देवाचा प्रकाश अंधकार दूर करतो!
देवाचा प्रकाश अंधकार दूर करतो!
“परमेश्वर माझ्या अंधकाराचा प्रकाश करितो.”—२ शमुवेल २२:२९.
१. प्रकाश जीवनाशी कशाप्रकारे संबंधित आहे?
देव बोलला: ‘प्रकाश होवो.’ आणि प्रकाश झाला.” (उत्पत्ति १:३) निर्मितीच्या अहवालातील हे अर्थसूचक शब्द प्रकाशाचा उत्पन्नकर्ता म्हणून यहोवाची ओळख करून देतात; या प्रकाशाशिवाय पृथ्वीवर जीवन असूच शकले नसते. जीवनाच्या मार्गावर आपल्याला दिशा दाखवण्याकरता आवश्यक असलेल्या आध्यात्मिक प्रकाशाचा उगम देखील यहोवाच आहे. (स्तोत्र ४३:३) राजा दाविदाने आध्यात्मिक प्रकाशाचा जीवनाशी असलेला जवळचा संबंध स्पष्ट केला. त्याने लिहिले: “जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे; तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो.”—स्तोत्र ३६:९.
२. पौलाने दाखवल्याप्रमाणे प्रकाश कशासोबत निगडित आहे?
२ दाविदाच्या काळानंतर जवळजवळ १००० वर्षे उलटल्यानंतर प्रेषित पौलाने निर्मितीच्या अहवालाचा पुन्हा संदर्भ घेतला होता. करिंथ येथील ख्रिस्ती मंडळीला लिहिताना त्याने म्हटले: ‘अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे देव बोलला.’ आध्यात्मिक प्रकाश यहोवाकडून मिळणाऱ्या ज्ञानाशी कशाप्रकारे निगडित आहे हे त्याच्या पुढील शब्दांवरून स्पष्ट होते: “तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.” (२ करिंथकर ४:६) हा प्रकाश आपल्यापर्यंत कसा पोचतो?
बायबल—प्रकाशाचे वाहक
३. बायबलच्या माध्यमाने यहोवा कोणता प्रकाश पुरवतो?
३ यहोवा मुख्यतः त्याच्या प्रेरित वचनाद्वारे, अर्थात बायबलच्याद्वारे आध्यात्मिक प्रकाश पाठवतो. त्याअर्थी आपण बायबलचा अभ्यास करतो आणि देवाचे ज्ञान आत्मसात करतो तसतसा आपण त्याचा प्रकाश आपल्यावर चमकू देत असतो. बायबलच्या माध्यमाने यहोवा त्याच्या उद्देशांवर प्रकाश टाकतो आणि त्याची इच्छा आपण कशाप्रकारे पूर्ण करू शकतो हे आपल्याला कळवतो. यामुळे आपल्याला जीवनात एक उद्देश लाभतो आणि आपल्या आध्यात्मिक गरजा तृप्त करण्यासही मदत होते. (उपदेशक १२:१; मत्तय ५:३) आपण आपल्या आध्यात्मिक गरजांविषयी जागरूक असले पाहिजे यावर येशूने जोर दिला; मोशेच्या नियमशास्त्रातून एक विधान उद्धृत करत येशू म्हणाला: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.”—मत्तय ४:४; अनुवाद ८:३.
४. येशू कोणत्या अर्थाने “जगाचा प्रकाश” आहे?
४ येशूलाही आध्यात्मिक प्रकाशाशी अभिन्नपणे जोडण्यात आले आहे. किंबहुना त्याने स्वतःला “जगाचा प्रकाश” म्हटले आणि असे सांगितले की “जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” (योहान ८:१२) यावरून, यहोवाचे सत्य मानवजातीला कळवण्यात येशूची केंद्रीय भूमिका समजून घेण्यास आपल्याला मदत मिळते. आपल्याला अंधकाराचा अव्हेर करून देवाच्या प्रकाशात चालायचे असल्यास, येशू जे काही सांगतो त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे आणि बायबलमध्ये लिखित असलेल्या त्याच्या आदर्शांचे आणि शिकवणुकींचे आपण जवळून अनुसरण केले पाहिजे.
५. येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या अनुयायांवर कोणती जबाबदारी होती?
५ येशूने आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधी पुन्हा एकदा आपण प्रकाश असल्याचे सांगितले आणि आपल्या शिष्यांना तो म्हणाला: “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हाला अंधकाराने गाठू नये म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा.” (योहान १२:३५, ३६) जे प्रकाशाचे पुत्र बनले त्यांनी बायबलमधील “सुवचनांचा नमुना” आत्मसात केला. (२ तीमथ्य १:१३, १४) त्यानंतर त्यांनी या सुवचनांनी इतर प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना अंधारातून देवाच्या प्रकाशाकडे आकर्षित केले.
६. प्रकाश व अंधकार यांविषयी १ योहान १:५ येथे कोणते मूलभूत सत्य नमूद आहे?
६ प्रेषित योहानाने लिहिले: “देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही.” (१ योहान १:५) प्रकाश व अंधकार यांमधील फरक लक्षात घ्या. आध्यात्मिक प्रकाश यहोवाकडून येतो आणि आध्यात्मिक अंधकाराचा त्याच्याशी काहीही संबंध असू शकत नाही. मग या अंधकाराचा कोणापासून उगम होतो?
आध्यात्मिक अंधकाराचा उगम
७. जगातल्या आध्यात्मिक अंधकाराला कोण कारणीभूत आहे आणि त्याचा कशाप्रकारचा प्रभाव आहे?
७ प्रेषित पौलाने ‘या युगाच्या दैवताविषयी’ उल्लेख केला. ही संज्ञा त्याने दियाबल सैतानाच्या संदर्भात वापरली. त्याने पुढे म्हटले की याने, “विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने . . . आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” (२ करिंथकर ४:४) बरेच लोक देवावर विश्वास असल्याचे सांगतात; पण त्यांपैकी बहुतेक लोकांना दियाबलाच्या अस्तित्वावर विश्वास नाही. का? कारण एक दुष्ट, अतिमानवीय शक्ती अस्तित्वात असू शकते आणि ती आपल्या विचारांवर प्रभाव करू शकते यावर विश्वास ठेवायला ते तयार नाहीत. पण पौलाने दाखवल्याप्रमाणे दियाबल अस्तित्वात आहे आणि लोकांना सत्याचा प्रकाश दिसू नये म्हणून तो त्यांच्या मनावर प्रभाव देखील पाडतो. सैतानाजवळ मानवाच्या विचारसरणीवर प्रभाव पाडण्याची ताकद आहे हे “सर्व जगाला ठकविणारा” या शब्दांत त्याच्याविषयी केलेल्या भविष्यसूचक वर्णनातून स्पष्ट होते. (प्रकटीकरण १२:९) सैतानाच्या कार्यांमुळेच यहोवाची सेवा करणाऱ्यांचा अपवाद सोडल्यास इतर सर्व मानवजातीबद्दल संदेष्टा यशयाचे शब्द आज पूर्ण होत आहेत: “पाहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे.”—यशया ६०:२.
८. आध्यात्मिक अंधकारात असणारे गोंधळलेल्या स्थितीत आहेत हे ते कशाप्रकारे शाबीत करतात?
८ निबिड काळोखात काहीही दिसत नाही. एखादी व्यक्ती अगदी सहज आपली वाट चुकू शकते आणि ती गोंधळून जाते. त्याचप्रकारे आध्यात्मिक अंधकारात असलेल्या लोकांजवळ समजशक्ती नाही आणि आध्यात्मिक अर्थाने लवकरच त्यांची गोंधळलेल्या व्यक्तीसारखी स्थिती होते. सत्य काय आणि असत्य काय, चांगले काय आणि वाईट काय यात फरक करण्याची क्षमताही ते गमावून बसण्याची शक्यता आहे. अंधकारात चाचपडणाऱ्या अशा लोकांविषयीच संदेष्टा यशया याने लिहिले: “जे वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानितात त्यांस धिक्कार असो.” (यशया ५:२०) जे आध्यात्मिक अंधकारात राहतात ते अंधकाराच्या दैवताच्या अर्थात दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली आहेत आणि पर्यायाने प्रकाशाच्या व जीवनाच्या उगमाशी त्यांचा संपर्क तुटला आहे.—इफिसकर ४:१७-१९.
