व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईश्‍वरी तत्त्वांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो

ईश्‍वरी तत्त्वांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो

ईश्‍वरी तत्त्वांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो

तुम्हाला ठाऊकच असेल की, प्राणी उपजत बुद्धीनुसार कार्य करत असतात. अनेक यंत्रे, सूचनांनुसार कार्य करण्यासाठी रचली जातात. परंतु, मानवांच्या मार्गदर्शनासाठी त्यांना तत्त्वे देण्यात आली होती. हे कसे म्हणता येईल? सर्व नैतिक तत्त्वांचा उगम, यहोवा, याने पहिल्या मानवांना निर्माण करताना म्हटले: “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू.” निर्माणकर्ता एक आत्मा आहे; आपल्यासारखे हाडामासांचे शरीर त्याला नाही. आपण त्याच्या ‘प्रतिरूपाचे’ आहोत त्याअर्थी त्याचे व्यक्‍तिमत्त्व व उदात्त गुण प्रदर्शित करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. मानवांजवळ तत्त्वांनुसार अर्थात, त्यांच्या मते जो योग्य वर्तनाचा नियम आहे त्यानुसार जीवन जगण्याची क्षमता आहे. यहोवाने यांतील अनेक तत्त्वे आपल्या वचनात नमूद करवून घेतली आहेत.—उत्पत्ति १:२६; योहान ४:२४; १७:१७.

परंतु, कोणी म्हणेल, ‘बायबलमध्ये तर शेकडो तत्त्वे आहेत. ती सर्व तत्त्वे लक्षात ठेवणे मला शक्य नाही.’ होय, हे खरे आहे. पण यावर जरा विचार करा: सर्व ईश्‍वरी तत्त्वे फायदेकारक असली तरीही काही तत्त्वे इतरांपेक्षा महत्त्वाची असतात. हे मत्तय २२:३७-३९ या वचनातून तुम्ही पाहू शकता; तेथे येशूने दाखवले की, मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञा आणि त्यामागील तत्त्वांमध्ये काही तत्त्वे इतरांपेक्षा जास्त महत्त्वाची होती.

महत्त्वाची तत्त्वे कोणती आहेत? यहोवासोबत आपल्या नातेसंबंधावर थेट परिणाम करणारी तत्त्वे ही बायबलमधील प्रमुख तत्त्वे आहेत. या तत्त्वांचे आपण पालन केले तर आपल्या नैतिक दिशादर्शकावर निर्माणकर्त्याचा सर्वात जास्त प्रभाव पडेल. शिवाय, अशी काही तत्त्वे आहेत ज्यांचा इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधावर परिणाम पडतो. ही तत्त्वे लागू केल्याने मी-पणा—किंवा इतर कोणत्याही नावाने ओळखली जाणारी ही वृत्ती टाळायला मदत मिळते.

आपण सुरवातीला बायबलमधील सर्वात महत्त्वपूर्ण सत्यांपैकी एक पाहू या. ते सत्य कोणते आहे आणि त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो?

“सर्व पृथ्वीवर परात्पर”

पवित्र शास्त्र स्पष्टपणे दाखवते की यहोवा आपला महान निर्माणकर्ता, सर्वशक्‍तिमान देव आहे. त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही किंवा त्याची जागाही कोणी घेऊ शकत नाही. हे बायबलमध्ये नमूद असलेले प्रमुख सत्य आहे.—उत्पत्ति १७:१; उपदेशक १२:१.

स्तोत्रसंहितेतील एका स्तोत्राच्या लेखकाने यहोवाविषयी असे लिहिले: “तू, केवळ तूच, . . . सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस.” प्राचीन काळातील दावीद राजाने म्हटले: “हे परमेश्‍वरा; राज्यहि तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्‍नत आहेस.” तसेच प्रसिद्ध संदेष्टा, यिर्मया असे लिहिण्यास प्रवृत्त झाला: “हे परमेश्‍वर, तुजसारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे.”—स्तोत्र ८३:१८; १ इतिहास २९:११; यिर्मया १०:६.

देवाविषयीची ही सत्ये आपण आपल्या दररोजच्या जीवनात कशाप्रकारे लागू करू शकतो?

आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ स्थान आपला निर्माणकर्ता आणि जीवन-दाता याला मिळाले पाहिजे हे स्पष्टच आहे. तर मग, स्वतःकडे लक्ष आकर्षित करण्याची प्रवृत्ती—जी काहींमध्ये इतरांपेक्षा ठळक असू शकते—टाळणे योग्य नाही का? याबाबतीत, मार्गदर्शन करणारे एक सूज्ञ तत्त्व असे आहे की, “सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिंथकर १०:३१) या बाबतीत संदेष्टा दानीएल याने उत्तम उदाहरण मांडले.

