वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
‘तुम्ही रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही’ या इब्री लोकांस १२:४ मधील वाक्यांशाचा काय अर्थ होतो?
‘रक्त पडेपर्यंत प्रतिकार करणे’ या वाक्यांशावरून मृत्यू येईपर्यंत सहन करणे, अर्थात शब्दशः स्वतःचे रक्त सांडणे हे सूचित होते.
काही हिब्रू ख्रिश्चनांना त्यांच्या विश्वासामुळे “दुःखाबरोबर फार धीराने झोंबी” करावी लागली होती हे प्रेषित पौलाला माहीत होते. (इब्री लोकांस १०:३२, ३३) हे दाखवून देत असताना पौलाने कदाचित ग्रीक खेळांच्या सामन्यांचे रूपक वापरले असावे; यांत धावणे, कुस्ती, मुष्टियुद्ध, थाळी व भाला फेक यांसारख्या खेळांचा समावेश असू शकतो. म्हणूनच, इब्री लोकांस १२:१ येथे त्याने सहख्रिश्चनांना अशाप्रकारे आर्जवले: “आपणहि सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.”—तिरपे वळण आमचे.
तीन वचनांनंतर म्हणजे इब्री लोकांस १२:४ येथे पौल कदाचित धावण्याच्या उदाहरणानंतर मुष्टियुद्धाचे उदाहरण देत असावा. (१ करिंथकर ९:२६ येथे दोन्ही उदाहरणांचा उल्लेख आहे.) प्राचीन मुष्टियोद्धे, चामड्याच्या पट्ट्यांनी आपली मूठ आणि मनगट बांधत असत. या चामड्याच्या पट्ट्यांवर, ‘शिशाची, लोखंडाची किंवा धातूची बटणे असल्यामुळे पट्टा बराच वजनदार असावा आणि त्यामुळे जबरदस्त प्रहार होत असावा.’ अशा निर्घृण सामन्यांमधील प्रतिस्पर्धी रक्तबंबाळ होत, कधीकधी तर त्यांचा मृत्यूही होत असे.
असो, इब्री ख्रिश्चनांपुढे, देवाच्या अनेक विश्वासू सेवकांची उदाहरणे होती ज्यांनी ‘रक्त पडेपर्यंत,’ मृत्यूपर्यंत छळ आणि निर्घृण दुर्व्यवहार सहन केला होता. प्राचीन विश्वासू लोकांनी कशाकशाचा सामना केला होता ते कोणत्या संदर्भात पौल दाखवून देतो ते पाहा:
“त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तरवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले, असे होते.” त्यानंतर पौलाने आपल्या विश्वासाचा उत्पादक, येशू याच्याबद्दल सांगितले: “त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.”—इब्री लोकांस ११:३७; १२:२.
होय, अनेकांनी ‘रक्त पडेपर्यंत’ अर्थात मृत्यूपर्यंत “प्रतिकार” केला होता. त्यांचा हा प्रतिकार फक्त, विश्वासाच्या उणीवेच्या पापाविरुद्धचा आंतरिक प्रतिकार नव्हता. तर, सर्वात पाशवी बाह्य दुर्व्यवहारातही ते एकनिष्ठ राहिले, मृत्यूपर्यंत विश्वासू होते.
तीव्र छळाची लाट ओसरल्यावर ख्रिस्ती बनलेल्या जेरुसलेम मंडळीतील नवीन लोकांनी अशाप्रकारच्या कडक परीक्षांचा सामना केला नव्हता. (प्रेषितांची कृत्ये ७:५४-६०; १२:१, २; इब्री लोकांस १३:७) तरीपण, काही परीक्षा ज्या इतक्या कडक नसतात त्या काहींना सामन्यांत पुढे जाण्यापासून निरुत्साहित करत होत्या; त्यांची ‘मने खचून ते थकून’ गेले होते. (इब्री लोकांस १२:३) प्रौढतेप्रत पोहंचण्याकरता त्यांना प्रगती करण्याची आवश्यकता होती. यामुळे त्यांची सहनशक्ती वाढणार होती जेणेकरून त्यांच्यासमोर कोणतीही परीक्षा आली तरी, मृत्यू येईपर्यंत त्यांना शारीरिक छळ सहन करावा लागला तरी त्यांनी तो सहन केला असता.—इब्री लोकांस ६:१; १२:७-११.
आधुनिक काळातील अनेक ख्रिश्चनांनी ‘रक्त पडेपर्यंत प्रतिकार केला;’ ख्रिस्ती तत्त्वाशी हातमिळवणी करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना मृत्यूदंड देण्यात आला. तेव्हा, इब्री लोकांस १२:४ मधील पौलाचे शब्द ऐकून मनात धडकी भरून घेण्याऐवजी, आपण कोठपर्यंत जाण्याचा निर्धार केला आहे, देवाशी एकनिष्ठ राहण्याकरता आपण जीवही द्यायला तयार आहोत हे त्या शब्दांवरून सूचित होते असे समजावे. इब्रीकरांना लिहिलेल्या त्याच पत्रात पुढे पौलाने लिहिले: “देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू.”—इब्री लोकांस १२:२८.