व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राजांचे अनुकरण करा

राजांचे अनुकरण करा

राजांचे अनुकरण करा

“नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी; ती त्याच्यापाशी असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे.”अनुवाद १७:१८, १९.

१. एक ख्रिस्ती व्यक्‍ती कदाचित कोणाप्रमाणे होण्याची इच्छा बाळगेल?

तुम्ही कदाचित स्वतःची तुलना एखाद्या राजाशी किंवा राणीशी करणार नाही. बायबलचा अभ्यास करणारा कोणी विश्‍वासू ख्रिस्ती राजा दावीद, योशिया, हिज्कीया किंवा यहोशाफाट यांसारख्या चांगल्या राजांप्रमाणे राज्याधिकार सांभाळण्याची कल्पना करेल का? पण एका बाबतीत मात्र तुम्ही या राजांप्रमाणे होऊ शकता आणि तुम्ही तसे झाले पाहिजे. आपण कशाच्या संदर्भात बोलत आहोत? आणि या बाबतीत तुम्ही त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

२, ३. मानवी राजाबद्दल यहोवाने आधीच काय ओळखले होते आणि या राजाने काय करावे असे त्याने सांगितले?

मोशेच्या काळात म्हणजे इस्राएली लोकांवर मानवी राजाला राज्य करू देण्यास देवाने संमती देण्याच्या बऱ्‍याच काळाआधी, यहोवाने हे ओळखले होते की त्याचे लोक एका राजाची मागणी करतील. म्हणूनच त्याने नियमशास्त्राच्या करारात समर्पक सूचनांचा समावेश करण्यास मोशेला प्रेरित केले. या खास राजाकरता असलेल्या सूचना होत्या.

देवाने म्हटले: “तुझा देव परमेश्‍वर ह्‍याने तुला दिलेल्या देशात जाऊन . . . तुला असे वाटेल की, आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणहि आपल्यावर राजा नेमावा; तर तुझा देव परमेश्‍वर ज्याला निवडील त्यालाच तू आपणावर राजा नेमावे; . . . नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी; ती त्याच्यापाशी असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधि पाळून व त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्‍वर ह्‍याचे भय बाळगावयाला शिकेल.”—अनुवाद १७:१४-१९.

४. राजांकरता देवाने दिलेल्या निर्देशनांत कशाचा समावेश होता?

होय, यहोवा आपल्या उपासकांकरता ज्याला राजा म्हणून निवडेल, त्याने आज बायबलमध्ये समाविष्ट असलेल्या लिखाणांची स्वतःकरता एक प्रत तयार करायची होती. मग त्यातून दररोज, वारंवार त्याने अध्ययन करायचे होते. हे केवळ पाठांतर करण्यासाठी नव्हते. तर हा अभ्यास होता आणि त्याच्यामागे एक फायदेशीर उद्देश होता. यहोवाची संमती असलेल्या राजाने योग्य मनोवृत्ती आत्मसात करून ती कायम ठेवण्याकरता अशाप्रकारचा अभ्यास करणे अनिवार्य होते. तसेच यशस्वीपणे आणि बुद्धिमत्तेने राज्य कारभार चालवण्याकरता देखील त्या प्रेरित लिखाणांचा अभ्यास करण्याची त्याला गरज होती.—२ राजे २२:८-१३; नीतिसूत्रे १:१-४.

राजाप्रमाणे शिका

५. राजा दावीदाकडे प्रत तयार करण्याकरता व अध्ययनाकरता बायबलचे कोणते भाग उपलब्ध होते आणि याविषयी त्याच्या कशा भावना होत्या?

