‘शरीरातील काट्याला’ तोंड देणे
‘शरीरातील काट्याला’ तोंड देणे
“माझी कृपा [“अपात्री कृपा,” NW] तुला पुरे आहे.” —२ करिंथकर १२:९.
१, २. (अ) आपल्यावर परीक्षाप्रसंग आणि समस्या येतात तेव्हा आपण का गोंधळून जाऊ नये? (ब) परीक्षांना तोंड देताना आपण का खात्री बाळगू शकतो?
“ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१२) हे असे का? कारण सैतानाचा असा दावा आहे की माणूस केवळ स्वार्थापोटी देवाची सेवा करतो आणि हा दावा तो कोणत्याही किंमतीवर खरा करून दाखवू इच्छितो. येशूने एकदा आपल्या विश्वासू प्रेषितांना अशी ताकीद दिली: “तुम्हांस गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली.” (लूक २२:३१) कष्टदायक समस्या आपल्यावर आणून आपली परीक्षा पाहण्याची देव सैतानाला परवानगी देतो हे येशूला चांगले ठाऊक होते. अर्थात याचा अर्थ आपल्या जीवनात येणारी प्रत्येक समस्या सैतान व त्याच्या दुष्टात्म्यांनीच आणवलेली असते असे नाही. (उपदेशक ९:११) पण आपली सचोटी भंग करण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा उपयोग करण्यास सैतान उत्सुक असतो हे मात्र खरे.
२ बायबल आपल्याला सांगते की आपल्यावर परीक्षा प्रसंग येतात तेव्हा आपण गोंधळून जाऊ नये. कोणतेही संकट आले तरीसुद्धा ते असामान्य किंवा अनपेक्षित नाहीच. (१ पेत्र ४:१२) कारण “जगांतील [आपल्या] बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.” (१ पेत्र ५:९) सैतान आज देवाच्या प्रत्येक सेवकावर कमालीचा दबाव आणू पाहात आहे. काट्यांसारख्या असंख्य समस्या आपल्यावर आणून आपल्याला पीडित करण्यात दियाबलाला असूरी आनंद मिळतो. त्यामुळे तो आपल्या ‘शरीरातील काट्यांमध्ये’ भर घालण्यासाठी किंवा ते आणखीन वेदनामय बनवण्यासाठी त्याच्या या व्यवस्थीकरणाचा उपयोग करतो. (२ करिंथकर १२:७) पण सैतानाच्या हल्ल्यांमुळे आपण आपली सचोटी त्यागण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे आपल्याला परीक्षांना तोंड देता यावे म्हणून यहोवा ‘निभावण्याचा उपाय’ करतो त्याचप्रमाणे शरीरात काट्यांप्रमाणे असलेल्या समस्यांना तोंड देता यावे म्हणूनही तो असेच करील.—१ करिंथकर १०:१३.
काट्यासमान समस्यांना कसे तोंड द्यावे
३. पौलाने त्याच्या शरीरातील काटा काढून टाकण्याची विनंती केली तेव्हा यहोवाने काय उत्तर दिले?
३ प्रेषित पौलाने त्याच्या शरीरातील काटा काढून टाकण्याची देवाला याचना केली. “हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली.” यहोवाने पौलाच्या कळकळीच्या याचनेला काय उत्तर दिले ते पाहा, “माझी [अपात्र] कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते.” (२ करिंथकर १२:८, ९) यहोवाने दिलेल्या या उत्तराचे आपण थोडे विश्लेषण करून पाहू आणि आपल्याला त्रस्त करणाऱ्या समस्यांना तोंड देण्याकरता त्यातून काय मदत मिळू शकते यावर विचार करू.
४. पौलाला यहोवाच्या अपात्री कृपेमुळे कशाप्रकारे फायदा झाला होता?
४ तुम्ही लक्ष दिले का? ख्रिस्ताद्वारे आधीच मिळालेल्या अपात्री कृपेकरता कृतज्ञ असण्यास देवाने पौलाला प्रोत्साहन दिले. खरोखर पौलाला अनेक मार्गांनी विलक्षण आशीर्वाद मिळाले होते. एकेकाळी त्याने येशूच्या अनुयायांचा कडाडून विरोध केला असला तरीसुद्धा यहोवाने प्रेमळपणे त्याला येशूचा शिष्य होण्याचा बहुमान दिला. (प्रेषितांची कृत्ये ७:५८; ८:३; ९:१-४) त्यानंतर यहोवाने दयाळूपणे पौलाला कित्येक उत्साहवर्धक कामे व विशेषाधिकार सोपवले. यातून आपण कोणता धडा घेऊ शकतो, हे अगदी स्पष्ट आहे. सर्वात कठीण परिस्थितीतही असे अनेक आशीर्वाद आहेत ज्यांकरता आपण कृतज्ञ असू शकतो. आपल्यावर येणाऱ्या परीक्षांमुळे यहोवाने आजवर दाखवलेला अपरंपार चांगुलपणा आपण कधीही विसरू नये.—स्तोत्र ३१:१९.
