यहोवाचे गौरव त्याच्या लोकांवर प्रकाशमान होते
यहोवाचे गौरव त्याच्या लोकांवर प्रकाशमान होते
“परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल.”—यशया ६०:२०.
१. यहोवा आपल्या विश्वासू लोकांना कशाप्रकारे आशीर्वादित करतो?
“परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे; तो दीनांना तारणाने सुशोभित करितो.” (स्तोत्र १४९:४) प्राचीन काळातील स्तोत्रकर्त्याने असे म्हटले होते, आणि इतिहास या शब्दांची सत्यता पटवून देतो. यहोवाचे लोक विश्वासू राहतात तेव्हा तो त्यांची काळजी वाहतो, त्यांना आशीर्वादित करतो आणि सुरक्षित ठेवतो. प्राचीन काळात तो त्यांना त्यांच्या शत्रूंविरुद्ध विजय मिळवून देत असे. आज तो त्यांना आध्यात्मिकरित्या बळकट करतो आणि येशूच्या बलिदानाच्या आधारावर त्यांचे तारण करण्याचे अभिवचन देतो. (रोमकर ५:९) ते त्याच्या नजरेत शोभायमान असल्यामुळे तो असे करतो.
२. देवाच्या लोकांना विरोधाला तोंड द्यावे लागते तरीसुद्धा त्यांना कशाविषयी खात्री आहे?
२ अर्थात, अंधकारात बुडालेल्या जगात “सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात” त्यांना विरोधाला तोंड द्यावे लागते. (२ तीमथ्य ३:१२) पण हे विरोधक यहोवाच्या नजरेतून निसटू शकत नाहीत; तो त्यांना ताकीद देतो: “जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल; अशी राष्ट्रे खातरीने उध्वस्त होतील.” (यशया ६०:१२) आज विरोध वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. यहोवाची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या ख्रिश्चनांवर काही देशांतील विरोधक प्रतिबंध अथवा बंदी आणू पाहतात. इतर देशांत धर्मांध शक्ती यहोवाच्या उपासकांवर शारीरिक हल्ला करतात आणि त्यांच्या मालमत्तेची जाळपोळ करतात. पण यहोवाच्या इच्छेच्या पूर्णतेत अडथळा आणणाऱ्यांना काय परिणाम भोगावे लागतील हे त्याने केव्हाच ठरवले आहे, हे आठवणीत असू द्या. विरोधक खात्रीने अपयशी ठरतील. सियोनेविरुद्ध अर्थात पृथ्वीवर तिचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिच्या मुलांविरुद्ध लढणारे यशस्वी होऊ शकत नाहीत. आपला महान देव यहोवा याच्याकडून मिळालेले हे आश्वासन अतिशय उत्साहवर्धक नव्हे का?
अपेक्षेपेक्षा जास्त आशीर्वाद
३. यहोवाच्या उपासकांच्या शोभेची व फलदायीपणाची कशासोबत तुलना करण्यात आली आहे?
३ या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळात यहोवाने आपल्या लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आशीर्वादित केले आहे. खासकरून त्याने त्याच्या उपासनेच्या ठिकाणास आणि त्यात त्याचे नाव धारण करणाऱ्यांस उत्तरोत्तर शोभायमान केले आहे. यशयाच्या भविष्यवाणीनुसार तो सियोनेस म्हणतो: “माझे पवित्रस्थान शोभिवंत व्हावे म्हणून लबानोनाचे वैभव तुजकडे येईल; अर्थात सुरु, देवदारू, भद्रदारू हे एकंदर तुजकडे येतील; माझे पादासन मी शोभायमान करीन.” (यशया ६०:१३) हिरव्यागार वृक्षांनी झाकलेले पर्वत अतिशय सुंदर दिसतात. म्हणूनच फलदायी वृक्ष यहोवाच्या उपासकांच्या शोभेची व फलदायीपणाची अगदी योग्य प्रतीके आहेत.—यशया ४१:१९; ५५:१३.
४. “पवित्रस्थान” व “[यहोवाचे] पादासन” कशास सूचित करतात आणि यांना कशाप्रकारे शोभायमान करण्यात आले आहे?