मग दावीद इस्राएलचा राजा झाला तेव्हा त्याला काय करावे लागले असेल? अर्थातच त्याला बायबलमधील पहिल्या पाच पुस्तकांची (उत्त्पति, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद) प्रत तयार करावी लागली असेल. स्वतः नियमशास्त्राच्या मूळ प्रतीत पाहून आपल्या हातांनी ते उतरवताना दाविदाच्या मनावर व हृदयावर त्याची किती अमिट छाप बसली असेल याची कल्पना करा. तोपर्यंत कदाचित मोशेने ईयोबाचे पुस्तक तसेच स्तोत्र ९० व ९१ देखील लिहिले असावे. मग दाविदाने हे भाग देखील उतरवले असावेत का? कदाचित होय. शिवाय, यहोशवा, शास्ते व रूथ ही पुस्तके देखील त्याच्या काळात उपलब्ध असावीत. अशारितीने राजा दाविदाकडे बायबलचा बराचसा भाग वाचन व मनन करण्याकरता उपलब्ध होता असे आपल्याला दिसून येते. आणि त्याने अवश्‍य असे केले असेल अशी खात्री तुम्ही बाळगू शकता; देवाच्या नियमशास्त्राविषयी, आज स्तोत्र १९:७-११ याठिकाणी नमूद असलेल्या वचनांत त्याने जे म्हटले त्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो.

६. येशूलाही त्याचा पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच शास्त्रवचनांमध्ये रस होता हे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

थोर दावीद—अर्थात दाविदाचा पुत्र, येशू ख्रिस्त याने देखील त्याच्या पावलांवर पाऊल ठेवले. दर आठवडी स्थानिक सभास्थानात जाण्याचा येशूचा नित्यक्रम होता. तेथे शास्त्रभागांचे वाचन व त्यांवरील विवेचन तो ऐकत असे. कधीकधी तर येशू स्वतः देवाच्या वचनातून मोठ्याने वाचून त्या भागाचा अर्थ समजावून सांगत असे. (लूक ४:१६-२१) शास्त्रभागांशी तो किती सुपरिचित होता हे आपल्याला सहज ताडता येते. शुभवर्तमानाची पुस्तके वाचा आणि त्यात येशूने “असा शास्त्रलेख आहे” या वाक्यांशाचा वापर करून किंवा इतर प्रकारे शास्त्रवचनांतील विशिष्ट उताऱ्‍यांचा संदर्भ दिला याकडे लक्ष द्या. मत्तयाने लिहिल्याप्रमाणे येशूने डोंगरावरील प्रवचनात २१ वेळा इब्री शास्त्रवचनांतील अंश उद्धृत केले.—मत्तय ४:४-१०; ७:२९; ११:१०; २१:१३; २६:२४, ३१; योहान ६:३१, ४५; ८:१७.

७. धर्मपुढाऱ्‍यांपेक्षा येशू कशाप्रकारे वेगळा होता?

येशूने स्तोत्र १:१-३ येथील सल्ल्याचे पालन केले: “जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही . . . तर परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. . . . जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” त्याच्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांपेक्षा त्याची ही वृत्ती किती वेगळी होती; ते पुढारी “मोशेच्या आसनावर” बसले होते पण ‘परमेश्‍वराच्या नियमशास्त्राकडे’ त्यांनी दुर्लक्ष केले.—मत्तय २३:२-४.

८. यहुदी धर्मपुढाऱ्‍यांचे बायबलचे वाचन व अभ्यास निर्रथक का ठरला?

पण एक उतारा वाचल्यावर काहीजण गोंधळात पडतात. यात येशूने जे म्हटले त्यावरून तो बायबलचा अभ्यास न करण्याचा सल्ला देत होता असा भास होतो. योहान ५:३९, ४० येथे येशूने त्याच्या काळातील काही लोकांना असे म्हटले: “तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत; तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही.” असे म्हणताना येशू त्याच्या यहुदी श्रोत्यांना शास्त्रवचनांचा अभ्यास करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत नव्हता. उलट त्यांची अप्रामाणिकता किंवा विसंगत मनोवृत्ती तो उघड करत होता. शास्रवचने त्यांना सार्वकालिक जीवनाकडे नेऊ शकत होती याची त्यांना जाणीव होती पण त्याच शास्त्रवचनांनी त्यांना मशीहा, अर्थात येशूचीही ओळख करून देण्यास हवी होती. पण त्यांनी त्याला स्वीकारण्यास नकार दिला. अशारितीने त्यांचा अभ्यास निर्रथक होता कारण त्यांची प्रांजळ, ग्रहणशील मनोवृत्ती नव्हती.—अनुवाद १८:१५; लूक ११:५२; योहान ७:४७, ४८.