५, ६. (अ) देवाचे सामर्थ्य ‘अशक्तपणातच पूर्णतेस येते’ हे यहोवाने पौलाला कसे शिकवले? (ब) पौलाच्या उदाहरणामुळे सैतान लबाड आहे हे कसे सिद्ध झाले?
५ यहोवाची अपात्री कृपा आणखी एका मार्गाने आपल्याकरता पुरे आहे. आपल्यावर येणाऱ्या परीक्षांत आपल्याला मदत करण्यास देवाचे सामर्थ्य पुरेसे, नव्हे त्याहून अधिक आहे. (इफिसकर ३:२०) यहोवाने पौलाला शिकवले की त्याचे सामर्थ्य ‘अशक्तपणातच पूर्णतेस येते.’ ते कसे? देवाने पौलाला त्याच्या समस्येला तोंड देण्याकरता लागणारी पर्याप्त शक्ती पुरवली. परिणामस्वरूप, पौलाच्या सहनशीलतेमुळे आणि यहोवावरील त्याच्या पूर्ण भरवशामुळे सर्वांना हे दिसून आले की देवाचे सामर्थ्य या मनुष्याच्या दुर्बलतेवर व उपजत पापमय स्वभावावर प्रबळ ठरले होते. पण यामुळे सैतानावर काय प्रभाव पडला असेल याचा जरा विचार करा. त्याचा तर असा दावा आहे की मनुष्य केवळ त्याचे जीवन सुरळीत व समस्यामुक्त असते तेव्हाच देवाची सेवा करतो. पौलाच्या विश्वासूपणामुळे जणू त्या निंदकाच्या तोंडात चपराक बसली!
६ हाच पौल आधी देवाविरुद्धच्या लढ्यात सैतानाची साथ देणारा, ख्रिस्ती लोकांचा निरातिशय छळ करणारा एक धर्मांध परुशी होता; समाजातील एका बहुमानित वर्गात जन्म घेतल्यामुळे त्याला अगदी ऐषारामाचे जीवन लाभले होते. आता मात्र तोच पौल स्वतःला ‘प्रेषितांत कनिष्ट’ म्हणवून यहोवाची आणि ख्रिस्ताची सेवा करत होता. (१ करिंथकर १५:९) याचा अर्थ, तो पहिल्या शतकातील ख्रिस्ती नियमन मंडळाच्या अधिकाराला नम्रपणे अधीन होऊन कार्य करत होता. आणि शरीरात काटा असूनही तो विश्वासूपणे आपली परीक्षा सहन करत होता. सैतानाची किती घोर निराशा झाली असेल! कारण जीवनातल्या समस्यांमुळे पौलाचा आवेश थंडावला नाही. ख्रिस्ताच्या स्वर्गीय राज्यात सहभागी होण्याची त्याला असलेली आशा त्याने क्षणभरही नजरेआड होऊ दिली नाही. (२ तीमथ्य २:१२; ४:१८) कोणताही काटा, कितीही वेदनामय असला तरीसुद्धा, तो पौलाचा आवेश कमी करू शकला नाही. आपलाही आवेश असाच, अविरत ज्वलंत राहो! आपल्या समस्यांतून आपल्याला निभावून नेणाऱ्या यहोवाने, सैतान लबाड आहे हे सिद्ध करून दाखवण्यात हातभार लावण्याचा बहुमान आपल्याला दिला आहे.—नीतिसूत्रे २७:११.
यहोवाच्या तरतुदी अत्यावश्यक
७, ८. (अ) आज यहोवा कशाच्या माध्यमाने आपल्या सेवकांना सामर्थ्य देतो? (ब) आपल्या शरीरातील काट्यासमान समस्यांना तोंड देण्याकरता दररोजचे बायबल वाचन आणि अभ्यास इतके अत्यावश्यक का आहेत?
