व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात

ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात

ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात

“देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने [“सत्याने,” Nw] केली पाहिजे.”योहान ४:२४.

१. देवाला कोणत्या प्रकारची उपासना संतुष्ट करते?

यहोवाचा एकुलता एक पुत्र, येशू ख्रिस्त याने त्याच्या स्वर्गीय पित्याला कशाप्रकारची उपासना संतुष्ट करते याविषयी अगदी स्पष्टपणे सांगितले. सूखार शहराजवळील एका विहिरीपाशी एका शोमरोनी स्त्रीला उत्साहवर्धक साक्ष देत असताना येशूने म्हटले: “तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता; आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करितो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे; तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व सत्याने केली पाहिजे.” (योहान ४:२२-२४) या शब्दांतून आपण काय समजावे?

२. शोमरोनी लोक कशाच्या आधारावर उपासना करत होते?

शोमरोनी लोकांचे काही चुकीचे धार्मिक दृष्टिकोन होते. ते पवित्र शास्त्रवचनांतील केवळ पहिली पाच पुस्तके प्रेरित आहेत असे मानत होते—आणि हीसुद्धा शोमरोनी पेन्टेट्यूक नावाच्या त्यांच्या स्वतःच्या भाषांतरानुसार. शोमरोनी लोकांना देवाची खऱ्‍या अर्थाने ओळख झाली नव्हती पण यहुद्यांना मात्र शास्त्रवचनांबद्दलचे ज्ञान बहाल करण्यात आले होते. (रोमकर ३:१, २) यहोवाची कृपा अनुभवण्याची संधी विश्‍वासू यहुद्यांना व इतरांनाही होती. पण यासाठी त्यांना काय करावे लागणार होते?

३. देवाची उपासना “आत्म्याने व सत्याने” करण्यात काय सामील आहे?

यहोवाला संतुष्ट करण्यासाठी यहुद्यांनी, शोमरोन्यांनी आणि गतकाळातील इतर लोकांनी काय करण्याची गरज होती? त्यांना “आत्म्याने व सत्याने” उपासना करावयाची होती. आपणही असेच केले पाहिजे. आत्म्याने उपासना करण्याचा अर्थ, देवाची सेवा उत्साहीपणे, आवेशाने केली पाहिजे आणि प्रीती व विश्‍वासाने प्रेरित झालेल्या अंतःकरणाने केली पाहिजे, असा असला तरीसुद्धा देवाची उपासना आत्म्याने करण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा आपल्यावर असणे आणि त्याच्या आत्म्याचे मार्गदर्शन आपण स्वीकारणे खासकरून आवश्‍यक आहे. देवाच्या वचनाच्या अभ्यासामुळे व त्यानुसार आचरण केल्यामुळे आपला आत्मा, अर्थात आपली मनोवृत्ती देवाच्या मानसिकतेशी जुळली पाहिजे. (१ करिंथकर २:८-१२) आपली उपासना यहोवाने स्वीकारण्याजोगी ठरण्याकरता त्याची उपासना खरेपणाने अर्थात सत्याने करणे देखील आवश्‍यक आहे. ती देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये देवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल प्रकट केलेल्या सत्यानुसार असली पाहिजे.

सत्य सापडणे अशक्य नाही

४. सत्याविषयी काहींचे काय मत आहे?

तत्त्वज्ञानाच्या विशिष्ट अभ्यासकांनी एका अशा मताचा पुरस्कार केला आहे, की अंतिम सत्य हे मनुष्याच्या अवाक्याबाहेर आहे. स्वीडिश लेखक ऑल्फ ऑलबर्ग यांनी तर असे लिहिले: “तत्त्वज्ञानाचे अनेक प्रश्‍न अशा प्रकारचे आहेत की त्यांचे निश्‍चित उत्तर देणे शक्यच नाही.” काहीजण म्हणतात त्याप्रमाणे सत्य खरोखर केवळ सापेक्ष असते का? येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार, नाही.

५. येशू या जगात का आला होता?

आपण पुढील दृश्‍य प्रत्यक्ष पाहात आहोत अशी कल्पना करा: सा.यु. ३३ वर्षाची सुरवात आहे आणि येशू रोमी सुभेदार पंतय पिलातासमोर उभा आहे. येशू पिलाताला सांगतो: “मी ह्‍यासाठी . . . जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” पिलात म्हणतो: “सत्य काय आहे?” पण येशूच्या उत्तराकरता तो थांबत नाही.—योहान १८:३६-३८.