४ यशया ६०:१३ येथे उल्लेख केलेले “पवित्रस्थान” व “[यहोवाचे] पादासन” कशास सूचित करते? या संज्ञा यहोवाच्या महान आत्मिक मंदिराच्या (येशू ख्रिस्ताद्वारे त्याची उपासना करण्याकरता असलेली व्यवस्था) अंगणास सूचित करतात. (इब्री लोकांस ८:१-५; ९:२-१०, २३) यहोवाने सर्व राष्ट्रांतून लोकांना आपल्या या आत्मिक मंदिरात उपासनेकरता आणून त्यास गौरवाने भरण्याचा आपला उद्देश जाहीर केला आहे. (हाग्गय २:७) याआधी स्वतः यशयाने देखील सर्व राष्ट्रांतील लोकांना यहोवाच्या उपासनेच्या उंच डोंगरावर झुंडीने येताना पाहिले होते. (यशया २:१-४) शेकडो वर्षांनंतर प्रेषित योहानाने दृष्टान्तात “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय” पाहिला. या समुदायातील लोक “देवाच्या राजासनासमोर . . . अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करितात.” (प्रकटीकरण ७:९, १५) या भविष्यवाण्या आपल्या काळात पूर्ण झाल्या आहेत, त्यामुळे यहोवाचे भवन अधिक शोभायमान झालेले आपल्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळाले आहे.
५. सियोनेच्या मुलांनी कोणते मोठे परिवर्तन अनुभवले?
५ सियोनेकरता किती मोठे परिवर्तन घडून आले आहे! यहोवा म्हणतो: “तू टाकिलेली व द्वेषिलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यान्पिढ्यांचा आनंद अशी मी करीन.” (यशया ६०:१५) पहिल्या महायुद्धाच्या शेवटी ‘देवाचे इस्राएल’ खरोखर काही काळ ओसाड पडले होते. (गलतीकर ६:१६) सियोनेच्या पृथ्वीवरील मुलांना त्यांच्याकरता देवाची काय इच्छा आहे हे तेव्हा स्पष्टपणे न समजल्यामुळे, आपल्याला ‘टाकलेले’ आहे असे तिला वाटत होते. मग १९१९ साली, यहोवाने त्याच्या अभिषिक्त सेवकांना पुनरुज्जीवित केले आणि तेव्हापासून त्याने त्यांना अद्भुत आध्यात्मिक भरभराटीच्या रूपात विपुल आशीर्वाद दिले आहेत. शिवाय या वचनातील अभिवचन चेतनादायक नाही का? यहोवा सियोनेस “भूषण” म्हणून लेखेल. होय, सियोनेच्या पुत्रांना व कन्यांना आणि स्वतः यहोवाला देखील तिच्याविषयी अभिमान वाटेल. ती अपरिमित ‘आनंदाचे’ कारण ठरेल. आणि हे केवळ काही काळापुरते नाही. सियोनेची अर्थात पृथ्वीवरील तिच्या मुलांची ही आशीर्वादित स्थिती ‘पिढ्यान्पिढ्या’ टिकेल. तिचा कधीही अंत होणार नाही.
६. खरे ख्रिस्ती राष्ट्रांच्या साधनसंपत्तीचा कशाप्रकारे उपयोग करतात?
६ आता देवाच्या दुसऱ्या एका प्रतिज्ञेकडे लक्ष द्या. यशया ६०:१६) सियोन कोणत्या अर्थाने ‘राष्ट्रांचे दूध शोषून घेते’ व ‘राजांचे स्तन चोखते?’ अभिषिक्त ख्रिस्ती आणि ‘दुसऱ्या मेंढरांतील’ त्यांचे साथीदार, राष्ट्रांची बहुमोल साधनसंपत्ती शुद्ध उपासनेच्या प्रगमनशील वाटचालीकरता उपयोगात आणतात. (योहान १०:१६) स्वेच्छेने दिलेल्या आर्थिक देणग्या मोठ्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचाराचे व शिकवण्याचे कार्य साधण्याकरता साहाय्य करतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा विचारशील उपयोग केल्यामुळे बायबल व बायबल आधारित प्रकाशने शेकडो भाषांतून प्रकाशित करणे शक्य झाले आहे. इतिहासात कधी नव्हे इतक्या लोकांना आज बायबलचे सत्य उपलब्ध झाले आहे. आपल्या अभिषिक्त सेवकांना आध्यात्मिक बंदिवासातून मुक्त करणारा यहोवा खरोखर उद्धारकर्ता आहे हे अनेकानेक देशांचे नागरिक आज शिकत आहेत.
सियोनेशी बोलताना यहोवाने म्हटले: “तू राष्ट्रांचे दूध शोषून घेशील, राजांचे स्तन तू चोखिशील, आणि मी परमेश्वर तुला तारणकर्ता, उद्धारकर्ता याकोबाचा समर्थ प्रभु आहे हे तू जाणिशील.” (संघटनेतील प्रगती
७. सियोनेच्या मुलांनी कोणती उल्लेखनीय प्रगती अनुभवली आहे?
७ यहोवाने आणखी एका मार्गाने आपल्या लोकांना शोभायमान केले आहे. त्याने संघटनेत प्रगती घडवून आणण्याद्वारे त्यांना आशीर्वादित केले आहे. यशया ६०:१७ येथे आपण वाचतो: “मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन; तुजवर शांति सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.” तांब्याच्या ठिकाणी सोने आणणे प्रगतीचे सूचक आहे आणि हेच इतर उल्लेखलेल्या धातूंच्या बाबतीतही खरे आहे. या अनुषंगाने देवाच्या इस्राएलने शेवटल्या काळादरम्यान संघटनेत सातत्याने प्रगती अनुभवली आहे. काही उदाहरणांवर विचार करा.
८-१०. संघटनेत १९१९ सालापासून झालेल्या काही प्रगतीशील फेरबदलांचे वर्णन करा.
८ देवाच्या लोकांच्या मंडळ्यांत १९१९ च्या आधी वडील व प्रसेवक व्यवस्था पाहात होते; यांना मंडळीतील सदस्य लोकतांत्रिक पद्धतीने निवडून देत असत. १९१९ पासून ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ प्रत्येक मंडळीतील क्षेत्र सेवाकार्याची देखरेख करण्याकरता एका सेवा निर्देशकाची (सर्व्हिस डायरेक्टर) नेमणूक करू लागला. (मत्तय २४:४५-४७) पण बऱ्याच मंडळ्यांत ही व्यवस्था तितकी परिणामकारक ठरली नाही कारण निवडून दिलेले काही वडील सुवार्ता प्रचाराच्या कार्याला तितका पाठिंबा देत नव्हते. त्यामुळे १९३२ साली, वडिलांना व प्रसेवकांना निवडून देण्याची पद्धत बंद करण्याची मंडळ्यांना सूचना देण्यात आली. त्याऐवजी त्यांना एका सेवा संचालकासोबत सेवा समितीत कार्यभार सांभाळण्याकरता काहीजणांना निवडण्यास सांगण्यात आले. हे “लाकडांच्या जागी तांबे” आणल्यासारखे होते—एक मोठे परिवर्तन!
९ सबंध जगातील मंडळ्यांनी १९३८ सालापासून एक अधिक चांगली व बायबलमधील आधीच्या उदाहरणाच्या एकवाक्यतेत असलेली व्यवस्था अवलंबण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने मंडळीचा कारभार एका सोबती सेवकाच्या (कंपनी सर्व्हंट) आणि इतर सेवकांच्या (सर्व्हंट) हाती सोपवला गेला; या सर्वांना विश्वासू व बुद्धिमान दासांच्या देखरेखीखाली नेमण्यात आले होते. निवडणुका कायमच्या बंद करण्यात आल्या! अशारितीने मंडळीतील नेमणुका ईश्वरशासित पद्धतीने करण्यात येऊ लागल्या. हे “दगडांच्या जागी लोखंड” किंवा “तांब्याच्या जागी सोने” आणण्यासारखे होते.
१० तेव्हापासून अव्याहत प्रगती होत गेली आहे. उदाहरणार्थ, १९७२ साली असे लक्षात आले, की कोणत्याही एका वडिलाने इतरांवर अधिकार न गाजवता, ईश्वरशासित पद्धतीने नियुक्त वडिलांच्या सहकारी वर्गाने मंडळीचा कारभार चालवणे पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीच्या कार्यपद्धतीशी अधिकच समन्वित होते. शिवाय, जवळजवळ दोन वर्षांआधी आणखी एक प्रगतीशील पाऊल उचलण्यात आले. विशिष्ट कायदेशीर संस्थांच्या संचालकपदांत फेरबदल करण्यात आले जेणेकरून नियमन मंडळाला दैनंदिन कायदेशीर बाबींमुळे विचलित न होता देवाच्या लोकांच्या आध्यात्मिक हितांकडे अधिक लक्ष एकाग्र करता यावे.
११. यहोवाच्या लोकांमध्ये झालेले संघटनात्मक बदल कोणी घडवून आणले आहेत आणि या बदलांमुळे काय परिणाम झाला आहे?
११ या प्रगतीशील फेरबदलांमागे कोण होते? स्वतः यहोवा देव. तोच म्हणतो: ‘मी सोने आणीन.’ आणि तोच पुढे म्हणतो, “तुजवर शांति सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.” (तिरपे वळण आमचे.) होय यहोवाच्या लोकांतील देखरेखीकरता तो स्वतःच जबाबदार आहे. पूर्वभाकीत केल्याप्रमाणे संघटनेतील ही प्रगती आणखी एक मार्ग आहे ज्याद्वारे यहोवा आपल्या लोकांना शोभायमान करत आहे. आणि यामुळे यहोवाच्या साक्षीदारांना अनेक मार्गांनी आशीर्वादित करण्यात आले आहे. यशया ६०:१८ येथे आपण वाचतो: “यापुढे तुझ्या देशात कसलाहि जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश याचे नावहि ऐकू येणार नाही; तारण माझा कोट व कीर्ति माझी वेस आहे असे तू म्हणशील.” हे खरोखर किती सुरेख शब्द आहेत! पण ते कशाप्रकारे पूर्ण झाले आहेत?
१२. खऱ्या ख्रिश्चनांमध्ये शांती कशाप्रकारे वास्तव्यास आली आहे?
१२ खरे ख्रिस्ती, शिक्षण व मार्गदर्शनाकरता यहोवाची आस धरतात आणि याचा परिणाम यशयाने भाकीत केल्याप्रमाणे होतो: “तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल.” (यशया ५४:१३) तसेच यहोवाचा आत्मा त्याच्या लोकांवर कार्य करतो आणि या आत्म्याच्या फळात शांतीचाही समावेश आहे. (गलतीकर ५:२२, २३) एखाद्या मरुवनाप्रमाणे यहोवाचे लोक त्यांच्यात उत्पन्न होणाऱ्या शांतीमुळे या हिंसाचारी जगाच्या वाळवंटात चेतनादायी ठरतात. खऱ्या ख्रिश्चनांमध्ये असलेल्या प्रेमामुळे निष्पन्न होणारी ही शांतीमय स्थिती नव्या जगातील जीवनाची एक पूर्वझलक देते. (योहान १५:१७; कलस्सैकर ३:१४) निश्चितच आपल्यापैकी प्रत्येकाला या शांतीत भर पाडण्यास अत्यानंद वाटतो; कारण आपल्या आध्यात्मिक परादीसचा एक मुख्य भाग असलेल्या या शांतीमुळे आपल्या देवाची स्तुती व गौरव होते!—यशया ११:९.
यहोवाचा प्रकाश चमकत राहील
१३. यहोवाचा प्रकाश त्याच्या लोकांवर चमकायचा कधीही थांबणार नाही असे आपण का म्हणू शकतो?
१३ यहोवाचा प्रकाश त्याच्या लोकांवर चमकत राहील का? होय! यशया ६०:१९, २० यात आपण असे वाचतो: “यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची, चांदण्यासाठी तुला चंद्राची गरज लागणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल, तुझा देव तुझे तेज होईल. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही; तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल; तुझे शोकाचे दिवस संपले आहेत.” आध्यात्मिक बंदिवानांचे “शोकाचे दिवस” १९१९ साली संपुष्टात आल्यानंतर यहोवाचा प्रकाश त्यांच्यावर चमकू लागला. ८० पेक्षा अधिक वर्षांनंतर आजही ते यहोवाची कृपापसंती अनुभवत आहेत आणि त्याचा प्रकाश त्यांवर चमकतच आहे. शिवाय तो चमकायचा थांबणारही नाही. आपल्या उपासकांवर देव सूर्याप्रमाणे “अस्त” होणार नाही किंवा चंद्राप्रमाणे “निस्तेज” होणार नाही. उलट, तो त्यांच्यावर सर्वकाळ प्रकाश चमकवत राहील. या अंधकारात बुडालेल्या जगाच्या शेवटल्या काळात जगणाऱ्यांकरता हे किती अद्भुत आश्वासन आहे!
१४, १५. (अ) देवाचे सर्व लोक कोणत्या अर्थाने “नीतिमान” आहेत? (ब) यशया ६०:२१ अनुसार दुसरी मेंढरे कोणत्या महत्त्वाच्या पूर्णतेची आस धरतात?
१४ यहोवा सियोनेचा पृथ्वीवरील प्रतिनिधी अर्थात देवाचे इस्राएल यासंबंधी काय अभिवचन देतो याकडे लक्ष द्या. यशया ६०:२१ म्हणते: “तुझे सर्व लोक धार्मिक होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील.” १९१९ साली अभिषिक्त ख्रिस्ती पुन्हा एकदा क्रियाशील झाल्यानंतर त्यांचा समूह जगात अतिशय असामान्य असा होता. सर्वस्वी पापमय अशा जगात, ख्रिस्त येशूच्या खंडणी बलिदानावर त्यांच्या अटळ विश्वासामुळे त्यांना ‘नीतिमान ठरवण्यात’ आले. (रोमकर ३:२४; ५:१) मग बॅबिलोनच्या बंदिवासातून मुक्त झालेल्या इस्राएली लोकांप्रमाणे त्यांनी ‘देशाचे’ एका आध्यात्मिक देशाचे अर्थात त्यांच्या कार्यक्षेत्राचे वतन मिळवले ज्याअंतर्गत त्यांना आध्यात्मिक परादीस उपभोगायला मिळणार होते. (यशया ६६:८) या नयनरम्य भूमीचे सौंदर्य कधीही नाहीसे होणार नाही कारण प्राचीन इस्राएलाप्रमाणे एक राष्ट्र या अर्थाने देवाचे इस्राएल कधीही देवाला अविश्वासू होणार नाहीत. त्यांचा विश्वास, त्यांची सहनशक्ती आणि त्यांचा आवेश यांमुळे सदैव यहोवाच्या नावाचे गौरव होत राहील.
१५ त्या आत्मिक राष्ट्राचे सर्व सदस्य नव्या करारात सामील झाले आहेत. या सर्वांच्या अंतःकरणावर यहोवाचे नियमशास्त्र लिहिले आहे आणि यहोवाने येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर त्यांच्या पापांची क्षमा केली आहे. यिर्मया ३१:३१-३४) तो त्यांना आपली “मुले” म्हणून नीतिमान ठरवतो आणि ते परिपूर्ण असल्यागत त्यांच्याशी व्यवहार करतो. (रोमकर ८:१५, १६, २९, ३०) दुसऱ्या मेंढरांतील त्यांच्या सोबत्यांच्या पापांची देखील येशूच्या बलिदानाच्या आधारावर क्षमा करण्यात आली आहे आणि अब्राहामाप्रमाणे त्यांना विश्वासायोगे देवाचे मित्र म्हणून नीतिमान ठरवण्यात आले आहे. “ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” आणि हे दुसऱ्या मेंढरांतील साथीदार आणखी एका उल्लेखनीय आशीर्वादाची आस धरतात. ‘मोठ्या संकटातून’ पार झाल्यावर किंवा पुनरुत्थान झाल्यावर, सबंध पृथ्वीचे परादीसात रूपांतर होईल तेव्हा यशया ६०:२१ येथील शब्दांची भौतिक रूपात पूर्णता झालेली त्यांना पाहायला मिळेल. (प्रकटीकरण ७:१४; रोमकर ४:१-३) तेव्हा, “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:११, २९.
(वाढ होतच आहे
१६. यहोवाने कोणती उल्लेखनीय प्रतिज्ञा केली आणि ती कशाप्रकारे पूर्ण झाली आहे?
१६ यशयाच्या ६० व्या अध्यायातील शेवटल्या वचनात आपण या अध्यायातील यहोवाचे शेवटले अभिवचन वाचतो. तो सियोनेस म्हणतो: “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” (यशया ६०:२२) आपल्या या काळात यहोवाने त्याचा शब्द पाळला आहे. १९१९ साली अभिषिक्त ख्रिश्चनांना क्रियाशील अवस्थेत पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्यात आले तेव्हा त्यांची संख्या फार कमी होती—अक्षरशः “सर्वात लहान” होती. पण जसजसे अधिकाधिक आत्मिक इस्राएली येऊ लागले तससशी त्यांची संख्या वाढत गेली. आणि मग दुसरी मेंढरे मोठ्या संख्येने त्यांच्याकडे झुंडीने येऊ लागली. देवाच्या लोकांमधील शांतीमय स्थिती पाहून, अर्थात त्यांच्या ‘देशातील’ आत्मिक परादीसमुळे प्रामाणिक अंतःकरणाचे इतके लोक आकर्षित झाले आहेत की जो “सर्वात लहान” त्याचे खरोखरच “बलाढ्य राष्ट्र” झाले आहे. सध्या या ‘राष्ट्राची’ म्हणजे देवाचे इस्राएल आणि ६० लाखांहून अधिक समर्पित ‘परदेशी’ लोकांची संख्या जगातील कित्येक सार्वभौम राष्ट्रांच्या जनसंख्येपेक्षा अधिक आहे. (यशया ६०:१०) यातील सर्व नागरिक यहोवाचा प्रकाश प्रतिबिंबित करण्यात सहभाग घेतात आणि यामुळे ते त्याच्या नजरेत शोभायमान ठरतात.
१७. यशया अध्याय ६० च्या या चर्चेमुळे वैयक्तिकरित्या तुमच्यावर कसा परिणाम झाला आहे?
१७ होय, यशयाच्या ६० व्या अध्यायातील मुख्य मुद्द्यांची चर्चा विश्वासाला पुष्टी देणारी आहे. आपले लोक आत्मिक बंदिवासात जातील आणि मग त्यांना पुनरुज्जीवित करण्यात येईल हे यहोवाला इतक्या काळाआधी ठाऊक होते हे जाणून खरोखर दिलासा मिळतो. आपल्या काळात खऱ्या उपासकांच्या संख्येत होणारी प्रचंड वाढ यहोवाने इतक्या काळाआधी पाहिली हे पाहून आपण अवाक् राहतो. शिवाय, यहोवा आपल्याला कधीही सोडणार नाही हे आठवणीत ठेवल्यामुळे आपल्याला किती सांत्वन मिळते! ‘सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती असणाऱ्यांकरता’ ‘शहराच्या’ वेशी सदैव उघड्या राहतील हे आश्वासन देखील किती प्रेमळ आहे! (प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW) यहोवा सर्वदा आपल्या लोकांवर प्रकाशमान राहील. सियोन सर्वकाळाकरता एक भूषण ठरेल कारण तिची मुले आपला प्रकाश अधिकाधिक प्रज्वलित करत राहतील. (मत्तय ५:१६) निश्चितच देवाच्या इस्राएलासोबत जवळचा सहवास राखण्याचा आणि यहोवाचा प्रकाश प्रतिबिंबित करण्याच्या बहुमानाची सदैव कदर बाळगण्याचा आपला निर्धार अधिकच पक्का झाला आहे यात शंका नाही!
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
• विरोधाच्या संबंधाने आपण कशाविषयी खात्री बाळगू शकतो?
• सियोनेच्या मुलांनी कशाप्रकारे ‘राष्ट्रांचे दूध शोषून घेतले आहे’?
• यहोवाने कोणत्या अर्थाने “लाकडांच्या जागी तांबे” आणले आहे?
• कोणत्या दोन गुणांवर यशया ६०:१७, २१ येथे भर देण्यात आला आहे?
• “सर्वात लहान” त्याचे “बलाढ्य राष्ट्र” कशाप्रकारे बनले?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१८ पानांवरील चौकट/चित्रे]
यशयाची भविष्यवाणी”—सर्व मनुष्यजातीकरता प्रकाश
या लेखांतील माहिती २००१/०२ च्या “देवाच्या वचनाचे शिक्षक” प्रांतीय अधिवेशनांतील एका भाषणात सादर करण्यात आली होती. बऱ्याच अधिवेशनांच्या ठिकाणी भाषणाच्या शेवटी यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता प्रकाश, (इंग्रजी) खंड दुसरा या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणा करण्यात आली. याआधीच्या वर्षी, यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता प्रकाश, (इंग्रजी) खंड पहिला, प्रकाशित झाल्याची घोषणा करण्यात आली होती. या नव्या प्रकाशनामुळे आता यशयाच्या पुस्तकातील जवळजवळ प्रत्येक वचनाचे अद्ययावत विवरण आता उपलब्ध झाले आहे. हे दोन्ही खंड यशयाच्या भविष्यसूचक व विश्वास उत्प्रेरक पुस्तकाची समज व कदर वाढवण्याकरता अत्यंत सहायक ठरत आहेत.
[१५ पानांवरील चित्रे]
हिंसक विरोधाला तोंड देतानासुद्धा ‘यहोवा आपल्या लोकांचे तारण करून त्यांना शोभायमान करत आहे’
[१६ पानांवरील चित्रे]
देवाचे लोक राष्ट्रांतील साधनसंपत्तीचा उपयोग शुद्ध उपासनेच्या प्रगमनशील वाटचालीकरता करत आहेत
[१७ पानांवरील चित्रे]
यहोवाने आपल्या लोकांना संघटनात्मक प्रगती आणि शांती देऊन आशीर्वादित केले आहे