७ आज, यहोवा विश्वासू ख्रिश्चनांना त्याचा पवित्र आत्मा, त्याचे वचन आणि आपल्याला लाभलेला ख्रिस्ती बंधुवर्ग यांच्या माध्यमाने सामर्थ्य देऊ करतो. प्रेषित पौलाप्रमाणे, आपण प्रार्थनेद्वारे आपला भार यहोवावर टाकू शकतो. (स्तोत्र ५५:२२) देव आपल्या समस्या कदाचित काढून टाकणार नाही, पण या समस्यांना, किंबहुना अतिशय कठीण भासणाऱ्या समस्यांनाही तोंड देण्याकरता तो आपल्याला सुबुद्धी देऊ शकतो. तसेच यहोवा आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देऊन आपल्यावर येणारी संकटे सोसण्याकरता मनोबल देखील देतो.—२ करिंथकर ४:७.
८ ही मदत आपण कशी मिळवू शकतो? त्यासाठी आपण देवाच्या वचनाचा मनःपूर्वक अभ्यास केला पाहिजे कारण त्यातच आपल्याला यहोवाची खात्रीलायक सांत्वनाची वचने सापडतील. (स्तोत्र ९४:१९) बायबलमध्ये आपल्याला, देवाच्या मदतीकरता याचना करणाऱ्या त्याच्या सेवकांचे हृदयस्पर्शी शब्द वाचायला मिळतात. यहोवाने त्यांना दिलेली व बऱ्याचदा सांत्वनदायक शब्दांत दिलेली उत्तरे देखील मनन करण्याकरता उत्तम साहित्य ठरू शकतात. अशाप्रकारचा अभ्यास आपल्याला मनोबल देईल जेणेकरून, ‘सामर्थ्याची पराकोटी देवाची असेल, आमच्यापासून होणार नाही.’ योग्य आहार आणि ताकद मिळण्याकरता ज्याप्रमाणे दररोज शारीरिक अन्न खाणे आवश्यक आहे त्याचप्रकारे देवाची वचने देखील आपण नियमितपणे ग्रहण केलीच पाहिजेत. आपण असे करतो का? कारण असे केल्याने मिळणारे ‘पराकोटीचे सामर्थ्य’ आज आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व लाक्षणिक काट्यांच्या वेदना सहन करण्यास आपली मदत करते असे आपल्याला दिसून येईल.
९. समस्यांना तोंड देणाऱ्यांना वडील कशाप्रकारे साहाय्य करू शकतात?
९ देवाला भिऊन वागणारे ख्रिस्ती वडील, दुःखांच्या “वाऱ्यापासून आसरा” आणि निरनिराळ्या समस्यांच्या “वादळापासून निवारा” ठरू शकतात. वरील वर्णन आपल्याबाबतीत खरे ठरावे अशी इच्छा बाळगणारे वडील नम्रपणे आणि प्रामाणिकपणे, आपणांस “सुशिक्षितांची जिव्हा” देण्याची यहोवाला विनंती करतात, जेणेकरून त्यांना दुःखात असलेल्यांना अचूक शब्दांत सांत्वन देता येईल. जीवनाच्या खडतर वळणावरून जाताना, वडिलांचे शब्द आपल्या जिवाला थंडावा व विसावा देणाऱ्या पावसाच्या कोमल सरीसारखे आल्हाददायक ठरू शकतात. “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर” देण्याद्वारे वडील खरोखर अशा आध्यात्मिक बंधूभगिनींना साहाय्य करू शकतात जे त्यांच्या शरीरात असलेल्या कोणत्या न कोणत्या काट्याशी झुंजत असल्यामुळे थकले असतील अथवा निराश झाले असतील.—यशया ३२:२; ५०:४; १ थेस्सलनीकाकर ५:१४.
१०, ११. कठीण परीक्षांना तोंड देत असलेल्यांना देवाचे सेवक कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ शकतात?
१० यहोवाचे सर्व सेवक त्याच्या संयुक्त ख्रिस्ती कुटुंबात सामील आहेत. होय, आपण “प्रत्येक जण एकमेकाचे अवयव असे आहो” आणि त्याअर्थी ‘आपण एकमेकांवर प्रीति केली पाहिजे.’ (रोमकर १२:५; १ योहान ४:११) हे कर्तव्य आपण कसे पूर्ण करू शकतो? १ पेत्र ३:८ यानुसार आपण विश्वासाद्वारे आपल्यासोबत एका घरचे झालेल्यांशी “समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू” होण्याद्वारे असे करू शकतो. आणि यांपैकी जे शरीरात एखाद्या वेदनामय काट्याला तोंड देत असतील, मग ते लहान असोत वा वयस्क, आपण त्यांच्याप्रती खास विचारशीलता दाखवली पाहिजे. कशी?
