एक मुलगा आपल्या पित्याला मदत करतो
एक मुलगा आपल्या पित्याला मदत करतो
तिशीत असलेल्या इंग्लंडच्या जेम्सला गंभीर मनोविकार व सौम्य इच्छावर्ततेचा (ऑटिझम) आजार आहे. तरीपण, आपली आई आणि मोठी बहीण यांच्याबरोबर तो अनेक वर्षांपासून यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहतो. त्याच्या वडिलांना मात्र त्यांच्या विश्वासात फारसा रस नव्हता. एकदा, एका सभेत, आपल्या ओळखीच्या लोकांना ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला उपस्थित राहण्यासाठी आपण आमंत्रण कसे देऊ शकतो याचे एक प्रदर्शन दाखवण्यात आले तेव्हा घरी गेल्यावर जेम्स सरळ आपल्या बेडरूममध्ये गेला. जेम्स असा तडक बेडरूममध्ये का गेला हे पाहण्यासाठी त्याची आईही त्याच्या बेडरूममध्ये गेली आणि तिने पाहिले की, तो टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांतली काही मासिके शोधत होता. मागच्या पानावर स्मारकविधीचे आमंत्रण छापलेले एक मासिक मिळाल्यावर तो लगबगीने आपल्या वडिलांकडे गेला. त्याने पहिल्यांदा त्या चित्राकडे बोट दाखवले आणि मग आपल्या वडिलांकडे बोट दाखवून “तुम्ही” असे म्हणाला. त्याच्या आईवडिलांनी जेम्सकडे अगदी आश्चर्याने पाहिले; जेम्स त्याच्या वडिलांना स्मारकविधीचे आमंत्रण देत होता, हे त्यांना समजले. त्याचे वडील त्याला म्हणाले, की त्यांना जमले तर ते येतील.
स्मारकविधीच्या संध्याकाळी, जेम्सने आपल्या वडिलांच्या कपाटातून एक पॅन्ट निवडली आणि आपल्या वडिलांकडे नेऊन त्यांना ती घालण्यास सांगू लागला. त्याचे वडील म्हणाले, की ते सभेला येणार नाहीत. त्यामुळे मग, जेम्स आणि त्याची आईच फक्त सभेला निघून गेले.
पण काही दिवसांनंतर, जेम्सची आई त्याला मंडळीच्या सभेला जाण्यासाठी तयार करायची तेव्हा तो खूप त्रास द्यायचा, आपल्या वडिलांबरोबर घरीच राहण्याचा तो हट्ट करू लागला. एके रविवारी सकाळी असेच, जेम्सची आई त्याला सभेला नेण्यासाठी तयार करत होती तेव्हा त्याने यायला नकार दिला. तेव्हा, जेम्सचे वडील त्याला म्हणाले, “जेम्स, मी जर सभेला आलो तर तूही येशील का?” हे ऐकून तर जेम्सच्या आईला खूप आश्चर्य वाटले. आणि जेम्सचा चेहरा तर आनंदाने फुलला! त्याने आपल्या वडिलांना मिठी मारून म्हटले: “हो!” आणि ते तिघेही राज्य सभागृहात गेले.
त्या दिवसापासून जेम्सचे वडील रविवारच्या सर्व सभांना उपस्थित राहू लागले आणि त्यांनी असेही बोलून दाखवले, की त्यांना जर प्रगती करायची आहे तर इतरही सभांना उपस्थित राहावे लागेल. (इब्री लोकांस १०:२४, २५) आणि त्यांनी खरोखरच असे केले व दोन महिन्यांनंतर ते नियमितरीत्या बायबलचा अभ्यास करू लागले. त्यांनी भराभर प्रगती केली, आपल्या जीवनात आवश्यक ते बदल केले आणि काही काळातच राज्यप्रचार कार्यातही ते भाग घेऊ लागले. एक वर्ष बायबलचा अभ्यास केल्यावर त्यांनी बाप्तिस्मा घेऊन यहोवाला आपल्या जीवनाचे समर्पण केल्याचे दाखवले. सध्या ते त्यांच्या मंडळीत सेवा सेवक म्हणून कार्य करीत आहेत. आता कुटुंबातील सर्वजण ऐक्याने यहोवाची सेवा करत आहेत.