व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरा देव यहोवा—यावर भरवसा ठेवा

खरा देव यहोवा—यावर भरवसा ठेवा

खरा देव यहोवायावर भरवसा ठेवा

एखाद्या रात्री, निरभ्र आकाशात लुकलुकणारे असंख्य तारे तुम्ही कधी पाहिलेत का? ते कोठून आले असावेत?

रात्रीच्या निःशब्द शांततेत, प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाशी या तारका जणू बोलल्या आणि त्यांनी त्याला असे लिहिण्यास प्रेरित केले: “आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते.” (स्तोत्र १९:१) होय, “गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास” निर्माण केलेल्या वस्तू नव्हेत तर निर्माणकर्ता योग्य आहे.—प्रकटीकरण ४:११; रोमकर १:२५.

बायबल म्हणते, “सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री लोकांस ३:४) होय, खरा देव, ‘ज्याचे नाव यहोवा आहे तोच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहे.’ (स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.) आणि तो केवळ मृगजळासारखा आभास नाही. येशू ख्रिस्ताने आपला स्वर्गीय पिता, यहोवा याच्याविषयी असे म्हटले: “ज्याने मला पाठविले तो खरा आहे.”—योहान ७:२८.

आपले उद्देश पूर्ण करणारा—यहोवा

देवाचे अनोखे नाव, यहोवा, इब्री शास्त्रवचनांतच जवळजवळ ७,००० वेळा आढळते. त्याचे नावच दाखवते की तो खरा आहे. देवाच्या नावाचा शब्दशः अर्थ, “तो व्हायला लावतो” असा आहे. त्यामुळे, आपले उद्देश पूर्ण करणारा अशाप्रकारे यहोवा देव त्याची ओळख करून देतो. मोशेने देवाला त्याचे नाव विचारले तेव्हा यहोवाने अशाप्रकारे त्याविषयी अधिक स्पष्टीकरण दिले: “मी जे होईन ते मी होईन.” (निर्गम ३:१४, NW) रॉथरहॅमचा अनुवाद आणखी स्पष्ट आहे; त्यात म्हटले आहे: “मला वाटेल ते मी बनेन.” आपले धार्मिक उद्देश आणि वचने वास्तवात उतरवण्यासाठी जे काही आवश्‍यक असते ते यहोवा होतो किंवा बनण्याचे निवडतो. त्यामुळेच, निर्माणकर्ता, पिता, सार्वभौम प्रभू, मेंढपाळ, सेनाधीश यहोवा, प्रार्थना ऐकणारा, न्यायाधीश, महान शिक्षक, उद्धारकर्ता अशा अनेक पदव्या त्याने धारण केल्या आहेत.—शास्ते ११:२७; स्तोत्र २३:१; ६५:२; ७३:२८; ८९:२६; यशया ८:१३; ३०:२०; ४०:२८; ४१:१४.

केवळ खरा देवच यहोवा हे नाव धारण करू शकतो कारण मानव स्वतःच्या योजना यशस्वी ठरण्याची कधीही खात्री बाळगू शकत नाहीत. (याकोब ४:१३, १४) केवळ यहोवा असे म्हणू शकतो: “पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्‍यास बीज, खाणाऱ्‍यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत; त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:१०, ११.

यहोवा अशा निश्‍चिततेने आपला उद्देश पूर्ण करतो की, मानवांसाठी काल्पनिक वाटणारी गोष्टही त्याच्या दृष्टीने खरी असते. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना मरून अनेक वर्षे होऊन गेल्यावर येशूने त्यांच्याविषयी असा उल्लेख केला: “तो [यहोवा] मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” (लूक २०:३७, ३८) ते तिन्ही विश्‍वासू कुलपुरुष मरण पावले परंतु त्यांना पुनरुत्थित करण्याचा देवाचा उद्देश पूर्ण होईल अशी खात्री असल्यामुळे ते त्याला जिवंत असल्यासारखेच होते. पहिल्या मानवाला मातीतून निर्माण करणे यहोवाला जसे कठीण नव्हते त्याचप्रमाणे या विश्‍वासू सेवकांना पुन्हा जिवंत करणेही त्याला कठीण नाही.—उत्पत्ति २:७.

देव आपल्या उद्देशानुसार घडवून आणतो हे दाखवण्यासाठी प्रेषित पौल आणखी एक उदाहरण देतो. शास्त्रवचनांमध्ये, अब्राहामाला “राष्ट्रांचा बाप” म्हटले आहे. (रोमकर ४:१६, १७) अब्राम अद्याप अपत्यहीन होता तेव्हाच यहोवाने त्याचे नाव बदलून अब्राहाम केले, ज्याचा अर्थ “समूहाचा (जमाव) पिता,” असा होतो. त्या नावाच्या अर्थानुसार घडवून आणण्यासाठी यहोवाने वृद्ध अब्राहाम व त्याची म्हातारी बायको सारा यांची प्रजननशक्‍ती चमत्कारिकरीतीने पूर्ववत केली.—इब्री लोकांस ११:११, १२.

येशू ख्रिस्ताला शक्‍ती आणि अधिकार देण्यात आल्यामुळे वास्तविक घटनांविषयी बोलताना येशू मानवांपेक्षा उच्च पातळीवर बोलत होता. त्याचा निकटचा मित्र लाजर मरण पावलेला असतानाही येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले: “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो.” (योहान ११:११) मेलेला माणूस केवळ झोपला आहे असे येशू का म्हणाला?

येशू जेव्हा लाजरच्या गावी बेथनी येथे पोचला तेव्हा तो कबरेजवळ गेला आणि त्याने कबरेच्या तोंडावरील दगड बाजूला करायला सांगितले. मग मोठ्याने प्रार्थना केल्यावर त्याने आज्ञा केली: “लाजरा, बाहेर ये!” तेव्हा लोकांच्या नजरा कबरेवर खिळलेल्या असताना “जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते.” त्यानंतर येशूने त्यांना म्हटले, “ह्‍याला मोकळे करून जाऊ द्या.” (योहान ११:४३, ४४) येशूने लाजराला उठवले—मरून चार दिवस झालेल्या मनुष्याला त्याने पुन्हा जिवंत केले! आपला मित्र झोपला आहे असे येशू म्हणाला तेव्हा तो काही खोटे बोलत नव्हता. यहोवा आणि येशूच्या दृष्टीत मेलेला लाजर केवळ झोपलेला होता. होय, येशूचा आणि त्याच्या स्वर्गीय पित्याचा वास्तविक गोष्टींशी संबंध आहे.

यहोवा आपल्या आशा वास्तविकतेत उतरवू शकतो

फसव्या मूर्ती आणि खरा देव यांच्यात केवढी ही विषमता! मूर्तीपूजा करणारे त्यांच्या पूज्य वस्तूंजवळ अलौकिक शक्‍ती असल्याचा चुकीचा दावा करतात. पण या मूर्तींची कितीही पूजा केली तरी त्यांना चमत्कारिक शक्‍ती प्राप्त होत नाही. परंतु, दुसऱ्‍या बाजूला, यहोवा आपल्या दीर्घकाळापासून मृत असलेल्या सेवकांना जिवंत म्हणू शकतो कारण त्यांना पुन्हा जीवन देण्याची ताकद त्याच्यात आहे. “यहोवा सत्य देव आहे,” आणि तो आपल्या लोकांची कधीच फसवणूक करत नाही.—यिर्मया १०:१०.

यहोवाच्या योग्य समयी, त्याच्या स्मरणात असलेल्या मृतांचे पुनरुत्थान होईल अर्थात त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल हे केवढे मोठे सांत्वन. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) होय, पुनरुत्थान म्हणजे त्या व्यक्‍तीचे जीवन पूर्ववत करणे. परंतु मृत जनांचे जीवन लक्षात ठेवून त्यांचे पुनरुत्थान करणे ही गोष्ट निर्माणकर्त्यासाठी कठीण नाही कारण त्याची बुद्धी आणि सामर्थ्य अमर्याद आहे. (ईयोब १२:१३; यशया ४०:२६) यहोवा अति प्रेमळ देव असल्यामुळे, मेलेल्या लोकांना त्यांच्या पूर्वीच्या व्यक्‍तिमत्वासह परादीस पृथ्वीवर पुन्हा जिवंत करण्यासाठी तो आपल्या परिपूर्ण स्मरणशक्‍तीचा वापर करील.—१ योहान ४:८.

सैतानाच्या जगाचा अंत जवळ येतो तसा खऱ्‍या देवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांचे भविष्य निश्‍चितच उज्ज्वल आहे. (नीतिसूत्रे २:२१, २२; दानीएल २:४४; १ योहान ५:१९) स्तोत्रकर्ता आपल्याला असे आश्‍वासन देतो: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:१०, ११) गुन्हेगारी आणि हिंसा या गोष्टी इतिहासजमा होतील. न्यायाचा काळ येईल, आर्थिक अडचणी नाहीशा झालेल्या असतील. (स्तोत्र ३७:६; ७२:१२, १३; यशया ६५:२१-२३) सामाजिक, वांशिक, जमातीय, व जातीय भेदभावांचे नामोनिशाण राहणार नाही. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) युद्धे आणि युद्धांची हत्यारे उरणार नाहीत. (स्तोत्र ४६:९) त्या वेळी, “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) सर्वांना परिपूर्ण, सुदृढ आरोग्य लाभेल. (प्रकटीकरण २१:३, ४) पृथ्वीवरील परादीसचे स्वप्न लवकरच साकार होईल. यहोवाचा हा उद्देश आहे!

होय, सर्व बायबल आधारित आशा लवकरच पूर्ण होतील. यहोवावर पूर्ण भरवसा ठेवता येत असताना या जगामध्ये पूज्य मानल्या जाणाऱ्‍या गोष्टींनी आपण स्वतःची फसवणूक का करून घ्यावी? देवाची अशी इच्छा आहे की, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:३, ४) या व्यवस्थीकरणातील आभास किंवा मृगजळ यांच्यामागे आपला वेळ आणि पैसा खर्च करण्याऐवजी जो खरा देव आहे त्याच्या ज्ञानात आपण वाढत जाऊ या आणि त्याच्यावर संपूर्ण हृदयाने भरवसा ठेवू या.—नीतिसूत्रे ३:१-६; योहान १७:३.

[६ पानांवरील चित्र]

यहोवा आणि येशूच्या दृष्टीत लाजर केवळ झोपी गेला होता

[७ पानांवरील चित्रे]

पृथ्वीवरील परादीस लवकरच वास्तवात उतरेल