९. प्रेषितांनी व पूर्वीच्या संदेष्ट्यांनी कोणता अनुकरणीय आदर्श मांडला?

येशूच्या शिष्यांची तसेच त्याच्या प्रेषितांची वृत्ती किती वेगळी होती! ‘तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ असणाऱ्‍या पवित्र शास्त्रवचनांचा’ त्यांनी अभ्यास केला. (२ तीमथ्य ३:१५) याबाबतीत ते पूर्वीच्या संदेष्ट्यांसारखे ठरले ज्यांनी “बारकाईने शोध केला.” या संदेष्ट्यांनी उत्साहाच्या भरात केवळ काही महिने किंवा वर्षे अभ्यास केला नाही. तर प्रेषित पेत्र म्हणतो त्याप्रमाणे विशेषतः ख्रिस्ताविषयी व मानवजातीला सोडवण्याकरता त्याच्या भूमिकेतील गौरवयुक्‍त गोष्टींविषयी सातत्याने “ते शोध करीत होते.” पेत्राने आपल्या पहिल्या पत्रात बायबलच्या दहा पुस्तकांतून ३४ वेळा वचने उद्धृत केली.—१ पेत्र १:१०, ११.

१०. आपण प्रत्येकानेच बायबल अभ्यासात रस घेणे का महत्त्वाचे आहे?

१० स्पष्टपणे, देवाच्या वचनाचे लक्षपूर्वक अध्ययन हे प्राचीन इस्राएलातील राजांना नेमलेले एक खास काम होते. येशूने या आदर्शाचे पालन केले. आणि येशूसोबत स्वर्गात राज्य करण्याकरता निवडण्यात आलेल्यांकरताही हाच आदर्श होता. (लूक २२:२८-३०; रोमकर ८:१७; २ तीमथ्य २:१२; प्रकटीकरण ५:१०; २०:६) खास राजांकरता असलेला हा आदर्श आज देवाच्या राज्याच्या शासनाखाली या पृथ्वीवर आशीर्वाद उपभोगण्याची आशा बाळगणाऱ्‍यांकरताही तितकाच आवश्‍यक आहे.—मत्तय २५:३४, ४६.

राजांना व तुम्हालाही नेमून दिलेले एक काम

११. (अ) अभ्यासाच्या संदर्भात आज ख्रिस्ती लोकांकरता कोणता धोका आहे? (ब) आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

११ प्रत्येक खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीने बायबलचे वैयक्‍तिकरित्या परीक्षण केले पाहिजे असे आपण पूर्ण खात्रीने व अगदी प्रामाणिकपणे म्हणू शकतो. असे करणे केवळ यहोवाच्या साक्षीदारांसोबत पहिल्यांदा अभ्यास करतानाच आवश्‍यक नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने प्रेषित पौलाच्या काळातील त्या लोकांसारखे होण्याचे टाळले पाहिजे, ज्यांनी कालांतराने वैयक्‍तिक अभ्यासाकडे दुर्लक्ष केले. त्यांनी “देवाच्या वचनाची मुळाक्षरे,” उदाहरणार्थ, “ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी” ज्ञान घेतले होते. पण त्यांनी हा अभ्यास सातत्याने सुरू न ठेवल्यामुळे ते “प्रौढतेप्रत” प्रगती करू शकले नाही. (इब्री लोकांस ५:१२-६:३) तेव्हा आपणही स्वतःला विचारू शकतो: ‘ख्रिस्ती मंडळीसोबत मी काही काळापासून किंवा अनेक दशकांपासून सहवास ठेवतो, पण देवाच्या वचनाच्या वैयक्‍तिक अभ्यासाबद्दल माझी कशी वृत्ती आहे? पौलाने त्याच्या काळातील ख्रिश्‍चनांकरता प्रार्थना केली की ‘देवाच्या पूर्ण ज्ञानाने त्यांची वृद्धी व्हावी.’ मी सुद्धा अशीच इच्छा बाळगून आहे का?’—कलस्सैकर १:९, १०.

१२. देवाच्या वचनाबद्दल सातत्याने आवड निर्माण करणे का महत्त्वाचे आहे?