६. (अ) ‘सत्याची’ व्याख्या कशी करण्यात आली आहे? (ब) येशूने आपल्या अनुयायांना कोणते काम सोपवले?

“सत्य” याची व्याख्या, “खऱ्‍या गोष्टी, घटना अथवा वस्तुस्थितींचा संचय.” (वेबस्टर्स नाइन्थ न्यू कॉलिजिएट डिक्शनरी) पण येशूने सर्वसामान्य सत्याविषयी साक्ष दिली का? नाही. तो विशिष्ट सत्याबद्दल बोलत होता. आपल्या अनुयायांना त्याने या सत्याची घोषणा करण्याची आज्ञा दिली कारण त्याने त्यांना म्हटले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) या व्यवस्थीकरणाचा अंत होण्याआधी येशूचे खरे अनुयायी सबंध पृथ्वीवर ‘सुवार्तेचे सत्य’ घोषित करणार होते. (मत्तय २४:३; गलतीकर २:१४) हे येशूच्या पुढील शब्दांच्या पूर्णतेत घडणार होते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) त्यामुळे, सर्व राष्ट्रांत राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याद्वारे कोण सत्य शिकवत आहेत हे ओळखणे महत्त्वाचे आहे.

आपल्याला सत्य कसे शिकता येईल

७. यहोवा सत्याचा उगम आहे हे तुम्ही कशाप्रकारे दाखवू शकता?

यहोवा आध्यात्मिक सत्याचा उगम आहे. किंबहुना, स्तोत्रकर्ता दावीद याने यहोवाला “सत्यस्वरूप देव” म्हटले. (स्तोत्र ३१:५; ४३:३) येशूने कबूल केले की त्याच्या पित्याचे वचन सत्य आहे आणि त्याने असेही घोषित केले: “संदेष्ट्याच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकविलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो.” (योहान ६:४५; १७:१७; यशया ५४:१३) तर मग स्पष्टपणे जे सत्याचा शोध घेत आहेत त्यांना यहोवाने, अर्थात महान शिक्षकाने शिकवले पाहिजे. (यशया ३०:२०, २१) सत्य शोधणाऱ्‍यांनी “देवाविषयीचे ज्ञान” मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (नीतिसूत्रे २:५) आणि यहोवाने अत्यंत प्रेमळपणे वेगवेगळ्या मार्गांनी सत्य शिकवले किंवा कळवले आहे.

८. देवाने कोणकोणत्या मार्गांनी सत्य शिकवले अथवा कळवले आहे?

उदाहरणार्थ, देवाने इस्राएल लोकांना नियमशास्त्र देवदूतांच्या माध्यमाने दिले. (गलतीकर ३:१९) स्वप्नांतून त्याने कुलपिता अब्राहाम व याकोब यांना आशीर्वादित करण्याचे अभिवचन दिले. (उत्पत्ति १५:१२-१६; २८:१०-१९) देवाने काही प्रसंगी स्वर्गातून आकाशवाणी देखील केली. उदाहरणार्थ येशूचा बाप्तिस्मा झाला त्या वेळी पृथ्वीवर ही रोमांचक वाणी ऐकू आली: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१७) तसेच देवाने बायबल लेखकांना प्रेरणा देण्याद्वारे सत्य कळवले याबद्दलही आपण कृतज्ञ आहोत. (२ तीमथ्य ३:१६, १७) देवाच्या वचनातून शिकण्याद्वारे आपल्याला ‘सत्यावर विश्‍वास’ ठेवता येईल.—२ थेस्सलनीकाकर २:१३.

सत्य व देवाचा पुत्र

९. देवाने सत्य प्रकट करण्याकरता आपल्या पुत्राचा कशाप्रकारे उपयोग केला आहे?

