यांत भाग न घेण्याचा निश्चय केला पाहिजे; परंतु पती करत असलेल्या मागण्यांचे काय? तो कुटुंब प्रमुख आहे आणि देवाचे वचन म्हणते: “स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा.” (कलस्सैकर ३:१८) याबाबतीत, देवाला एकनिष्ठ राहून ती पतीलाही अधीनता दाखवू शकेल का? यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन न करता आपल्या पतीला अधीनता दाखवण्याच्या बाबतीत संतुलन कसे राखायचे हे तिने ठरवले पाहिजे.
इतर वेळी, पती कदाचित तिला त्याच्या आवडीचे काही किंवा कदाचित त्या विशिष्ट मौसमात त्याला तो विशिष्ट अन्नपदार्थ खाण्याची पहिल्यापासून सवय असेल असे काही अन्नपदार्थ करायला सांगेल. अशावेळी पत्नी, त्याच्यावरील प्रेमापोटी आणि त्याच्या मस्तकपदाचा आदर करून त्याच्या इच्छेनुसार वागेल. पण त्याने जर अशाचप्रकारची मागणी सणाच्या दिवशी केल्यास तिने ती पूर्ण करावी का? रोजच्या स्वयंपाकाप्रमाणे हाही स्वयंपाक आहे असे समजून काही ख्रिस्ती पत्नी आपला विवेक शुद्ध ठेवू शकतील. मग पती, त्याला धार्मिक अर्थ लावत असला तरी, कोणतीही एकनिष्ठ ख्रिस्ती पत्नी तसे समजणार नाही. तसेच, दर महिन्याच्या किंवा वर्षाच्या वेगवेगळ्या प्रसंगी पती आपल्या नातेवाईकांना भेटायला जातो तेव्हा तो कदाचित पत्नीलाही त्याच्यासोबत नेऊ इच्छित असेल. मग तो सणाचा दिवस असला तरी पत्नीने त्याच्याबरोबर जावे का? किंवा, पतीने सांगितलेल्या गोष्टी ती तिच्या नेहमीच्या खरेदीच्या वस्तुंबरोबर आणेल का? आणलेल्या त्या वस्तुंचे तो करणार आहे याजशी माझे काहीही घेणेदेणे नाही असा ती विचार करेल का?
अर्थातच, एका ख्रिश्चन पत्नीने इतरांवर कोणता परिणाम होऊ शकतो याचा विचार जरूर करावा. (फिलिप्पैकर २:४) तिघा हिब्रू तरुणांनी जसे, दूराच्या मैदानाकडे जाताना लोकांनी त्यांना पाहू नये म्हणून विशेष काळजी घेतली असावी त्याचप्रकारे एक ख्रिश्चन पत्नीसुद्धा असे काहीही करणार नाही ज्यामुळे लोकांना तिच्याबद्दल चुकीचा ग्रह होईल. ती पतीला न दुखावता त्याला सांगू शकते, की तिला त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे; जर त्याने तिच्या भावनांची कदर केली व सणाच्या संबंधाने असलेल्या विशिष्ट गोष्टी स्वतःच केल्या तर बरे होईल. खोट्या धार्मिक कार्यांत भाग घेण्यास नकार देण्याची तिच्यावर पाळी आल्यावर, तिला आणि त्याला अशा दोघांनाही त्या प्रसंगी संकोच वाटेल; तेव्हा असे प्रसंग टाळलेलेच बरे, असा कदाचित तो विचार करेल. होय, आधीच शांतपणे चर्चा केल्याने शांतीमय तोडगा निघू शकतो.—नीतिसूत्रे २२:३.
सरतेशेवटी, सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन काय करावे आणि काय करू नये हे ठरवणे विश्वासू ख्रिश्चन व्यक्तीची जबाबदारी आहे. तिघा हिब्रूंप्रमाणे देवाची आज्ञा मानणे हे प्रथमस्थानी असले पाहिजे. (१ करिंथकर १०:३१) ही गोष्ट लक्षात ठेवून, कुटुंबात अथवा समाजात अधिकार पदी असलेल्या व्यक्तीने सांगितलेली कोणती गोष्ट हातमिळवणी न करता केली जाऊ शकते हे ख्रिश्चन व्यक्तीने स्वतः ठरवावे.
[तळटीप]
^ टेहळणी बुरूज ऑगस्ट १, २००१ मधील “वाचकांचे प्रश्न” पाहा.