अंधकारातून प्रकाशाकडे—एक खडतर प्रवास
९. पातके करणाऱ्यांना प्रत्यक्षात आणि आध्यात्मिक अर्थानेही अंधकाराचे कशाप्रकारे आकर्षण असते हे स्पष्ट करा.
९ विश्वासू ईयोबाने दाखवले की, पातके करणाऱ्यांना प्रत्यक्षातही अंधकाराचे आकर्षण असते; त्याने म्हटले: “व्यभिचारी मनात म्हणतो की कोणी मला पाहू नये, म्हणून तो दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; तो आपले तोंड झाकून घेतो.” (ईयोब २४:१५) अशाप्रकारचे लोक आध्यात्मिक अर्थानेही अंधकारात आहेत आणि हा अंधकार एखाद्या व्यक्तीला वश करतो. प्रेषित पौलाने म्हटले की लैंगिक अनैतिकता, चोरी, लोभीपणा, दारूबाजी, चहाडी आणि वित्तहरण यांसारख्या गोष्टी अंधकाराच्या जाळ्यात सापडलेले लोक सर्रास आचरतात. पण जे कोणी देवाच्या वचनाच्या प्रकाशात येतात ते बदलू शकतात. अशाप्रकारचा बदल घडणे शक्य आहे हे पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले. करिंथ येथील बरेच ख्रिस्ती पूर्वी अंधकाराची ही कर्मे करत होते, पण तरीसुद्धा पौलाने त्यांना म्हटले: “तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला.”—१ करिंथकर ६:९-११.
१०, ११. (अ) येशूने एका माणसाची दृष्टी परत आणताना विचारशीलपणा कसा दाखवला? (ब) बरेचजण प्रकाशाची आवड का धरत नाहीत?
१० एखादी व्यक्ती गर्द काळोखातून प्रकाशात येते तेव्हा साहजिकच तिच्या डोळ्यांना प्रकाशाची सवय व्हायला थोडा वेळ लागतो. बेथसैदा येथे येशूने एका अंधळ्या माणसाला बरे केले. पण येशूने प्रेमळपणे टप्प्याटप्प्याने त्याची दृष्टी परत आणली. “त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले तुला काही दिसते काय? तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरी पण ती चालत आहेत. नंतर त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेविले, तेव्हा त्याने निरखून पाहिले, आणि तो बरा झाला व सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले.” (मार्क ८:२३-२५) लख्ख सूर्यप्रकाशामुळे या माणसाचे डोळे दिपू नयेत म्हणून येशूने त्याची दृष्टी हळूहळू परत आणली असेल. त्या माणसाला आपल्या डोळ्यांनी पाहता आले तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो.
११ पण, याच्या तुलनेत ज्यांना आध्यात्मिक अंधकारातून टप्प्याटप्प्याने सत्याच्या प्रकाशात पाऊल ठेवण्यास साहाय्य केले जाते त्यांना होणारा आनंद कैक पटीने जास्त आहे. त्यांचा आनंद पाहून आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की आणखी बरेच लोक या प्रकाशाकडे का आकर्षित होत नाहीत? येशू या प्रश्नाचे उत्तर देतो: “निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करितो तो प्रकाशाचा द्वेष करितो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.” (योहान ३:१९, २०) होय, बऱ्याच लोकांना अनैतिकता, जाचजुलूम, लबाडी, फसवेगिरी आणि चोरी यांसारखी “वाईट कृत्ये” करायला आवडते आणि सैतानाचा आध्यात्मिक अंधकार त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागण्याची मोकळीक देतो.
प्रकाशात उन्नती करणे
१२. प्रकाशात आल्यामुळे आपल्याला कोणकोणत्या मार्गांनी फायदा झाला आहे?