देवाने खासकरून आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्या माध्यमाने मानवजातीला सत्य प्रकट केले आहे. (इब्री लोकांस १:१-३) किंबहुना, येशूने ज्याप्रकारे सत्य वचने सांगितली त्याप्रकारे आधी कोणत्याही मानवाने सांगितली नव्हती. (योहान ७:४६) त्याचे स्वर्गारोहण झाल्यानंतरही त्याने आपल्या पित्याविषयीचे सत्य प्रकट केले. उदाहरणार्थ, प्रेषित योहानाला “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण” झाले. येशू ख्रिस्ताला हे प्रकटीकरण देवाकडून झाले. “ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले.”—प्रकटीकरण १:१-३.

१०, ११. (अ) येशूने ज्या सत्याविषयी साक्ष दिली त्याचा संबंध कशाशी आहे? (ब) येशूने सत्याला वास्तविक रूपात कसे प्रकट केले?

१० येशूने पंतय पिलाताला आपण सत्याविषयी साक्ष देण्याकरता पृथ्वीवर आलो असे सांगितले. आपल्या सेवाकार्यादरम्यान, येशूने हे सत्य प्रकट केले ज्याचा संबंध ख्रिस्ताच्या राजवटीखाली यहोवाच्या राज्याकरवी त्याच्या सार्वभौमत्वाच्या दोषनिवारणाशी होता. पण सत्याला साक्ष देण्याकरता येशूने केवळ प्रचार करणे व लोकांना शिकवणे पुरेसे नव्हते. येशूने सत्याला पूर्ण करण्याद्वारे त्याला वास्तविक स्वरूप दिले. म्हणूनच प्रेषित पौलाने लिहिले: “खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका; ह्‍या बाबी पुढे होणाऱ्‍या गोष्टींच्या छाया आहेत; शरीर [“वास्तविकता,” NW] तर ख्रिस्ताचे आहे.”—कलस्सैकर २:१६, १७.

११ सत्याला वास्तविक स्वरूप मिळण्याचे एक उदाहरण म्हणजे भविष्यवाणीनुसार बेथलेहेममध्ये झालेला येशूचा जन्म. (मीखा ५:२; लूक २:४-११) तसेच, ६९ ‘वर्षांच्या सप्ताहांती’ मशीहा प्रकट होईल यासंबंधी दानीएलाने केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली तेव्हासुद्धा सत्य वास्तविकता बनले. येशूने आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळी स्वतःला देवाच्या सेवेकरता सादर केले आणि सा.यु. २९ साली बरोबर भाकीत केलेल्या वेळी पवित्र आत्म्याने त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हा हे घडले. (दानीएल ९:२५; लूक ३:१, २१, २२) येशूने राज्य उद्‌घोषक या नात्याने केलेल्या उद्‌बोधक सेवाकार्यामुळे देखील सत्य वास्तविक बनले. (यशया ९:१, २, ६, ७; ६१:१, २; मत्तय ४:१३-१७; लूक ४:१८-२१) त्याचा मृत्यू व पुनरुत्थान यांच्याद्वारे देखील ते वास्तव रूपात प्रकट झाले.—स्तोत्र १६:८-११; यशया ५३:५, ८, ११, १२; मत्तय २०:२८; योहान १:२९; प्रेषितांची कृत्ये २:२५-३१.

१२. ‘सत्य मीच आहे’ असे येशू का म्हणू शकला?

१२ सत्य येशू ख्रिस्तावरच केंद्रित असल्यामुळे तो असे म्हणू शकला: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहान १४:६) देवाच्या उद्देशांत येशूच्या भूमिकेचा स्वीकार करून आपण ‘सत्याचे आहोत’ असे जे लोक दाखवतात ते आध्यात्मिक अर्थाने स्वतंत्र होतात. (योहान ८:३२-३६; १८:३७) मेंढरांसमान लोक सत्याचा स्वीकार करून विश्‍वासूपणे ख्रिस्ताचे अनुकरण करत असल्यामुळे त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल.—योहान १०:२४-२८.

१३. आपण कोणत्या तीन बाबींसंबंधी शास्त्रवचनांतील सत्याचे परीक्षण करणार आहोत?

