व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलांच्या मनात यहोवाबद्दलचं प्रेम रुजवणं

मुलांच्या मनात यहोवाबद्दलचं प्रेम रुजवणं

जीवन कथा

मुलांच्या मनात यहोवाबद्दलचं प्रेम रुजवणं

वरनर मॅटसन यांच्याद्वारे कथित

काही वर्षांआधी माझा थोरला मुलगा हॅन्स वरनर यानं मला एक बायबल दिलं. बायबलच्या आतल्या पानावर त्यानं लिहिलं होतं: “प्रिय पप्पा, यहोवाचं वचन, आपल्या संपूर्ण कुटुंबाला जीवनाच्या मार्गावर सदोदित वाट दाखवत राहो. मी तुमचा खूप आभारी आहे. तुमचा थोरला मुलगा.” हे शब्द वाचून माझं अंतःकरण कृतज्ञतेनं व आनंदानं कसं भरून आलं हे माझ्यासारखे जे आईवडील आहेत त्यांना चांगल्याप्रकारे समजेल. पण कुटुंब या नात्यानं आम्हाला कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे याची तेव्हा मला पुसटशीही कल्पना नव्हती.

हॅमबर्गच्या जर्मन बंदरापासून २० किलोमीटर दूर असलेल्या हॉलस्टनबेक येथे १९२४ साली माझा जन्म झाला; माझ्या आईनं व आजोबांनी (आईचे वडील) मला लहानाचं मोठं केलं. टूलमेकर म्हणून मी ॲप्रेन्टीसशीप केल्यामुळे, १९४२ साली मला व्हॉरमॅक्ट या सैन्यदलात भरती होण्याचा हुकूम मिळाला. दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी रशियन आघाडीत मला इतके भयंकर अनुभव आले, की त्यांच्या फक्‍त विचारानंच माझा थरकाप होतो. मला टाइफॉइड झाला होता आणि उपचारानंतर पुन्हा आघाडीवर पाठवण्यात आलं. १९४५ सालच्या जानेवारीत मी पोलंडच्या लोड्‌झ इथं होतो; तिथं मी गंभीररीत्या जखमी झालो, मला मिलिटरीच्या इस्पितळात ठेवण्यात आलं. युद्ध संपलं तरी मी तिथं होतो. इस्पितळात असताना व तद्‌नंतर नोलेंगॅममधील डिटेंशन कॅम्पमध्ये असताना मला पुष्कळ गोष्टींचा विचार करायला वेळ मिळाला होता. देव खरोखरच आहे का? आहे तर मग जगात चाललेली क्रूरता तो काढत का नाही? यासारखे प्रश्‍न मला भेडसावायचे.

डिटेंशन कॅम्पमधून माझी सुटका झाल्यावर १९४७ सालच्या सप्टेंबर महिन्यात, कार्लाबरोबर माझं लग्न झालं. आम्ही एकाच गावात वाढलो होतो; कार्ला कॅथलिक होती, पण माझ्या जीवनात धर्माची कसलीच भूमिका नव्हती. आमचं लग्न लावणाऱ्‍या पाळकानं आम्हाला सल्ला दिला, की आम्ही दोघांनी मिळून संध्याकाळच्या वेळी निदान प्रभूची प्रार्थना तरी म्हणावी. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही करू लागलो; परंतु आम्ही कशासाठी प्रार्थना करतोय हे मात्र आम्हाला कळत नव्हतं.

एक वर्षानंतर हॅन्स वरनरचा जन्म झाला. त्याचदरम्यान, माझ्याबरोबर काम करणारा विलहेम ॲरेन्स यानं यहोवाच्या साक्षीदारांबरोबर माझी ओळख करून दिली. त्यानं मला बायबलमधून दाखवलं, की एक दिवशी युद्धांचा अंत होणार आहे. (स्तोत्र ४६:९) १९५० साली मी यहोवाला माझं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला. कार्लानंही एका वर्षानंतर बाप्तिस्मा घेतला तेव्हा मला खूप आनंद झाला.

