व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भिन्‍न मनोवृत्ती जोपासणारे भाऊ

भिन्‍न मनोवृत्ती जोपासणारे भाऊ

भिन्‍न मनोवृत्ती जोपासणारे भाऊ

आईवडिलांनी घेतलेल्या निर्णयांचा मुलांवर निश्‍चितच परिणाम होतो. हे एदेन बागेत जितके खरे होते तितकेच आज देखील आहे. आदाम व हव्वा यांच्या विद्रोही वर्तनाचा सबंध मानवजातीवर अतिशय दूरगामी परिणाम झाला. (उत्पत्ति २:१५, १६; ३:१-६; रोमकर ५:१२) तरीसुद्धा आपल्यापैकी प्रत्येकाकडे आपल्या निर्माणकर्त्यासोबत एक चांगला नातेसंबंध जोडण्याची संधी आहे; अर्थात हा मार्ग निवडणे किंवा न निवडणे आपल्या हातात आहे. मानवी इतिहासातील पहिल्या दोन भावांच्या, म्हणजे काइन व हाबेल यांच्या वृत्तान्तावरून हे स्पष्ट होते.

आदाम व हव्वा यांना एदेन बागेतून हाकलण्यात आल्यानंतर देव त्यांच्याशी बोलल्याचे बायबल आपल्याला सांगत नाही. पण त्यांच्या मुलांपासून मात्र यहोवाने स्वतःला लपवले नाही. एदेन बागेत काय घडले होते हे काइन व हाबेल यांना आपल्या आईवडिलांकडून कळले असावे यात शंका नाही. “जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी ठेवलेले करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तरवार” देखील ते पाहू शकत होते. (उत्पत्ति ३:२४) तसेच मनुष्याचे जीवन कष्टप्रद व दुःखदायक होईल असे जे देवाने घोषित केले होते ते वास्तवात घडल्याचेही ते आपल्या डोळ्यांनी पाहात होते.—उत्पत्ति ३:१६, १९.

यहोवाने सर्पाला काय सांगितले होते हे काइन व हाबेल यांना माहीत असावे: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१५) यहोवाविषयी काइन व हाबेल यांच्याजवळ असलेले ज्ञान त्यांना त्याच्यासोबत एक स्वीकार्य नातेसंबंध जोडायला मदत करण्यास पुरेसे होते.

यहोवाच्या भविष्यवाणीविषयी आणि तो किती प्रेमळ व उदार आहे याविषयी मनन केल्यावर काइन व हाबेल यांच्या मनात देवाची मर्जी संपादन करण्याची इच्छा निर्माण झाली असेल. पण ही इच्छा ते कितपत जोपासणार होते? देवाची उपासना करण्याच्या उपजत इच्छेला प्रतिसाद देऊन ते देवावर विश्‍वास ठेवण्याइतपत आपली आध्यात्मिकता विकसित करणार होते का?—मत्तय ५:३.

दोघे भाऊ अर्पणे आणतात

काही काळानंतर काइन व हाबेल यांनी देवाकरता अर्पणे आणली. काइनाने जमितीतून उत्पन्‍न झालेली फळे आणि हाबेलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून अर्पणे आणली. (उत्पत्ति ४:३, ४) या सुमारास काइन व हाबेल हे जवळजवळ १०० वर्षांचे असावेत कारण आदामाला शेथ झाला तेव्हा तो १३० वर्षांचा होता.—उत्पत्ति ४:२५; ५:३.

काइन व हाबेल यांनी अर्पणे आणली यावरून त्यांना त्यांच्या पापी अवस्थेची जाणीव होती आणि त्यांना देवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा होती हे दिसून आले. सर्प आणि स्त्रीच्या संतानाविषयी यहोवाच्या प्रतिज्ञेवर त्यांनी निश्‍चित थोडा तरी विचार केलाच असेल. यहोवासोबत एक चांगला नातेसंबंध जोडण्याकरता काइन व हाबेलने किती वेळ आणि शक्‍ती खर्च केली याविषयी सांगितलेले नाही. पण देवाने त्यांच्या अर्पणांकडे कोणत्या दृष्टीने पाहिले यावरून त्यांच्या हृदयातील विचार कसे असावेत याविषयी कळून येते.

काही विद्वानांचे असे मत आहे की हव्वा काइनालाच ते “संतान” समजत होती जे सर्पाचा नाश करेल, कारण त्याचा जन्म झाला तेव्हा ती म्हणाली: “परमेश्‍वराच्या सहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.” (उत्पत्ति ४:१) काइनालाही जर असे वाटत असेल तर ते अगदीच चूक होते. दुसरीकडे पाहता, हाबेलाने विश्‍वासाने आपले अर्पण सादर केले. म्हणूनच असे म्हटले आहे, की “विश्‍वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला.”—इब्री लोकांस ११:४.