१२ प्रकाशाचे ज्ञान मिळाल्यापासून आपल्याला स्वतःत कोणते बदल दिसून येतात? आपण केलेल्या आध्यात्मिक उन्नतीचे अधूनमधून सिंहावलोकन करणे श्रेयस्कर आहे. कोणत्या वाईट सवयी आपण सोडून दिल्या आहेत? जीवनातल्या कोणत्या समस्या सोडवण्यात आपल्याला यश आले आहे? भविष्याकरता आपल्या योजनांत कोणता बदल झाला आहे? यहोवाच्या सामर्थ्याने आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात आणि विचारसरणीत सातत्याने बदल करू शकतो; यावरून हे दिसून येईल की आपण प्रकाशाला प्रतिसाद देत आहोत. (इफिसकर ४:२३, २४) पौल याचे पुढील शब्दांत वर्णन करतो: “पूर्वी तुम्ही अंधकार असे होता पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहा. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यात दिसून येते.” (इफिसकर ५:८, ९) यहोवाच्या प्रकाशाचे मार्गदर्शन स्वीकारण्याद्वारे आपल्याला एक आशा आणि एक उद्देश लाभतो आणि यामुळे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचे जीवनही सुखकर होते. शिवाय अशाप्रकारचे बदल आपण करतो तेव्हा यहोवाला मनापासून किती आनंद होत असेल याची कल्पना करा!—नीतिसूत्रे २७:११.
१३. आपण यहोवाच्या प्रकाशाबद्दल कृतज्ञता कशाप्रकारे दाखवू शकतो आणि असे करण्याकरता कशाची गरज आहे?
१३ आपल्या जीवनात आलेल्या या आनंदाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण यहोवाचा प्रकाश प्रतिबिंबित करतो—अर्थात बायबलमधून आपल्याला शिकायला मिळालेल्या गोष्टी आपण आपल्या कौटुंबिक सदस्यांना, मित्रमैत्रिणींना आणि शेजाऱ्यांनाही सांगतो. (मत्तय ५:१२-१६; २४:१४) जे आपले ऐकून घेत नाहीत त्यांना, आपल्या प्रचार कार्याद्वारे आणि आपल्या आदर्श ख्रिस्ती जीवनाद्वारे दोषी ठरवले जाते. पौल याविषयी खुलासा करतो: “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा, अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा.” (इफिसकर ५:१०, ११) इतरांना अंधकाराचा अव्हेर करून प्रकाशाची वाट निवडण्यास मदत करण्याकरता आपल्याला धैर्य दाखवावे लागेल. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपण इतरांबद्दल सहानुभूती आणि काळजी दाखवली पाहिजे आणि त्यांच्या सार्वकालिक हिताकरता त्यांना सत्याचा प्रकाश देण्याची आपल्याला मनस्वी इच्छा असली पाहिजे.—मत्तय २८:१९, २०.
फसव्या प्रकाशांपासून सावधान!
१४. प्रकाशाच्या बाबतीत आपण कोणत्या इशाऱ्याकडे लक्ष दिले पाहिजे?
१४ रात्रीच्या अंधकारात समुद्रात प्रवास करणाऱ्यांना कोणताही प्रकाश दिसला तर त्यांना आनंद वाटतो. जुन्या काळांत इंग्लंडच्या खडकाळ डोंगरकडांवर, वादळांतून आश्रय घेऊ इच्छिणाऱ्यांना मार्ग दाखवण्याकरता जाळ पेटवून ठेवला जायचा. गलबतांतील प्रवाशांना हा प्रकाश पाहून सुखरूप बंदरावर पोचता येत होते. पण काही जाळ फसवे असायचे. बंदरावर येऊन पोचण्याऐवजी कित्येक गलबतांची दिशाभूल होऊन खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर येऊन ती फुटायची आणि त्यांतील माल लुटला जायचा. या फसव्या जगात आपल्याला आकर्षित करून शेवटी आपले आध्यात्मिक नौकाभंग घडवून आणणाऱ्या फसव्या प्रकाशांनी मोहित होण्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. आपल्याला सांगण्यात आले आहे, की “सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.” त्याचप्रकारे त्याचे सेवक, ज्यांत धर्मत्यागी लोकांचाही समावेश आहे, ते देखील “कपटी कामदार” असून ते ‘नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतात.’ आपण अशा लोकांचे खोटे युक्तिवाद ऐकून घेतले तर यहोवाच्या सत्याच्या वचनावर अर्थात बायबलवर असलेला आपला भरवसा कमकुवत होऊन आपला विश्वास मृत होऊ शकतो.—२ करिंथकर ११:१३-१५; १ तीमथ्य १:१९.