११ आपण त्यांच्या दुःखाबद्दल जाणीव ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण भावनाशून्य, असंवेदनशील किंवा बेपर्वा मनोवृत्तीने वागलो तर नकळत आपण त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल. त्यांच्या समस्यांची जाणीव राखल्यास आपोआपच आपण काय बोलतो, कसे बोलतो आणि कसे वागतो याविषयी विचारशील राहण्यास प्रवृत्त होऊ. आपण आशावादी दृष्टिकोनाने आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल अशाप्रकारे वागतो-बोलतो तेव्हा त्यांना पीडित करणाऱ्या काट्याच्या तीव्र वेदना निदान काही प्रमाणात सुसह्य होण्याची शक्यता आहे. अशारितीने आपण त्यांना सांत्वन व मदत देऊ शकतो.—कलस्सैकर ४:११.
काहींनी कशाप्रकारे विजय मिळवला
१२-१४. (अ) एक ख्रिस्ती बहीण कर्करोगाशी कशाप्रकारे लढली? (ब) आध्यात्मिक बंधूभगिनींनी या बहिणीला कशाप्रकारे साहाय्य व प्रोत्साहन दिले?
१२ शेवटल्या काळाची समाप्ती जवळ येत असता, ‘वेदना’ दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. (मत्तय २४:८) पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांच्या आणि खासकरून यहोवाची इच्छा पूर्ण करू इच्छिणाऱ्या त्याच्या विश्वासू सेवकांच्या जीवनात अनेक समस्या येण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, एका ख्रिस्ती बहिणीच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. ती पूर्ण वेळेची सेवा करत होती. तिला कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले आणि तिच्या लाळग्रंथी व लसीकाग्रंथी शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तिला हा आजार झाल्याचे तिला व तिच्या पतीला कळले तेव्हा त्यांनी लगेच यहोवाला बराच वेळ अगदी कळकळीने प्रार्थना करून मदत मागितली. नंतर या बहिणीने सांगितले, की आपल्याला विश्वास वाटणार नाही, पण प्रार्थना केल्याबरोबर त्यांना लगेच एकप्रकारची मानसिक शांती जाणवली. अर्थात, या बहिणीला बरेच उतार चढाव, खासकरून तिच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांचे अनेक दुष्परिणाम सहन करावे लागले आहेत.
१३ या परिस्थितीला तोंड देण्याकरता या बहिणीने कर्करोगाबद्दल शक्य तितकी माहिती मिळवली. तिने डॉक्टरांना तिच्या शंका विचारल्या. टेहळणी बुरूज, सावध राहा! आणि संबंधित ख्रिस्ती प्रकाशनांत तिला अशा बहिण-भावांचे वैयक्तिक अहवाल वाचायला मिळाले ज्यात त्यांनी या आजारपणाला भावनिकरित्या कसे तोंड दिले हे वाचायला मिळाले; तसेच कठीण प्रसंगात यहोवा आपल्या लोकांना कसे सांभाळतो हे दाखवणारे बायबलमधील समर्पक अहवाल आणि इतर बरीच उपयुक्त माहिती सापडली.
१४ दुःखाला कसे तोंड द्यावे याविषयी एका लेखात या वचनाचा उल्लेख होता: “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो.” (नीतिसूत्रे १८:१) त्यामुळे या लेखात असा सल्ला दिला होता, की “फटकून राहण्याचे टाळा.” * बहिणीने सांगितले: “बऱ्याच जणांनी मला सांगितले की ते माझ्यासाठी प्रार्थना करत होते; इतरजण फोनवर माझ्याशी बोलायचे. दोन वडील नियमित फोन करून माझी विचारपूस करायचे. फुलं आणि कितीतरी शुभेच्छा पत्रे मला मिळाली. काहींनी तर जेवण देखील पाठवले. तसेच, बऱ्याच जणांनी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता माझ्यासोबत येण्याविषयी स्वतःहून सुचवले.”
१५-१७. (अ) एका ख्रिस्ती बहिणीने अपघातांमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीला कशाप्रकारे तोंड दिले? (ब) मंडळीतल्या बांधवांनी तिला कशी मदत केली?