ऐतिहासिक अहवाल आपल्याला सांगतो की, बॅबिलोनचा राजा नबुखदनेस्सर याला पडलेल्या एका स्वप्नामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता आणि त्याने त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्याची मागणी केली. बाकीचे सर्व कोड्यात पडले परंतु दानीएलाने मात्र राजाला जे हवे होते त्याचे अचूक स्पष्टीकरण दिले. परंतु याचे श्रेय दानीएलाने स्वतः घेतले का? नाही, त्याने “रहस्ये प्रगट करणारा देव [जो] स्वर्गात आहे” त्याचे गौरव केले. दानीएल पुढे म्हणाला: “हे रहस्य मला प्रगट झाले आहे ते मी काही इतर मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान्‌ आहे म्हणून नव्हे.” दानीएल तत्त्वांनुसार चालणारा मनुष्य होता. म्हणूनच दानीएलाच्या पुस्तकात, तिन्ही वेळा त्याचे वर्णन देवाच्या नजरेत “परमप्रिय” असे करण्यात आले आहे.—दानीएल २:२८, ३०; ९:२३; १०:११, १९.

दानीएलाचे अनुकरण केल्याने तुम्हाला लाभ होईल. दानीएलाचे उदाहरण अनुसरताना, हेतू ही निर्णायक गोष्ट आहे. तुम्ही जे काही करता त्याचे गौरव कोणाला प्राप्त व्हावे? तुमची परिस्थिती कोणती असली तरी बायबलमधील एका महत्त्वाच्या तत्त्वानुसार वागण्याची क्षमता तुमच्याजवळ आहे. ते तत्त्व म्हणजे—यहोवा सार्वभौम प्रभू आहे. हे तत्त्व लक्षात ठेवून वागल्यास तुम्ही त्याच्या नजरेत “परमप्रिय” व्हाल.

मानवी नातेसंबंधांच्या संदर्भात आपले मार्गदर्शन करणाऱ्‍या दोन मूलभूत तत्त्वांचे आता आपण परीक्षण करू या. स्वतःला महत्त्व देण्याच्या वाढत्या प्रघातामुळे जीवनाचा हा पैलू खासकरून आव्हानात्मक आहे.

“लीनतेने . . . ”

स्वार्थी लोक क्वचितच समाधानी असतात. त्यांना अधिक चांगले जीवन हवे असते आणि तेही लगेचच्या लगेच. त्यांच्याकरता, नम्रता म्हणजे कमकुवतपणा. त्यांना असे वाटते की, सहनशीलता केवळ इतरांनी प्रदर्शित करण्याचा गुण आहे. यशस्वी होण्यासाठी काहीही केले तरी चालते असे त्यांचे तत्त्व असते. अशा लोकांच्या वागण्याला तुमच्याजवळ काही पर्याय आहे असे तुम्हाला वाटते का?

देवाच्या सेवकांना या प्रवृत्तीचा प्रत्यय जवळजवळ दररोजच येतो पण तिचा प्रभाव त्यांच्यावर होता कामा नये. “स्वतःची वाखाणणी करणारा पसंतीस उतरत नाही, तर ज्याची वाखाणणी प्रभु करितो तोच पसंतीस उतरतो” हे प्रौढ ख्रिश्‍चनांचे तत्त्व असले पाहिजे.—२ करिंथकर १०:१८.

फिलिप्पैकर २:३, ४ येथील तत्त्व लागू केल्याने आपल्याला मदत मिळू शकते. त्या वचनात असे उत्तेजन दिले आहे की, “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” अशातऱ्‍हेने, तुम्ही ‘आपलेच हित पाहणार नाही, तर दुसऱ्‍याचेही पाहाल.’

स्वतःबद्दल योग्य विचार करणारा आणि स्वतःची पात्रता जाणारा एक होता गिदोन; तो प्राचीन इब्री लोकांमध्ये शास्ता होता. त्याने इस्राएलचा नेता होण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. परंतु, गिदोनला नेता म्हणून निवडण्यात आले तेव्हा आपण यासाठी लायक नाही असे तो म्हणू लागला. “माझे कुळ मनश्‍शेवंशात सर्वात दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलाच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे,” असे तो म्हणाला.—शास्ते ६:१२-१६.

शिवाय, यहोवाने गिदोनला विजय प्राप्त करून दिल्यावर एफ्राइमी लोक त्याच्याशी हुजत घालू लागले. गिदोनची काय प्रतिक्रिया होती? विजय प्राप्त झाल्यामुळे तो स्वतःला फार महत्त्वाचे समजू लागला का? मुळीच नाही. उलट नम्रतेने उत्तर देऊन त्याने संकट टाळले. तो म्हणाला, “तुम्ही केले त्या मानाने मला काय करिता आले?” होय, गिदोन मनाचा लीन होता.—शास्ते ८:१-३.