यहोवाच्या मार्गांत मुलांना वाढवणं

यहोवा विवाहाचा उगम आहे हे मी बायबलमधून वाचलं होतं. (उत्पत्ति १:२६-२८; २:२२-२४) हॅन्स वरनर, कार्ल हान्स, मिखाइल गॅब्रीएला आणि टोमस या आमच्या प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळी मी हजर असल्यामुळे, एक चांगला पती व चांगला पिता होण्याचा माझा निश्‍चय प्रत्येक वेळी पक्का होत गेला. प्रत्येक मुलाचा जन्म झाला तेव्हा कार्लाला व मला अत्यंत आनंद व्हायचा.

१९५३ साली न्यूरेम्बर्ग इथं झालेलं यहोवाच्या साक्षीदारांचं अधिवेशन आमच्या कुटुंबासाठी विशेष होतं. शुक्रवारी दुपारी, “नव्या जगातील समाजात मुलांचे संगोपन करणे” या भाषणात वक्‍त्‌याने जे म्हटलं, ते अजूनही आम्ही विसरलेलो नाही; ते म्हणाले होते: “आपल्या मुलांना आपण देऊ शकणारा सर्वात महान वारसा म्हणजे, यहोवाचे सेवक होण्याची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण करणं.” यहोवाच्या मदतीनं कार्ला व मी तेच करू इच्छित होतो. पण हे आम्ही कसं करू शकणार होतो?

दररोज कुटुंब मिळून प्रार्थना करायची, याप्रकारे आम्ही सुरवात केली. यामुळे प्रार्थनेचं महत्त्व मुलांच्या मनावर कोरलं गेलं. भोजनाआधी आम्ही प्रार्थना करतो, हे प्रत्येक मूल लहानपणीच शिकलं होतं. बाळ असतानासुद्धा ते आपली दुधाची बाटली पाहिली की लगेच आपलं डोकं खाली वाकवून आपले इवलेशे हात जोडत असत. एकदा तर, आम्हाला कार्लाच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला बोलवलं होतं; ते लोक साक्षीदार नव्हते. समारंभानंतर, मुलीच्या आईवडिलांनी पाहुण्यांना हलक्या अल्पोपहारासाठी घरी बोलवलं. सर्वांनी लगेच भोजनाला सुरवातही केली. पण आमच्या पाच वर्षांच्या कार्ल हिन्सला हे काही बरोबर वाटलं नाही. तो म्हणाला: “आधी प्रार्थना करा.” जमलेले पाहुणे त्याच्याकडं पाहू लागले, मग आमच्याकडं, मग यजमानाकडं. पुढं आणखी काही व्हायच्या आधी मी यजमानांना विचारलं, की मी भोजनावर प्रार्थना करू का, तर यजमानांनी होकार दिला.

यावरून मला, येशूच्या शब्दांची आठवण झाली: “बाळके व तान्ही मुले ह्‍यांच्या मुखातून तू स्तुति पूर्ण करविली आहे.” (मत्तय २१:१६) आम्हाला खात्री आहे, की आमच्या नियमित व मनःपूर्वक प्रार्थनांमुळे मुलांना समजलं, की यहोवा त्यांचा प्रेमळ स्वर्गीय पिता आहे.

यहोवाप्रती आमची जबाबदारी

मुलांना देवावर प्रेम करायला शिकवण्यामध्ये, त्याच्या वचनाचे नियमित वाचन आणि अध्ययन देखील समाविष्ट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून आम्ही दर आठवडी बहुतेककरून सोमवारी संध्याकाळी कौटुंबिक अभ्यास करायचो. आमचा थोरला मुलगा आणि धाकटा मुलगा यांच्यात नऊ वर्षांचं अंतर असल्यामुळे, त्यांच्या वेगवेगळ्या गरजा होत्या; त्यामुळे सर्वांबरोबर आम्ही एकाच विषयावर बोलू शकत नव्हतो.