१५ अमेरिकेतील न्यू मेक्सिको येथे राहणाऱ्या व बऱ्याच काळापासून यहोवाची सेवा करत असलेल्या एका बहिणीचे दोन मोटार अपघात झाले. तिच्या मानेला व खांद्यांना मार लागला आणि त्यामुळे ती २५ वर्षांपासून तोंड देत असलेली संधिवाताची व्याधी आणखीनच तीव्र झाली. ती सांगते: “मला मानेचा तोल सांभाळणे आणि दोन किलोपेक्षा जास्त वजनाची कोणतीही वस्तू उचलणे अतिशय कठीण झाले. पण यहोवाला कळकळीने प्रार्थना केल्यामुळे मला खूप मदत मिळाली आहे. तसेच टेहळणी बुरूज अभ्यास लेख देखील खूप सहायक ठरले आहेत. यांपैकी एका लेखात, मीखा ६:८ या वचनावर विवेचन करण्यात आले होते. त्यात असे सांगितले होते की देवासमागमे नम्रभावाने चालण्याचा अर्थ आपल्या मर्यादा ओळखणे. या माहितीमुळे मला हे समजायला मदत झाली की माझ्या या दुर्बल अवस्थेमुळे मला सेवाकार्यात हवा तितका सहभाग घेता येत नसला तरीसुद्धा मी निराश व्हायला नको. स्वच्छ मनाने त्याची उपासना करणे सर्वात महत्त्वाचे आहे.”
१६ ती असेही सांगते: “सभांना येण्याकरता व क्षेत्र सेवाकार्याला जाण्याकरता मी केलेल्या प्रयत्नांबद्दल मंडळीतले वडील नेहमी कौतुक करायचे. मंडळीतली तरुण मुले अतिशय प्रेमाने बिलगून माझे स्वागत करायचे. पायनियर सेवकसुद्धा माझ्यासोबत अतिशय धीराने वागायचे आणि एखाद्या दिवशी मला बरे वाटत नसल्यामुळे सेवेला जाता येत नसल्यास ते आपल्या योजना त्यानुसार बदलायचे. हवामान चांगले नसल्यास, ते मला पुनर्भेटींकरता घेऊन जायचे किंवा त्यांच्या बायबल अभ्यासांकरता येण्याचे मला आमंत्रण द्यायचे. मला बॅग धरता येत नसल्यामुळे प्रचार कार्याला जाताना मंडळीतले इतर प्रचारक माझे साहित्य देखील आपल्या बॅगमध्ये ठेवायचे.”
१७ मंडळीतल्या वडिलांनी व सहविश्वासू बांधवांनी या दोन बहिणींना त्यांच्या काट्यासमान आजारपणाला तोंड देण्यास कशी मदत केली याकडे लक्ष द्या. त्यांनी त्यांना प्रेमळपणे व्यवहारोपयोगी मदत दिली जी खासकरून त्यांच्या विशिष्ट आध्यात्मिक, शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण नीतिसूत्रे २०:२९.
करण्यासाठी मदतदायक ठरली. यामुळे तुम्हाला देखील समस्यांना तोंड देत असलेल्या इतर बांधवांना मदत देण्याचे प्रोत्साहन मिळत नाही का? तरुणांनो, तुम्ही देखील तुमच्या मंडळीतल्या अशा बांधवांना मदत करू शकता जे शरीरातील काट्यासमान समस्यांना तोंड देत आहेत.—१८. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांत प्रकाशित होणाऱ्या जीवन कथांतून आपल्याला कोणत्या प्रकारे प्रोत्साहन मिळू शकते?
१८ टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांत, अशा अनेक साक्षीदारांच्या जीवनकथा आणि अनुभव आहेत ज्यांनी जीवनातल्या समस्यांना तोंड दिले आणि आजही देत आहेत. अशाप्रकारचे लेख नियमित वाचल्यास तुम्हाला दिसून येईल की जगभरातील तुमच्या आध्यात्मिक बंधू व भगिनींनी आर्थिक समस्या, विपत्तींमध्ये प्रिय जनांचा मृत्यू आणि युद्धकाळातील भयंकर परिस्थिती यांसारख्या निरनिराळ्या समस्यांना तोंड दिले आहे. काहीजण आजारपणामुळे अंथरुणाला खिळले आहेत. निरोगी लोक ज्यांची दखलसुद्धा घेत नाहीत अशी साधी साधी कामे देखील काहीजणांना स्वतःहून करता येत नाहीत. आजारपणामुळे, खासकरून त्यांना ख्रिस्ती कार्यांत मनासारखा सहभाग घेता येत नाही तेव्हा तर त्यांच्या सहनशक्तीची परीक्षाच होते. पण अशा परिस्थितींत त्यांचे बंधू भगिनी, तरुण व वयस्क त्यांना मदत आणि साहाय्य करतात तेव्हा त्यांना याबद्दल किती कृतज्ञ वाटते!