१२ उत्तम अभ्यासाच्या सवयी असण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या वचनाबद्दल आवड निर्माण करणे. स्तोत्र ११९:१४-१६ यात सांगितल्याप्रमाणे देवाच्या वचनावर नियमित, उद्देशपूर्ण मनन करून आपण ही आवड निर्माण करू शकतो. पुन्हा एकदा, तुम्ही किती काळापासून ख्रिस्ती आहात हे या संदर्भात महत्त्वाचे नाही. हे अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याकरता तीमथ्याचे उदाहरण विचारात घ्या. हा ख्रिस्ती वडील आधीच “खिस्त येशूचा चांगला शिपाई” म्हणून सेवा करत होता तरीसुद्धा पौलाने त्याला “सत्याचे वचन नीट सांगणारा” होण्यास होईल तितका प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन दिले. (२ तीमथ्य २:३, १५; १ तीमथ्य ४:१५) स्पष्टपणे, ‘होईल तितका प्रयत्न’ करण्यात अभ्यासाच्या उत्तम सवयी असणे देखील समाविष्ट आहे.

१३. (अ) बायबल अभ्यासाकरता अतिरिक्‍त वेळ आपल्याला कशाप्रकारे काढता येईल? (ब) अभ्यासाकरता अधिक वेळ मिळवण्याकरता तुम्हाला कोणते फेरबदल करता येतील असे तुम्हाला वाटते?

१३ अभ्यासाच्या उत्तम सवयी लावण्याकरता बायबल अभ्यासासाठी नियमितपणे काही वेळ बाजूला ठेवणे आवश्‍यक आहे. याबाबतीत तुम्ही कितपत प्रगती केली आहे? तुमचे प्रामाणिक उत्तर काहीही असो, पण वैयक्‍तिक अभ्यासात आणखी काही वेळ दिल्यामुळे तुम्हाला फायदा होईल असे तुम्हाला वाटते का? कदाचित तुम्ही म्हणाल, ‘यासाठी मी वेळ कुठून आणू?’ काही जणांनी सकाळी नेहमीपेक्षा थोडे लवकर उठून परिणामकारक बायबल अभ्यासाचा त्यांचा वेळ वाढवला आहे. ते १५ मिनिटे बायबल वाचतात किंवा हाती घेतलेल्या एखाद्या वैयक्‍तिक अभ्यासाच्या प्रकल्पावर काम करतात. पण हे शक्य नसल्यास, कदाचित तुमच्या आठवड्याच्या वेळापत्रकात थोडा फेरबदल करता येईल का? उदाहरणार्थ जर तुम्हाला दररोज बातमीपत्र वाचण्याची किंवा संध्याकाळी टीव्हीवर बातम्या पाहण्याची सवय असेल, तर आठवड्यातला फक्‍त एक दिवस तुम्ही याला फाटा देऊ शकता का? त्या दिवशी तो वेळ तुम्ही अतिरिक्‍त बायबल अभ्यासाकरता उपयोगात आणू शकता. जर एक दिवस बातम्या न पाहता समजा तुम्ही साधारण ३० मिनिटे वैयक्‍तिक अभ्यास केलात तर वर्षभरात तुम्ही २५ पेक्षा जास्त तास मिळवता. २५ तास अधिक बायबल वाचनाच्या अथवा अभ्यासाच्या फायद्यांची जरा कल्पना करा! आणखी एक उपयुक्‍त सूचना: येत्या आठवड्यादरम्यान दररोज रात्री दिवसभर आपण काय काय केले यावर विचार करा. बायबल वाचनाकरता किंवा अभ्यासाकरता अधिक वेळ काढण्याकरता कोठेतरी कपात करणे शक्य आहे का हे तपासून पाहा.—इफिसकर ५:१५, १६.

१४, १५. (अ) वैयक्‍तिक अभ्यासाच्या संबंधाने डोळ्यापुढे ध्येय ठेवणे का महत्त्वाचे आहे? (ब) बायबल वाचनाच्या संदर्भात कोणती ध्येये तुम्ही ठेवू शकता?

१४ अभ्यास अधिक सोपा, अधिक मनोरंजक बनवण्याकरता कोणती गोष्ट सहायक ठरेल? ध्येये. अभ्यासाच्या संदर्भात तुम्ही कोणती वास्तववादी ध्येये ठेवू शकता? बरेच जण सर्वप्रथम सबंध बायबल वाचण्याचे कौतुकास्पद ध्येय डोळ्यांपुढे ठेवतात. कदाचित आतापर्यंत तुम्ही अधूनमधून बायबलचे काही भाग वाचले असतील; यांमुळे तुम्हाला फायदाही झाला असेल. आता तुम्हाला सबंध बायबल वाचण्याचे ध्येय ठेवता येईल का? हे ध्येय गाठण्याकरता तुम्ही सुरवातीला चार शुभवर्तमान वाचण्याचे ध्येय ठेवू शकता. यानंतर ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील बाकीची पुस्तके वाचण्याचे ध्येय तुम्ही ठेवू शकता. यातून प्राप्त होणारे समाधान व लाभ मिळवल्यावर तुम्ही पुढच्या ध्येयाकडे जाऊ शकता, अर्थात मोशेच्या पुस्तकांपासून एस्तेर या पुस्तकापर्यंत सगळी ऐतिहासिक पुस्तके वाचणे. हे ध्येय गाठल्यानंतर तुम्हाला बायबलचा उर्वरित भाग वाचणे तितके कठीण जाणार नाही. एक स्त्री जवळजवळ ६५ वर्षांची असताना ख्रिस्ती बनली. तिने जेव्हा सबंध बायबल वाचायला सुरवात केली, तेव्हा तिने आपल्या बायबलच्या कव्हरच्या आतल्या बाजूला ती तारीख लिहून ठेवली आणि वाचन संपल्याची तारीखही लिहून ठेवली. आता तिच्याजवळ या तारखांच्या पाच जोड्या झाल्या आहेत. (अनुवाद ३२:४५-४७) कम्प्युटरच्या स्क्रीनवरून किंवा छापील प्रत काढून वाचण्याऐवजी ती हातात बायबल घेऊन वाचत होती.

१५ सबंध बायबल वाचण्याचे ध्येय पूर्ण केल्यानंतर काहीजण आपला अखंड अभ्यास अधिक परिणामकारक व समाधानदायक बनवण्याकरता इतर पावले उचलतात. एक मार्ग म्हणजे बायबलचे प्रत्येक पुस्तक वाचण्याआधी ते त्यासंदर्भात खास साहित्याचा अभ्यास करतात. “सर्व शास्त्रवचने ईश्‍वरप्रेरित व लाभदायक” (इंग्रजी) तसेच शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), या प्रकाशनांत बायबलमधील प्रत्येक पुस्तकाची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, त्याची लेखनशैली आणि त्याच्या व्यवहार्य उपयोगाबद्दल उत्तम माहिती मिळते. *

१६. बायबल अभ्यास करताना आपण कोणाच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचे टाळले पाहिजे?

१६ अभ्यास करताना तथाकथित बायबल विद्वानांच्या पद्धतीचा अवलंब करू नका. ते बायबलच्या वचनांचेही विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न करतात, जणू हा ग्रंथ मनुष्यांनी लिहिला आहे. बायबलमधील प्रत्येक पुस्तकाकरता एक निश्‍चित वाचकगण आहे असे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करतात; किंवा प्रत्येक पुस्तक लिहिण्यामागे काहीतरी निश्‍चित उद्देश आणि प्रत्येक पुस्तकाच्या मानवी लेखकाच्या मनात एक ठराविक दृष्टिकोन होता असे त्यांचे मत असते. अशाप्रकारच्या मानवी तर्कवादामुळे ते बायबलच्या पुस्तकांना केवळ ऐतिहासिक अहवालांचा दर्जा देतात किंवा ही वेगवेगळी पुस्तके धर्माकडे बघण्याचे प्रगतीशील दृष्टिकोन प्रतिबिंबित करतात असे त्यांचे मत असते. इतर विद्वान बायबमधील शब्दांवर लक्ष केंद्रित करतात, उदाहरणार्थ बायबल साहित्याचा भाषाभ्यास करण्यात गढून जातात. देवाच्या संदेशाचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते निरनिराळ्या शब्दांची व्युत्पत्ती आणि इब्री व ग्रीक भाषेतील अर्थ सांगण्यात लक्ष केंद्रित करतात. अशा प्रकारे अभ्यास केल्याने मनःपूर्वक व कार्य करण्यास प्रेरणा देणारा विश्‍वास निर्माण होऊ शकतो असे तुम्हाला वाटते का?—१ थेस्सलनीकाकर २:१३.

१७. बायबलमधील संदेश सर्वांकरता उपयुक्‍त आहे असे आपण का मानले पाहिजे?

१७ या विद्वानांचे निष्कर्ष वस्तुस्थितीवर आधारित आहेत का? प्रत्येक पुस्तकाचा एकच मुख्य विषय किंवा ठराविक वाचकगण असतो हे खरे आहे का? (१ करिंथकर १:१९-२१) खरे पाहता, देवाच्या वचनातील पुस्तके सर्व वयोगटांतील व सर्व प्रकारच्या पार्श्‍वभूमीच्या लोकांच्या कायमस्वरूपी लाभाची आहेत. एखादे पुस्तक सुरवातीला एका विशिष्ट व्यक्‍तीला, उदाहरणार्थ तीमथ्य अथवा तीत यास उद्देशून लिहिले असले किंवा एखाद्या विशिष्ट समूहाला उदाहरणार्थ, गलतीकर अथवा फिलिप्पैकरांना उद्देशून लिहिले असले तरीसुद्धा आपण सर्वजण या पुस्तकांचा अभ्यास करू शकतो व तो आपण केला पाहिजे. ही पुस्तके आपल्यापैकी प्रत्येकाकरता महत्त्वाची आहेत आणि एका विशिष्ट पुस्तकात अनेक मुख्य विषय व निरनिराळ्या प्रकारच्या वाचकगणाकरता उपयुक्‍त माहिती असू शकते. होय, बायबलमधील संदेश विश्‍वव्यापी आहे; म्हणूनच तर त्याचे भाषांतर सबंध जगातील लोकांच्या वेगवेगळ्या भाषांत करण्यात आले आहे.—रोमकर १५:४.

तुमच्याकरता व इतरांकरता लाभदायक

१८. देवाच्या वचनाचे वाचन करत असताना तुम्ही कशाविषयी विचार केला पाहिजे?

१८ अभ्यास करताना बायबलची समज मिळवण्याव्यतिरिक्‍त वेगवेगळ्या तपशीलांचा आपसांतील असलेला संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करणेही अत्यंत लाभदायक ठरेल. (नीतिसूत्रे २:३-५; ४:७) यहोवाने त्याच्या वचनात जे काही प्रकट केले आहे ते त्याच्या उद्देशाशी निगडित आहे. त्यामुळे बायबलचे वाचन करत असताना त्यातील वस्तुस्थितींचा व सल्ल्याचा, देवाच्या उद्देशाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. एखादी घटना, संकल्पना किंवा भविष्यवाणी यहोवाच्या उद्देशाशी कशाप्रकारे संबंधित आहे याविषयी तुम्ही चिंतन करू शकता. स्वतःला हे प्रश्‍न विचारून पाहा: ‘या माहितीवरून मला यहोवाविषयी काय कळून येते? देवाच्या राज्याद्वारे पूर्णत्वास जाणाऱ्‍या त्याच्या उद्देशाशी याचा काय संबंध आहे?’ तसेच ‘या माहितीचा मला कशाप्रकारे उपयोग करता येईल? बायबलच्या आधारावर इतरांना शिकवताना किंवा सल्ला देताना मला या माहितीचा उपयोग करता येईल का?’ यावरही तुम्ही मनन करू शकता.—यहोशवा १:८.

१९. तुम्ही शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगता तेव्हा त्याचा कोणाला फायदा होतो? स्पष्ट करा.