जसं की, शाळेला जाण्याइतके वय नसलेल्या मुलांसाठी आमचा अभ्यास अगदी साधा असायचा. कार्ला त्यांच्याबरोबर फक्‍त एकाच वचनाची चर्चा करायची, किंवा ती बायबल आधारित प्रकाशनांतील चित्रांचा उपयोग करायची. मला अजूनही आठवतं, आमची मुलं लहान होती तेव्हा नवे जग (इंग्रजी) * नावाच्या पुस्तकातली त्यांची आवडती चित्रं दाखवायला ती अगदी पहाटे आमच्या बिछान्यात घुसायची.

आपण सर्वांनी यहोवावर प्रेम का केलं पाहिजे याची अनेक कारणं मुलांना समजावून सांगण्यात कार्ला तरबेज झाली होती. हे साधंसोपं वाटत असलं तरी, शारीरिकरीत्या व मानसिकरीत्या कार्लासाठी व माझ्यासाठी ते पूर्ण-वेळेच्या नोकरीसारखंच होतं. पण आम्ही कधी हार मानली नाही. यहोवाला न ओळखणाऱ्‍या लोकांनी आमच्या मुलांवर प्रभाव पाडायला सुरवात करण्याआधी आम्ही आमच्या मुलांच्या कोवळ्या हृदयपटलावर यहोवाबद्दलचं प्रेम गिरवू इच्छित होतो. म्हणूनच, मुलांना बसता येऊ लागल्यापासून त्यांनी कौटुंबिक अभ्यासासाठी बसले पाहिजे असा आम्ही एक नियमच केला होता.

उपासनेच्या बाबतीत, कार्ला आणि मी पालक या नात्याने आपल्या मुलांपुढं चांगलं उदाहरण मांडण्याचं महत्त्व ओळखलं होतं. आम्ही जेवत असलो, बागेत काम करत असलो, फिरायला गेलेलो असलो तरी, प्रत्येक प्रसंगी आम्ही मुलांना यहोवाबरोबर निकट संबंध जोडण्यास मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. (अनुवाद ६:६, ७) प्रत्येक मुलाकडे लहानपणापासूनच स्वतःचं बायबल आहे याची आम्ही खात्री केली. शिवाय, मासिकं मिळाल्यावर मी कुटुंबातील प्रत्येकाचं नाव त्याच्या किंवा तिच्या मासिकावर लिहित असे. यामुळे मुलं स्वतःची प्रकाशनं ओळखायला शिकली. नंतर आम्हाला एक कल्पना सुचली, मुलांना सावध राहा! मधील विशिष्ट लेख वाचायला सांगायचं आणि मग पुढील रविवारी दुपारच्या जेवणाच्या वेळी त्यांनी आम्हाला, त्यांना त्या लेखातून काय शिकायला मिळालं हे सांगायचं.

मुलांना ज्याची गरज आहे ते त्यांना देणं

अर्थातच, सर्वकाही नेहमी सुरळीत चाललं नाही. मुलं जसजशी मोठी होऊ लागली, तसतसं आम्हाला कळलं, की मुलांच्या मनात जर आपल्याला यहोवाबद्दल प्रेम रुजवायचं आहे तर आपण त्यांच्या मनात आधीपासून काय आहे हे माहीत करून घेतलं पाहिजे. याचा अर्थ त्यांचं ऐकून घ्यायचं. कधीकधी मुलांना आमच्याविरुद्ध तक्रार असायची तेव्हा आम्ही दोघं निवांत बसून त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करायचो. कौटुंबिक अभ्यासानंतर आम्ही खास अर्धा तास याच्यासाठी द्यायचो. तेव्हा कोणीही त्याला/तिला काय वाटतं हे उघडपणे बोलू शकत होतं.

