२००३ मधील आंतरराष्ट्रीय अधिवेशने
२००३ मधील आंतरराष्ट्रीय अधिवेशने
शनिवार, ऑक्टोबर ६, २००१ रोजी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाच्या सदस्यांची वार्षिक सभा जर्सी सिटी, न्यू जर्सी, अमेरिका येथे भरवण्यात आली होती. या सभेनंतर, सर्व सदस्यांना आणि त्यांच्या पाहुण्यांना एका खास कार्यक्रमाचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. दुसऱ्या दिवशी, कॅनडा आणि अमेरिका येथील चार शहरांमध्ये भरवण्यात आलेल्या अतिरिक्त सभांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या सदस्यांनी भाषणाच्या शेवटी पुढील प्रमाणे घोषणा केली:
“भविष्याकडे पाहिल्यावर कळते, की देवाच्या लोकांनी एकत्र मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रेषित पौलाने आर्जवले, की एकत्र मिळण्यासोबत आपण एकमेकांना उत्तेजन देखील दिले पाहिजे; आणि, यहोवाचा महान व भयप्रेरक दिवस जसजसा जवळ येताना पाहतो तसतसे हे अधिक केले पाहिजे. (इब्री लोकांस १०:२४, २५) या शास्त्रवचनीय आज्ञेनुसार, आम्ही पुढील वर्षी [२००२] जगाच्या सर्व भागांमध्ये प्रांतीय अधिवेशने भरवण्याची आशा करत आहोत. आणि मग, २००३ साली, यहोवाची इच्छा असेल तर कदाचित जगाच्या काही विशिष्ट भागांमध्ये खास आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवली जातील. जगात ज्या घडामोडी होत आहेत त्या अनुषंगाने आता हा जागृत व सतर्क राहण्याचा समय आहे.”
सध्याचे व्यवस्थीकरण जसजसे आपल्या अंताजवळ येत आहे तसतशी अनिश्चितता आणि दबाव वाढत चालले आहेत; परंतु देवाच्या लोकांचे कार्य पुढे चालू राहिले पाहिजे. राज्याच्या सुवार्तेची व बायबलमधील इशाऱ्याच्या संदेशाची, सर्व राष्ट्रांना, वंशांना, निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना घोषणा केली पाहिजे; त्यांना ‘देवाची भीति बाळगून त्याचे गौरव करण्यास’ सांगितले पाहिजे “कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे.” (प्रकटीकरण १४:६, ७) यास्तव, आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार व मर्जीनुसार २००३ सालामध्ये जगाच्या विविध भागांमध्ये आंतरराष्ट्रीय अधिवेशनांची योजना केली जात आहे.
पहिल्यांदा, उत्तर अमेरिका आणि त्यानंतर युरोपच्या काही शहरांमध्ये या अधिवेशनांची तात्पुरती आखणी करण्यात आली आहे. २००३ सालाच्या सुरवातीला किंवा मध्यापर्यंत, उमेदवारांच्या गटांसाठी आशियातील काही शहरांत जाण्याची योजना केली जाईल; २००३ सालाच्या शेवटी, अतिरिक्त गट आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि पॅसिफिक क्षेत्रातील अधिवेशनांसाठी जातील. काही विशिष्ट शाखांना, सीमित उमेदवारांना विशिष्ट अधिवेशनांस पाठवण्याची विनंती केली जाईल; त्यामुळे सर्वांनाच अधिवेशनांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले जाणार नाही. पण, प्रत्येक ठिकाणी सीमित उमेदवारांचा एक गट विविध राष्ट्रांचे प्रतिनिधीत्व करील, हे उत्तेजनात्मक असेल.
यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना लवकरच या मेळाव्यांविषयीची माहिती पाठवण्यात येईल. आमंत्रित उमेदवारांना उपस्थित राहता येईल अशा विशिष्ट शहरांची आणि तारखांची माहिती त्यांच्या शाखा दफ्तरांकडून पुरवण्यात येईल. तेव्हा, सध्याच तुम्ही याविषयी जादा माहितीसाठी किंवा चौकशीसाठी आम्हाला लिहू नये अशी विनंती करण्यात येते.
निवडलेले उमेदवार, समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार असतील व ते स्थानिक बांधवांना प्रेम दाखवण्यात स्वतःचे चांगले उदाहरण मांडतील. आणि स्थानिक बांधवांना परदेशाहून आलेल्या बंधूभगिनींचे प्रेमाने स्वागत करून त्यांना आदरातिथ्य दाखवण्याची संधी मिळेल. (इब्री लोकांस १३:१, २) अशाने, त्यांना ‘परस्परांना . . . उत्तेजन’ देता येईल. (रोमकर १:११, १२) अमुक देशात किंवा देशांत उमेदवारांना पाठवण्यास ज्या शाखांना आमंत्रित केले जाईल त्या शाखांना या योजनांविषयीची अधिक माहिती पुरवण्यात येईल.
बहुतेक देशांत नेहमीप्रमाणे २००३ साली तीन दिवसांच्या प्रांतीय अधिवेशनांची योजना करण्यात येईल. एकत्र आल्याने सर्वांना ‘ऐकण्याची, शिकण्याची व बोध [“उत्तेजन,” NW]’ घेण्याची संधी मिळते. (अनुवाद ३१:१२; १ करिंथकर १४:३१) शिवाय, देवाच्या सर्व लोकांना “परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन” पाहता येईल. (स्तोत्र ३४:८) सर्व आंतरराष्ट्रीय अधिवेशनांत व बहुतेक प्रांतीय अधिवेशनांत, मिशनरी उपस्थित असतील; काही मिशनऱ्यांचा कार्यक्रमात भागही असेल.
या वर्षी, आपण “आवेशी राज्य उद्घोषक” प्रांतीय अधिवेशनांचा आनंद लुटणार आहोत; आणि या अधिवेशनांद्वारे आपल्याला मोठ्या प्रमाणावर साक्ष देण्याची प्रेरणा मिळेल. येत्या वर्षासाठी यहोवाने आपल्यासाठी काय राखून ठेवले आहे त्याची आपल्या सर्वांना नक्कीच उत्कंठा लागेल. यामुळे हा कठीण व महत्त्वाचा काळ लक्षात ठेवून ‘जागृत राहण्यास व सिद्ध असण्यास’ आपल्याला मदत मिळेल.—मत्तय २४:४२-४४.