हाबेलला आध्यात्मिक समज होती आणि काइनाला नव्हती, हा एकच फरक या दोन भावांत नव्हता. त्यांच्या मनोवृत्तींत देखील जमीनअस्मानाचा फरक होता. म्हणूनच, “परमेश्‍वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला; पण काइन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही.” कदाचित काइनाने पूर्ण मनाने नव्हे, तर केवळ कर्तव्य पार पाडायचे म्हणून अर्पण दिले असावे. पण देवाने ही नावापुरती उपासना स्वीकारली नाही. काइनाचे हृदय कपटी झाले होते आणि त्याचे हेतू शुद्ध नव्हते हे यहोवाने ओळखले. काइनाच्या अर्पणाचा देवाने अस्वीकार केल्यानंतर त्याने ज्याप्रकारे प्रतिक्रिया दाखवली त्यावरून त्याची खरी वृत्ती उजेडात आली. स्वतःत सुधारणा करण्याऐवजी, “काइन संतापला व त्याचे तोंड उतरले.” (उत्पत्ति ४:५) त्याच्या वर्तनावरून त्याचे दुष्ट विचार व हेतू दिसून आले.

इशारा व प्रतिक्रिया

काइनाची मनोवृत्ती जाणून देवाने त्याला असा सल्ला दिला: “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्‍न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुजवर आहे. करिता तू त्यास दाबात ठेव.”—उत्पत्ति ४:६, ७.

यात आपल्याकरता एक धडा आहे. पाप आपल्याला वश करण्यासाठी जणू दारातच टपून असते. पण देवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिले आहे आणि चांगला मार्ग निवडणे आपल्या हातात आहे. यहोवाने काइनाला ‘बरे करण्याचे’ प्रोत्साहन दिले पण त्याने त्याला बदलण्यास भाग पाडले नाही. काइनाने आपला मार्ग स्वतः निवडला.

प्रेरित अहवाल पुढे सांगतो: “मग काइनाचे त्याचा भाऊ हाबेल ह्‍याच्याशी बोलणे झाले; आणि असे झाले की ते शेतात असता काइनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले.” (उत्पत्ति ४:८) अशारितीने काइन एक आज्ञाभंजक, निर्दयी खूनी बनला. “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” असे यहोवाने त्याला विचारले तेव्हा देखील त्याचे मन जराही चुरचुरले नाही. उलट निर्लज्जासारखा तो उर्मटपणे म्हणाला: “मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” (उत्पत्ति ४:९) हा धडधडीत खोटेपणा आणि जबाबदारी नाकारण्याची वृत्ती यांतून काइनाची असंवेदनशीलता स्पष्ट दिसून आली.

यहोवाने काइनाला शाप दिला व एदेनच्या परिसरातून त्याला घालवून दिले. भूमीला आधीच दिलेला शाप काइनाच्या बाबतीत आणखीनच प्रभावी ठरणार होता; त्याने कितीही मशागत केली तरी भूमी त्याला पीक देणार नव्हती. तो पृथ्वीवर भटका व परागंदा होणार होता. काइनाने ही शिक्षा खूपच भारी असल्याची तक्रार केली. त्याच्या या तक्रारीवरून आपल्या भावाच्या खूनाचा बदला आपल्याकडून घेतला जाईल याबद्दल वाटणारी त्याची भिती व्यक्‍त झाली, पण त्याला मनापासून पश्‍चात्ताप झाला नाही. यहोवाने काइनाकरता एक “खूण” नेमून दिली—काइनाला सूडभावनेने कोणी ठार मारू नये म्हणून कदाचित हा सर्वज्ञात असलेला हुकूम असावा ज्याचे सर्वजण पालन करत असावेत.—उत्पत्ति ४:१०-१५.

मग “काइन परमेश्‍वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला.” (उत्पत्ति ४:१६) आपल्या बहिणी अथवा भाच्यांपैकी एकीला पत्नी केल्यानंतर त्याने हनोख या आपल्या पहिल्या पुत्राच्या नावाने एक शहर बांधले. काइनाचा वंशज लामेख देखील त्याच्या अधार्मिक पूर्वजासारखाच हिंसक प्रवृत्तीचा निघाला. पण नोहाच्या दिवसांत आलेल्या जलप्रलयात काइनाचा वंश नामशेष झाला.—उत्पत्ति ४:१७-२४.