जसं की, आमची दोन धाकटी मुलं टॉमस आणि गॅब्रीएला यांना असं वाटायचं, की आम्ही थोरल्या मुलावर जास्त प्रेम करत होतो. एकदा अभ्यासानंतर त्यांनी मला अगदी उघडपणे सांगितलं: “पप्पा, आम्हाला असं वाटतं, की तुम्ही आणि आई फक्‍त हॅन्स वरनरलाच त्याला हवं तसं वागू देता.” हे ऐकल्यावर मला माझ्या कानांवर विश्‍वासच बसत नव्हता. पण, मनात कसलाही ग्रह न बाळगता मी या गोष्टीवर विचार केला व कार्लाला आणि मला कबूल करावं लागलं, की मुलांचं बोलणं निराधार नव्हतं. तिथूनपुढं आम्ही दोघंही, सर्व मुलांना एकसारखी वागणूक मिळेल याची खबरदारी घेऊ लागलो.

कधीकधी, मी पुढेमागे कसलाही विचार न करता व कडकपणे मुलांना शिक्षा करायचो. तेव्हा आम्हा दोघांनाही, मुलांची क्षमा मागायला शिकावं लागलं. त्यानंतर, आम्ही यहोवाला प्रार्थना करायचो. हे अतिशय महत्त्वाचं होतं, कारण मुलांना तेव्हा समजायचं, की आपले पप्पा यहोवाकडे आणि त्यांच्याकडे क्षमा मागायला तयार आहेत. यामुळे, आमच्या मुलांबरोबर आमचं अतिशय जिव्हाळ्याचं आणि मैत्रीपूर्ण बंधन निर्माण झालं होतं. ते आम्हाला अनेकदा म्हणायचे: “तुम्हीच आमचे सर्वात बेस्ट फ्रेंड्‌स आहात.” हे ऐकून आम्हाला अगदी मनापासून आनंद व्हायचा.

कुटुंब मिळून कार्य करण्याची मजा काही औरच असते; यामुळे घरातलं ऐक्य वाढतं. म्हणूनच, प्रत्येकाला काम नेमून दिलं होतं. हॅन्स वरनरला आठवड्यातून एकदा सर्व बाजारहाट करायचं काम होतं; याचा अर्थ, त्याला खरेदीच्या यादीबरोबर पैसेही द्यावे लागायचे. एकदा, आम्ही त्याला यादी किंवा पैसे काहीच दिले नाहीत. त्यानं त्याच्या आईला त्याबद्दल विचारलं, तेव्हा तिनं त्याला सांगितलं, की आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत. तेव्हा सगळी मुलं एकमेकांजवळ काहीतरी कुजबूजली आणि मग प्रत्येकानं आपला पैशाचा डबा आणून त्यातून पैसे काढून टेबलवर ठेवले. आणि मग म्हणाले: “आई, आता आपण बाजारहाट करू शकतो!” तातडीच्या परिस्थितीत मदत करायला मुलं शिकली होती; यामुळे आमचं कुटुंब आणखीनच घट्ट विणत गेलं.

मुलं जशी मोठी होऊ लागली तसे त्यांना मुलींचे आकर्षण वाटू लागले. उदाहरणार्थ, टॉमसला १६ वर्षांची एक सहसाक्षीदार मुलगी आवडू लागली होती. मी त्याला समजावून सांगितलं, की जर त्याला खरोखरच ती मुलगी आवडते, तर त्याला तिच्याशी लग्न करावं लागेल आणि पत्नी व मुलांची जबाबदारी घ्यावी लागेल. टॉमसला समजलं, की तो लग्न करण्यासाठी तयार नव्हता कारण तो तेव्हा फक्‍त १८ वर्षांचा होता.

कुटुंब मिळून प्रगती

मुलं कोवळ्या वयात होती तेव्हाच त्यांनी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत आपली नावं दाखल केली होती. आम्ही त्यांची भाषणं लक्षपूर्वक ऐकत असू आणि देवाबद्दल त्यांना मनापासून असलेलं प्रेम पाहून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळायचं. अधूनमधून आमच्या घरी राहायला येणारे विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षक आम्हाला त्यांचे अनुभव सांगायचे किंवा बायबलमधले अनुभव वाचून दाखवायचे. या बांधवांनी आणि त्यांच्या पत्नींनी आमच्या सर्वांच्या मनात पूर्ण-वेळेच्या सेवेबद्दल एकप्रकारची ओढ निर्माण केली.