१५. जीवनाकडे नेणाऱ्या मार्गावर टिकून राहण्याकरता आपल्याला कशामुळे मदत मिळेल?
स्तोत्र ११९:१०५) होय, ‘जीवनाकडे नेणारा संकोचित मार्ग’ आपला प्रेमळ पिता यहोवा याने प्रकाशमान केला आहे आणि “त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (मत्तय ७:१४; १ तीमथ्य २:४) बायबलच्या तत्त्वांचे पालन केल्यामुळे आपण त्या संकोचित मार्गावरून अंधकाराच्या पायवाटांवर भरकटण्याची शक्यता आहे. पौलाने लिहिले: “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) आपण जसजशी आध्यात्मिक उन्नती करतो तसतसा आपल्याला देवाच्या वचनाद्वारे सद्बोध प्राप्त होतो. देवाच्या वचनाच्या प्रकाशात आपण स्वतःचे दोष सुधारू शकतो किंवा आवश्यकता भासल्यास मंडळीतले प्रेमळ मेंढपाळ आपल्याला आपले दोष दाखवू शकतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण सुधारणा करून नम्रपणे नीतिशिक्षण स्वीकारून जीवनाच्या मार्गावर कायम टिकून राहू शकतो.
१५ स्तोत्रकर्त्याने लिहिले: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.” (कृतज्ञपणे प्रकाशात चालत राहा
१६. यहोवाने पुरवलेल्या अद्भुत प्रकाशाबद्दल आपण कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो?
१६ प्रकाशाच्या अद्भुत तरतुदीबद्दल आपण यहोवाला आपली कृतज्ञता कशी दाखवू शकतो? योहानाच्या ९ व्या अध्यायात, जन्मापासून अंधळ्या असलेल्या एका माणसाला येशूने बरे केले तेव्हा तो माणूस आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास प्रेरित झाला हे सांगितले आहे. त्याने आपली कृतज्ञता कशाप्रकारे व्यक्त केली? येशू देवाचा पुत्र आहे यावर त्याने विश्वास ठेवला आणि त्याला “संदेष्टा” म्हटले. शिवाय, ज्यांनी येशूच्या या चमत्काराची निंदा करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याने धैर्याने उत्तर दिले. (योहान ९:१७, ३०-३४) प्रेषित पेत्राने ख्रिस्ती मंडळीच्या अभिषिक्त सदस्यांना “देवाचे स्वतःचे लोक” म्हटले. का? कारण जन्मापासून अंधळा असलेल्या ज्या माणसाला येशूने बरे केले होते त्याच्यासारखीच कृतज्ञ वृत्ती ते दाखवतात. ‘ज्याने त्यांना अंधकारांतून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण प्रसिद्ध करण्याद्वारे’ ते आपल्यावर कृपा करणाऱ्या यहोवा देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. (१ पेत्र २:९; कलस्सैकर १:१३) पृथ्वीवरील जीवनाची आशा असणाऱ्यांची देखील अशीच कृतज्ञ वृत्ती आहे आणि ते यहोवाच्या ‘गुणांविषयी’ जाहीर घोषणा करण्यात आपल्या अभिषिक्त बांधवांना सहयोग देतात. अपरिपूर्ण मानवांना देवाने ही किती अनमोल सुसंधी दिली आहे!
१७, १८. (अ) प्रत्येक व्यक्तीची कोणती जबाबदारी आहे? (ब) तीमथ्याप्रमाणे, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला काय टाळण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे?
१७ सत्याच्या प्रकाशाबद्दल मनस्वी कदर बाळगणे महत्त्वाचे आहे. आपल्यापैकी कोणालाही जन्मतःच सत्य माहीत नसते हे आठवणीत असू द्या. काहींना प्रौढपणी ते शिकायला मिळाले आणि अंधकाराच्या तुलनेत हा प्रकाश किती श्रेष्ठ आहे याची त्यांना लगेच जाणीव होते. इतरांना लहानपणापासूनच देवभीरू पालकांचे संस्कार लाभले आहेत. यांना सत्याच्या प्रकाशाची तितकीशी कदर न वाटण्याची शक्यता आहे. एका साक्षीदार बहिणीचे आईवडील तिच्या जन्माआधीच यहोवाची सेवा करत होते; ती कबूल करते की तिला बालपणापासून शिकवण्यात आलेल्या सत्यांच्या पूर्ण अर्थाची आणि महत्त्वाची जाणीव व्हायला बराच काळ लागला व यासाठी तिला बरेच प्रयत्न करावे लागले. (२ तीमथ्य ३:१५) आपण तरुण असो वा वृद्ध, आपल्यापैकी प्रत्येकजणाने यहोवाने प्रकट केलेल्या सत्याविषयी मनस्वी कदर उत्पन्न केली पाहिजे.
१८ तरुण तीमथ्याला बालपणापासूनच “पवित्र शास्त्राची” शिकवण देण्यात आली होती, पण त्याने सेवाकार्यात स्वतःला परिश्रमाने वाहून घेतल्यानंतरच तो एक परिपक्व ख्रिस्ती बनला. (२ तीमथ्य ३:१५) मग तो प्रेषित पौलाला मदत करण्याच्या योग्यतेपर्यंत पोचला; आणि तरीसुद्धा पौलाने त्याला असे प्रोत्साहन दिले की: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.” तीमथ्याप्रमाणेच आपण सर्वांनी अशी कोणतीही गोष्ट करण्याचे टाळले पाहिजे ज्यामुळे आपल्याला लाजिरवाणे वाटेल किंवा ज्यामुळे यहोवाला आपली लाज वाटेल!—२ तीमथ्य २:१५.
१९. (अ) दाविदाप्रमाणे आपल्या सर्वांकडे काय म्हणण्याची कारणे आहेत? (ब) पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?
१९ सत्याचा प्रकाश देणाऱ्या यहोवाची स्तुती करण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत. राजा दावीदाप्रमाणे आपण त्याला म्हणतो: “हे परमेश्वरा, तू माझा दीप आहेस; परमेश्वर माझ्या अंधकाराचा प्रकाश करितो.” (२ शमुवेल २२:२९) तरीसुद्धा आपण कधीही आत्मसंतुष्ट होता कामा नये कारण अशा वृत्तीमुळे, ज्या अंधकारातून आपल्याला बचावण्यात आले आहे त्यात हळूहळू आपण पुन्हा परतण्याचा धोका आहे. यासाठीच, पुढचा लेख आपल्याला हे तपासून पाहण्यास मदत करेल की देवाकडून मिळालेल्या सत्याला आपण आपल्या जीवनात किती महत्त्व देतो.
तुम्ही काय शिकला?
• यहोवा आध्यात्मिक प्रकाश कशाप्रकारे पुरवतो?
• आपल्याभोवती असलेल्या आध्यात्मिक अंधकारामुळे आपल्याला कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागते?
• आपण कोणते धोके टाळले पाहिजेत?
• सत्याच्या प्रकाशाबद्दल आपण कृतज्ञता कशाप्रकारे व्यक्त करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[८ पानांवरील चित्र]
यहोवा शारीरिक व आध्यात्मिक प्रकाशाचा उगम आहे
[१० पानांवरील चित्र]
येशूने एका आंधळ्या माणसाला हळूहळू बरे केले त्याचप्रमाणे तो आपल्यालाही आध्यात्मिक अंधकारातून बाहेर पडण्यास साहाय्य करतो
[११ पानांवरील चित्र]
सैतानाच्या फसव्या प्रकाशामुळे पथभ्रष्ट झाल्यास आध्यात्मिक नौकाभंग होऊ शकतो