तुम्ही खर्चाचा अंदाज करता का?
तुम्ही खर्चाचा अंदाज करता का?
येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सार्वकालिक जीवनाची आशा देऊ केली, पण ख्रिस्ती असण्यात अंतर्भूत असलेल्या खर्चाचा अंदाज करण्याचेही त्याने त्यांना प्रोत्साहन दिले. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्याने असा प्रश्न विचारला, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” (लूक १४:२८) येशू कोणत्या खर्चाविषयी बोलत होता?
सर्व ख्रिश्चनांना परीक्षांना—आणि कधीकधी तर गंभीर स्वरूपाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. (स्तोत्र ३४:१९; मत्तय १०:३६) म्हणूनच आपण स्वतःची मानसिक आणि आध्यात्मिक तयारी केली पाहिजे, जेणेकरून अचानक विरोधाला किंवा इतर समस्यांना तोंड द्यावे लागल्यास आपल्याला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. ख्रिस्ताचे शिष्य असण्यात अंतर्भूत असलेल्या खर्चाचा अंदाज करताना अशी आव्हाने आपण आधीच गृहीत धरली पाहिजेत; आपल्याला याची जाणीव असली पाहिजे, की आपल्याला मिळणार असलेले प्रतिफळ, अर्थात पाप व मृत्यू यांपासूनचे तारण या सद्य व्यवस्थीकरणात मिळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मोलाचे आहे. होय, देव आपल्यावर येऊ देतो अशी कोणतीही परिस्थिती, अगदी मृत्यूसुद्धा आपली कायमची हानी करू शकत नाही; अट अशी आहे की आपण त्याची सेवा करत राहिली पाहिजे.—२ करिंथकर ४:१६-१८; फिलिप्पैकर ३:८.
आपला विश्वास इतका मजबूत कसा होऊ शकतो? आपण एखादा योग्य निर्णय घेतो, ख्रिस्ती तत्त्वांवर खंबीर राहतो, किंवा देवाच्या इच्छेविरुद्ध वागण्याचा दबाव असतानाही त्याच्या इच्छेनुसार वागतो त्या प्रत्येक वेळी आपला विश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होत जातो. आपल्या विश्वासू आचरणामुळे आपण वैयक्तिकरित्या यहोवाचा आशीर्वाद अनुभवतो तेव्हा आपला विश्वास अधिकच मजबूत होतो आणि खोलवर मुळावला जातो. अशाप्रकारे आपण येशूचे, त्याच्या पहिल्या शतकातील शिष्यांचे आणि इतिहासात होऊन गेलेल्या अशा सर्व विश्वासू स्त्रीपुरुषांचे अनुकरण करतो ज्यांनी देवाची सेवा करण्यात अंतर्भूत असलेल्या ‘खर्चाचा अंदाज केला.’—मार्क १:१६-२०; इब्री लोकांस ११:४, ७, १७, २४, २५, ३२-३८.