हे खरे की, गिदोनासंबंधीच्या या घटना अगदी प्राचीन काळातल्या आहेत. तरीसुद्धा, हा वृत्तान्त तपासून पाहण्याच्या लायकीचा आहे. तुम्ही पाहिलेच असेल की, गिदोनाची मनोवृत्ती आज लोकांमध्ये असलेल्या वृत्तीपेक्षा खूप वेगळी होती आणि तो त्यानुसार जगला म्हणून त्याला त्याचा फायदाही झाला.

आत्म-केंद्रीतपणाच्या प्रचलित वृत्तीचा आपण स्वतःबद्दल बाळगत असलेल्या दृष्टिकोनावर विपरीत प्रभाव पडू शकतो. बायबलची तत्त्वे हा चुकीचा दृष्टिकोन सुधारून निर्माणकर्ता व इतरांच्या संबंधात आपले खरे मूल्य काय आहे ते शिकवतात.

बायबलच्या तत्त्वांचे पालन केल्याने आपण आज प्रचलित असलेल्या वृत्तीवर मात करू शकतो. भावना किंवा व्यक्‍तिमत्त्वे यांनी आपण प्रभावित होत नाही. धार्मिक तत्त्वांचे आपण जितके अधिक ज्ञान घेतो तितकाच त्या तत्त्वांच्या उगमकर्त्याशी आपला परिचय वाढत जातो. होय, बायबलचे वाचन करतेवेळी ईश्‍वरी तत्त्वांकडे खास लक्ष देणे सार्थ ठरेल.—पेटी पाहा.

यहोवाने मानवांना, प्रामुख्याने उपजतबुद्धीनुसार वागणाऱ्‍या प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ बनवले आहे. देवाची इच्छा अनुसरण्यामध्ये ईश्‍वरी तत्त्वे लागू करणे सामील आहे. अशाप्रकारे आपण आपला नैतिक दिशादर्शक सुस्थितीत ठेवू; हा दिशादर्शक आपल्याला देवाने बनवलेल्या नवीन व्यवस्थेत मार्गदर्शित करील. बायबलमध्ये कारण दिले आहे ज्यामुळे आपण अशी अपेक्षा करू शकतो की, लवकरच “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास” करील अशी नवीन व्यवस्था संपूर्ण पृथ्वीला व्यापून टाकील.—२ पेत्र ३:१३.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

काही मदतदायी बायबल तत्त्वे

कुटुंबात:

“कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्‍याचे पाहावे.” —१ करिंथकर १०:२४.

“प्रीति . . . स्वार्थ पाहत नाही.”—१ करिंथकर १३:४, ५.

“तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वत:वर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी.”—इफिसकर ५:३३.

“स्त्रियांनो, . . . तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा.” —कलस्सैकर ३:१८.

“तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको.”—नीतिसूत्रे २३:२२.

शाळेत, कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात:

“खोट्या तागडीचा यहोवाला वीट वाटतो, . . . दुष्ट नकली वेतन मिळवतो.”—नीतिसूत्रे ११:१, १८, [पं.र.भा.]

“ज्याने चोरी केली त्याने यापुढे चोरी करू नये, तर त्याऐवजी आपल्या हातांनी . . . श्रम करावे.” —इफिसकर ४:२८, [पं.र.भा.]

“कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.”—२ थेस्सलनीकाकर ३:१०.

“जे काही तुम्ही करिता ते . . . प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.”—कलस्सैकर ३:२३.

“सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा” आहे. —इब्री लोकांस १३:१८.

धनसंपत्तीबद्दल दृष्टिकोन:

“जो धनवान होण्याची उतावळी करितो त्याला शिक्षा झाल्यावांचून राहत नाही.”—नीतिसूत्रे २८:२०.

“ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही.” —उपदेशक ५:१०.

स्वतःची पात्रता ठरवणे:

“मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही.”—नीतिसूत्रे २५:२७.

“आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी.” —नीतिसूत्रे २७:२.

“मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका.” —रोमकर १२:३.

“आपण कोणी नसता कोणी तरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो.”—गलतीकर ६:३.

[५ पानांवरील चित्र]

दानीएलाने, देवाला योग्य असलेले श्रेय दिले

[७ पानांवरील चित्र]

ईश्‍वरी तत्त्वांनुसार इतरांशी वागल्याने लोकांसोबत चांगले नातेसंबंध राहतात आणि आनंद मिळतो

[७ पानांवरील चित्राचे श्रेय]

U.S. Fish & Wildlife Service, Washington, D.C./Robert Bridges