आपल्याकरता धडे

काइन व हाबेल यांच्या अहवालांवरून आपण बरेच शिकू शकतो. प्रेषित योहान ख्रिश्‍चनांना एकमेकांवर प्रेम करण्याचे प्रोत्साहन देतो व म्हणतो, “काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे.” “काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती.” तसेच योहान म्हणतो: “जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांस माहीत आहे.” होय, आपण आपल्या ख्रिस्ती बांधवांशी ज्याप्रकारे वागतो, त्यावर आपला देवासोबतचा नातेसंबंध आणि आपले भवितव्य अवलंबून आहे. कोणत्याही बांधवाचा द्वेष करत असताना देवाची स्वीकृती आपल्याला मिळेल अशी आपण अपेक्षा करू शकत नाही.—१ योहान ३:११-१५; ४:२०.

काइन व हाबेल यांच्यावर लहानपणी सारखेच संस्कार झाले असतील पण देवावर विश्‍वास ठेवण्याच्या बाबतीत काइन उणा पडला. किंबहुना त्याने ‘मनुष्यघातक व लबाडीचा बाप’ असलेल्या दियाबलाची प्रवृत्ती प्रदर्शित केली. (योहान ८:४४) काइनाच्या जीवनावरून आपल्याला असे दिसून येते की आपल्या सर्वांसमोर एक निवड आहे, आणि जे लोक पाप करण्याचे निवडतात ते स्वतःहून देवापासून दुरावतात, तसेच अपश्‍चात्तापी व्यक्‍तीला यहोवा अवश्‍य शिक्षा देतो.

दुसरीकडे पाहता, हाबेलाने यहोवावर विश्‍वास ठेवला. “विश्‍वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली.” बायबलमध्ये हाबेलचा बोललेला एकही शब्द नमूद नसला तरीसुद्धा त्याच्या अनुकरणीय विश्‍वासायोगे तो “अद्यापि बोलत आहे.”—इब्री लोकांस ११:४.

खरेपणाने चालणाऱ्‍यांच्या मोठ्या यादीत हाबेलाचे नाव अग्रक्रमावर आहे. त्याचे रक्‍त, जे ‘भूमीतून यहोवाकडे ओरड करीत होते’ ते विसरण्यात आलेले नाही. (उत्पत्ति ४:१०; लूक ११:४८-५१) आपणही हाबेलाप्रमाणे विश्‍वासाने चाललो तर आपल्यालाही यहोवासोबत एक मोलवान आणि कायमरूपी नातेसंबंध अनुभवता येईल.

[२२ पानांवरील चौकट]

शेतकरी आणि मेंढपाळ

देवाने आदामाला अगदी सुरवातीला दिलेल्या जबाबदाऱ्‍यांत जमिनीची मशागत करणे आणि प्राण्यांची देखभाल करणे यांचा समावेश होता. (उत्पत्ति १:२८; २:१५; ३:२३) त्याचा पुत्र काइन शेतीचे काम करू लागला तर हाबेल मेंढपाळ बनला. (उत्पत्ति ४:२) पण जलप्रलयाच्या आधी जर मानवजातीचे अन्‍न केवळ फळे व वनस्पती होत्या तर मग मेंढरांचे पालन करण्याची काय गरज?—उत्पत्ति १:२९; ९:३, ४.

मेंढरांची मानवांनी काळजी घेतली असता त्यांची उत्तम वाढ होते. हाबेलच्या या व्यवसायावरून हेच सिद्ध होते की मनुष्याने इतिहासाच्या सुरवातीपासून या पाळीव प्राण्यांचे पालन केले होते. त्यांचे दूध खाद्यासाठी वापरले जात होते किंवा नाही हे बायबलमध्ये सांगितलेले नाही; अर्थात, या प्राण्यांचे मांस खालले जात नसले तरी त्यांची लोकर कदाचित वापरली जात असावी. शिवाय मेंढरे मेल्यानंतर त्यांच्या कातडीचाही बऱ्‍याच गोष्टींसाठी उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, आदाम व हव्वा यांच्यासाठी यहोवाने “चर्मवस्त्रे करून त्यांस घातली.”—उत्पत्ति ३:२१.

सुरवातीला काइन व हाबेल यांच्यात उत्तम सहकार्य होते असे आपण गृहीत धरू शकतो. ते दोघेही कुटुंबातील इतर सदस्यांच्या अन्‍न व वस्त्राच्या गरजा भागवण्यासाठी काही न काही उत्पन्‍न करत होते.

[२३ पानांवरील चित्र]

“काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती”