सर्व प्रकारच्या मलीनतेपासून स्वतःला शुद्ध करा
सर्व प्रकारच्या मलीनतेपासून स्वतःला शुद्ध करा
स्वच्छता राखण्याची इच्छा ही स्वाभाविक आहे पण देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाच्या संदर्भात हा केवळ इच्छेचा प्रश्न नव्हे, तर त्याला संतुष्ट करण्याकरता ही एक अट आहे. इब्री व ग्रीक भाषेत स्वच्छ, शुद्ध तसेच शुद्ध करण्याची क्रिया, म्हणजे कलंक धुऊन टाकणे, डाग काढून टाकणे, सर्व प्रकारची भेसळ, भ्रष्टता किंवा मलीनता काढून टाकणे यास सूचित करण्याकरता अनेक शब्द आहेत. हे शब्द केवळ शारीरिक स्वच्छतेलाच नव्हे तर सहसा नैतिक किंवा आध्यात्मिक शुद्धतेला सूचित करतात.
शारीरिक स्वच्छता
इस्राएल राष्ट्रांतील लोकांच्या वैयक्तिक सवयींमुळे तुलनात्मकरित्या इतर देशांतील लोकांपेक्षा (४० वर्षे ते अरण्यात भटकत होते तरीसुद्धा) त्यांचे आरोग्य अधिक चांगले होते. आणि याचे श्रेय निश्चितच, त्यांच्या छावणीतल्या जीवनाविषयी, उदाहरणार्थ, आजारांचे निदान व उपचाराविषयी देवाने दिलेल्या नियमांना जाते. देवाने दिलेल्या नियमांत स्वच्छ पाण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला होता.
येशूने देखील परूशांच्या आध्यात्मिक अशुद्धतेकडे आणि ढोंगीपणाकडे लक्ष वेधताना शारीरिक स्वच्छतेचे उदाहरण घेतले. त्याने त्यांच्या फसव्या आचरणाची तुलना केवळ बाहेरून ताटवाटी साफ करण्याशी केला. (मत्तय २३:२५, २६) शेवटल्या वल्हांडण भोजनाच्या वेळी शिष्यांशी बोलताना, यहुदा इस्कर्योत अद्याप तेथे होता तेव्हा येशूने अशाच प्रकारचे एक उदाहरण पुन्हा वापरले. त्या सर्वांनी स्नान केले होते आणि त्यांच्या धन्याने त्यांचे पायही धुतले होते त्याअर्थी शारीरिकरित्या ते “सर्वांगी शुद्ध” होते पण आध्यात्मिक अर्थाने मात्र, येशूने म्हटले, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”—योहान १३:१-११.
सामान्य पण अशुद्ध—का?
रजोवृत्ती, विवाहितांमधील लैंगिक संबंध, प्रसूती यांसारख्या गोष्टी सामान्य व योग्य असूनही नियमशास्त्रानुसार त्या एका व्यक्तीला “अशुद्ध” करतात असे का बरे मानले जायचे? एक कारण म्हणजे यामुळे वैवाहिक जीवनातील अंतरंगीच्या संबंधांना पवित्रतेचा दर्जा दिला गेला; यामुळे दोघाही सोबत्यांना आत्मसंयम, जननेंद्रियांविषयी आदर आणि जीवन व रक्त यांची पवित्रता यांविषयी जाणीव करून देण्यात आली. या नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे निष्पन्न झालेल्या आरोग्यदायी परिणामांविषयी बरेच विवेचन करण्यात आले आहे. पण या विषयाची आणखी एक बाजू आहे.
देवाने पहिल्या पुरुष व स्त्रीला निर्माण केले तेव्हा त्याने त्यांना लैंगिक इच्छा आणि प्रजोत्पादनाची शक्ती दिली होती व त्यांना एकत्र राहून मुले उत्पन्न करण्याची आज्ञा दिली होती. त्यामुळे त्या परिपूर्ण जोडप्याचे लैंगिक संबंध पाप नव्हते. पण आदाम व हव्वा यांनी लैंगिक संबंधांच्या बाबतीत नव्हे, तर मना केलेले फळ खाण्याच्या बाबतीत देवाची आज्ञा मोडली, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलली. अचानक त्यांच्या विवेकातील दोषभावनेमुळे त्यांना त्यांच्या नग्न अवस्थेची जाणीव झाली आणि त्यांनी लगेचच देवासमोर जाण्याआधी आपली जननेंद्रिये झाकली. (उत्पत्ति ३:७, १०, ११) तेव्हापासून मनुष्य, संतती उत्पन्न करण्याची आज्ञा निर्दोषरित्या पूर्ण करू शकत नव्हते; उलट, आईवडिलांपासून मुलांना पापाचा कलंक आणि मृत्यूचा दंड उपजतच मिळणार होता. सर्वात सत्शील आणि देवभीरू पालकांनाही पापाने दूषित असलेली मुलेच होतात.—स्तोत्र ५१:५.
जननेंद्रियांसंदर्भात दिलेल्या नियमशास्त्रातील आज्ञांनी पुरुष व स्त्रियांना आत्म-शासन करण्यास, वासनांवर ताबा ठेवण्यास आणि प्रजननाकरता देवाने दिलेल्या व्यवस्थेचा आदर करण्यास शिकवले. मनुष्याच्या उपजत पापपूर्णतेची आठवण करून देण्याकरता, पुरुष व स्त्रिया या दोघांनीही त्यांच्या शरीराच्या सामान्य क्रियांमुळे जननेंद्रियांतून स्राव होत लूक २:२२-२४.