अधिवेशनांची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. देवाचे सेवक होण्याची इच्छा आमच्या मुलांच्या मनात निर्माण करण्यासाठी अधिवेशनांची मुख्य भूमिका होती. मुलांना अधिवेशनं खास वाटायची, अधिवेशनाला जाताना लेपल कार्ड लावायला त्यांना खूप आनंद व्हायचा. वयाच्या दहाव्या वर्षी हॅन्स वरनरनं बाप्तिस्मा घेतला तेव्हा तर आम्हाला अत्यंत आनंद झाला. पुष्कळ लोकांना तेव्हा वाटलं होतं, की यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्यासाठी हॅन्स फार लहान होता; पण वयाच्या ५० व्या वर्षी त्यानं मला सांगितलं, की ४० वर्षांपासून यहोवाची सेवा करायला मिळाल्यामुळे तो किती कृतज्ञ आहे.

यहोवाबरोबर नातेसंबंध जोडणं किती महत्त्वाचं आहे हे आम्ही मुलांना सांगितलं असलं तरी, समर्पण करायला आम्ही त्यांना सक्‍ती केली नाही. प्रत्येकानं आपापल्या परीनं प्रगती करून बाप्तिस्मा घेतल्यामुळे आम्ही आनंदी आहोत.

यहोवावर आपला भार टाकण्यास शिकणं

१९७१ साली, हॅन्स वरनर वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ५१ व्या वर्गातून पदवीधर झाला आणि स्पेनला त्याला मिशनरी म्हणून सेवा करायची नेमणूक मिळाली तेव्हा तर आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एक एक करून इतर मुलांनीही काही काळापर्यंत पूर्ण-वेळेचे सेवक म्हणून सेवा केल्याचं पाहून पालक या नात्यानं आम्हाला खूप समाधान मिळालं. आणि याच वेळेला, हॅन्स वरनरनं मला ते बायबल दिलं ज्याचा मी लेखाच्या सुरवातीला उल्लेख केला. कुटुंब या नात्यानं आम्हाला वाटायचं, की आम्ही सर्वांपेक्षा आनंदी आहोत.

पण नंतर आम्हाला समजलं, की आम्ही यहोवाला आणखी बिलगण्याची गरज आहे. का बरं? कारण मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यासमोर अशा समस्या आल्या ज्यांनी आमच्या विश्‍वासाची खरोखरच परीक्षा घेतली. आमची मुलगी गॅब्रीएला ही देखील यातून सुटली नाही. १९७६ साली लोटरबरोबर तिचं लग्न झालं. पण लग्नानंतर काही दिवसांतच तो आजारी पडला. दिवसेंदिवस तो अशक्‍तच होत गेला; गॅब्रीएलानं त्याची खूप सेवा केली, पण शेवटी त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातला एक धडधाकट सदस्य आजारी पडतो आणि आम्ही हतबल होऊन त्याला आमच्यासमोर मरताना पाहतो तेव्हा आम्हाला याची जाणीव झाली, की यहोवाच्या प्रेमळ काळजीची आपल्याला खरोखरच किती गरज आहे.—यशया ३३:२.

यहोवाच्या संघटनेतील विशेषाधिकार

१९५५ साली मला, मंडळीचे सेवक (आज, अध्यक्षीय पर्यवेक्षक) म्हणून नियुक्‍त केले तेव्हा मी इतक्या मोठ्या जबाबदारीसाठी अद्याप तयार नाही असं मला वाटलं होतं. मला खूप काम करावं लागत होतं; मिळालेल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी मी कधीकधी पहाटे चार वाजता उठायचो. माझ्या पत्नीनं व मुलांनी मला खूप चांगलं सहकार्य दिलं; कधीकधी माझ्याकडे खूप काम असायचं तेव्हा मी संध्याकाळच्या वेळी बसायचो तर ते मला शांतपणे माझं काम करू द्यायचे.