१३ येशूने व त्याच्या प्रेरित शिष्यांनी पोचता केलेला सत्य शिकवणुकींचा संचय म्हणजेच खरा ख्रिस्ती धर्म. जे “विश्‍वासाला मान्यता” देतात ते ‘सत्यात चालत राहतात.’ (प्रेषितांची कृत्ये ६:७; ३ योहान ३, ४) तर मग आज कोण सत्यात चालत आहेत? कोण खरोखर सर्व राष्ट्रांना सत्य शिकवत आहेत? या प्रश्‍नांचा विचार करत असताना आपण सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांवर लक्ष केंद्रित करू आणि (१) धार्मिक विश्‍वास, (२) उपासना पद्धती आणि (३) वैयक्‍तिक आचरण या तीन बाबींसंबंधी शास्त्रवचनांतील सत्याचे परीक्षण करू.

सत्य व धार्मिक विश्‍वास

१४, १५. शास्त्रवचनांसंबंधी सुरवातीच्या ख्रिश्‍चनांच्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या मनोवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटते?

१४ सुरवातीचे ख्रिस्ती लोक यहोवाच्या लिखित वचनाला खूप महत्त्व देत होते. (योहान १७:१७) त्यांचे सर्व धार्मिक विश्‍वास व रितीरिवाज यांकरता ते त्यास आधार मानत होते. दुसऱ्‍या व तिसऱ्‍या शतकातील क्लेमेंट ऑफ ॲलेक्झँड्रिया याने म्हटले: “उत्कृष्टतेच्या शोधात असल्यामुळे ते सत्याचा शोध तोपर्यंत थांबवणार नाहीत जोपर्यंत त्यांच्या विश्‍वासांकरता त्यांना खुद्द शास्त्रवचनांतून पुरावा सापडणार नाही.”

१५ सुरवातीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणे यहोवाचे साक्षीदार देखील बायबलला खूप महत्त्व देतात. त्यांचा असा विश्‍वास आहे की ‘प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध ह्‍याकरिता उपयोगी आहे.’ (२ तीमथ्य ३:१६) तर आता आपण सुरवातीच्या ख्रिश्‍चनांच्या काही विश्‍वासांचे परीक्षण करू आणि त्यासंदर्भात, यहोवाचे साक्षीदार बायबलला आपले मुख्य पाठ्यपुस्तक मानत असल्यामुळे त्यांना काय शिकायला मिळाले आहे हे विचारात घेऊ या.

मृतांविषयी सत्य

१६. मृतांविषयी सत्य काय आहे?

१६ शास्त्रवचनांत जे सांगितले आहे त्यावर विश्‍वास असल्यामुळे आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी मृतांविषयी सत्य शिकवले. त्यांनी हे कबूल केले की मानव मरतात तेव्हा शरीरातून काहीही बाहेर पडून स्वतंत्ररित्या अस्तित्वात राहात नाही. शिवाय त्यांना हेसुद्धा माहीत होते की “मृतांस तर काहीच कळत नाही.”—उपदेशक ९:५, १०.

१७. मृतांकरता असलेल्या आशेचे तुम्ही कसे स्पष्टीकरण कराल?

१७ तरीसुद्धा, येशूच्या सुरवातीच्या शिष्यांना मृतांविषयी ही खात्रीलायक आशा होती की देवाच्या स्मृतीत असलेल्या मृतांचे पुनरुत्थान होईल, म्हणजेच ते पुन्हा जिवंत होतील. हा विश्‍वास पौलाने व्यक्‍त केला होता. त्याने असे घोषित केले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी . . . आशा मी देवाकडे पाहून धरितो.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) काही काळानंतरही तथाकथित ख्रिस्ती मीन्युक्युस फेलिक्स याने लिहिले: “मुळात देवानेच निर्माण केलेल्या माणसाला तो पुन्हा नव्याने निर्माण करू शकत नाही असे मानण्याइतका कोण मूर्ख किंवा बेअक्कल असेल?” पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे यहोवाचे साक्षीदार मृत्यू, व पुनरुत्थान यांविषयी शास्त्रवचनांतील सत्याला जडून राहतात. आता आपण देव व ख्रिस्त हे कोण आहेत याविषयी पाहू या.

सत्य व त्रैक्य

१८, १९. त्रैक्याची शिकवण शास्त्रवचनांवर आधारित नाही असे आपण का म्हणू शकतो?