सहन केल्यामुळे आनंद
१९. काट्यांसमान समस्या व दुर्बलता असूनही पौलाला आनंद का व्यक्त करता आला?
१९ देवाने आपल्याला कशाप्रकारे सामर्थ्य दिले हे पाहून पौलाला आनंद झाला. त्याने म्हटले: “ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.” (२ करिंथकर १२:९, १०) आपल्या या वैयक्तिक अनुभवांमुळेच पौल आत्मविश्वासाने असे म्हणू शकला: “मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतहि राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:११-१३.
२०, २१. (अ) ‘अदृश्य गोष्टींवर’ मनन केल्यामुळे आपल्याला आनंद का मिळू शकतो? (ब) पृथ्वीवरील परादीसमध्ये तुम्ही स्वतः कोणत्या “अदृश्य गोष्टी” पाहण्याची आस धरता?
२० तर मग आपल्या शरीरात कोणताही लाक्षणिक काटा असला तरीसुद्धा, आपल्या अशक्तपणात यहोवाचे सामर्थ्य पूर्णतेस येत आहे हे सर्वांना दाखवण्यात आपण मोठा आनंद प्राप्त करू शकतो. पौलाने लिहिले: “म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही; . . . तरी [आमचा] अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करिते; आम्ही . . . अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण . . . अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.”—२ करिंथकर ४:१६-१८.
२१ आज यहोवाच्या लोकांपैकी बहुतेकांना पृथ्वीवरील त्याच्या परादीसमध्ये राहण्याची आणि त्याने प्रतिज्ञा दिलेले आशीर्वाद उपभोगण्याची आशा आहे. हे आशीर्वाद आज आपल्याकरता “अदृश्य” आहेत असे म्हणता येईल. पण ती वेळ वेगाने जवळ येत आहे जेव्हा आपण ते सर्व आशीर्वाद खरे झालेले आपल्या डोळ्यांनी पाहू, इतकेच नव्हे तर ते सर्वकाळ उपभोगू. यांपैकी एक आशीर्वाद म्हणजे पुन्हा कधीही आपल्याला जीवनात काट्यासमान समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही! देवाचा पुत्र ‘सैतानाची कृत्ये नष्ट करेल’ आणि ‘मरणावर सत्ता गाजविणाऱ्याला शून्यवत’ करेल.—१ योहान ३:८; इब्री लोकांस २:१४.
२२. आपण कोणती खातरी बाळगू शकतो आणि त्याअर्थी आपण कोणता संकल्प करावा?
२२ आज आपल्याला कोणताही काटा दुःख देत असला, तरीसुद्धा आपण त्याला तोंड देत राहू. पौलाप्रमाणे आपण यहोवाच्या सामर्थ्याने असे करू शकतो कारण तो आपल्याला विपुल शक्ती पुरवतो. पृथ्वीवरील परादीसमध्ये आपण दररोज यहोवाला त्याने आपल्याकरता केलेल्या सर्व अद्भुत कार्यांबद्दल धन्यवाद देऊ.—स्तोत्र १०३:२.
[तळटीप]
^ परि. 14 सावध राहा! जून ८, २००० अंकातील “बायबलचा दृष्टिकोन: निराशेवर काही उपाय?” हा लेख पाहा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• दियाबल कशाप्रकारे खऱ्या ख्रिश्चनांच्या सचोटीचा भंग करण्याचा प्रयत्न करतो?
• यहोवाचे सामर्थ्य कशाप्रकारे ‘अशक्तपणात पूर्णतेस येते?’
• समस्यांमुळे दुःखी झालेल्यांना वडील व इतर जण कशाप्रकारे उत्तेजन देऊ शकतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१८ पानांवरील चित्र]
पौलाने त्याच्या शरीरातील काटा काढून टाकण्याची तीन वेळा देवाला विनंती केली