१९ इतरांविषयी विचार करणे आणखी एका मार्गाने लाभदायक ठरू शकते. बायबल वाचन व अभ्यास करत असताना तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील तसेच नवीन दृष्टिकोनातून विशिष्ट गोष्टीकडे पाहायला मिळेल. आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा इतरांसोबत संभाषण करताना या नवीन गोष्टींविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळी आणि विनयशील वृत्तीने केल्यास या चर्चा निश्‍चितच अतिशय आनंददायक ठरतील. तुम्हाला शिकायला मिळालेल्या किंवा रोचक वाटलेल्या गोष्टी प्रामाणिक व उत्साही पद्धतीने सांगितल्यास कदाचित इतरांवर याची अधिक छाप पडेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे यामुळे तुम्हाला फायदा होईल. तो कसा? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एखादी नवी गोष्ट शिकल्यावर ती अद्याप मनात ताजी असताना, तिचा उपयोग केल्यास अथवा पुनरुच्चार केल्यास, उदाहरणार्थ ती इतरांना सांगितल्यास ती गोष्ट अधिक काळ आठवणीत राहते. *

२०. बायबलचे वारंवार वाचन करणे लाभदायक का आहे?

२० दर वेळी तुम्ही एखाद्या बायबल पुस्तकाचे वाचन करता, तेव्हा तुम्हाला त्यातून काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तेच उतारे आधी वाचताना आपल्याला या गोष्टी कशा लक्षात आल्या नाहीत याचे तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. मग हे उतारे तुम्हाला अधिकच अर्थपूर्ण वाटू लागतील. यावरूनच आपल्याला समजते की बायबल हे मनुष्याने लिहिलेले साहित्य नसून त्यातील एकेक पुस्तक एखाद्या खजिन्याप्रमाणे आहे जे खास तुमच्या वारंवार अभ्यासाकरता व लाभाकरता आहे. आठवणीत असू द्या, राजा दाविदाला ‘तिचे जन्मभर अध्ययन करायचे होते.’

२१. देवाच्या वचनाच्या अभ्यासात वाढ केल्यामुळे तुम्ही कोणते उत्तम प्रतिफळ मिळण्याची अपेक्षा करू शकता?

२१ होय, बायबलचा गहन अभ्यास करण्याकरता वेळ काढणाऱ्‍यांना यामुळे मोठा लाभ होतो. त्यांना अनेक आध्यात्मिक रत्ने व ज्ञानमोती गवसतात. देवासोबतचे त्यांचे नाते अधिकाधिक घनिष्ठ होत जाते. कुटुंबियांच्या, ख्रिस्ती मंडळीतल्या बंधूभगिनींच्या नजरेत ते अधिक मौल्यवान साथीदार बनतात आणि जे अद्याप यहोवाचे उपासक बनले नाहीत अशा लोकांनाही त्यांच्या ज्ञानामुळे फायदा होतो.—रोमकर १०:९-१४; १ तीमथ्य ४:१६.

[तळटीपा]

^ परि. 15 अभ्यासाकरता सहायक ठरणारी ही प्रकाशने अनेक भाषांत उपलब्ध आहेत.

^ परि. 19 टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९९३, पृष्ठे २१-२२ पाहा.

तुम्हाला आठवते का?

• इस्राएली राजांना काय करण्याची आज्ञा देण्यात आली होती?

• येशू व प्रेषितांनी बायबल अभ्यासाच्या बाबतीत कोणता आदर्श आपल्याकरता पुरवला?

• वैयक्‍तिक अभ्यासाच्या वेळात भर पाडण्याकरता तुम्ही कोणते फेरबदल करू शकता?

• देवाच्या वचनाचा अभ्यास हाती घेताना तुम्ही कोणती मनोवृत्ती बाळगावी?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चौकट]

“आपल्या हातात”

“बायबलच्या अभ्यासाकरता विषयसूची हवी असेल तर इंटरनेट सारखे दुसरे साधन नाही. पण बायबलचे वाचन करायचे असेल, त्याचा अभ्यास करायचा असेल, त्यावर विचार व मनन करायचे असेल तर ते आपल्या हातात असणे आवश्‍यक आहे; तरच त्यातील ज्ञान आपल्या मनात व अंतःकरणात उतरेल.”—गर्ट्रूड हिम्मलफार्ब, नामांकित सेवानिवृत्त प्राध्यापिका, सिटी युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क.