१८ देव, ख्रिस्त व पवित्र आत्मा तिन्ही मिळून एक आहेत असे सुरवातीचे ख्रिस्ती मानत नव्हते. एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यात असे म्हटले आहे: “त्रैक्य हा शब्द किंवा या शिकवणुकीचे स्पष्टीकरण नव्या करारात आढळत नाही. तसेच जुन्या करारात असलेली शीमा [एक हिब्रू प्रार्थना] योग्य नाही असे येशूने किंवा त्याच्या अनुयायांनीही कधीच सुचवले नाही. ती प्रार्थना अशी होती: ‘हे इस्राएला, श्रवण कर, आपला देव परमेश्‍वर हा अनन्य परमेश्‍वर आहे.’ (अनुवाद ६:४).” ख्रिस्ती लोक रोमी त्रिएक अथवा इतर कोणत्याही देवतांची उपासना करत नव्हते. केवळ यहोवाची उपासना केली पाहिजे या येशूच्या विधानाचा त्यांनी स्वीकार केला. (मत्तय ४:१०) शिवाय, ख्रिस्ताच्या पुढील शब्दांवर त्यांचा विश्‍वास होता: “माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.” (योहान १४:२८) आज यहोवाच्या साक्षीदारांचेही हेच विश्‍वास आहेत.

१९ येशूच्या सुरवातीच्या अनुयायांनी देव, ख्रिस्त व पवित्र आत्मा यांच्यातला भेद स्पष्टपणे ओळखला. किंबहुना, त्यांनी शिष्यांना त्रिएक देवाच्या नावाने नव्हे, तर (१) पित्याच्या, (२) पुत्राच्या आणि (३) पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दिला. यहोवाचे साक्षीदार देखील शास्त्रवचनातील हे सत्य शिकवतात आणि त्यामुळे देव, त्याचा पुत्र व पवित्र आत्मा वेगवेगळे आहेत हे ओळखतात.—मत्तय २८:१९.

सत्य व बाप्तिस्मा

२०. बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींना कशाविषयीचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे?

२० येशूने आपल्या अनुयायांना, लोकांना सत्य शिकवून त्यांना शिष्य बनवण्याची आज्ञा दिली. बाप्तिस्मा घेण्यासाठी योग्य बनण्याकरता त्यांना शास्त्रवचनांचे मूलभूत ज्ञान असणे आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ, पिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांचे स्थान व अधिकार त्यांनी कबूल करणे आवश्‍यक आहे. (योहान ३:१६) तसेच पवित्र आत्मा व्यक्‍ती नसून देवाची सक्रिय शक्‍ती असल्याचेही बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍यांनी समजून घेणे आवश्‍यक आहे.—उत्पत्ति १:२.

२१, २२. बाप्तिस्मा केवळ सत्य मानणाऱ्‍यांकरता आहे असे तुम्ही का म्हणाल?

२१ सुरवातीच्या ख्रिश्‍चनांमध्ये बाप्तिस्मा घेणाऱ्‍या व्यक्‍ती सज्ञान आणि पश्‍चात्तापी व्यक्‍ती होत्या ज्यांनी देवाची इच्छा करण्याकरता स्वतःला विनाअट समर्पित केले होते. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरूसलेम येथे जमलेल्या यहुदी व यहुदी मतानुसारी लोकांना आधीपासूनच इब्री शास्त्रवचनांचे ज्ञान होते. प्रेषित पेत्राकडून मशीहा येशू याच्याविषयी ऐकल्यानंतर जवळजवळ ३,००० जणांनी “संदेशाचा स्वीकार केला” आणि “त्यांचा बाप्तिस्मा झाला.”—प्रेषितांची कृत्ये २:४१; ३:१९-४:४; १०:३४-३८.