तरीपण, कुटुंब या नात्यानं आम्ही, आम्हाला जमेल त्याप्रमाणे मनोरंजनासाठी वेळ काढायचो. कधीकधी माझे मालक मला स्वतःची कार द्यायचे तेव्हा मी कुटुंबाला घेऊन संपूर्ण दिवसभर फिरायला जायचो. एखाद्या वनराईत टेहळणी बुरूज मासिकाचा अभ्यास करायला मुलांना खूप आवडायचं. कधीकधी आम्ही फिरायला जायचो तेव्हा, मी माझा माऊथ-ऑर्गन सोबत न्यायचो आणि राज्यगीते वाजवायचो.

१९७८ साली मला बदली विभागीय पर्यवेक्षक (प्रवासी सेवक) म्हणून नेमण्यात आलं. तेव्हाही मी भारावून यहोवाला प्रार्थना केली: “यहोवा बापा, हे काम मला पेलणार नाही. पण मी प्रयत्न करावा असं तुला वाटत असेल तर मी माझ्यापरीनं जरूर प्रयत्न करीन.” दोन वर्षांनंतर वयाच्या ५४ व्या वर्षी मी आमचा लहानसा व्यापार माझा धाकटा मुलगा, टॉमस याच्या नावावर करून टाकला.

आमची सर्व मुलं मोठी झाल्यामुळे कार्ला व मला यहोवाची आणखी सेवा करण्याची संधी मिळाली. त्याचवर्षी, मला विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं व हॅमबर्गचा एक भाग आणि शेल्सवीग-होलस्टेनचा संपूर्ण भाग मला देण्यात आला. आम्हाला मुलांचे संगोपन करण्याचा अनुभव असल्यामुळे पालक आणि मुलांना खासकरून आम्ही खूप चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकत होतो. पुष्कळ बंधूभगिनी प्रेमानं आम्हाला सी.ओ. आईवडील म्हणायचे.

कार्लानं दहा वर्षं माझ्याबरोबर विभागाच्या कार्यात काम केलं; त्यानंतर तिचं ऑपरेशन करावं लागलं. आणि त्याच वर्षी डॉक्टरांनी मला सांगितलं, की मला ब्रेन ट्यूमर आहे. त्यामुळे मला विभागीय पर्यवेक्षकाची सेवा थांबवावी लागली आणि नंतर माझं मेंदूचं ऑपरेशन झालं. तीन वर्षांनंतर, मी पुन्हा बदली विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा सुरू करू शकलो. कार्ला आणि मी आता सत्तरीत आहोत; आम्ही आता प्रवासी कार्य करीत नाही. जो विशेषाधिकार पूर्ण करणं आम्हाला जमत नाही त्याला धरून ठेवण्याचा अट्टाहास करण्यात काही तथ्य नाही हे समजण्यास यहोवानं आम्हाला मदत केली.

आमच्या सरलेल्या आयुष्याकडे आम्ही मागे वळून पाहतो तेव्हा, आमच्या लेकरांच्या मनात सत्याबद्दल प्रेम रुजवायला त्यानं आम्हाला मदत केली म्हणून कार्ला व मी खूप कृतज्ञ आहोत. (नीतिसूत्रे २२:६) या सर्व वर्षांत यहोवानं आम्हाला मार्ग दाखवला, आम्हाला शिकवलं, आमच्या जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी आम्हाला मदत केली. आता आम्ही वृद्ध व अशक्‍त झालो असलो तरी, यहोवाबद्दल आमच्या मनात असलेलं प्रेम अजूनही चिरतरुण व जिवंत आहे.—रोमकर १२:१०, ११.

[तळटीप]

^ परि. 15 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित, सध्या उपलब्ध नाही.

[२६ पानांवरील चित्र]

१९६५ साली, हॅमबर्गच्या एल्ब नदीकाठी फिरत असताना आमचं कुटुंब

[२८ पानांवरील चित्र]

१९९८ साली बर्लिन इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात कुटुंबातील काही सदस्य

[२९ पानांवरील चित्र]

कार्लासोबत