असताना काही काळ अशुद्धता पाळणे योग्यच होते. काही व्याधींमुळे प्रदीर्घ काळ शरीरातून स्राव होत असल्यास आणखी काही काळ अशुद्ध राहणे आवश्यक होते; आणि शेवटी, बाळंतिणीला करावे लागत होते त्याप्रमाणे, स्नान करण्यासोबतच पापार्पण द्यावे लागत होते जेणेकरून देवाचा याजक त्या व्यक्तीकरता प्रायश्चित्त करू शकत होता. म्हणूनच, येशूची आई मरिया हिने देखील आपल्या पहिल्या मुलास जन्म दिल्यानंतर पापार्पण देण्याद्वारे आपली उपजत पापपूर्णता कबूल केली; त्याअर्थी आपण पापरहित किंवा निष्कलंक नाही हे तिने कबूल केले.—स्वच्छतेविषयी ख्रिस्ती लोकांचा दृष्टिकोन
ख्रिस्त या पृथ्वीवर होता तेव्हा नियमशास्त्र आणि त्यात सांगितलेले रीतीरिवाज पाळले जात होते; पण आज ख्रिस्ती लोक नियमशास्त्राच्या किंवा त्यातील स्वच्छतेसंबंधी असलेल्या नियमांच्या अधीन नाहीत. (योहान ११:५५) “ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे;” “वास्तविकता ख्रिस्ताची आहे.” (इब्री लोकांस १०:१; कलस्सैकर २:१७, NW) म्हणूनच पौलाने शुद्धीकरणाच्या संदर्भात असे लिहिले: “बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धि होईल इतके पवित्र करितात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्सद्विवेकबुद्धि जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?”—इब्री लोकांस ९:१३, १४, १९-२३.
त्याअर्थी प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्तच ख्रिस्ती लोकांना सर्व पाप व अधार्मिकतेपासून शुद्ध करते. (१ योहान १:७, ९) “ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे,” जेणेकरून तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी अर्थात, “चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक.” (इफिसकर ५:२५-२७; तीत २:१४) म्हणूनच या ख्रिस्ती मंडळीच्या प्रत्येक सदस्याने “आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर” न पडू देता सतत देवाच्या आत्म्याची फळे प्रदर्शित केली पाहिजेत आणि नेहमी हे आठवणीत ठेवले पाहिजे, की “फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून [देव] त्या प्रत्येकाला साफसूफ करितो.”—२ पेत्र १:५-९; योहान १५:२, ३.
कायम स्वच्छतेचा उच्च दर्जा राखा
तेव्हा, ख्रिस्ती लोकांनी सतत शारीरिक, नैतिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचा उच्च दर्जा राखला पाहिजे आणि त्यासाठी, “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून” स्वतःला सुरक्षित ठेवले पाहिजे. (२ करिंथकर ७:१) येशूने म्हटले, “बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही. तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करिते;” त्यामुळे येशूच्या शुद्ध करणाऱ्या रक्ताचा फायदा उपभोगणारे आध्यात्मिक शुद्धतेवर अधिक भर देतात. ते देवासमोर ‘शुद्ध अंतःकरण’ व ‘शुद्ध विवेकभाव’ राखतात. (मार्क ७:१५; १ तीमथ्य १:५; ३:९; २ तीमथ्य १:३) शुद्ध विवेक राखणाऱ्यांकरता “सर्व काही शुद्ध आहे,” ते विटाळलेल्या व विश्वास न ठेवणाऱ्यांप्रमाणे नाहीत, ज्यांना “काहीच शुद्ध नाही.” (तीत १:१५) ज्यांना आपले अंतःकरण स्वच्छ व शुद्ध ठेवायचे आहे ते यशया ५२:११ च्या सल्ल्याचे पालन करतात जेथे असे म्हटले आहे: “[“कोणत्याही,” NW] अशुद्ध वस्तूला शिवू नका; . . .परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो, तुम्ही आपणास शुद्ध करा.” (स्तोत्र २४:४; मत्तय ५:८) असे केल्यामुळे त्यांचे “हात” लाक्षणिक अर्थाने स्वच्छ असतात आणि त्यामुळे देव त्यांना शुद्ध लेखतो.—याकोब ४:८; २ शमुवेल २२:२७; स्तोत्र १८:२६; दानीएल ११:३५; १२:१०.
एके प्रसंगी प्रेषित पौलाने, आता तो नियमशास्त्राच्या अधीन नव्हता तरीसुद्धा नियमशास्त्राच्या आज्ञेनुसार मंदिरात जाऊन स्वतःला शुद्ध केले. हे त्याचे वागणे त्याच्या शिकवणुकींशी विसंगत होते का? पौल नियमशास्त्राच्या किंवा त्यातील विधींच्या विरोधात नव्हता; त्याने केवळ हे स्पष्ट केले की देव ख्रिश्चनांकडून नियमशास्त्राच्या अधीन राहण्याची अपेक्षा करत नाही. नियमशास्त्राचे विधी नव्या ख्रिस्ती सत्यांच्या विरोधात नसल्यास, देवाने नियमशास्त्रात आज्ञापिल्यानुसार करण्यात काही गैर नव्हते. यहुद्यांना येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता ऐकण्यात अडखळण होऊ नये म्हणून पौलाने वर सांगितल्याप्रमाणे केले. (प्रेषितांची कृत्ये २१:२४, २६; १ करिंथकर ९:२०) या सर्व बाबतीत, पौलाने इतरांच्या तारणाची दखल घेतली आणि त्यांना तारण मिळावे म्हणून आपल्या परीने जे काही करता येईल ते केले. म्हणूनच तो असे म्हणू शकला की: “मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:२६; १८:६) आपणही शारीरिक, नैतिक व आध्यात्मिक दृष्टीने शुद्ध राहण्याचा कसोशीने प्रयत्न करू या. असे केल्याने आपण देवाला संतुष्ट करू.