२२ ख्रिस्ती बाप्तिस्मा सत्य मानणाऱ्‍यांकरता आहे. शोमरोनातील लोकांनी सत्याचा स्वीकार केला आणि “फिलिप्प देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्‍यांविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्‍वास बसला आणि पुरुष व स्त्रिया ह्‍यांचा बाप्तिस्मा झाला.” (प्रेषितांची कृत्ये ८:१२) एक श्रद्धाळू यहुदी मतानुसारी असलेल्या व यहोवाविषयीचे ज्ञान असलेल्या कूशी षंढाने आधी मशीहाच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेविषयी फिलिप्पाचे मार्गदर्शन मान्य केले आणि मग बाप्तिस्मा घेतला. (प्रेषितांची कृत्ये ८:३४-३६) नंतर, पेत्राने कर्नेल्याला व इतर विदेश्‍यांना सांगितले की “जो [देवाची] भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे” आणि येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या प्रत्येकाला त्याच्या पापांची क्षमा मिळते. (प्रेषितांची कृत्ये १०:३५, ४३; ११:१८) येशूने ‘शिष्य करा व जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा’ अशी जी आज्ञा दिली होती त्याच्या एकवाक्यतेत हे सर्व होते. (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८) यहोवाचे साक्षीदार त्याच आदर्शानुसार चालतात; ते बाप्तिस्म्याकरता केवळ अशाच व्यक्‍तींचा स्वीकार करतात ज्यांना शास्त्रवचनांचे मूलभूत ज्ञान आहे आणि ज्यांनी देवाला स्वतःचे जीवन समर्पित केले आहे.

२३, २४. ख्रिस्ती बाप्तिस्म्याचे योग्य स्वरूप कोणते आहे?

२३ सत्य मानणाऱ्‍यांकरता पाण्याखाली पूर्णपणे बुडवून बाप्तिस्मा घेणे उचित आहे. यार्देन नदीत येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर तो ‘पाण्यातून वर आला.’ (मार्क १:१०) कूशी षंढाचा एका ‘पाणवठ्यात’ बाप्तिस्मा झाला. फिलिप्प व तो “दोघे पाण्यात उतरले” आणि मग “ते पाण्यातून वर आले.” (प्रेषितांची कृत्ये ८:३६-४०) बायबलमध्ये बाप्तिस्म्याचा लाक्षणिक पुरले जाण्याशी संबंध जोडण्यात आला आहे, त्यावरूनही पाण्यात पूर्णपणे बुडवण्याचा अर्थ सूचित होतो.—रोमकर ६:४-६; कलस्सैकर २:१२.

२४ दी ऑक्सफोर्ड कम्पॅनियन टू द बायबल यात असे म्हटले आहे: “नव्या करारातील विशिष्ट बाप्तिस्म्यांच्या वर्णनांवरून असे दिसून येते की व्यक्‍तीला पाण्याखाली बुडवून बाप्तिस्मा दिला जात असे.” फ्रेंच ग्रंथ विसाव्या शतकातील लेरूस (पॅरिस १९२८) यात म्हटल्याप्रमाणे, “सुरवातीच्या खिस्ती धर्मियांना जेथे कोठे पाणी उपलब्ध होते तेथे पाण्यात बुडवूनच बाप्तिस्मा देण्यात येई.” येशूनंतर—ख्रिस्ती धर्माचा उत्कर्ष (इंग्रजी) यात सांगितल्याप्रमाणे: “सर्वात मूलभूत स्वरूपात, [बाप्तिस्मा] घेऊ इच्छिणाऱ्‍याने विश्‍वासाचा अंगीकार करून येशूच्या नावाने पाण्यात पूर्णपणे बुडून वर येणे आवश्‍यक होते.”

२५. पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

२५ मूळ ख्रिश्‍चनांच्या बायबलवर आधारित विश्‍वासांविषयी व उपासनापद्धतीविषयी वरील मुद्दे केवळ उदाहरणादाखल उल्लेखण्यात आले आहेत. त्यांच्या व यहोवाच्या साक्षीदारांत समान असलेल्या इतर अनेक विश्‍वासांची उदाहरणे देता येतील. पुढील लेखात आपण सत्य शिकवत असलेल्या लोकांना ओळखण्याच्या आणखी काही मार्गांवर विचार करू.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• देव कशाप्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो?

• येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने सत्य वास्तविक स्वरूपात कशाप्रकारे प्रगट झाले?

• मृतांविषयीचे सत्य काय आहे?

• ख्रिस्ती बाप्तिस्मा कशाप्रकारे दिला जातो आणि बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍यांकडून काय अपेक्षा केली जाते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

येशूने पिलाताला सांगितले: ‘मी सत्याविषयी साक्ष देण्यास या जगात आलो आहे’

[१७ पानांवरील चित्र]

‘मी सत्य आहे’ असे येशूने का म्हटले हे तुम्ही स्पष्ट करू शकता का?

[१८ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती बाप्तिस्म्याविषयीचे सत्य काय आहे?